समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय १ ला

अजामिळाचे उपाख्यान -


राजा परिक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्)
भगवन् ! मार्ग निवृत्ति तुम्ही पूर्वीच वर्णिला ।
क्रमाने अर्चिरा-ब्रह्म जीव तो मुक्त होतसे ॥ १ ॥
पवृत्ति लक्षणे आणि त्रैगुना वर्णिले तुम्ही ।
स्वर्गादि प्राप्तिने जीव भव बंधात गुंततो ॥ २ ॥
अधर्म करिता नर्क लाभतो तेहि बोधिले ।
मन्वंतर मनू आद्य स्वायंभूवहि बोलले ॥ ३ ॥
प्रियव्रतोत्तनपाद वंशचरित वर्णिले ।
द्वीप वर्ष नद्या वृक्ष पर्वते वर्णिले तुम्ही ॥ ४ ॥
भूमंडळ स्थिती तारे स्वर्ग पाताळ सर्वही ।
हरीची सृष्टि ती सारी वर्णिली जशिच्या तशी ॥ ५ ॥
महाभागा वदा ऐसा मार्ग जो श्रेष्ठ, यातना ।
मानवा न लभे केंव्हा नरकी भोग भोगणे ॥ ६ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
मनुष्य देहे मन वाणि यांनी
    जे पाप होते नच येथ क्षाळे ।
जाणे पडे तै नरकात प्राण्या
    तुम्हीच हे तो वदले अम्हाला ॥ ७ ॥
म्हणोनि रोगेपिडिण्या अधीच
    नी मृत्युपूर्वीच धुणेहि पापा ।
ते वैद्य रोगा निरखोनि जैसी
    त्वरे चिकित्सा करिती निवांत ॥ ८ ॥
राजा परीक्षिताने विचारिले -
(अनुष्टुप्)
या लोकी राजदंडादी परलोकी यमदंड तो ।
ठावून असता पाप्या प्रायश्चित कसे मिळे ॥ ९ ॥
प्रायश्चित्ते कुठे त्याला कधी का सुटका असे ।
कळोनी करिती पाप जसे कुंजरस्नान ते ॥ १० ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
कर्माचे बीज ते कर्मे नष्ट ना होतसे कधी ।
कर्माधिकारि तो अज्ञ इच्छा त्याच्या न नष्टती ।
तत्वाचे ज्ञान ते एक प्रायश्चित्त तया असे ॥ ११ ॥
सुपथ्य सेवितो त्याला रोग ते नच स्पर्शिती ।
नियमा पाळिता इच्छा नष्टोनी ज्ञान होतसे ॥ १२ ॥
तप नी ब्रह्मचर्याने दमाने ध्यान साधिता ।
दान नी सत्य नी शुद्धी यम नी नियमे तसे ॥ १३ ॥
या नवू साधतां द्वारा मन वाणी तशी तनू ।
न साधिता वसे पाप साधिता पाप नष्टते ॥ १४ ॥
विरळे भक्त ते होती भगवत्‌शरणी मनें ।
नाशिती भक्तिने पाप तिमिता सूर्य जै करी ॥ १५ ॥
परीक्षिता ! जसे पापी हरीसी तनु अर्पिती ।
भक्तांना सेविती तैसे तपाने नच ते घडे ॥ १६ ॥
भक्तीचा पंथ हा श्रेष्ठ जगी कल्याणि निर्भर ।
मार्गी त्या चालती भक्त सुशील साधु सर्वही ॥ १७ ॥
परीक्षिता ! जशी तीर्थे मदिरा घट पावन ।
करून ना शकती तैसे अभक्ता घडते जगीं ॥ १८ ॥
(इंद्रवज्रा)
जो एकदा भृंग-मनास पायीं
    अर्पी तयाची पळतात पापे ।
स्वप्नात ना तो यमदूत पाही
    नी ना घडे त्या नरकात जाणे ॥ १९ ॥
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! अशी एक संत ते सांगती कथा ।
विष्णु नी यमदूतांचा संवाद ऐक सांगतो ॥ २० ॥
कनोज नगरी मध्यी दासीपति अजामिळ ।
विप्र तो दासिसंसर्गे जाहला भ्रष्ट वर्तनी ॥ २१ ॥
जुगारे छळुनिइ किंवा धोका चौर्ये लुटी धना ।
निंद्य कर्मी असा वागे जगण्या त्रासवी जना ॥ २२ ॥
परीक्षिता ! असे पापी वर्ते नी दासिपुत्र ते ।
पोषिता लाडिता झाला अठ्ठ्यांशी वर्ष एवढा ॥ २३ ॥
वृद्ध अजामिळा पुत्र नारायण दहातला ।
सान तो म्हणूनी माय-बाप त्या बहु लाडिती ॥ २४ ॥
वृद्ध अजामिळे मोहे चित्त नारायणा दिले ।
बोबडे बोलणे खोड्या यात जो मोद जागवी ॥ २५ ॥
स्नेहात बांधला विप्र रमे खाता पिता तयीं ।
मूढाला नकळे डोईवरी तो पृत्यु पातला ॥ २६ ॥
या परी जगता मूर्ख मृत्यूचा काळ पातला ।
तरीही आठवी तेंव्हा बाळ नारायणा मनीं ॥ २७ ॥
तैक्षणी पाहिले त्याने भयान यमदूत जे ।
हाती फासास घेवोनी तिघे सामोरि ठाकले ॥ २८ ॥
तेंव्हा नारायणो बाळ होता खेळत तो दुरी ।
शोके नारायणा बाही पापी तो दूत पाहता ॥ २९ ॥
भगवत्‌पार्षदे तेंव्हा पाहिला वदता यया ।
स्व्बामीसी बाहतो आहे नारायणचि बोलता ॥
हा तो नारायणो नामे गातसे स्वामि आपुला ।
म्हणोनी पातले तेथे वेगाने पापिया घरी ॥ ३० ॥
वेळी त्या शरिरातून सूक्ष्मा दूतेचि ओढिले ।
पार्षदे बळ देवोनी रोधिले यत्‍न पूर्वक ॥ ३१ ॥
रोधिता वदले दूत यमाचे विष्णुपार्षदा ।
धर्माज्ञा तोडणार्‍यांनो अरे कोण तुम्ही अहा ? ॥ ३२ ॥
कोणाचे दूत हो तुम्ही आले कोठोनि रोधिण्या ।
तुम्ही का देवता सिद्ध कोण तुम्ही अहा वदा ॥ ३३ ॥
कमळास तुम्ही आहा पीतवस्त्र नि कुंडले ।
कितीअ मस्तकी ऐसा गळां पंकजमाळ ही ॥ ३४ ॥
नवीन दिसते सर्व भुजां सुंदर चार या ।
शंखचक्र गदा खड्ग धनुष्य शोभते करीं ॥ ३५ ॥
तुमच्या अंगकांतीने अंधार मिटला जगी ।
धर्माचे अम्हि तो दूत कां हो आम्हास रोधिता ॥ ३६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षिता ! असे दूत यमाचे बदले तदा ।
मेघाच्या सम वाणीने बोलले विष्णुदूत ते ॥ ३७ ॥
पार्षद म्हणाले -
तुम्ही ना धर्मराजाचे सत्य ते दूत की पहा ।
धर्माची लक्षणे आणि धर्माचे तत्त्व सांगणे ॥ ३८ ॥
दंडाचा पात्र तो कोण दंडावे कोणत्या परी ।
सर्व पाप्यासि दंडावे अथवा कांहि त्यातले ॥ ३९ ॥
यमदूत म्हणाले -
वेदांचा विधि तो कर्म निषेधाऽधर्म जाणणे ।
वेद ते भगवद्‌रूप श्वास प्रश्वास ज्ञानही ॥ ४० ॥
तपादी गुणि ते प्राणी वस्तू त्या भगवत् स्थित ।
वेदही गुण नामाचे रूप नी कर्म त्याचिये ।
यथोचित विभागोनी वर्णिती आवडे बहू ॥ ४१ ॥
शरीर मन वृत्तींनी जीव जो कर्म आचरी ।
तयाचा साक्षि तो सूर्य अग्नि आकाश वायु नी ॥
चंद्रमा चांदण्या संध्या दिन तात्र दिशा जल ।
पृथ्वी नी काल नी धर्म नित्य पाहत आसती ॥ ४२ ॥
तयाच्या साक्षिने पाप ठरतो दंडही तसा ।
कर्माच्या अनुसाराने समस्ता दंड भोगणे ॥ ४३ ॥
कर्म जे करिती प्राणी तया संबंध तो गुने ।
देहावान् त्याजिता कर्म पाप-पुण्य घडेचि की ॥ ४४ ॥
या लोकी वागणे जैसे पाप वा धर्म मान्य जे ।
तयाते फेडणे होते मरता भोगुनी फळ ॥ ४५ ॥
गुणांच्या त्रय भेदाने त्रैगुनी प्राणि वागती ।
पुण्यवान् पाप आत्मा नी दोहोंचा सम मिश्रित ॥
सुखी वा दुःखि नी कोणी दोहोंचा सम मिश्रित ।
तसेचि परलोकात बांधणे अनुमान की ॥ ४६ ॥
वर्तमाने कळे सर्व भूत नी जे पुढे घडे ।
पाप-पुण्ये तसे सर्व कळती भोग काय ते ॥ ४७ ॥
अजन्मा भगवान् धर्म वसे तो अंतरी सदा ।
सर्वांचे पाहतो रूप करितो निश्चया तसा ॥ ४८ ॥
स्वप्नीचा देह तो सत्य स्वप्नात पाहता गमे ।
जाणत्या शरिरा नेणे तै पूर्व जन्म ना कळे ॥ ४९ ॥
सिद्धांनो कर्म ते सारे पाचांनी जीव आचरी ।
पाचांनी जाणितो सर्व मन ते भोगि सर्वही ॥ ५० ॥
कळा सोळा जिवांच्या नी लिंगदेह अनादि तो ।
जीवासी शोक हर्षाने पीडितो भवि टाकितो ॥ ५१ ॥
अज्ञाने वश जो जीव हरे ना साहि शत्रुला ।
इच्छाही नसता वागे विभिन्न वासने मुळे ।
कोषकीटा परी गुंते कर्माने आपुल्या सवे ॥ ५२ ॥
कर्माचा त्याग ना होय देहधार्‍यां क्षणासही ।
स्वभावे वश होवोनी गुणाने कर्म आचरी ॥ ५३ ॥
जीव तो पूर्वकर्माने स्थूळ सूक्ष्मासि धारितो ।
कधी तो होय ती माता पिता तो होय की कधी ॥ ५४ ॥
प्रकृतीच्यामुळे रूपा लिंग देहासि मानितो ।
भगवद्‌भजने सारे नष्टते विपरीत ते ॥ ५५ ॥
कथारंभ :-
देवतांनो तुम्ही जाणो हा शास्तज्ञ अजामिळ ।
शीलाचार गुणो यांचा भांडार जणु तो असे ।
नम्र जितेंद्रियो सत्य मंत्रवेत्तानि शुद्ध जो ॥ ५६ ॥
अतिथी गुरु अग्नी नी वृद्धसेवा करी सदा ।
अहिंसी निरहंकारी अद्वेष्ठा हितचिंतक ॥ ५७ ॥
एकदा पितृआज्ञेने समिधा फळ-फूल नी ।
दुर्वा नी दर्भ घेवोनी आला गेहीं वनातुनी ॥ ५८ ॥
वाटेत पाहिले त्याने भ्रष्टशूद्र नि कामि जो ।
निर्लज्ज पिउनी दारू वेश्येसह विहारता ॥
वेश्याही पिउनी तेच धूंद जी जाहली असे ।
डोळ्यांनी मिचकावोनी नशेत अर्ध नग्न जी ॥ ५९ ॥
वेश्येच्या सह तो शूद्र कधी गाता नि नाचता ।
हासे चेष्टा करी कैक प्रसन्न करिण्या तिला ॥ ६० ॥
उद्दीपक अशा वस्तू शूद्राने भुजि लाविल्या ।
तेणे वेश्येसि आलींगी पाहता मोहिला अजा ॥ ६१ ॥
तरी अजामिळे धैर्ये ज्ञानाने काम रोधिण्या ।
लाविली सर्व ती शक्ती हरला मन रोधिण्या ॥ ६२ ॥
विश्यानिमित्त योगाने कामभूते पछाडिले ।
शास्त्र चारुत्य शुद्धीही मनाची नष्टली पुन्हा ।
वेश्येच्या चिंतनी होता अधर्मा तो प्रवर्तला ॥ ६३ ॥
वस्त्रादी भूषणे देता वडिलांचेहि द्रव्य ते ।
संपले तिजला चित्ती प्रसन्न ठेविता सदा ।
जसे इच्छी तसे वागे वेश्येच्या परि हा द्विज ॥ ६४ ॥
वेश्येच्या दृष्टिने लुब्ध जाहला टाकिली वधू ।
कुलीन युवती ऐसी पापां सीमा नसेच की ॥ ६५ ॥
कुबुद्धी न्याय अन्याये कसे ही मिळवी धन ।
वेध्येच्यापरिवाराला पोसण्या व्यस्त राहिला ॥ ६६ ॥
शास्त्राज्ञा मोडुनी वागे संतांनी निंदिले यया ।
वेश्येचे भक्षिले अन्न पापी जीवन जाहले ॥ ६७ ॥
प्रायश्चित्त नसे यासी दंडार्थ ओढिती यया ।
यमाच्या सदनी नेता दंडभोगात शुद्धि ती ॥ ६८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ ६ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP