समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सहावा - अध्याय १६ वा
चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवाचे दर्शन -
श्री शुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
राजा रे ! नारदे तेंव्हा जीवात्मा बाळकाचिया ।
प्रत्यक्ष बोलवीले त्या शोकाकुल जनां पुढे ॥ १ ॥
देवर्षी नारद म्हणाले -
होवो कल्याण हे आत्मा पहा माता पिता नि ते ।
संबंधी सुहृदो सर्व वियोगे शोक पावले ॥ २ ॥
म्हणोनी शरिरी यावे शेष आयू जगे ययीं ।
पित्याने दिधल्या भोगा, भोगणे राजवैभवा ॥ ३ ॥
जीवात्मा म्हणाला -
देवर्षे किति तो जन्म घेतले कोण जाणितो ।
कर्माच्या गतिने झालो देवता पशु पक्षिही ॥
मनुष्य योनि त्या कैक फिरलो भटक्या परी ।
कोणत्या जन्मि हे झाले माझे ते माय बाप की ॥ ४ ॥
विभिन्न जन्मि ते होती विभिन्न बंधु मित्र नी ।
मध्यस्थ शत्रु नी द्वेषी उदासीन परस्परा ॥ ५ ॥
सोने चांदी अशा वस्तू घेता नी विकिता पुन्हा ।
जाती एका कडोनीया आत्म्याचे तेचि हे घडे ॥ ६ ॥
सोन्याच्या वस्तु ना स्थीर क्षणीक सोबती असे ।
वस्तुंच्या सहवासाने वस्तूसी ममता वसे ॥ ७ ॥
निरहंकारि नी नित्य आत्मा गर्भात येतसे ।
राहता देह तो मानी शरीरा आपुला म्हणे ॥ ८ ॥
अव्ययी सूक्ष्म नी नित्य सर्वाश्रय स्वतेजस ।
ईशरूप असोनीया मायें विश्वी प्रगटतो ॥ ९ ॥
प्रियाप्रीय नसे त्याला आपुला परका कुणी ।
अद्वितीय असा साक्षी वृत्तीसी जाणि तोच की ॥ १० ॥
कार्यकारण हा साक्षी आत्मा हा सवता असे ।
न त्यासी गुन नी दोष उदासे राहतो स्थित ॥ ११ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
जीवात्मा वदता शब्द सर्व विस्मित जाहले ।
स्नेहाचे तुटले बंध शोक साराहि संपला ॥ १२ ॥
और्ध्वदेहिक ते कर्म केले त्या स्वजने तदा ।
सोडिला स्नेह तो सर्व शोक दुःख जया मुळे ॥ १३ ॥
बाळाला पाजिले वीष त्या राण्या सगळ्या पहा ।
बालहत्त्येमुळे झाल्या लज्जित् श्रीहीन त्या तदा ॥
मुनिंनी बोधिता त्यांना यमुना तटि पातल्या ।
प्रायश्चित्त तिथे झाले विप्र जै सांगती तसे ॥ १४ ॥
परीक्षिता ! तदा राजा ऐकता उपदेश हा ।
करकूपा मधोनीया निघाला नित्य चिंतना ।
तळ्याच्या चिखलातून हत्ती तो निघतो जसा ॥ १५ ॥
यमुनाजळ स्नानाने तर्पिले विधिपूर्वक ।
संयमी जाहला मौनी दोघांच्या पायि लागला ॥ १६ ॥
नारदे पाहिला राजा जितेंद्रिय हरिप्रिय ।
प्रसन्न हौनी त्याला विद्या ही उपदेशिली ॥ १७ ॥
ॐकार रूप भगवान् प्रद्युम्न वासुदेव तू ।
संकर्षण अनिरुद्ध बुद्धी चित्त मनास नी ।
अहंकार अधिष्ठाता वारंवार तुला नमो ॥ १८ ॥
विज्ञानरूप तू शुद्ध आनंदमूर्ति ही तुझी ।
आत्मानंदात तू मग्न शांतही दिससी तसा ॥
द्वेष ना तुजसी स्पर्शी नमस्कार तुला असो ॥ १९ ॥
आनंदरूप तू देवा राग द्वेषास नष्टिसी ।
हृषीकेशा विराटा तू तुजला नमितो पुन्हा ॥ २० ॥
समर्थ नच ही वाणी परते मधुनीच ही ।
परेच्या पुढची वस्तू ती रक्षो नित्यचि अम्हा ॥ २१ ॥
कार्यकारण ही सृष्टी ज्याच्या इच्छे दिसे मरे ।
मृतिआपात्रि जै माती तसा तू भरला असे ।
परब्रह्म अशा रूपा तुजला नमितो पहा ॥ २२ ॥
नभाच्या परि तू आत बाहेर ओत प्रोत नी ।
ज्ञानेंद्रिय मनो बुद्धी स्वशक्त्ये नच जाणिती ।
स्पर्शिना तुजला कर्म तुजला प्रणिपात हा ॥ २३ ॥
(इंद्रवज्रा)
देहेंद्रियी प्राण मनी नि बुद्धी
चैतन्य घेता तव कार्य होते ।
कर्मासि जाळी, जयि लोह तप्त
तू सर्व द्रष्टा नच अन्य कांही ॥ २४ ॥
(भृंगनाद)
औंकार स्वरूप महापुरुषा नमितो । तुझ्या
चरणकमल कलिकेपासी महापुरुष रमती । प्रभो !
सर्व श्रेष्ठ तू, मी आपणा वारंवार नमितो ॥ २५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! असे तेंव्हा चित्रकेतूसि बोधुनी ।
दोघेही ऋषि ते गेले ब्रह्मलोकाकडे तदा ॥ २६ ॥
विद्या जी नारदे केली उपदिष्ट तया परी ।
पिऊनी जळ ते फक्त चित्रकेत्ये अनुष्ठिली ॥ २७ ॥
अनुष्ठानेचि विद्येच्या सातरात्रीहि संपता ।
विद्याधर अधिपती झाला तो चित्रकेतु नी ॥ २८ ॥
पुन्हा कांही दिनांमाजी माहले मन सुद्ध ते ।
हरीच्या चरणापाशी पोचला मग तो असा ॥ २९ ॥
(इंद्रवज्रा)
सिद्धेश्वरांमाजि विराज शेषी
मृणाल गोरा शरिरी असा जो ।
केरीट पीतांबर कंकणे नी
आरक्त नेत्रे मुख ते प्रसन्न ।
आभूषणांनी सजला हरी तो
त्या चित्रकेत्या दिसला स्वनेत्रे ॥ ३० ॥
त्या दर्शने पापहि नष्ट झाले
शुद्धोचि झाले हृदयो तयाचे ।
वाढोनि भक्ती ढळलेचि अश्रू
रोमांच अंगे नमिले पुरूषा ॥ ३१ ॥
प्रेमाश्रु आले हरिच्या पदासी
ते पाय तेंव्हाचि भिजोनि गेले ।
प्रेमेचि कंठो मग दाटला नी
स्तुती करू ना शकलाच कांही ॥ ३२ ॥
नी वेळ जाता मग धैर्य आले
चित्ते विवेके मन रोधिले नी ।
स्तुती जयाची वदतात वेद
त्या श्री गुरूची स्तुति बोलला तो ॥ ३३ ॥
चित्रकेतु म्हणाला -
(आर्या)
अजिता जितेंद्रिया तू जिंकियले तू तुलाच साधुंनी ।
गुणसौंदर्ये तू तो जिंकियले त्यां खराचि धन्यहि तू ॥
जो निष्काम मनाने भजतो त्यासी स्वतास अर्पिसि तू ।
स्थिति लय नी निष्पत्ती तुझ्याचि लीला विसास सर्वहि तो ॥ ३४ ॥
विश्वाचा निर्माता ब्रह्माही तो तुझाच अंशरूपी ।
तरिही स्वतास कर्ता म्हणता खोटी करीहि स्पर्धा ती ॥ ३५ ॥
परमाणूच्या सह तू विश्वाच्याही मधून चेतक तू ।
आदि मधेनी अंती अससी त्याचा तुला न स्पर्शहि तो ॥ ३६ ॥
ब्रह्मांडाचा कोष एकाच्याहुनि दहा दहा पटिने ।
घेरियला हा कवचे पृथ्वी ऐसी सात पुडांची ही ॥
कोटी कोटी ऐसे ब्रह्मांडे ती तुझ्यात फिरती की ।
तरिही अणुच्या ऐसा पत्ता त्यांचा तुला न कांहिच तो ॥ ३७ ॥
जे नरपशु विषयांचा भोग इच्छिती तुलाच नाठविती ।
इंद्रादिंची सेवा करिती भजनी कधीच ना वळती ॥
प्रभूते राजकुलाच्या नाशाने हो उपासमार जना ।
क्षुद्र देवता यांच्या नाशा मध्ये तसेचि पूजिति ते ॥ ३८ ॥
निर्गुण ज्ञान असा तू सकाम भाए तुलाच भजता ते ।
जन्म मृत्युच्या कर्मा थोरा नच हो जळीत बीज असे ॥
जीवा मिळते द्वंद्व सुख दुःखादी गुणातची असती ।
निर्गुण अससी म्हणुनी नच तू देशी मुळात कर्महि ते ॥ ३९ ॥
अजित जधी तू केले समूपदेशो भागवता जगता ।
जिंकियले तै सर्वा म्हणोनि तू तो अजीत सर्वांसी ॥
संग्रह परिग्रह नसता मनीं नसे ज्या मुळीच ममता ती ।
सनकादी परमर्षी मोक्षा घेती ययाचि धर्माते ॥ ४० ॥
शुद्धचि भगवत्धर्म ऐसा की तो सकाम धर्मिहि जो ।
त्यजितो विषमहि बुद्धी माझे मी नी तुझे तसे कांही ॥
याच्या विपरित कोठे धर्मामध्ये विषम विजे होती ।
नच तो धर्म, अशुद्ध नाशवंत नी अधर्म बहुलचि तो ॥ ४१ ॥
सकाम धर्मचि असता स्वतास आणिक दुजास बुडवी तो
नच त्या अपुल्या परका नच हेतू नी मुळीच फळ न मिळे
सकाम धर्मचि असला अनुष्ठिता तो मनास दुखवी तो
दुखवी दुज्यां मनाला नच धर्मो तो अधर्म घडतो तो ॥ ४२ ॥
तू जो कथिला धर्म नच तो विदलित कधीहि परमार्था
चराचराची समता बघती साधू तसेचि आचरती ॥ ४३ ॥
पापचि सरती सारे दर्शन मात्रे तुझ्या मनुष्याचे ।
एकदाचि तव घेता नामा पापी मुक्तचि संसारी ॥ ४४ ॥
झाले शुद्धचि हृदय दर्शन मात्रे तुझ्या बरे झाले ।
परि देवर्षी वाणी मिथ्या होई शक्यचि कधि नाते ॥ ४५ ॥
आत्मा तू जगताचा हेतू तुजला कळेचि सर्वांचा ।
म्हणुनी तुज मी काय सांगू सूर्यापुढे काजवा हा ॥ ४६ ॥
इच्छे तुझ्याचि सारे घडते जगते लयाप्रती जाते ।
भेद दृष्टिने बघता योग्यालाही मुळी न दिससी तू ।
रूप तुझे हे शुद्ध वास्तवरूपा तुला नमस्कार ॥ ४७ ॥
(वसंततिलका)
ब्रह्मादि यत्न करुनी तव शक्ति घेती
नी इंद्रियी विषयभोगि समर्थ होती ।
हे विश्वराइ परि हो शिरि सान ऐसे
सहस्रशीर्ष हरि रे तुज मी नमीतो ॥ ४८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
विद्याधर अधिपती करिता स्तुतिही अशी ।
अनंत भगवान् विष्णु बोलला चित्रकेतुला ॥ ४९ ॥
श्रीभगवान म्हणाले -
महर्षि नारदे आणि अंगिरे तुजला मम ।
विद्याही बोधिली तेंव्हा घडले मम दर्शन ।
माझ्या या दर्शने आता सिद्ध तू श्रेष्ठ जाहला ॥ ५० ॥
समस्त प्राणि ज्या रूपीं रूप ते मम सत्यची ।
आत्मा मी त्या समस्तांचा पोषितो सगळ्यास मी ।
शब्दब्रह्म परब्रह्म माझे रूप सनातन ॥ ५१ ॥
कार्यकारण तो आत्मा जगीं व्याप्त चहूकडे ।
जग हे स्थित त्या आत्मी अधिष्ठान द्वयास मी ॥ ५२ ॥
स्वप्नात झोपला जो तो मनात जग पाहतो ।
स्वप्न ते तुटते तेंव्हा स्वप्न सृष्टीच पाहतो ॥ ५३ ॥
स्वतासी वेगळा पाही तुटता स्वप्न ते दुजे ।
पाही जो सत्य रूपाला तशी माया जिवास ती ।
मायातीत असा साक्षी परमात्मा स्मरा मनीं ॥ ५४ ॥
ज्याच्याने लागते निद्रा अतींद्रिय सुखो मिळे ।
ते ब्रह्म जाणणे मीच आत्मा त्याला तुम्ही म्हणा ॥ ५५ ॥
झोपतो जागतो व्यक्ती आत्मा दोन्हीहि जाणितो ।
तरीही वेगळा आहे ज्ञानब्रह्म असाचि तो ॥ ५६ ॥
विसरे मज तो जीव मानी तै वेगळा स्वता ।
पडे संसार चक्री तो जन्म मृत्यू टळे न त्यां ॥ ५७ ॥
ज्ञान विज्ञान हा स्रोत येथुनी मानवा मिळे ।
मिळाले जरि हे ज्ञान आत्मरूपा न जाणता ।
न मिळे शांति त्या कोठे मिळता योनि कैक त्या ॥ ५८ ॥
राजा संसार भोगाचे प्रयत्नी श्रम क्लेश ते ।
सुखार्थ करिता सर्व दुःखची पदरी पडे ॥
कर्मा पासोनि निवृत्त तयासी भय ना मुळी ।
म्हणोनी त्यजिणे इच्छा कर्माची नी फळाचिही ॥ ५९ ॥
सुखार्थ झटती सारे दुःख ते त्यजिण्यास की ।
सरेना दुःख त्या कर्मे सुख ना मिळते कधी ॥ ६० ॥
बुद्धिवंत स्वता मानी कर्मात फसतो सदा ।
उलटे फळ त्या प्राप्त आत्मा सूक्ष्म नि वेगळा ॥ ६१ ॥
जाणुनी पाहणे सृष्टी विवेके भोग त्यागिणे ।
संतुष्ट राहता ज्ञानीं विज्ञानीं भक्त हो मम ॥ ६२ ॥
योगी श्रेष्ठ असे त्याने जाणणे स्वार्थ हेतुने ।
परमार्थ असे ब्रह्म आत्मा एकचि पाहणे ॥ ६३ ॥
राजा ! सावध चित्ताने श्रद्धा ती धरूनी मनीं ।
स्वीकारी उपदेशा या होशील शीघ्र सिद्धची ॥ ६४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
राजा ! जगद्गुरू भगवान् विश्वात्मा श्रीहरी तदा ।
बोलता चित्रकेतूला अंतर्धानहि पावला ॥ ६५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥ ६ ॥ १६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|