समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय ११ वा

वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत्प्राप्ती -


श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
जाहलीसे भयभीत दैत्य सेना परीक्षिता ।
बिथरले असे मी ते स्वामी बोल न लक्ष्यिती ॥ १ ॥
हतवीर्य अशी सेना त्या वृत्रासूर नायके ।
पाहिली मारिती देव जशी सेनापती विना ॥ २ ॥
क्रोधला बहु पाहोनी बळाने शत्रु र्होधिले ।
दटावता तयां झाला ओरडोनि पुनः पुन्हा ॥ ३ ॥
भित्र्यांनो क्षुद्र देवांनो पळता पाठ दाउनी ।
लपोनी करिता हल्ला मलमूत्र तुम्ही असा ।
तुम्हासी युद्ध ना शौर्य न तुम्हा स्वर त्या मुळे ॥ ४ ॥
स्वर्गीचे भोग त्यागावे युद्धाची मनिषा तरी ।
सामोरी क्षणची यावे युद्धाची मौज चाखणे ॥ ५ ॥
प्रचंड देहे कायेने शत्रूसी भय दाविता ।
गर्जला सिंहनादाने मूर्छित कैक जाहले ॥ ६ ॥
मूर्छित देवता झाल्या अडल्या भूमिसी जशा ।
अंगासी जाहला पात विजेचा मेघ गर्जने ॥ ७ ॥
(इंद्रवज्रा)
बोरूवनाते तुडवीति हत्ती
    वृत्रासुरे तै शुळ हाति घेता ।
देवांसि त्या तो तुडवोनि गेला
    वेगे तयाच्या हललीहि पृथ्वी ॥ ८ ॥
वृत्रासुराची करणी अशी ही
    न साहि तो की मग इंद्रदेव ।
गदेस फेकी नच साहुनीया
    दैत्ये कराने धरिली लेलेने ॥ ९ ॥
पराक्रमी दैत्यहि लालबुंद
    झाला गदा तीच करात घेई ।
ऐरावताच्या शिरि मारि घाव
    प्रशंसिले त्या बघताच लोके ॥ १० ॥
जै वज्रघाते गिरि होय भग्न
    चेंदा तसा तो गजराज झाला ।
व्याकूळला नी सह इंद्रदेवा
    अठ्ठाविसो हात सरे तदा तो ॥ ११ ॥
विषाद झाला मग इंद्रदेवा
    ऐरावता मूर्छित तै बघोनी ।
धर्मज्ञ वृत्रे नच घाव केला
    व्यथा गजाची दुर केलि इंद्रे ॥ १२ ॥
ज्या शत्रुने मारिला बंधु ऐसा
    तो वज्र घेता दिसला समोर ।
वृत्रासुराला स्मरताचि दुःख
    हांसोनि इंद्रा मग शब्द बोले ॥ १३ ॥
वृत्रासुर म्हणाला -
रे ! भाग्य माझे अरि पाहिली मी
    मारी गुरूसी करि ब्रह्महत्त्या ।
पाषाण चित्ता खुपसोनि शूळ
    ओ ! हो ! क्षणासी तुज मारितो मी ॥ १४ ॥
जो आत्मवेत्ता द्विजबंधु माझा
    निष्पाप ऐसा गुरु यज्ञशाळी ।
विश्वास देता तिन्हिही श्रे त्या
    यज्ञीपशूच्या परि कापियेले ॥ १५ ॥
लज्जा दया कीर्ति नी त्या रमेने
    तुला त्यजील अति नीच तू तो ।
माझ्या त्रिशूळे तुज कापितो मी
    कष्टे तुला आजच मृत्यु आहे ।
पाप्या तुला तो नच स्पर्शि अग्नी
    प्रेता गिधाडे मग टोचतील ॥ १६ ॥
हे अज्ञ देवो तव बाजु घेता
    माझ्यावरी हे धरितात शस्त्र ।
छेदीन यांचे शिर या त्रिशूळे
    नी भैरवांना बळि तो करील ॥ १७ ॥
हे वीर इंद्रा जरि शक्य हे की
    वज्रे तुझ्या येइल मृत्यु आम्हा ।
बळी तनूचा पशू पक्षि यांना
    देई नि जाई तरि पुण्यलोकी ॥ १८ ॥
तुझ्या पुढे शत्रु तुझा असे मी
    तरी न वज्रा नच सोडिसी त्या ।
शंका मनी तू नच कांहि घेवू
    गदा जशी निष्प्रभ ती जाहली ।
जै याचना हो कृपणा पुढे ती
    होईल तै निष्फळ वज्रशस्त्र ॥ १९ ॥
इंद्रा तुझे वज्र हरिकृपेने
    तसे दधीच्येतपि श्रेष्ठ झाले ।
आज्ञापिले श्रीहरिने तुला तो
    मारी तदा तू मज वज्रघाते ।
जेथे हरी तेथ जयो नि लक्ष्मी
    म्हणोनि वज्रे मम मृत्यु सत्य ॥ २० ॥
मी अर्पितो शीर हरीपदासी
    आज्ञाचि संकर्षण याचि आहे ।
वज्रे तुझ्या भोग मिटेल सर्व
    नी मी मुनीजन्मचि मेळवील ॥ २१ ॥
जो भक्त तो श्री हरिचाच प्रीय
    त्याला न तो दे मुळि संपदा ती ।
नत्यात शांती चिर मोद नाही
    नी लाभती कष्ट नि द्वेष शत्रू ॥ २२ ॥
तो स्वामी नष्टी पुरुषार्थ सर्व
    प्रसाद भक्तासि तसाचि लाभे ।
अकिंचना लाभ मिळे ययाचा
    न अन्य कोणा मिळतो असा ही ॥ २३ ॥
भगवत्‍६साक्षात्काराने वृत्रासुर प्रार्थना करतो -
प्रभो करावी मजसी कृपा ही
    अनन्य भावे चरणाश्रयाची ।
घडो असे हेचि पुढील जन्मी
    स्मरो तुझे मंगलगीत चित्ती ।
लागो तुझ्या गायनि वाणि माझी
    सेवेत राहो नित हे शरीर ॥ २४ ॥
मी आपणा सोडुनि स्वर्ग ब्रह्म
    लोकीं तसे भूमिस्वराज सर्व ।
रसातळाचे जरि राज्य सारे
    नी योग सिद्धी नच मोक्ष इच्छी ॥ २५ ॥
पिले जसी पक्षिण नित्य ध्याती
    नी पाडसे दूध पिण्यास माता ।
ध्याते जसी पत्‍नि प्रियोत्तमाला
    उताविळा मी तव दर्शना तै ॥ २६ ॥
नकोचि मुक्ती मज जन्म व्हावे
    तेथे परी संतमैत्री असावी ।
लोभी अशांचा नच संग व्हावा
    गेहादिका माजि गुंतून त्याचा ॥ २७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥ ६ ॥ ११ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP