समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय १५ वा

चित्रकेतूला अंगिरा व नारदाचा उपदेश -


श्री शुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
शोकग्रस्त असा राजा प्रेतवत् पडला असे ।
अनेक वचने त्यासी ऋषी हे बोलु लागले ॥ १ ॥
वदले राज्ञ हा बाळ कोन तो पूर्व जन्मिचा ।
तिथे कोण तयाचा तू पुढल्या जन्मि काय ते ? ॥ २ ॥
जलप्रवाहे वाळूचे उटती तुटती कण ।
तसी कालप्रवाहाने प्राण्याची भेट नी तुटी ॥ ३ ॥
बीजाच्या पोटि ते बीज जन्मते मरते पुन्हा ।
तसेचि प्राणि जन्माचे जन्मणे मरणे असे ॥ ४ ॥
जन्माच्या पूर्वि ना कोणी मरता कोणिही नसे ।
म्हणोनी सिद्ध की ऐसे आताही नच ते कुणी ॥ ५ ॥
स्वामी तो भगवान् सर्वां जन्म मृत्यु न त्याजला ।
नीर्मी पोषी नि तो पारी खेळते मूल ते जसे ॥ ६ ॥
बीजाने बीज जै जन्मे तसे मूल पित्यातुनी ।
जीवाचे देह हे भिन्न घटी माती जसी असे ॥ ७ ॥
मृत्तिका तत्त्व ते एक घटांचा भास वेगळा ।
भिन्न हे देह ते सारे अविद्ये कल्पिले असे ॥ ८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
अंगिरे नारदे ऐसे बोधिता चित्रकेतुला ।
धीराने शोक थोपोनी पुसले मुख दो करे ।
आणि दोघे ऋषी यांना पुसता जाहला असा ॥ ९ ॥
ज्ञानवंत तुम्ही दोघे दिसता अवधूत की ।
कृपया सांगणे की ते तुम्ही कोण असा द्वय ॥ १० ॥
जाणितो विषयासक्ता अनेक संत ते जगीं ।
घेवोनी आगळी रूपे फिरती उपदेशिण्या ॥ ११ ॥
वसिष्ठ कपिलो व्यास सनत्कुमर नारद ।
मार्कंडेय तसे अन्य अंगिरा देवलो ऋभु ॥ १२ ॥
भगवान् परशूराम गौतमो मुनि ते शुक ।
दुर्वास याज्ञवल्क्यो नी जातुकर्ण्य पतंजली ॥ १३ ॥
आरुणी रोमशो तैसे दत्तो च्यवन आसुरी ।
बोध्यमुनी वेदशीरा पंचशीरा ऋतुध्वज ॥ १४ ॥
हिर्अण्यनाभ कौशल्य श्रुतदेव तसे मुनी ।
करण्या ज्ञानदानाते फिरती पृथिवीवरी ॥ १५ ॥
प्रभो ! मी विषयासक्त फसलो पशुच्या परी ।
बुडालो अज्ञ अंधारीं ज्ञानाचे तेज द्या मला ॥ १६ ॥
महर्षि अंगिरा म्हणाले -
पुत्रासी लाडिले ज्या तू देणारा मीच अंगिरा ।
तुझ्या हे पुढती ऐसे ब्रह्मपुत्रचि नारद ॥ १७ ॥
अज्ञानीं बुडता केला शोक तू पाहिला अम्ही ।
केला विचार तो आम्ही भक्ता शोक नको असा ॥ १८ ॥
गोष्ट ही सत्य की विप्र हरीचा भक्त जो असे ।
कोणत्याहि प्रसंगात तेणे शोक करू नये ॥ १९ ॥
पूर्वी मी पातलो येथे ज्ञान देण्या तुला तदा ।
पाहिली लालसा पुत्री गेलो पुत्रचि देउनी ॥ २० ॥
पुत्रवंता किती दुःख आता तू जाणिले असे ।
स्त्री गेह धन ऐश्वर्य संपत्ती शब्द रूप नी ॥ २१ ॥
रसादी विषयो राज्य पृथ्वी सेनानि द्रव्य ते ।
सखे नी सोयर्‍यांसाठी अनित्य सर्व ते असे ॥ २२ ॥
म्हणोनी सर्व हे शोक मोह दुःखासि कारणी ।
मनाचे खेळणे मिथ्य नसता भासती खरे ॥ २३ ॥
क्षणात दिसती सारे क्षणात लोपती पुन्हा ।
गंधर्व नगरी स्वप्न जादू खोटी जशी असे ॥ २४ ॥
प्रेरीत कर्म इच्छेने विषय चिंतिता मनीं ।
रचिती कर्म सृष्टीला असत्यचि मनोरथे ॥ २५ ॥
ज्ञानकर्मेंद्रिये संघ जीवाचा देह हा असे ।
जीवासी क्लेश ते देती संताप वाढवी सदा ॥ २६ ॥
म्हणॊनी विषया रोधी मन ते भटको न दे ।
शांत स्वस्थ करी त्यासी त्या द्वारे स्वरुपा पहा ॥
द्वैत भ्रम नि नित्यत्व बुद्धी सोडी ययातुनी ।
शांती स्वरूप आत्म्यात परमात्मा करी स्थिर ॥ २७ ॥
श्रीनारद म्हणाले -
राजा ! एकाग्र चित्ताने मंत्रोपनिषएदास या ।
स्वीकार करणे तेणे सात रात्रीत तू पहा ।
तुला संकर्षणो देव देईल हरि दर्शन ॥ २८ ॥
(वसंततिलका)
राजा शिवादि हरिच्या पद आश्रयासी
    द्वैतासि त्याग करुनी भजले तयाला ।
ज्याच्याहुनी जगिं नसे मुळि कांहि थोर
    तू ही तसाचि करशील पदास प्राप्त ॥ २९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥ ६ ॥ १५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP