समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय १८ वा

अदिति व दितीच्या संतानाचे वर्णन, तसेच मरुद्‌गणांच्या उत्पत्तीचे वर्णन -


श्री शुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
सवितापत्‍नि पृश्नीच्या गर्भे संतान आठ ते ।
व्याहृती त्रयि सावित्री अग्निहोत्र नि तो पशू ।
चातुर्मास्य तसा सोम आठवा तो महामख ॥ १ ॥
भगाची पत्‍नि सिद्धीला महिमा विभु नी प्रभू ।
पुत्र आशिष नावाची पुत्री ती गुणि सुंदरी ॥ २ ॥
धाताच्या कुहुनी राका सीनीवाली अनूमती ।
सायंप्रातः तसा दर्श पूर्ण मास असे मुले ॥ ३ ॥
धाताचा धाकटा बंधू विधाता पत्‍नि त्यां क्रिया ।
तिला पुरिष्य नावाचे पंचाग्नी पुत्र जाहले ॥
चरिषिणी वरुणा पत्‍नी हिच्यापोटी भृगू पुन्हा ।
ब्रह्म्याचे पुत्र जे होते पूर्वजन्मात हेच की ॥ ४ ॥
वाल्मिकी जो महायोगी वरुणाचाच पुत्र तो ।
वाल्मिकी पासुनी झाला म्हणोनी नाम वाल्मिक ॥
उर्वशी पाहता मित्रवरुणाचेही वीर्य ते ।
गळाले धरिले त्यांनी मृत्तिकाघटि तेधवा ॥ ५ ॥
अगस्त्य मुनि नी त्यांत वसिष्ठ ऋषि जन्मले ।
मित्राची रेवती पत्‍नी तिला पुत्र असे पहा ।
उत्सर्ग आणि आरिष्ट तिसरा पिप्पलो असे ॥ ६ ॥
इंद्राची पत्‍नि ती होती पुलोमानंदिनी शची ।
जयंत ऋषभो मिढ्वान् एकले पुत्र हे तिचे ॥ ७ ॥
स्वयं ते भगवान् विष्णू माये वामन जाहले ।
व्यापिले तिन्हिही लोक त्रिपाद भूमि मागता ॥
तयांचि पत्‍नि ती कीर्ती बृहच्छ्लोकहि पुत्र त्यां ।
सौभगादी असे कैक त्याजला पुत्र जाहले ॥ ८ ॥
कश्यपा अदिती गर्भे वामनो जन्मला कसा ।
तयाचे गुण नी लीला आठव्या स्कंधि पाहुया ॥ ९ ॥
कश्यपाची दुजी पत्‍नी दितीचा वंश ऐकणे ।
जयात भगवद्‌भक्त प्रल्हाद बळि जन्मले ॥ १० ॥
दितीचे पुत्र ते दोन्ही वंद्य त्या दैत्य दानवा ।
हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षचि बंधु ते ॥ ११ ॥
हिरण्यकशिपूपत्‍नी कयाधू पुत्रि जंभची ।
संर्‍हाद नी अनूर्‍हाद र्‍हाद प्रल्हाद पुत्र नी ॥ १२ ॥
सिंहिका कयधूपुत्री जी दिली विप्रचित्तिला ।
तिच्या पासोनि राहू तो पुत्र दानव जन्मला ॥ १३ ॥
हाच राहू तया देवे पिताना अमृतो यया ।
मोहिनी रूप घेवोनि चक्राने कापिले असे ।
कृती संर्‍हापत्‍नी ती पंचजन हिचा पुढे ॥ १४ ॥
धमनी र्‍हादची पत्‍नी हिला वातापि इल्वल ।
इल्वले कापिला बंधू अगस्त्या भोज ते दिले ॥ १५ ॥
सूर्म्यानी अनुर्‍हादाला बाष्कलो महिषासुर ।
विरोचन असा पुत्र प्रल्हादा जाहला असे ।
तयाची पत्‍नि ती देवी हिच्या गर्भे बळी पुन्हा ॥ १६ ॥
बळीची अशना पत्‍नी तिला बाणादि शंभर ।
जाहले पुत्र ते ऐसे बळी आख्यान चांगले ।
पवित्र गायना योग्य आठव्या स्कंधि पाहुया ॥ १७ ॥
बाणासुर बळीपुत्र शंकराला उपासिता ।
गणांचा नायको झाला आजही तो तिथे असे ॥ १८ ॥
दितीला आणखी पुत्र एकोण्‌पन्नास ही तसे ।
संतानहीन ते सर्व इंद्राचे जे सरूपची ॥ १९ ॥
राजा परीक्षिताने विचारिले -
मरुद्‌गणे असे काय पुण्य ते साधिले असे ।
त्यजुनी असुरी बुद्धी इंद्राच्यापरि जाहले ॥ २० ॥
माझ्यासह ऋषी सर्व जाणन्यासी स‍उत्सुक ।
रहस्य सांगणे सारे आम्हासी उकलोनिया ॥ २१ ॥
सूतजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
हा प्रश्न मोठा अन सार बर्भी
    भूपे तदा नम्र भावेचि केला ।
संतोषले तै शुक ऐकुनिया
    शाबासकी देउनि बोलले हे ॥ २२ ॥
श्री शुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
ईम्द्राचा घेउनी पक्ष दोन्ही पुत्रास विष्णुने ।
मारिता दिति त्या दुःखे विचार करु लागली ॥ २३ ॥
विषयी निर्दयी क्रूर इंद्र हा राम ! राम गे !
माझे दो मारिले पुत्र त्याच्या घातेचि मी निजे ॥ २४ ॥
लोक राजा प्रभू ही ते इंद्राला वदती पहा ।
एकदिन परी हा हो राख विष्ठाढिगापरी ।
प्राणिया त्रासितो का की नरकी पडणे यये ॥ २५ ॥
इंद्र हा मानितो नित्य शरीरा माजला तये ।
आता मी जन्मिते पुत्र इंद्राचा गर्व जो हरी ॥ २६ ॥
दितीने मनि हे घेता प्रेमे नी विनये तसे ।
सेवा नी सुश्रुषा भाषे जितेंद्रिय अशा व्रते ।
परी कश्यपजी यांना प्रसन्न ठेवु लागली ॥ २७ ॥
पतीचा भाव ती जाणी प्रेमे मधुर ग्भाषणे ।
तिरक्या दृष्टिने त्यांना आकर्षित करी सदा ॥ २८ ॥
विद्वान नी विचारी त्या कश्यपा मोहिले तिने ।
वदले ’पूर्ण हो इच्छा’ स्त्रियांना ना कठीण हे ॥ २९ ॥
सृष्टीच्या त्या उषःकाली असम्ग सर्व जीव तै ।
ब्रह्म्याने पाहता अर्धी स्त्रियांची सृष्टि निर्मिली ।
बुद्धी त्या पुरुषांची तै स्त्रिया आकर्षिती पहा ॥ ३० ॥
हां मी सांगत ते होतो दितीने सेविला पती ।
तिला प्रसन्न झाले ते हासुनी बोलले असे ॥ ३१ ॥
कश्यपजी म्हणाले -
अनिंद्य सुंदर्ती प्रीये प्रसन्नतुज जाहलो ।
इच्छिसी माग ते सर्व न उणे पति पावता ॥ ३२ ॥
शास्त्रात कथिले स्पष्ट स्त्रीसी पतिच देव तो ।
प्रिये समस्त जीवान वसतो वासुदेव तो ।
प्रिये स्मस्त जीवान वसतो वासुदेव तो ॥ ३३ ॥
विभिन्न देवता रूपा नामासी तोचि कल्पितो ।
कुणाही पूजिता होते समर्पित तयासची ॥
स्त्रियांच्या करिता देव पती हा निर्मिला असे ।
तयाची करणे पूजा वासुदेवचि मानुनी ॥ ३४ ॥
म्हणोनी आपुले प्रीये कल्याणार्थ पतिव्रत्ये ।
अनन्य प्रेमभावाने पूजावा पतिदेव तो ।
प्रियतम असा आत्मा पती तो ईशची असे ॥ ३५ ॥
कल्याणी प्रेमभावाने मज तू पूजिले असे ।
इच्छा सार्‍या करी पूर्ण असतील न ज्या कधी ॥ ३६ ॥
दिति म्हणाली -
विष्णुच्या करवी इंद्रे वधिले मम पुत्र दो ।
मज द्या पुत्र तो ऐसा इंद्रासी ठार मारि जो ॥ ३७ ॥
ऐकता दितिचे शब्द ऋषी पस्तावले पुन्हा ।
वदले हाय हे काय अधर्म पातला अजी ॥ ३८ ॥
पहा मी इंद्रियांच्या या विषया मानिले सुख ।
स्त्रीमाये मोहिले चित्त दीन मी नर्कची अता ॥ ३९ ॥
स्त्रियेचा अन्च तो दोष स्वभावा परि वागली ।
दोषी मी इंद्रिया वश्य परमार्थ न जाणिला ।
स्वार्थही जाणिला नाही माझा धिक्कार हो सदा ॥ ४० ॥
न कोणी जाणि ते सत्य स्त्रियांचे ते चरित्र की ।
अमृत वाटते शब्दीं शरत्पद्मापरी सुख ।
परी हृदय ते तीक्ष्ण सुर्‍याची धारची जशी ॥ ४१ ॥
आशेच्या पुतळ्या स्त्रीया न प्रेम मुळिही तया ।
स्वार्थार्थ मारिती पुत्रा पतीला इतरा करे ॥ ४२ ॥
वदलो पूर्ण हो इच्छा खोटा शब्द न हो कदा ।
इंद्राचा वध मी नेच्छी विषयीं युक्ति साधितो ॥ ४३ ॥
समर्थ कश्यपे ऐसे स्वतासी दोष ते दिले ।
दोन्हीही साधिण्या गोष्टी रुष्ट चित्तेचि बोलले ॥ ४४ ॥
कश्यप म्हणाले -
कल्याणी विधिने एक वर्ष ते व्रत आचरी ।
इंद्रहत्त्यारि हो पुत्र चुकता इंद्रमित्र हो ॥ ४५ ॥
दिति म्हणाली -
व्रता मी पाळिते ब्रह्मन् सांगा ते करणे कसे ।
सोडणे कोणती कर्मे बुद्ध्याच करणेहि जे ॥ ४६ ॥
न हिंसी प्रणिमात्राला क्रिया वाचा मने तसे ।
खोटे शिवी नको ओठी नख केस न काढणे ।
रोमही काढणे नाही अशुभा स्पर्श तो नको ॥ ४७ ॥
जळात शिरुनी स्नान घ्यावे नी नच क्रोधणे ।
न बोलो दुर्जना कांही पारसे वस्त्र ते नको ।
दुजाने धारिली माला ती कदा लेवुही नको ॥ ४८ ॥
उष्टे ते नच भक्षावे मासान्न नच भक्षि तू ।
शूद्राने आणिले तैसे पाहिले जे विटाळसी ।
न भक्षी असेल अन्न् अंजुळी जलपान हो ॥ ४९ ॥
आचम्य नच ते होता उष्ट्या तोंडे फिरू नको ।
संध्येची वेळ ती तेंव्हा मुक्त केस करू नको ॥
शृंगार विण नी संयत् वाणी ती नसता तदा ।
पदरा वीण तू ना जा घराच्या मधुनी कुठे ॥ ५० ॥
न धुता पाय नी ओले उत्तरी पश्चिमेस ते ।
डोके करोनिया तैसे कधीही झोअणे नको ॥
न झोप सोबती कोणा नग्न ही झोंपु तू नको ।
सांध्य प्रातः अशा वेळी झोपणे नच ते मुळीं ॥ ५१ ॥
निषिद्ध कर्म ते त्यागी पवित्र राहणे सदा ।
धुतले वस्त्र लेवोनी सौभाग्य चिन्ह लेववी ॥
सकाळी न पिता पाणी गाय विप्र नि लक्षुमी ।
आणि तो भगवान् विष्णू ययांची करणे पुजा ॥ ५२ ॥
पुन्हा पुष्पे सुगंधाने नैवेद्य वस्त्र भूषणे ।
सुवासिनीस पूजावे पती तो नित्य पूजिणे ।
पतीचे नित्य ते तेज जठरीं मानणे तसे ॥ ५३ ॥
पुंसवन व्रतो ऐसे अखंड एक वर्ष ते ।
अचूक करणे तेंव्हा मिळे इंद्रघ्न पुत्र तो ॥ ५४ ॥
निश्चयी दिति ती होती ठीक ही वदली असे ।
अनायासे व्रता आणि कश्यपी वीर्य घेउनी ।
नियमा पाळिले सर्व दितीने ऐकिले तसे ॥ ५५ ॥
देवेंद्रा कळले सर्व वेष तो बदलोनिया ।
दितीची करण्या सेवा आश्रमी मग पातला ॥ ५६ ॥
दितीच्या साठि तो रोज वेळोवेळी वनातुनी ।
कंद मूळ फळे पुष्प समिधा कुश पत्र नी ।
माती दूर्वा तसे पाणी सेवार्थचि समर्पि तो ॥ ५७ ॥
हरिणीवेष घेवोनी पारधी काम साधवी ।
त्रुटी जाणावया तैसा इंद्र तै पातला असे ॥ ५८ ॥
सदैव ठेवुनी दृष्टी न दिसे त्रुटि कांहिहि ।
सेवेत गुंतला आणि उपाय शोधु लागला ॥ ५९ ॥
व्रतें दुर्बल ती झाली ईशाने मोह टाकिला ।
आचम्य विण नी पाय न धुता झोपली तदा ॥ ६० ॥
योगेश्वर अशा इंद्रे पाहिली संधि ही अशी ।
त्वरे योगबळाने ते गर्भात घुसले तिच्या ॥ ६१ ॥
सुवर्णापरि तो गर्भ वज्राने तोडिला असे ।
रडले सात ते खंड प्रत्येका तोडिले पुन्हा ।
सात सात पुन्हा झाले साताचे तुकडे तदा ॥ ६२ ॥
तयांना मारण्या इंद्र उठता सर्व बोलले ।
देवेंद्रा मारितो कांरे काय केले अम्ही तुला ।
आम्ही बंधू तुझे सर्व मरुद्‌गण असोत की ॥ ६३ ॥
अनन्य प्रेमभावाने इंद्र तै वदला बरे ।
तुम्ही माझेचि बंधू तो आता भीऊ नका तुम्ही ॥ ६४ ॥
ब्रह्मास्त्रा पासुनी जैसा रक्षिला तो परीक्षित ।
रक्षिला हाहि तैसाचि हरीने दितिगर्भ तो ॥ ६५ ॥
आश्चर्य नच ते कांही भजता एकदाहि त्यां ।
होतो तद्‌रूप तो त्यासी हिचे तो व्रत थोर की ॥ ६६ ॥
इंद्राच्या सह ते झाले पन्नास दिति पुत्र ते ।
इंद्रे सावत्रबंधूसी शत्रुभाव न ठेविला ।
देवता सोमपायी या पदासी घेतले तयां ॥ ६७ ॥
जागृत जाहली दीती पन्नास बाळ पाहिले ।
प्रसन्न जाहली चित्ती सुंदरा शालिनी दिती ॥ ६८ ॥
बोलली पाहता इंद्रा मुला मी व्रत पाळिले ।
माझ्या पुत्रे तुला भेय रहावे म्हणुनी असे ॥ ६९ ॥
संकल्प एक पुत्राफ़्चा एकोणपन्नास हे कसे ।
पुत्र इंद्रा जर गुह्य जाणसी तर सांगणे ॥ ७० ॥
इंद्र म्हणाला -
माते गे कळला मागे व्रताचा हेतु तो तुझ्या ।
स्वर्गास सोडुनी आलो व्रताची त्रुटि शोधिली ।
गर्भाचे तुकडे केले संधी साधून ही अशी ॥ ७१ ॥
तुकडे सात ते आधी करिता बाळ सात ते ।
जन्मता एक एकाचे केले सातहि खंडचि ।
मेले ना तरिही कोणी एकोण्‌पन्नास जाहले ॥ ७२ ॥
आश्चर्य पाहिले मी नी केला निश्चय तो मनी ।
हरीभक्ती अशी एक स्वाभाविकचि सिद्धि ती ॥ ७३ ॥
निष्काम भक्तिभावाने भगवद्‌बह्क्ति जो करी ।
मोक्षही नच तो इच्छी अन्याची गोष्ट काय ती ॥ ७४ ॥
जगदीश्वर सर्वांचा आत्मा नी पूज्य देवही ।
पावता स्वयही तोची स्वताला दानही करी ॥
बुद्धिवान् कोण तो ऐसा तयाला भोग मागतो ।
माते हे विषयी भोग नरकाप्रत नेत की ॥ ७५ ॥
जननी प्रिय माझी तू पूज्य तू मज सर्वदा ।
मूर्खतावश मी झालो केले दुष्टचि कृत्य हे ॥
क्षमावे अपराधाते भाग्य हे केवढे असे ।
खंड खंड करोनीया गर्भ जीवित राहिले ॥ ७६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षिता असा शुद्ध इंद्राचा भाव पाहुनी ।
संतुष्ट जाहली चित्ती दितीमाता पुन्हा पुढे ।
मरुद्‌गणासवे इंद्र नमुनी स्वर्गि पातला ॥ ७७ ॥
राजन् मरुद्‌गणाचा हा जन्म मोठाचि मंगल ।
वदलो उत्तरा आता आणखी काय इच्छिसी ॥ ७८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हा ॥ ६ ॥ १८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP