समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय २६ वा

नरकाच्या विभिन्न गतीचे वर्णन -

राजा परीक्षिताने विचारिले -
(भृंगनाद)
महर्षि ! लोकांना या ज्या उंच नीच गती लाभती
तयांची भिन्नता एवढी कां असे ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
राजा ! कर्म करणारे पुरुष सात्विक राजस नी
तामस या तिन्ही प्रकारे असती तथा तयांच्या
श्रद्धेचेही भेद असती । या प्रकारे नी श्रद्धेच्या
भेदे तयांच्या कर्माच्या गतिही भिन्न असती ती
न्यूनाधिक रुपे या सर्व गती सर्व कर्त्यांना
लाभती ॥ २ ॥
या प्रकारे निषिद्ध पापकर्म करणार्‍यांनाही
तयांच्या श्रद्धेच्या भिन्नत्वे समान फळ न मिळे ।
तेंव्हा अनादी अविद्येने वशीभूत होवुनी
कामनापूर्वक केलेल्या त्या निषिद्धकर्म
परिणामे ज्या हजारो गति असती, तयांचा
विस्तार करुया ॥ ३ ॥
राजा परीक्षिताने विचारिले -
भगवान् आपण जयाचे वर्णन करुं इच्छिता
तो नरक या पृथिवीवरी कोणत्या देश विदेशी
वा त्रिलोक बाहेरी वा आत तो कोठे असे ? ॥ ४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
राजा ते त्रिलोका आतचि तथा दक्षिणेसी नी
पृथ्वीच्या खाली नी पाण्याच्या वरी तेथील
निवासी अत्यंत एकाग्रे आपुल्या वंशधरा मंगल
कामना करिती ॥ ५
त्या नरकलोकीं सूर्यपुत्र भगवान् यम आपुल्या
सेवकांसह निवसती तथा भगवंताच्या आज्ञेचे
उल्लंघन न करिता आपुल्या दूतांद्वारा
आणिल्या मृतप्राण्या तयांच्या दुष्कर्मानुसार
पापाचे फळ देती दंड म्हणुनी ॥ ६ ॥
परीक्षिता ! कोणी-कोणी लोक नरकांची संख्या
एकेविस वदती । आता आम्ही रुप लक्षणांनुसार
तयांचे क्रमशः वर्णन करुं । तयांची नामे -
तामिस्त्र, अंधतामिश्र, रौरव महारौरव कुंभिपाक
कालसूत्र असिपत्रवन सूकरमुख अंधकूप
कृमिभोजन संदंश तप्तसूर्मि वज्रकटक शाल्मलि
वैतरणि पूयोद प्राणरोध विशसन लालाभक्ष
सारमेयादन अवीची नी अयःपान । या शिवाय
क्षारकर्दम रक्षोणभोजन शूलप्रोत दंतशूक
अवटनिरोध पर्यावतन नी सुचीमुख -हे सात
मिळुनी अठठाविस नरक विविध तर्‍हांच्या यातना
भोगण्याची स्थळे ॥ ७ ॥
जे पुरुष दुसर्‍यांचे धन संतान अथवा स्त्रियांचे
हरण करिती तयां अत्यंत भयानक यमदूत
कालपाशीं बळे तामिस्त्र नरकीं टाकिती । त्या
अंधारमय नरकीं तया न देती अन्न-जल, थंड
लाविती नी भय दाविती, अशा अनेक रीतीने
पीडिती । तयात अत्यंत दुःखी हो‌उनी ते
अचानक मूर्च्छितही होती ॥ ८ ॥
या परी जे पुरुष दुसर्‍यांसी फसवुनी तयाची
स्त्री आदी भोगिती ते अंधतामिस्त्र नरकीं
पडती । तेथील यातनात पडुनी मुळापासूनि
कापल्या वृक्षासमान वेदनांनी सारी शुद्ध हरपते
न तया कळे कांहीही । त्या मुळे या नरका
म्हणती अंधतामिस्त्र ॥ ९ ॥
जे पुरुष या लोकी हे शरिर मम, हे स्त्री धनादी
माझे ही बुद्धी ठेवुनी दुसर्‍या प्राणिया द्रोह
करुनी निरंतर आपुल्या कुटुंबाच्या राहती
पोषणी ते आपुले शरीर त्यागिता आपुल्या पाप
कारणे स्वयंही पडती रौरव नरकीं ॥ १० ॥
या लोकी तया कडुनी ज्या जीवा ज्या प्रकारे
त्रास जाहला, परलोकी यम यातना
समयी ‘रुरु ’ हो‌उनी तेचि तैसा त्रास पोचिती ।
या साठी या नरका रौरव हे नाम असे । सर्पाहुनी
क्रूर अशा जीवा ‘रुरु ’ नाम असे ॥ ११ ॥
ऐसाची महारौरव नरक असे । यात जाय तो नी
तया तो कच्चे मास खाणारा रुरु तोडितसे ॥ १२ ॥
जो क्रूर मनुष्य या लोकी आपुल्या पोट पोषणा
जिवंत पशु वा पक्षी शिजविती त्या हृदयहीना
राक्षसाहुनी झालेल्या त्या जीवा तप्त तैली नि
कुंभिपाक नरकीं टाकिती नी उकळिती ॥ १३ ॥
जे मनुष्य या लोकी माता-पिता ब्राह्मण नी
वेदांसी विरोध करिती तया यमदूत कालसूत्र
नरकी टाकिती, तयाचा विस्तार दहाहजार
योजने । तेथील भू ताम्राची असे । तेथील मैदान
तप्त असे, वरच्या सूर्याने नी खालच्या अग्निने
नित्य राही तापती । तेथे टाकिता जीव भुकेने
नी तृष्णेने व्याकुळे नी तयाची तनू जळे आत
बाहेरी । अस्वस्थता तयाची एवढी वाढे की तो
कधी बसे, कधी उठे कधी धावे नी कधी पडे
सारखा नी धावत सुटे चोहिकडे । या परी त्या
नर पशुच्या शरीरा जेवढे रोम तेवढेचि हजार
वर्षे पर्यंते होतसे तयाची दुर्गती ॥ १४ ॥
जे पुरुष कोणतीही आपत्ती नसता आपुला
वैदिकमार्ग त्यजुनि अन्य पाखंडपूर्ण धर्मी घे
आश्रय, तया यमदूत असिपत्रवन नरकीं नेती
नी कोरडयाने ठोकिती । जधी मारापासुनी
वाचण्या पळे इकडुनी तिकडे, तदा तयाचे अंग
तलवारी समान पानांनी कापिती त्या पत्रा दोन
धारा असती । तदा तो अतिवेदनांनी ‘हाय
मेलो ’ म्हणुनी ओरडे नी पद पदां मूर्च्छित पडे ।
आपुल्या धर्मा सोडुनी पाखंड मार्गी चालता
या परी आपुल्या कुकर्माचे फळ मिळे ॥ १५ ॥
या लोकी जो पुरुष राजा वा राजकर्मचारी
असुनी कोण्या निरपराध्या दंडिती अथवा
शरीरदंड देती ते महापापी मरुनी सूकरमुख
नरकी पडती । तिथे जेंव्हा महाबळी यमदूत
तयांच्या अंगी ठेचुनी जधी चरकीं घालिती तदा
उसाच्या सोतर्‍या सम पीडिती, ज्या प्रकारे
तयांद्वारा लोक त्रासले निरपराधी प्राणी रडले-
ओरडले तशा प्रकारे कधी ते ओरडती नी कधी
बेशुद्ध पडती ॥ १६ ॥
जे पुरुष या लोकी ढेकणादी जीवांची हिंसा
करिती ते तयांच्या द्रोहे अंधकूप नरकीं पडती ।
कां की स्वयं भगवंतेही रक्तपानादी तयांची वृत्ती
बनविली नी तयांचे कारणे दुसर्‍या कष्ट देण्याचे
न तया ज्ञानही, परी मनुष्याची वृत्ती भगवंते
विधि निषेध पूर्वक बनविली नी तया दुसर्‍यांच्या
कष्टा ज्ञानही दिले । तेथे ते पशू मृग सर्पादी
त्रासिणारे जंतू मच्छर उवां ढेकणे माशादी जयां
याने द्रोहिले-तया सर्वांगा चावती । तेणे तयाची
निद्रा नी शांती भंग होतसे नी स्थान न मिळताची
तो अस्वस्थ घोर अंधारी या परी राही भटकत
जसा रोगी शरीरी जीव झटे ॥ १७ ॥
जो मनुष्य पंचमहायज्ञे न करिता तथा न कोणा
दान करिता स्वयेचि भक्षी तो कावळ्या
समानची । तो तो परलोकी कृमिभोजन नामक
नरकीं पडे । तेथे एकलक्ष योजने लांब-रुंद
किडयांचे महाकुंडची । तयात तयाही कीडा
बनुनी राहणे घडे नी प्रायश्चित पुरे हो पर्यंत
तेथ राहणे घडे । तेथे किडे तया त्रासिती नी
तया किडेचि खाणे पडे ॥ १८ ॥
राजा ! या लोकी जो व्यक्ती चोरी वा बळेचि
द्विजाचे अथवा आपत्ती नसता कोणाही
दुसर्‍याचे सुवर्ण वा रत्नादी हरितो तया
मरणोत्तर संदेश नामे नरकी जाउनी तापत्या
लोहगोळाने डागण्या नी सांडसीने लोचके
तोडिती ॥ १९ ॥
या लोकी कोणी सगोत्री स्त्रीशी व्यभिचार
करितो, तो यमदूत तया तप्तसूर्मि नामक नरकीं
नेउनी कोरडयाने फटके मारिती तथा त्या पुरुषा
तापत्या स्त्रीमूर्तीसी नी स्त्रियांसी तापत्या पुरुष
प्रतिमेसी आलिंगाया लाविती ॥ २० ॥
जे पुरुष या लोकी पशू आदी सर्वांच्या
सर्वांच्यासह व्यभिचार करिती, तयां मृत्योत्तरे
यमदूत वज्रकंटकशाल्मली नरकीं टाकिती नी
वज्रा समान कठोर कांटेरी सेमर वृक्षीं फेकिती
नी खाली ओढिती ॥ २१ ॥
जो राजा वा राजपुत्र जन्मुनी श्रेष्ठवंशी उल्लंघी
धर्ममर्यादा तो त्या मर्यादाक्रमणाचे कारणे मरता
वैतरणी नदीत पडे । ही नदी नरक कुंडापरी ।
तियेत मल मूत्र पूव रक्त केश नख हाडे चरबी
मास नी मज्जादी घाण वस्तू भरुनी । तिथे पडता
तया चलचर त्रासिती । परी तयाचे शरीर न सुटे,
पापाच्या कारणे प्राण ओढिती तया नी
दुर्गतीसी आपुल्या कर्माचे फळ मानुनी
मनातची संतापती ॥ २२ ॥
जे लोक शौच नी आचाराने नियम त्यागिती तथा
त्यागिती लज्जा नी या लोकी शूद्रासी संबंध
ठेवूनी पशूपरी करिती वर्तन, तेही मरता पूव विष्ठा
कफ नी मलें भरल्या पूयोद नामक समुद्रीं पडती
नी अत्यंत घृणित वस्तूंसी भक्षिती ॥ २३ ॥
या लोकीं ब्राह्मणादी उच्चवर्णीय कुत्रे वा गाढवे
पाळिती नी शिकार करिती नी शास्त्र विपरित
जीवां वधिती ते मरता प्राणरोध नामक नरकीं
पडती नी तेथे यमदूत तयां लक्ष्य करिती बाणाने
विंधिती ॥ २४ ॥
जे पाखंडी पाखंडपूर्ण यज्ञीं पशुहत्त्या करिती
तया परलोकी वैशस(विशसव) नरकीं टाकूनी
तेथील शास्ते तया बहू पीडिती ॥ २५ ॥
जे द्विज कामातूर हो‌उनी आपुल्या सवर्णा
भार्येसी वीर्यपान करिती अशा पाप्यां मरता
यमदूत वीर्याच्या नदीत लालभक्ष नामक नरकीं
टाकिती नी वीर्य प्यावया लाविती ॥ २६ ॥
जो कोणी चोर वा राजा वा राजपुरुष या लोकी
कोणाच्या घरां आग लावी वा कुणा वीष दे
वा गावासी वा व्यापारी टोळीसी लुटिती तया
मरणोत्तर सारमेयादन नामक नरकीं वज्रासम
दाढांचे सातसेवीस कुत्रे-यमदूत मोठया वेगे
तोडिती ॥ २७ ॥
या लोकी जे पुरुष साक्ष देण्या व्यापारी वा दान
समयी कोण्यापरी असत्य वदे, तो मरता
आधारशून्य अविचिमान् नरकी पडे । तिथे शत
योजने उंच पहाडावरुनी खाली डोके करुनी
फेकिती । तेथील दगडांची भूमी पाण्यासमान
गमे । या मुळे त्या नाम अवीचिमान् । तेथे
पडता शरिराच्या ठिकर्‍या होवुनीही न जाय
प्राण, त्या मुळे वारंवार उचलिता तया येथोनी
फेकिती ॥ २८ ॥
जो ब्राह्मण वा ब्राह्मणी अथवा व्रतींस्थित नी
कोणीही कोणीही प्रमादवश मद्यपान करिती
तया जे क्षत्रिय वा वैश्य सोमपान करिती तया
यमदूत अधःपतन नरकीं नेती नी छातीवर पाय
ठेवुनी तया मुखी अग्नितप्तलोह कोंबिती ॥ २९ ॥
जे पुरुष या लोकी निम्न श्रेणीचे असुनी
स्वतांसी मोठे मानुनी जन्म, तप, विद्या आचार
वर्ण वा आश्रमी आपुल्याहुनी श्रेष्ठांचा विशेष
सत्कार न करिती तो जिवंत असुनी
मेल्यासमची । तया मरणोत्तरे क्षार कर्दम नामक
नरकीं खाली शिर करुनी टाकिती नी तेथे अनंत
पीडा भोगणे घडे ॥ ३० ॥
जे पुरुष या लोकी नरमेध द्वारा भैरव यक्ष
राक्षस आदीचे यजन करिती नी ज्या स्त्रिया
पशूपरी पुरुषा भक्षिती तया ते पशुच्या परी
मारिती नी पुरुष यमलोकी राक्षस हो‌उनी
प्रकार-प्रकारे यातना देती नी रक्षोक्षण नरकी
खाटका परी कुर्‍हाडीने कापुनी तयांचे
रक्त पिती । नी ज्या परी ते मांसभक्षक पुरुष
या लोकी तयांचे मांस भक्षिता मोद मानिती त्या
परी ते तयांचे मांस भक्षुनी होती आनंदित, त्या
परी ते ही तयांचे रक्तपान करुनी होती आनंदित
नी नाचती गातीही ॥ ३१ ॥
या लोकी जो वन वा गावातिल निरपराध
जीवांना - जे जीव आपुले रक्षण करिती -
बोलाविती नी तया काटयांनी वा बांधुनी
पीडिती तयांही मरणोत्तरे शूलप्रोत नामक
नरकीं शूलांनी टोचले जायी । तयां समयी जधी
तया भूक-तृष्णा सतावे नी बगळे आदी तीक्ष्ण
चोचीने नरकातील भयानक पक्षी टोचिती तदा
तयां आपुले कृतकर्म स्मरे ॥ ३२ ॥
राजा या लोकीं सर्पापरी जे उग्र स्वभावे
दुसर्‍यांसी पीडिती ते मरणोत्तरे दंतशूक नामक
नरकी पडती, तेथे पाच-पाच वा सात-सात
मुखांचे सर्प तयां समीप येउनी उंदिरां प्रमाणे
तयां गिळिती ॥ ३३ ॥
जे व्यक्ती येथे दुसर्‍या प्राणिया अंधार्‍या
कोठीसी वा गुफा इत्यादीत कोंडिती तया
परलोकी यमदूत तैशाची स्थानी टाकिती नी
विषारी अग्नीच्या धुरीत ढोसिती । या साठी या
नरका अवटनिरोध म्हणती ॥ ३४ ॥
जे गृहस्थ आपुल्या घरी आल्या अतिथी-
अभ्यागता वारंवार क्रोधे भरुनी ऐशा क्रोध
दृष्टिने बघे की जणू तया भस्मची करी, तो जधी
नरकी जातो तदा त्या पापदृष्टि नेत्रांते गिधाडे
बगळे कावळे नी बटेर आदी वज्रासम कठोर
चोंचीने बळे काढिती नी टाकिती । या नरका
पर्यावर्तन म्हणती ॥ ३५ ॥
या लोकी जे व्यक्ती आपणा श्रेष्ठ धनाढय
समजुनी अभिमानाने सर्वांशी तेवढया दृष्टिने
बघती नी सर्वांसी संदेहे बघे, धनाचा व्यय नी
नाशाच्या चिंतने जगाचे हृदय नी मुख सुके,
नी थोडीही चैन न पडता यक्षासमान धनासी
रक्षीतसे तथा पैसा मिळविण्या, वाढविण्या
वाचविण्या हर प्रकारची पापे करिती, ते
नराधम मरता सूचीमुख नरकीं पडती । तेथे त्या
अर्थ पिशाच्या पापात्म्या सार्‍या अंगासी
यमदूत सुई-दोर्‍याने शिंप्यापरी शिविती ॥ ३६ ॥
राजा ! या लोकी या परी शेकडो हजारो नरक ।
तयातिल जयांचा येथ उल्लेख नी जयांचा न
मुळी, या सार्‍यात अधर्मी जीव आपुल्या
कर्मानुसार पाळी-पाळीने शिरती । त्या परी
धर्मात्मा जाती स्वर्गादी लोकीं । या परी
अधिकांश पाप नी पुण्य सरता पाप-पुण्यरुप
कर्मा घेवुनी तो या लोकी जन्मुनी परते ॥ ३७ ॥
या धर्म नी अधर्म दोन्ही पासुनी वेगळा जो
निवृत्तीमार्ग तया द्वितीय स्कंधी वदलोची ।
पुराणी जे ब्रह्मांड कोश चौदा भुवने कथिले ते
एवढेची । हे साक्षात् परम पुरुष नारायणाच्या
स्वयि माया-गुण युक्त अत्यंत स्थूल रुप । याचे
वर्णन मी तुम्हा वदलो । परमात्मा भगवंताचे
उपनिषदवर्णितस्वरुप जरी मन-बुद्धी पोचण्या
पलीकडे तरीही जे पुरुष या स्थूल रुपाचे वर्णन
आदरे वाचिती, ऐकती वा ऐकविती, तयांची
बुद्धी श्रद्धा नी भक्तिने शुद्ध हो नी तो त्या सूक्ष्म
रुपाचा अनुभव करुं शके ॥ ३८ ॥
(अनुष्टुप्)
यतीने भगवान् स्थूल सूक्ष्म दोन्हीही ऐकणे ।
चित्ता स्थूलास लावावे सूक्ष्मरुपी पुन्हा पुढे ॥ ३९ ॥
(वसंततिलका)
भू द्वीप वर्ष नदि पर्वत खं समुद्र
पाताळ दिक् नरको ज्योति नि लोक सारे ।
वर्णीयत्नी स्थिति असे नवलो हरीचे
जो आश्रयो नित जिवा सगळ्या रुपासी ॥ ४० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सव्विसावा अध्याय हा ॥ ५ ॥ २६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP