समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सहावा - अध्याय १२ वा
वृत्रासुराचा वध -
श्रीशुकदेव सांगतात -
(इंद्रवज्रा)
स्वर्गाहुनी श्रेष्ठचि विष्णुपाद
तै देह युद्धी त्यजुइच्छि दैत्य ।
जै कैटभो श्री हरिसी वधाया
तसाचि इंद्रावरि हाहि गेला ॥ १ ॥
अग्नी जसा तो प्रलयाथ पेटे
तसा त्रिशू घेउनि धावला तो ।
इंद्रावरी गर्जुनि धाव घेता
पाप्या ! वदे तू नच वाचसी रे ॥ २ ॥
उल्कापरी पाहुनि शूळ इंद्रे
शतग्रंथि वज्रा करि घेउनीया ।
कापीयली वासुकिच्या समान
वृत्रासुराची भुज एक तेंव्हा ॥ ३ ॥
तुटोनि गेली भुज एक जेंव्हा
क्रोधेचि तो तै खवळोनि गेला ।
प्रहार केला हनुटीस तेंव्हा
इंद्राचिये वज्र गळोनि गेले ॥ ४ ॥
महान कार्या बघताचि देवे
सिद्धे नि तैत्ये हि प्रशंसियेले ।
परी तदा संकति इंद्र येता
रे याह ! शब्दाहि वदोनि गेले ॥ ५ ॥
परीक्षिता रे ! पडताचि वज्र
वृत्रासुराच्या पडले समीप ।
लज्जार्थ इंद्रे नच घेतले ते
पाहुनि ऐसे मग दैत्य बोले ।
इंद्रा विषादा नच वेळे ही रे
घे वज्र तैसे वध या अरीला ॥ ६ ॥
सर्वज्ञ आदी पुरुषो हरी तो
समर्थ तोची स्थिति नी लयासी ।
त्याच्या विना ना जय तो कधी ही
गर्व्यास लाभे जय-हार दोन्ही ॥ ७ ॥
(अनुष्टुप्)
जाळात फसती पक्षी तसे लोक नि ते नृप ।
यशापयश हे सर्व काळाच्याच अधीन ते ॥ ८ ॥
काळ तो मन देहाला इंद्रिया बळ पोचवी ।
प्राण जीवन नी मृत्यू स्थिती त्याच्या अशा पहा ।
अज्ञ हे नच जाणोनी देती देहास दोष ते ॥ ९ ॥
बाहुल्या नाचती सूत्रे मृग यंत्रेहि नाचती ।
त्या परी भगवम्ताच्या अधीन सर्व लोक हे ॥ १० ॥
कृपा जै नसते त्याची आत्मा-प्रकृति इंद्रिये ।
पंचभौतेहि सृष्टीस निर्माया असमर्थची ॥ ११ ॥
नव्हे हे ज्ञान्ब ज्यांना ते कर्ता जीवास मानिती ।
तो जीवां कडुनी निर्मी संहारी ही तयां करे ॥ १२ ॥
इच्छाही नसता येतो मृत्यू जय पराजय ।
इच्छिले नसता लाभे आयू संपत्ति नी जय ॥ १३ ॥
या साठी सुख दुःखांना नेच्छिणे तो जया-जय ।
जगणे मरणे नेच्छो ठेविले राहणे तसे ॥ १४ ॥
तिन्ही गुण तनूचेची आत्म्याचे नच ते मुळी ।
आत्म्यासी जाणिले ज्याने तया ना दोष लोंपती ॥ १५ ॥
देवेंद्रा ! मजसी पाही हात शस्त्र हिराविता ।
तू पराजितही केले तरी मी लढतो तुज ॥ १६ ॥
जुगार समजी युद्ध प्राणाची पैज येथ जी ।
बाणांची पडती फासे वाहने चौरसा परी ।
कळते युद्धपूर्वीच हरे नी कोण जिंकतो ॥ १७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! स्वच्छ नी सत्य देवेंद्रे ऐकता तदा ।
आदरे घेतले शस्त्र हासोनी नी वदला तया ॥ १८ ॥
देवेंद्र म्हणाला -
दानवा ! सिद्ध पुरुष खरा तू असल्या मुळे ।
धैर्य निश्चय नी भक्ती विलक्षणचि सर्व ते ॥ १९ ॥
माया तू त्यजिली सर्व अवश्य भगवद्लिला ।
सोडिली असुरीवृत्ती महापुरुष जाहला ॥ २० ॥
रजोगुणी असोनीया विशुद्ध सत्वरूप त्या ।
भगवान् वासुदेवास लाविली बुद्धि निश्चये ॥ २१ ॥
स्वामी श्री हरिच्या पायी लावी जो चित्त आपुले ।
तयासी भोग ते तुच्छ जसा अमृत सागती ।
पोहतो तो नच इच्छी पाणी नालीतले पुन्हा ॥ २२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षिता असे दोघे थोरची जान्णण्यास हे ।
धर्म तत्वासि बोलोनी लागले लढण्या पुन्हा ॥ २३ ॥
आता वृत्रासुरे डाव्या हाती परिघ घेउनी ।
आकाशी फिरवोनीया इंद्राच्या वरि फेकिले ॥ २४ ॥
इंद्राने मारुनी वज्र त्याचा परिघ मोडिला ।
तोडिला हात ही त्याचा गजाची सोड जो गमे ॥ २५ ॥
धडाचे तुटले हात रक्तधाराहि वाहिल्या ।
वाटले तुटल्या पंक पडला गिरि थोर हा ॥ २६ ॥
पर्वता परि ती काया चालता पातला पुन्हा ।
हनुटी पृथिवीसी नी स्वर्गासी ऊर्ध्व ओठ तो ॥ २७ ॥
आकाशापरि तो तोंड फाकिता जाहला जणू ।
त्रैलोक्य गिळु हा पाही जीभ सर्पापरी दिसे ॥ २८ ॥
पर्वताप्राय पायाने चालता पातला पुढा ।
सह ऐरावता त्याने गिळिला इंद्रदेव तो ।
बलवान् अज्गरे जैसा गिळावा हत्ति तै तसा ॥ २९ ॥
प्रजापती महर्षींनी पाहिला इंद्र हा असा ।
वदले हाय हा झाला अनर्थ बहु थोर हा ।
अत्यंत जाहले दुःखी शोकही करु लागले ॥ ३० ॥
महापुरुषविद्येने तथा मायाबळेहि तो ।
देवेंद्र नच तो मेला गिळता उदरात त्या ॥ ३१ ॥
वेगाने काढिता झाला वज्र नी फाडिली कुस ।
पर्वता परि ते डोळे कापण्या लागला पुन्हा ॥ ३२ ॥
(इंद्रवज्रा)
सूर्यापरी वेग असोनि वज्रा
फिरोनि चौबाजुस एक वर्ष ।
इंद्रासि वृत्रासुरमान तेंव्हा
कापावयासी धरणीस आला ॥ ३३ ॥
आकाशि तै दुंदुभि वाजल्या नी
गंधर्व सिद्धो वदले हि मंत्र ।
वृत्रासुराची निज आत्म ज्योत
सर्वां समक्षो हरिपायि गेली ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ ६ ॥ १२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|