समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय ५ वा

श्रीनारदकडून दक्षपुत्रांना उपदेश व त्यामुळे त्यांना विरक्ती नी दक्षाचा नारद मुनीस शाप -


श्रीशुकदेव म्हणतात -
(अनुष्टुप्)
भगवत्‌शक्तिसंचारे समर्थ दक्ष जाहला ।
दहा हजार हर्यश्व नामे पुत्रासि जन्मिले ॥ १ ॥
राजन् ! ते सर्वही पुत्र स्वभावे वर्तने सम ।
जधी दक्षे तयां आज्ञा संतान निर्मिण्या दिली ।
करण्या तप तै थोर गेले ते पश्चिमेकडे ॥ २ ॥
तेथे नारायणसरी तीर्थ सिंधूमिखासि नी ।
श्रेष्ठ सिद्धमुनी नित्य राहती संगमी तसे ॥ ३ ॥
करिता तीर्थि त्या स्नान हर्यश्व शुद्ध जाहले ।
हरीसी लागले ध्यान तपासी बसले तिथे ॥ ४ ॥
नारदे पाहिले त्यांना हरीभक्त असोनिया ।
गुंतले पुत्र मोहात तदा ते वदले तयां ॥ ५ ॥
प्रजापती अहो तुम्ही परी मूर्खचि राहिले ।
पृथ्वी ना पाहिली सर्व मग सृष्टी कराल कै ॥ ६ ॥
देश एक असा आहे पुरूष एकची तिथे ।
बीळ मार्ग न येण्याला तिथे स्त्री वहुरूपिणी ।
नी एक पुरुष जो की व्यभिचारिणिचा पती ॥ ७ ॥
तेथ एक नदी ऐसी दो दिशां वाहि सारखी ।
एक हंस असा तेथ विचित्र गोष्ट सर्वही ।
चक्र तेथे असे एक वज्र-खड्गापती गमे ।
आपोआप फिरे नित्य मूर्खांनो वस्तु या पहा ॥ ८ ॥
पित्राज्ञा जाणणे आणि पाह्णे वस्तु सर्व त्या ।
तदाचि सृष्टि ती निर्मू शकता अन्यथा नच ॥ ९ ॥
जन्मजात असे ज्ञानी हर्यश्वे चिंतिले मनीं ।
आणीक गूढ ती वाणी जाणिली नारदी तदा ॥ १० ॥
खरेचि नातदी बोल देह हा पृथिवीच की ।
अनिर्बंध असा आत्मा पाहिल्याविण व्यर्थची ।
ज्ञानाचा अंत ना होता मोक्षकर्महि व्यर्थची ॥ ११ ॥
खरेचि ईश तो एक साक्षी जो जागृतादिचा ।
अतीत आश्रयो मुक्त तयासी जाणणे असे ।
न अर्पिता तयाकर्म जीवासी लाभ काय तो ॥ १२ ॥
माघारा नच ये कोणी संसार बिळ ते असे ।
आत्मज्ञाना विना सर्व स्वर्गादी भोग तुच्छची ॥ १३ ॥
रजादी गुण तो भोगी बुधी ती व्यभिचारिणी ।
विवेक जाणणे कर्म अन्यथा सर्व व्यर्थची ॥ १४ ॥
बुद्धी ती कुलटे ऐसी संगे जीव पराधिन ।
भ्रमे जीव पतीऐसा विवेका विण व्यर्थची ॥ १५ ॥
दो दिशीं वाहते माया निर्मिते मोडिते पुन्हा ।
अज्ञानी विवशी त्याला माया कर्मे न लाभची ॥ १६ ॥
गृह हे पंचवीसाचे शरीर आश्रयो तया ।
कार्यकारण आधार न जाणे तो स्वतंत्र ना ॥ १७ ॥
क्षीर-नीर विवेकाने हंस तो रूप वर्णितो ।
बंध मोक्ष दिशा दावी त्यजिता त्यान लाभ तो ॥ १८ ॥
कालचक्र फिरे नित्य आरे त्याचेचि कापिती ।
कोण तो थांबवी त्याला ? सकाम कर्म व्यर्थची ॥ १९ ॥
शास्त्राने दुसरा जन्म कर्म त्याचे न ऐकणे ।
न जाणी विषया ऐसा निवृत्त कायसाचि हो ॥ २० ॥
हर्यश्वें निश्चयो केला मोक्षपांथस्थ जाहले ।
न फिरो मागुती केव्हा नारदीय परीक्रमा ॥ २१ ॥
देवर्षी स्वरब्रह्मात डुंबले गात गायनी ।
कृष्णचंद्रपदपद्‌मी धानाने फिरु लागले ॥ २२ ॥
परीक्षिता ! जधी दक्षा कळली नारदी कला ।
संतान चांगले होता शोकाचे तेही कारणी ॥ २३ ॥
ब्रह्माने सांत्विले त्याला पाचजण नि नंदिनी ।
आसक्नि गर्भिचे त्याने दिधले पुत्र त्या पुन्हा ।
श्बलाश्व अशा नामे सहस्र पुत्र जाहले ॥ २४ ॥
पिता दक्षाचिया आज्ञे नारायण सरोवरी ।
तपासी पातले तेही जै पूर्व सिद्ध जाहले ॥ २५ ॥
श्बलाश्वे तिथे स्नान करोनी शुद्ध जाहले ।
प्रणवा जापुनी नित्य अखंड लागले तपा ॥ २६ ॥
कांही मास जलो आणि हवा विउनी राहिले ।
ओंकाररूप भगवान श्री नारायण ध्यायिला ॥ २७ ॥
निवसे शुद्ध चित्ती जो अंतर्यामी नि व्यापक ।
परंहंस अशा रूपा मंत्रे या स्तविले तया ॥ २८ ॥
परीक्षिता ! असे दक्षपुत्र ते शबलाश्व हे ।
तपासी लागले तेंव्हा पहिल्या परि नारद ।
कूट शब्दासि योजोनी तयांना बोलु लागले ॥ २९ ॥
म्हणाले दक्षपुत्रांनो ऐकणे उपदेश हा ।
तुमचे बंधुसी प्रेम तयांचा मार्ग तो धरा ॥ ३० ॥
धर्मज्ञ बंधु ते सत्य श्रेष्ठाचा मार्ग जो क्रमे ।
मरुद्‌गणी पुण्यवंत अशांना मोद तो मिळे ॥ ३१ ॥
परीक्षिता ! असे बोल देवर्षी बोलुनी पुढे ।
जाताचि सगळे त्यांच्या मार्गाला अनुसारले ॥ ३२ ॥
अंतर्मुख असा मार्ग भक्ती ही सुंदरो अशी ।
जिथे जाता पुन्हा कोणी न स्मरे भवसागरा ॥ ३३ ॥
दक्षाने पाहिले आज कुशकुण मनात ती ।
पुत्रांची जाहली शंका नारदे लुटिले असे ॥ ३४ ॥
शोकाने भरला दक्ष नारदा कोपला बहू ।
कंपले ओठ चावोनी नारदा बोलला असा ॥ ३५ ॥
दक्ष प्रजापती म्हनाला -
अरे दुष्टा तुझे सोंग खोटे साधुत्व हे असे ।
भिकेसी लाविले माझे पुत्र ते अपकारची ॥ ३६ ॥
पितृदेव ऋषी यांचे पुत्रांनी बाल या वयीं ।
ऋण ते फिडिले नाही पाप्या ! मोकलिले तया ॥ ३७ ॥
हृदयी नच ती माया मुलांना भ्रमिशी असा ।
खरा निर्लज्ज तू होय भगवत्‌पार्षदो कसा ॥ ३८ ॥
जीवांसी करिती माया खरे ते संत जाणि मी ।
प्रेमासी नासिसी तू तो वैरी निष्पापियास तू ॥ ३९ ॥
वैराग्ये तुटती बंध जाणिसी तू असे जरी ।
सोंगाने नच हो त्याग तुझे सोंग असे असे ॥ ४० ॥
नारदा ! विषयो तुच्छ भोगिता कळते मना ।
वैराग्य घडते दुःखी नच ते भेदिता मने ॥ ४१ ॥
गृहस्थी आमुचा धर्म आम्हांसी अपकार हा ।
केलासे जरि तू ऐसा साहिले सर्व हे अम्ही ॥ ४२ ॥
तू तो हा वंश खंडाया पागला पाथिसी असा ।
मूर्खा ! जा भटकंतीच करी की ठाव ना तुला ॥ ४३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षिता ! ’अहो छान’ वदोनी नारदे तया ।
शापासी ग्राहिले आणि साहिले, संत तो खरा ॥ ४४ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ ६ ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP