समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय २५ वा

श्री संकर्षणदेवाचे विवरण आणि स्तुति -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजा ! पाताळ लोकीच्या खाली तीस हजार
योजने दूरवरी अनंत नामाने विख्यात
भगवंताची तामसी कला नित्य । हे
अहंकाररुपी म्हणुनी द्रष्टा नी दृश्यासी खेचुनी
एक करिती या साठी पंचरात्र आगमाचे
अनुयायी भक्तजन यांना संकर्षण म्हणती ॥ १ ॥
या भगवान् अनंता शीर्षे हजार । तयातिल
एकावरी ठेविलेले भूमंडल हे दिसे मोहरी परी ॥ २ ॥
येताचि प्रलय काल यांना या विश्वाचा
उपसंहार करण्या होते मनीषा, तदा यांची
क्रोधवश उडत्या भुवयांच्या मध्यातुनी संकर्षण
नामक रुद्र प्रगटे । तयांची व्यूहसंख्या बारा
असे । ते सर्व त्रिनेत्री असती हाती त्रिशूल ॥ ३ ॥
भगवान् संकर्षणाच्या चरणकमळीचे गोल
गोल स्वच्छ नी अरुणवर्ण नख मणिपंक्ती
समान दिसती दैदिप्यमान । जधी अन्य श्रेष्ठ
भक्तांच्या सहित नागराज अनन्य भक्तिभावे
तया प्रणाम करिती तदा तयांना त्या
नखमण्यात कुंडलकांति मंडित कमनीय
कपाळाची मनोहर मुखारविंदाची मनमोहक
घडती दर्शने नी तयांचे मन भरे आनंदे ॥ ४ ॥
कितेक नागराजांच्या कन्या विविध कामनांनी
स्वयं अंगमंडित चांदीच्या खांबासमान
सुशोभित तयांची वलय विलसित लांब लांब
श्वेतवर्णी सुंदर भुजांवरी नावा चंदन नी
कुंकुमपंका लेपिती । त्या समयी अंगस्पर्शे
मंथित असे तयांच्या हृदयी होतो काम संचार।
तदा ते तयांची मदविव्हल सकरुण अरुणनयन
कमळांनी सुशोभित तथा प्रेममदे मुदित
मुखारविंदाकडे पाहुनी मधुर मनोहर हासती नी
सवेचि लाजल्या भावे निरखिती ॥ ५ ॥
ते अनंतगुणसागर आदिदेव भगवान् अनंत
आपुले असहनशीलतेलानी शेषा थांबवुनी तेथे
समस्त लोककल्याणा ठाकती ॥ ६ ॥
देवता असुर नाग सिद्ध गंधर्व विद्याधर नी
मुनिगण भगवान् अनंताचे ध्यान करिती । तयांचे
नेत्र निरंतर प्रेमाश्रूभरित, चंचल नी विव्हल
असती । ते सुललित वचनामृते आपुल्या पार्षदा
संतुष्ट असती । तयांच्या अंगावर नीलांबर नी
कानात एक कुंडल केवल विलसे तथा त्यांची
सुभग नी सुंदर हात मोकळ्या मुठीवरी ठेविती ।
ते उदार लीलामय भगवान् संकर्षण गळ्यात
वैजयंतिमाला धारिती, जी इंद्राच्या ऐरावतगळीं
पडलेल्या सुवर्ण शृंखला परी । जियेची कांती
कधीही फिकी न पडे ऐसी तुलसीमाला गंधित
नी मधुर मकरंदे मत्तभृंग निरंतर गुंजुनी शोभा
वाढविती ॥ ७ ॥
परीक्षित् ! या प्रकारे भगवान् अनंत महात्म्य
श्रवण नी ध्यान करिता मुमुक्षुंच्या हृदयी
आविर्भूत होवुनी तयांची अनादीकालीन
कर्मवासना ग्रथित रज तम नी सत्वगुणात्मक
अविद्यामयी हृदयग्रंथीला तात्काल कापिती ।
तयांच्या गुणांचा एकदा ब्रह्मपुत्र नारदे तुंबर
गंधर्वांसह ब्रह्माजीसभेत या प्रकारे केले
गायन ॥ ८ ॥
(प्रहर्षिणी)
ज्याची दृष्टिपडत तै सचेत विश्व
    उत्पत्यादि गुणाहि तै समर्थ होती ।
ज्याचे रुप ध्रुव अकृतो नि एकटा तो
    धारी त्या सकल प्रपंच कोण वर्णी ॥ ९ ॥
ज्याच्यासी सकलहि भास भक्त गाती
    सिंहोही ग्रहणाकरी गुणास त्याच्या ।
तो संकर्षण हरि अम्हास पावे
    नी शुद्धोस्वरुप धरी सत्वी असे हे ॥ १० ॥
दुःखे पीडित कुणि हासताहि नामा
    गाता जाय सकल पाप सत्वरची ।
ऐसे रुप मुमुक्षु कोण त्यागुनी त्या
    आश्रेया भटकत हो जगात ऐसा ? ॥ ११ ॥
हे पर्वतो नि सरिता सागरादि पृथ्वी
    धारी मस्तकि कण जै अनंत ऐसा ।
ज्या जिव्हा सहस्त्र तरी न गान शक्य
    ऐसा व्यापक हरि नाच मोजमाप ॥ १२ ॥
(इंद्रवज्रा)
ऐसा प्रभावी भगवंत थोर
    रसातळा माजि निवांत राही ।
असीम वीर्यो गुणही अनंत
    संपूर्ण पृथ्वी जयि धारियेली ॥ १३ ॥
(भृंगनाद)
राजन् ! भोगकामनापुरुषा आपुल्या कर्मानुसार
भगवंते रचिलेल्या या अशा गती मिळती । जैसे
मी गुरुमुखिचे ऐकिले ते मी तुम्हा तैसेचि
बोललो ॥ १४ ॥
मनुष्य़ प्रवृत्ती रुप धर्म परिणामे विलक्षण गती
मिळती त्या एवढयाची, या मी तुम्हा तुमच्या
प्रश्नानुसार वदलो । आता आणखी काय वदणे ॥ १५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचविसावा अध्याय हा ॥ ५ ॥ २५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP