समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय २ रा

विष्णूदूतांकडून भागवतधर्म निरूपण आणि अजामिळाचे परमधाम गमन -


श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
धर्मज्ञ पार्षदे ऐसे यमदूतांचि भाषणे ।
ऐकूनी वदल राजा ! तयासी या परी पुन्हा ॥ १ ॥
पार्षद म्हणाले -
दूतांनो खेद आश्चर्य अधर्म शिरतो पहा ।
धर्माच्या त्या सभास्थानी अकारणचि दंडिता ॥ २ ॥
प्रजेचा रक्षिता शास्ता शमदर्शी हिता बघे ।
जर तो विषमी वागे जावे कोठे जने तदा ॥ ३ ॥
वागती थोर जै तैसे सामान्य जन वागती ।
संत ते दाविती वाटा लोक तैसेचि वागती ॥ ४ ॥
पशूच्या परि ते लोक धर्माधर्म न जाणता ।
संतांच्या कुशिसी शीर ठेविता झोपती सुखे ॥ ५ ॥
विश्वासपात्र तो साधू विसंबे त्याजला कधी ।
विश्वासघात तो कैसा कधी ते करतील कां ? ॥ ६ ॥
दूतांनो कोटि जन्माचे पाप प्रक्षाळिले यये ।
विवश होवुनी येणे मोक्षदो नाम गायिले ॥ ७ ॥
जेंव्हा नारायणो चार अक्षरी नाम बोलला ।
तेंव्हाची पापराशींचे प्रायश्चित्तचि जाहले ॥ ८ ॥
मद्यपी चोर नी मित्रद्रोही नी ब्रह्मघातकी ।
गुरुपत्‍नी रिघे आणि यया संसर्गि जो असे ॥ ९ ॥
स्त्री राजा नी पिता गाय हत्यारी असला जरी ।
प्रायश्चित्त तया एक नाम गाता मिळे हरी ॥ १० ॥
(इंद्रवज्रा)
मोथे ऋषी ते वदले बहूही
    निस्तारण्या पाप व्रते अनेक ।
नामा परी ना हरण्यास पाप
    उपाय ऐसा. भजनात ज्ञान ॥ ११ ॥
व्रते न होते मन शुद्ध पूर्ण
    पुन्हाहि ओढि मग पाप कर्मी ।
नामेचि होते मन शुद्ध पूर्ण
    पुन्हा घडेना मग पाप कांही ॥ १२ ॥
(अनुष्टुप्)
या मुळे यमदूतांनो अजामेळा न न्या तुम्ही ।
मरता समयी याने नामे पापासि जाळिले ॥ १३ ॥
महात्मे वदती सारे संकेते अथवा जिव्हे ।
चेष्टेने वदता नाम पापे ती सर्व नष्टती ॥ १४ ॥
पडता ठेचता अंग फसता सर्पदंशिता ।
जळता जखमी होता नामोच्चारात मोक्ष की ।
हरीसी गात ज्या मृत्यू यमाचा त्रास ना तया ॥ १५ ॥
मोठ्या पापास मोठे नी सान पापास सान ते ।
प्रायश्चित्त ऋषी सर्व वदले बुद्धिपूर्वक ॥ १६ ॥
तपे नामे जपे पाप नष्टती संशयो नसे ।
जरी हृदय ना शुद्ध नामे शुद्धचि होतसे ॥ १७ ॥
जाणता नेणता अग्नी स्पर्शाने जाळितो तसे ।
जाणता नेणता गाता कीर्तने पाप नष्टते ॥ १८ ॥
अमृता चुकुनी प्याला तरी त्यां मरणे नसे ।
तसे नामामुळे सत्य उच्चारे मोक्ष लाभतो ॥ १९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
राजा ! त्या पार्षदे ऐसा भागवत् धर्म बोधिता ।
अजामळ्या यमाच्या त्या बंधनातून सोडिले ॥ २० ॥
परीक्षिता असे सर्व दूतांनी ऐकिले पुन्हा ।
यमाच्या पुढती सर्व वदले घडले तसे ॥ २१ ॥
यमपाशातुनी मुक्त जाहला तो अजामिळ ।
निर्भेय स्वस्थही झाला आनंदे नम्र जाहला ॥ २२ ॥
पार्षदे पाहिले बोलू इच्छितो तो अजामिळ ।
परी ते जाहले गुप्त पाहता पाहता तदा ॥ २३ ॥
यावेळी भागवद्धर्म पार्षदा मुखिचा तसे ।
वेदोक्त सगुणी धर्म दूतांकडुनि ऐकिला ॥ २४ ॥
हरीची ऐकता कीर्ती मनीं भक्ती उदेयली ।
पापांचा आठवो येता अनुतापचि जाहला ॥ २५ ॥
अजामिळ मनात विचार करू लागला -
इंद्रीयदास मी रे ! रे ! दासीसी गर्भ घातला ।
द्विजत्व नष्टिले सर्व दुःखाची गोष्ट जाहली ॥ २६ ॥
धिक्कार तो असो माझा ! पापात्मा संतनिंद्यची ।
कुळासी लाविला डाग धर्मपत्‍नी त्यजोनिया ।
दारुडी कुलटे संगे रमलो हाय ! कर्म हे ॥ २७ ॥
वृद्ध ते पितरे होते असहाय तपस्विही ।
नीच मी त्यागिले त्यांना कृतघ्न जाहलो किती ॥ २८ ॥
अवश्य नरकी जाणे पापात्म्यें धर्मघातकी ।
भोगिती यातना जेथे कामी पुरुष त्या स्थळी ॥ २९ ॥
अद्‌भूत पाहिले दृश्य स्वप्न कां पडले मला ।
ओढिती फास घेवोनी गेले दूत कुणीकडे ॥ ३० ॥
आत्ताचि घालुनी फास पृथ्वीच्या खालि ओढिती ।
कोणी सुंदर सिद्धांनी सोडिले, गुप्त जाहले ॥ ३१ ॥
या जन्मी जरि मी पापी पुण्यवान् पूर्विचा असो ।
तेंव्हाचि भेटले सिद्ध स्मरता उल्हसे मन ॥ ३२ ॥
कुलटागामी मी पापी न पूर्व सुकृतो तरी ।
कैसी वाणी वदे नाम पवित्र हरिचे तदा ? ॥ ३३ ॥
कुठे मी कपटी पापी नष्टिले ब्रह्मतेज मी ।
कुठे ते भगवन्नाम श्री नारायण मंगल ॥ ३४ ॥
आता प्राणैंद्रीया मनाला आवरोनिया ।
प्रयत्‍ने नरकामध्ये स्वताला नच टाकि की ॥ ३५ ॥
माझा मी मानिला देह कर्मे बद्धचि जाहलो ।
संयमे शांत मित्रत्वे दयेने राहतो अता ॥ ३६ ॥
माया ती स्त्री रुपे येता मृगया साधिली मम ।
नाचलो माकडा ऐसा मुक्त होईल मी अता ॥ ३७ ॥
जाणिले सत्यवस्तूला मीपणा त्यागितो पहा ।
नामाच्या कीर्तने सुद्ध करोनी पदि लाविता ॥ ३८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
क्षणाच्या संतसंगाने द्विजा वैराग्य जाहले ।
संसार त्यागुनी सर्व हरीद्वारासि पातला ॥ ३९ ॥
भगवत्‌मंदिरी तेथे आसनें योग साधिला ।
विषया त्यागिले सर्व मना बुद्धीत मेळिले ॥ ४० ॥
पुढती चिंतने तेणे विषयी बुद्धि त्यागिली ।
बुद्धीसी भगवद्‌रूपा परब्रह्मासि जोडिले ॥ ४१ ॥
तिन्ही गुणातुनी बुद्धी काढुनी रूपि स्थापिली ।
तदा पार्षद चौ आले द्विजाने नमिले तयां ॥ ४२ ॥
दर्शनोत्तर गंगेचे स्नाने देहासि त्यागिता ।
विप्राला मिळला देह भगवत्‌पार्षदापरी ॥ ४३ ॥
आणि तो पार्षदापाठी सुवर्णयानि बैसला ।
पुन्हा आकाशमार्गाने वैकुंठ धाम पावला ॥ ४४ ॥
(इंद्रवज्रा)
चतुर्गुणी धर्म नि कर्म तेणे
    दासीसवे राहुनि वाढविला ।
तो निंद्य पापी नरका पथीक
    नामासि घेता त्वरि मुक्त झाला ॥ ४५ ॥
तीर्थत्व तीर्था मिळते जयाने
    नामाहुनी त्या मग काय श्रेष्ठ ।
नामाश्रयी त्या नच कर्म बांधी
    नामाविना ना अनुताप चित्ता ॥ ४६ ॥
(अनुष्टुप्)
इतिहास असे गुप्त समस्त पापनाशक ।
श्रद्धेने ऐकता गाता जाणे ना नरकी घडे ॥ ४७ ॥
नेत्रही उचलोनीया न पाही यमदूत तो ।
पापात जगला प्राणी तरी वैकुंठि पूज्यची ॥ ४८ ॥
अजामिळे पुत्रमिसे हरीचे नाम घेतले ।
तयाही लाभला मोक्ष श्रद्धावंता न संशय ॥ ४९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ ६ ॥ २ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP