समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सातवा - अध्याय १ ला
नारद - युधिष्ठिर संवाद आणि जय-विजयाची कथा -
राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्)
सम समस्त भूतांना समप्रीय सुहृद हरी ।
सामान्यां परि तो ऐसा इंद्रार्थ दैत्य का वधी ? ॥१॥
स्वयंपूर्ण असाची तो उदास भद्र तो असे ।
निर्गूण असल्याने त्यां दैत्याचा द्वेष ना कधी ॥२॥
भगवत् प्रेमसंपन्ना संदेह सम या गुणा ।
कृपया आमुचा तुम्ही मिटवा संशयो पुरा ॥३॥
श्रीशुकदेव सांगतात -
महाराजा ! खरा छान प्रश्न हा पुसला असे ।
अद्भूत हरिच्या लीला येणे भक्तीच वाढते ॥४॥
प्रल्हादाचे असे येश गाती प्रेमेचि नारद ।
सांगतो सर्व ती वार्ता पिता व्यास नमोनिया ॥५॥
अजन्मनी पराव्यक्त भगवान् निर्गुणी तरी ।
स्वीकारी गुण मायेचे बाध्य बाधक दोन्हिही ॥६॥
सत्व रज तमो ऐसे प्रकृतीचे तिन्ही गुण ।
गुण ते नच ईशाचे, सवे ना वाढती उणे ॥७॥
गुणासी कालमानाने श्रीहरीही स्विकारतो ।
सत्वार्थ ऋषिचा जन्म रजार्थ दैत्य जन्मती ॥
तमार्थ राक्षसा जन्म अभ्यूदय गुणा तसा ॥८॥
काष्ठात असतो अग्नी परी नेत्रा न तो दिसे ।
आत्माराम तसा देही असुनी नच तो दिसे ॥
मथिता काष्ठिचा अग्नी प्रगटोनी दिसे जना ।
आंतरर्यामी तसा आत्मा पाहती साधु संत ते ॥९॥
(इंद्रवज्रा)
इच्छी जधी ईश स्वतास देह
रजो गुणे सृष्टि करी निराळी ।
उत्कृष्टदेही रमण्यास इच्छी
सत्वागुणाची रचि तोच सृष्टी ।
नी झोपण्याचे जधि ईश इच्छी
तदा तमाला नित वाढवी तो ॥१०॥
सृष्टीस निर्मि हरि आश्रयास
काळाधिनी ना म्हणुनीच देव ।
सत्वात वाढे बळ देवतांचे
ते वाढावया प्रगटे हरीच ।
संहारितो तो तमि दैत्य सारे
तसे पहाता सम श्रीहरी तो ॥११॥
(अनुष्टुप्)
राजा ! या विषयी मोठ्या प्रेमाने नारदे कथा ।
कथिली राजसूयात धर्माच्या प्रश्न उत्तरा ॥१२॥
महान राजसूयात धर्मे आश्चर्य पाहिले ।
चेदिराजा शिशूपाल समक्ष कृष्णि पावला ॥१३॥
तिथे नारद ते होते राये चकित होवुनी ।
सभेत मुनिच्या श्रेष्ठ नारदा प्रश्न टाकिला ॥१४॥
युधिष्ठिराने विचारिले -
मोठी विचित्र ही गोष्ट भक्तां हि दुर्लभो असे ।
द्वेषी या शिशुपाळाला गती ती लाभली कशी ? ॥१५॥
मुनी रहस्य हे काय आम्ही ते जाणु इच्छितो ।
भगवद्द्वेषि तो वेन पूर्वी नर्कात पातला ॥१६॥
दमघोषसुतो पापी शिशुपाल नि तो तसा ।
वक्रदंते हरीसी या बरळोनिहि द्वेषिले ॥१७॥
पाणी पिऊनिया यांनी शिव्या कृष्णास की दिल्या ।
न त्यांना लाभला नर्क न कोड जिभिसी तसा ॥१८॥
उलटे भगवत्प्राप्ती अत्यंत ती कठीणची ।
त्या दोघा सहजी मोक्ष लाभला काय कारणे ॥१९॥
हवेने हालते ज्योत चळे बुद्धी तशी मम ।
सर्वज्ञ तुम्हि तो आहा रहस्य समजाविणे ॥२०॥
श्रीशुकदेव सांगतात -
राजाचा प्रश्न एकोनी प्रसन्न जाहले मुनी ।
नृपा संबोधुनी ऐसी सभेत बोलले कथा ॥२१॥
श्रीनारद म्हणाले -
निंदास्तुती तिरस्कार सत्कार शरिरास या ।
विवेके नच बघता राजा ! प्रकृति पूरूषा ॥२२॥
शरीरा मानिता आत्मा मी हा भाव तसा दृढे ।
भेदाने मूळ ते एक तेणे पीडा मनास या ॥२३॥
अभिमाने तनूच्या या मृत्यु तो मानि आपुला ।
हरिसी नाहि हे कांही हिंसा त्यासी न स्पर्शिते ॥२४॥
म्हणोनी दृढ वैराने भक्तिने वा भये तसे ।
स्नेहाने वा सकामे जो भजे त्या सम श्रीहरी ॥२५॥
वाढे तन्मयता जैसी वैरभावात हे नृपा ।
तेवढी नच ती वाढे भक्तियोगातही पहा ॥२६॥
भृंगी कीटास आणोनी बंद छिद्रात ती करी ।
ध्यासाने कीटही भृंगी होतसे नच संशय ॥२७॥
सूत्र हे हरिसी लागू लीलें माणूस वाटतो ।
वैराही चिंतने याच्या शुद्ध होता पदी मिळे ॥२८॥
एक ना कैक ते द्वेषी स्नेहे कामे नि त्या भये ।
मनात भगवान् ध्याता पापीही पोचले पदा ॥२९॥
गोपिंनी प्रेमभावाने कंसाने भय घेवुनी ।
द्वेषाने शिशुपालाने यादवे बंधु मानुनी ॥
स्नेहाने तुम्हि नी आम्ही भक्तिने भजले तया ॥३०॥
भक्तिचे पाच हे स्त्रोत वेण त्यात न तो कुठे ।
सारंश हाच की याचा मना कृष्णास अर्पिणे ॥३१॥
महाराजा ! तुझे दोघे मावस्बंधूच दोन्हि ते ।
भगवत्पार्षदो होते शापानेच्युत जाहले ॥३२॥
राजा युधिष्ठिराने विचारले -
भगवत्पार्षदांनाही कोणी शाप असा दिला ।
अनन्यप्रेमी ते भक्त अतर्क्य सर्व वाटते ॥३३॥
वैकुंठी राहती त्यांची तनू प्राण अप्राकृत ।
प्राकृतीं पातले कैसे सांगा काय प्रकार तो ॥३४॥
श्रीनारद सांगतात -
एकदा सनकादीक विधिमानसपुत्र जे ।
स्वच्छंद फिरता गेले वैकुंठधाम पाहण्या ॥३५॥
पुराण परिही चारी पाच वर्षाचिती मुले ।
वस्त्रहीन अशा अंगे द्वारी रक्षकि रोधिले ॥३६॥
तेणे ते क्रोधले आणि वदले शाप तो असा ।
रज तमी न की पात्र विष्णुच्या पदि राहण्या ॥
शीघ्र जा पापयोनीस असूर म्हणुनी जगा ॥३७॥
पाहिले पडता शापे तदा संते कृपाळु हे ।
तीनची भोगणे जन्म येथ या वदले पुन्हा ॥३८॥
हिरण्यकश्यपूबंधू हिरण्याक्ष दितीसुत ।
दैत्य दानव वंशात श्रेष्ठ पुत्र चि हे द्वय ॥३९॥
वराह अवताराने हिरण्याक्षास मारिले ।
नृसिंह अवताराने हिरण्यकशपू पुन्हा ॥४०॥
हिरण्यकश्यपू याने पुत्र प्रल्हादभक्तला ।
भक्तिच्या कारणे केल्या यातना मारण्या तया ॥४१॥
तो पुत्र हरिचा प्रीय समदर्शी नि शांतची ।
रक्षिले हरिने त्याला न मेला तो पित्याकरें ॥४२॥
राजा पुढेहि ते दोघे विश्रवा मुनिच्या मुळे ।
केशिनीपुत्रही झाले कुंभकर्ण नि रावण ॥४३॥
त्या वेळी भगवान् रामे तयांना वधिले असे ।
मार्कंडेय मुखाने ते चरित्र ऐकणे पुन्हा ॥४४॥
पुढच्या तिसर्या जन्मी शिशुपाल नि तो दुजा ।
दंतवक्त्र अशा नामे क्षत्रीय कुळि जन्मले ॥
भगवत्चक्र स्पर्शाने जाहले शापमुक्त ते ॥४५॥
वैरभावा मुळे दोघे स्मरले नित्य श्रीहरी ।
तयाचे फळ त्या दोघा भगवत्पदि पावले ॥
पार्षदो हरिचे दोघे झाले वैकुंठि ते पुन्हा ॥४६॥
राजा युधिष्ठिराने विचारिले -
हिरण्यकश्यपू याने स्वपुत्रा द्वेषिले कसे ।
महात्मा तो असोनिया सांगा प्रल्हाद कीर्ति ती ॥४७॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ ५ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|