समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय ४ था

दक्षाकडून भगवंताची स्तुती व भगवंताचे प्रगटणे -


राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्)
भगवन् ! तिसर्‍या स्कंधी मनुष्य नि सुरासुर ।
सर्प पक्षादि सृष्टिचे केले संक्षेपि वर्णन ॥ १ ॥
आता सविस्तरे त्याची इच्छितो जाणण्यास मी ।
भगवान् शक्तिने ज्या की निर्मितो जग सर्व हे ॥ २ ॥
श्रीसूत सांगतात -
शौनकादी ऋषी ऐका प्रश्न सुंदर ऐकुनी ।
कौतुके बोलले शब्द शुक राजा परीक्षिता ॥ ३ ॥
श्रीसुखदेव सांगतात -
प्रचेते दश जे होते प्राचीन्‌बर्हिसुपुत्र ते ।
पाहिली पृथिवी त्यांनी वृषवेष्टित जेधवा ॥ ४ ॥
पाहता क्रोधले सर्व तपाने वृक्ष जाळिले ।
मुखाने अग्नि नी वायू सोडिते जाहले तदा ॥ ५ ॥
परीक्षिता ! प्रचेत्यांनी वृक्षाते जाळिता तयां ।
करण्या शांत तो चंद्र वदला शब्द हे असे ॥ ६ ॥
भाग्यवंत प्रचेत्यांनो ! वृक्ष हे दीन की बहू ।
प्रजापती तुम्ही आहा वृक्षांचा द्रोह टाळणे ॥ ७ ॥
महात्म्यांनो ! प्रचेत्यांनो ! सर्वसत्ताधिशो हितां ।
निर्मिले वृक्ष नी वेली आहर औषधीस हे ॥ ८ ॥
जगी जे उडती पक्षी फल पुष्पादि अन्न त्यां ।
चतुष्पादां तृणो नी ते अपाद भोजना असे ॥
हस्त पादादिका वृक्ष लता पुष्प फळे तशी ।
बैल उंटादि यांचे ते शेतीसी सहकार्यची ॥ ९ ॥
निष्पाप्यांनो तुम्हा देवे नी त्या श्रीपतिने असे ।
बोधिले सृष्टि निर्माया क्रोध नाही उचीत तो ॥ १० ॥
क्रोधा शांत करा तुम्ही पिता आणि पितामहे ।
प्रपित्यें वर्तले जैसे तैसा सन्मार्ग आचरा ॥ ११ ॥
बालका माय नी बापे नेत्रासी पापण्यांनि ही ।
पतीने पत्‍निला आणि गृहस्थे भिक्षुकास नी ।
अज्ञासी ज्ञानि जै रक्षी तसे राखा प्रजेस या ॥ १२ ॥
समस्त प्राणियां मध्ये शक्तिमान् भगवान् वसे ।
जीव हो मंदिरे त्याची मानिल्या पावतो हरी ॥ १३ ॥
क्रोधाग्नी पेटता आत विचारे शांत जो करी ।
तिन्ही गुणांवरी जेता होतो तो काळ चालता ॥ १४ ॥
या हीन दीन वृक्षांना न जाळा राखणे ययां ।
हीत ते रक्षिली कन्या यांनी तीच स्विकारणे ॥ १५ ॥
परीक्षिता ! असे चंद्रे प्रचेत्यां बोलुनी पुन्हा ।
प्रम्लोचा अप्सरापुत्री तयांसी दिधली असे ।
प्रचेत्यें तिजसी लग्न केलेसे त्रेधवा पहा ॥ १६ ॥
प्रचेतस् हा तिच्या गर्भी जन्मला दक्ष नाम त्यां ।
दक्षपुत्रे तिन्ही लोक भरली मग जी प्रजा ॥ १७ ॥
आपुल्या पुत्रिसी लग्न त्यांचे होते प्रेम बहूतची ।
तयांनी आपुल्या वीर्ये प्राणिसृष्टीहि निर्मिली ॥ १८ ॥
जलस्थल नि आकाशी मानवा सुर आसुरा ।
दक्षाने निर्मिले ऐक राजा रे तू परीक्षिता ॥ १९ ॥
तरीही सृष्टिविस्तार न होय पाहि दक्ष जै ।
तदा विंध्याचली घोर तये आरंभिले तप ॥ २० ॥
अघमर्षण हे तेथ पापनाशक तीर्थ तै ।
दक्षे त्रिकाल ते स्नान करोनी हरि ध्यायिला ॥ २१ ॥
हंसगुह्य अशा स्तोत्रे इंद्रियातीत तो हरी ।
स्तविता पावला ऐशा स्तोत्रास ऐकणे तुम्ही ॥ २२ ॥
दक्षप्रजापती म्हणाले -
(इंद्रवज्रा)
नमो पराया अनुभुति श्रेष्ठा
    तुम्ही नियंते अन स्फुर्तिदाते ।
तुम्हा न सीमा नच काळ वेळ
    स्वयं प्रकाशा नमितो तुम्हा मी ॥ २३ ॥
जीवा शिवाची दृढ मैत्रि होय
    परी न कोणा तुम्हि सख्य होता ।
द्रष्टा तुम्ही तो नच दृश्य कांही
    महेश्वराच्या नमितो पदा मी ॥ २४ ॥
धादि वृत्ति अन भूत मात्रा
    न जाणिती ते तव रूप कैसे ।
न जाणिती केवळ तै गुणासी
    ज्ञात्या अनंता नमितो तुमा मी ॥ २५ ॥
जेंव्हा समाधीतचि लोप सर्व
    तेंव्हा चिदानंद तुम्हीच होता ।
प्रभो जयांचे मन शुद्ध तेची
    तुम्हास मंदीर तुम्हा नमस्ते ॥ २६ ॥
काष्ठातला अग्निहि मंत्र योगे
    निघे तसे ज्ञानिहि बुद्धि द्वारा ।
सत्ताविसी शक्ति मधील तू ते
    धुंडोनि घेती हृदयी स्वताच्या ॥ २७ ॥
जी भिन्नता ती तव जाल माया
    तिच्य निषेधे तव रूप पाही ।
माया तुझी नी तव रूप सारे
    प्रसन्न व्हा ! द्या मजला प्रसाद ॥ २८ ॥
जे वाणिने वा मन बुद्धि यांनी
    कळे, न ते तो तव रूप सत्य ।
तुम्ही गुणी ना गुण निर्मिता हो
    नी केवलो तो लयची प्रतीत ॥ २९ ॥
तुम्हातुन्ही हे जग जन्मले मी
    तुम्हाचसाठी तुमचेच सर्व ।
विधी तुम्ही कारण स्वैचि सिद्ध
    ते ब्रह्म तेंव्हा मजला प्रसादा ॥ ३० ॥
प्रभो तुम्ह्या शक्तिचे, वादि नी ते
    विवादि हेही पडती भवात ।
अप्राकृता हो स्वय तू अनंता
    मी आपणाला नमितो प्रभोरे ॥ ३१ ॥
ध्याती तुला ते बभती रुपात
    नी सांख्यवादी वदती अरूप ।
जरी विरोधी गमती विधाने
    दोन्ही हि ते वस्तु स्थितीचि आहे ॥
आधार व्हावा कर-पाद होण्या
    निषेध होतो अवधी वरीच ।
आकार नी रूप विनाहि तूची
    नी ते समब्रह्महि एकटा तू ॥ ३२ ॥
प्रभो अनंता नच नाम रूप
    तुम्ह्या पदासी भजता तदाची ।
बोधावया त्यां मग रूप घेसी
    हे ईश्वरा हो मजला प्रसन्न ॥ ३३ ॥
मनुष्य साधारण नित्य ध्यातो
    अनेक रूपे हृदयात होसी ।
हवा जसी गंधित भाव्समान
    तै भावनेने मज पाव देवा ॥ ३४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
अघमर्षण या तीर्थी दक्षाने स्तविता असे ।
तेंव्हा तो भगवान् देव भक्तवत्सल पातला ॥ ३५ ॥
गरूडस्कंधि ते पाय अष्ट भूजा विशाल त्या ।
शंख चक्र गदा बाण ढाल पाश धनू तसे ।
करात खड्गही धारी ऐसा प्रत्यक्ष राहिला ॥ ३६ ॥
घनश्याम असा देही तो पीतांबर नेसला ।
कंठी कौस्तुभ नी स्कंधी श्रीवत्स चिन्ह शोभले ॥ ३७ ॥
बहूमूल्य असा टोप मकराकार कुंडले ।
कर्धनी अंगठ्या आणि नुपुरे शोभली बहू ॥ ३८ ॥
त्रिलोकप्ति तो मोही त्रैलोका भासला असा ।
नारदो सनकादी ते पार्षदे चहु बाजुला ॥ ३९ ॥
इंद्रादी सिद्ध गंधर्व गुणासी गाउ लागले ।
पाहता हर्षला दक्ष अलौकिक रूपास या ॥ ४० ॥
आनंदे दक्ष राजाने साष्टांग नमिले तया ।
झर्‍यांच्या जलवेगाने नद्या जै भरती तसे ।
आनंदे भरला राजा बोलूही कांहि ना शके ॥ ४१ ॥
परीक्षिता ! तदा दक्ष नम्र होवोनि ठाकला ।
प्रजावृद्धी तया इच्छा जाणिले श्री जनार्दने ॥ ४२ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
भाग्यवान् दक्षराजा रे ! तपस्या सिद्ध जाहली ।
तुझ्या त्या हृदयी माझे श्रद्धेने प्रेम जन्मले ॥ ४३ ॥
प्रजापते ! तपस्या ही विश्ववृद्ध्यर्थ पाहुनी ।
प्रसन्न जाहलो मी तो इच्छा माझीच ती असे ॥ ४४ ॥
प्रजापती मनू ब्रह्मा स्वायंभूव शिवो नि तू ।
माझ्याची विभुती सार्‍या प्राण्या वृद्ध्यर्थची असा ॥ ४५ ॥
तपस्या हृदयो माझे विद्या माझे शरीर की ।
कर्म ते आकृती माझी यज्ञ अंग नि ते मन ।
धर्म नी देवता प्राण जाणावे मन रूप हे ॥ ४६ ॥
नव्हती सृष्टि ही जेंव्हा निष्क्रीय एक मी तदा ।
आत बाह्य न ते कांही द्रष्टा कोणी न दृश्यही ।
अव्यक्त ज्ञानरूपी मी सुषुप्ती सर्व दाटली ॥ ४७ ॥
अनंत गुन आधार दक्षा स्वयंचि मी असे ।
मायेने क्षोभलो तेंव्हा ब्रह्मांड जन्मले असे ।
अयोनिजच तो ब्रह्मा जन्मलासे तयातुनी ॥ ४८ ॥
जेंव्हा चैतन्य त्याच्यात संचार जाहले तदा ।
सृष्टीसी रचिण्या पाही परी तो असमर्थची ॥ ४९ ॥
आज्ञापिले तदा मी त्या तप ते आचरावया ।
तप प्रभाव वाढोनी नवांसी निर्मिले तुम्ही ॥ ५० ॥
पहा पंचजनांची ही पुत्री आसिक्नि नामक ।
पत्‍नी ही म्हणूनी व्हावा स्वीकार हेतु साधण्या ॥ ५१ ॥
स्त्रियेच्या सहवासाचा गृहस्थोचित धर्म हा ।
आसिक्नि धर्म हा घेई प्रजा जन्मेल ती बहू ॥ ५२ ॥
मानसी सृष्टी ही होती या पूर्वी रे प्रजापती ।
परी तुझ्या पुढे सर्व संयोगे निपजेल की ।
आणीक वाढता सारे सेवितील मलाच ते ॥ ५३ ॥
जगज्जीवन तो ईश बोलता गुप्त जाहला ।
स्वप्नीची सृष्टि जे नष्टे भंगता स्वप्न जेधवा ॥ ५४ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चवथा अध्याय हा ॥ ६ ॥ ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP