समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय ३ रा

यम आणि यमदूतांचा संवाद -


राजा परिक्षिताने विचारले -
(इंद्रवज्रा)
धर्मा वशीभूतचि सर्व जीव
    त्याच्या दुतांचा अवमान झाला ।
वृत्तांत सारा जधि त्या दुतांनी
    त्यां ऐकविता यम काय बोले ? ॥ १ ॥
मुनी मधी मी नच ऐकिले कीं
    ती धर्म आज्ञा कुणि मोडियेली ।
संदेह याचा जनतेत होई
    तुम्हाविना ना नच दूर होई ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
भगवत्‌पार्षदे केला दूतांचा यत्‍न निष्फळ ।
संयमनीपुरा गेले नी तेथे वदले यमा ॥ ३ ॥
दूत म्हणाले -
प्रभो ! त्या जगतामध्ये पाप पुण्ये नि मिश्रित ।
जन ते करिती कर्म शास्त्रे त्यांचे किती वदा ॥ ४ ॥
जर बाहू तिथे शास्ते तदा न्याय कसा मिळे ।
कुणा दुःख कुणा सौख्य व्यवस्था नच हो अशी ॥ ५ ॥
अनेक करिता कर्म तयां शास्ते जधी बहू ।
ते तो मांडलिकां ऐसे सामंत राज्यि जै असे ॥ ६ ॥
अधीश्वर तुम्ही जीवा सर्वां शासकही तुम्ही ।
पापपुण्या तुळोनीया न्याये तुम्हीच दंडिता ॥ ७ ॥
तुमच्या नियमा कोणा न कधी अवमानिले ।
परी आज कुणी सिद्धे आज्ञेसी अवमानिले ॥ ८ ॥
प्रभो हो तुमच्या आज्ञे एका पाप्यासि आणिता ।
पार्षदे बल यत्‍नाने तयासी सोडवीयले ॥ ९ ॥
रहस्य सांगणे याचे इच्छिता तरि ते तसे ।
नरायण असा शब्द पाप्याने वदला तदा ।
न भियी ! न भियी । ऐसे वदता पातले पहा ॥ १० ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
जेंव्हा दूते असा प्रश्न केला तेंव्हा यमे तदा ।
प्रसन्न होवुनी चित्ती हरी स्मरुनि बोलले ॥ ११ ॥
यमराज म्हणाले -
(इंद्रवज्रा)
माझ्याहुनी स्वामि जगात श्रेष्ठ
    वस्त्रात दोरा जयि व्यापिला तो ।
त्याचेचि अंशे हरि ब्रह्म सांब
    यांच्या कराने जग वेसनी जो ॥ १२ ॥
गळ्यासि नी दावुनि बैल बद्ध
    तै विप्र वेदे जिव बद्ध सर्व ।
सर्वस्व त्याच्या भयि जीव देती
    अर्पोनिया श्री हरिसीच नित्य ॥ १३ ॥
मी इंद्र नी न्र्‌ऋति चंद्र वायू
    नी सूर्य ब्रह्मा हर वैश्वदेव ।
मरुत् वसू आठ नि सिद्ध साध्य
    नी रूद्र भृगू नि प्रजापती ही ॥ १४ ॥
सत्वप्रधानी जरि सर्व झाले
    माये मधे सर्वचि गुंतलेलो ।
त्याच्या मनीं काय करी कधी तो
    आम्हा न ठावे मग काय अन्या ॥ १५ ॥
घटा पटा ना दिसते स्वरूप
    तसेचि अंतःकरणी असोनी ।
जो स्थीत आत्मा जिव त्यां न पाही
    प्राणे मने शब्द नि इंद्रियांनी ॥ १६ ॥
स्वामी प्रभू सर्व जगासि एक
    मायापती त्या पुरुषोत्तमाचे ।
ती पार्षदे जी हरिच्या समान
    संपन्न ऐसे फिरती जगात ॥ १७ ॥
श्री विष्णूचे पार्षद पूज्य देवां
    दुर्लभ्य त्यांचे पददर्शने ही ।
भक्तासि ते रक्षिति अग्नि आणि
    त्या संकटी नी मज पासुनीया ॥ १८ ॥
ती धर्म सीमा हरि तोचि दावी
    नजाणिती त्या ऋषि देव सिद्ध ।
मनुष्य विद्याधर चारणादी
    असूर त्याते मग काय जाणो ॥ १९ ॥
(अनुष्टुप्)
भगवद्‌धर्म तो शुद्ध भगवंतेचि निर्मिला ।
कठीण जाणण्या गुप्त तेणे मोक्षचि लाभतो ॥ २० ॥
अशा भागवती धर्मा बारा लोकचि जाणती ।
ब्रह्मा नारद नी सांब कपील सनकादिक ॥
स्वायंभुवमनू भक्त प्रह्लाद जनको बळी ।
शुकजी आणि मी जाणी न अन्य ज्ञात तो कुणा ॥ २१ ॥
जीवांना जगती श्रेष्ठ कर्तव्य अन धर्मही ।
नामसंकीर्तने भक्ती हरीच्या पदि पावते ॥ २२ ॥
दूतांनो महती जाणा नाम उच्चार कारणे ।
अजामिळा असा पापी सुटला मृत्यु पासुनी ॥ २३ ॥
(वसंततिलका)
घेताचि नाम जधि श्रीहरिचे मुखाने ।
    पापेचि सर्व पळती फळ काय मोठे ॥
अजामिळे मरणिच्या समयास शब्द ।
    नारायणो सहजची म्हणता सुटे तो ॥ २४ ॥
मोहीत होति कधि ज्ञानिहि मोह-माये ।
    ते अर्थवाद रुप वेदहि मोहितो नी ॥
यज्ञादि कर्मि रमती हरि नाठवे त्यां ।
    दुर्भाग्य की सुलभ नाम कितीही श्रेष्ठ ॥ २५ ॥
ते बुद्धिवंत हरिसी बघती अनंती ।
    ते पाप ना च करिती मग दंड कैसा ॥
संयोग योग घडता घडलेहि पाप ।
    संकीर्तनेचि जळते नच कांहि राही ॥ २६ ॥
जो साध्य-साधनहि त्या हरिसीच पाही ।
    त्या साधुची परम कीर्तिहि देव गाती ॥
रक्षी गदेंचि हति त्यां नच तेथ जावे ।
    तेथे न काळ ममही मुळि कांहि चाले ॥ २७ ॥
मोठेहि मे परमहंस त्यजोनि माया ।
    निष्कांचनीय वसुनी स्मरती मुकुंदा ॥
जो त्यागितो रस हरीपदपद्म याचा ।
    वाही प्रपंच भरणा धरिणे तयासी ॥ २८ ॥
ज्याच्या जिभीं न कधिही भगवंत नाम ।
    ज्याचे न चित्त कधि ध्यायि पदारविंदा ॥
नाही झुकेल कधि श्री हरिच्या पदासी ।
    ओढोनि पापि असला मज पासि आणा ॥ २९ ॥
त्या पार्षदासि अवमान् मजसीच दोष ।
    नारायणे क्षमियणे कर जोडतो मी ॥
तो श्रेष्ठ श्रीहरि मला पदरात घेई ।
    त्या साक्षिभूत प्रभूला नमितो पुन्हा मी ॥ ३० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! म्हणोनीया सर्वपाप नि वासना ।
निष्कृतां हरिकीर्तीचे गान कल्याणकारक ॥ ३१ ॥
श्रद्धेने एकदा ऐको तरी भक्ती उदेल की ।
भक्तिने आत्मशुद्धी ह्जो कृच्छ्रचांद्रायणोहि ना ॥ ३२ ॥
(वसंततिलका)
जो लाभ चित्ती धरितो हरिपादपद्मीं ।
    तो ना कधीच रमतो विषयीं नि पापी ॥
जे लोक तो विमुख श्रीरसनाम घ्याया ।
    त्यांचे न पाप मिटतेपडतीच नर्की ॥ ३३ ॥
राजा ! असे यमदूते मग ऐकिल्याने ।
    आले स्मरोनि सगळे नच पार हर्षा ॥
तै पासुनी पुढति ते यमदूत केंव्हा ।
    ना त्रासिती हरिजना मनिंनच पाहतीही ॥ ३४ ॥
(अनुष्टुप्)
इतिहास असा गुह्य रहस्यमय पावन ।
मलयीं अर्चिता कृष्ण अगस्त्ये मज बोधिला ॥ ३५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ ६ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP