समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध पाचवा - अध्याय २४ वा
राहू आदींची स्थिती, अतलादी खालच्या लोकांचे वर्णन -
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
परीक्षिता ! कांही लोकांचे म्हणणे की सूर्याच्या
दहाहजार योजने खाली राहू नक्षत्रापरि फिरे ।
येणे भगवत्कृपे देवत्व नी ग्रहत्वही मेळिले,
स्वयं हा सिंहीचा पुत्र असुराधम जाहल्या मुळे
कोणत्या पदा न पात्र । याच्या जन्म नी कर्मा
आम्ही पुढे कथूची ॥ १ ॥
सूर्याचे हे मंडल अत्यंत तप्त नी याचा विस्तार
दहाहजार योजने, या परी चंद्रमंडलाचा बारा नी
राहूचा तेरा असे । अमृतपानसमयी राहू देवतावेषे
सूर्य नी चंद्राच्या मध्ये बसला । तदा सूर्ये तयाचा
भेद उघडिला, त्या वैरा आठवुनी हा अमावस्या
नी पौर्णिमादिनीं तयांवरी आक्रमे ॥ २ ॥
हे पाहुनी भगवंते सूर्य नी चंद्राच्या रक्षणार्थे त्या दोघां
आपुले प्रीय आयुध सुदर्शन चक्रासी केले
नियुत । ते निरंतर फिरत असे, या कारणे राहू त्याच्या
असह्य तेजे उद्विग्न नी आश्चर्य चित्त होवुनी
मुहूर्तमात्र तया पुढे ठाकुनी सहसा परत फिरे ।
तयाच्या या थांबण्या लोक ग्रहण म्हणती ॥ ३ ॥
राहूच्या दहाहजार योजने खाली सिद्ध, चारण
नी विद्याधर आदींचे स्थान ॥ ४ ॥
तयाचे खाली जिथवरी वायू नी ढग दिसती तो
लोक अंतरीक्ष । हे यक्ष, राक्षस, पिशाच्च,
प्रेत, नी भूतांचे विहारस्थल ॥ ५ ॥
तयाचे खाली शत योजने ही पृथिवी । जिथवरी
हंस गिधाडे ससाणे नी गरुड आदी प्रमुख पक्षी
उडूं शकती तेथवरीच हिची सीमा असे ॥ ६
पृथ्वीचे स्थान नी विस्ताराते वर्णिले । तयाचेही
खाली अतल वितल सुतल तलातल महातल
रसातल नी पाताल नावाचे भूविवरे । हे
एकाहुनि एक खाली दहा दहा हजार योजने दूर
नी स्थित नी ययातील प्रत्येकाची लांबीही दहा
दहा योजनेची ॥ ७ ॥
ही विवरेही एका प्रकारे स्वर्गची । ययात स्वर्गाहुनि
अधिक विषयभोग, ऐश्वर्य, आनंद, संतान सुख
नी धन संपत्ती । येथले संपन्न भवन उद्यान नी
क्रीडास्थली दैत्य दानव नी नाग विविध प्रकारचे
मायामयी क्रीडा करिता निवसती । ते सर्व गार्हस्थ्य
पालक असती । तयांचे स्त्री-पुत्र बांधव बंधु नी
सेवक तयां बहू प्रेम करिती नी सदा प्रसन्न चित्ते
निवसती । तयांच्या सुखीं इंद्रादीदेवही बाधा
करण्या न समर्थ ॥ ८ ॥
महाराजा ! या बिळी मायावी मय दानवांनी
रचियल्या अनेक पुर्या शोभेने झगमगती ।
ज्या अनेक जातींच्या श्रेष्ठ रत्नें रचुनी चित्र-
विचित्र भवन कोट नगरद्वारे सभाभवने मंदिरे
मोठ-मोठी प्रांगणे नी घरांनी विशोभित तथा
जयांची कृत्रिम भूमीवर नाग नी असुरांच्या
जोडया तसे कबूतर पोपट-मैनादी पक्षी
कुंजती, ऐसे पाताल लोकाधिपतीचे भव्य
भवन त्या पुरांनी शोभा वाढवी ॥ ९ ॥
तेथील बगिचे ही आपल्या सौंदर्ये देवलोक उद्याना
हरविती । तयात अनेक तरु, जयांच्या सुंदर
डहाळ्या फळ-फुलांच्या गुच्छे नी कोवळ्या
पर्णभरे झुकुनि राहती, तथा जयीं प्रकार-प्रकारे
वेलिंनी आपुल्या अंगपाशे बंधनी ठेविले । तेथील
सरोवर निर्मल जले भरित तयात विहग जोडया
विलासे क्रीडती । ह्या वृक्ष नी जलाशयाच्या सौंदर्ये
ते उद्यान बहु सुशोभित । त्या जलाशयीं राहणारे
मासे जेंव्हा क्रीडती नी उसळी मारिती तदा जळही
उसळतसे । सेवेचि जळावरी उमललेली कमळे
कुमुद कुवलय कल्हार नीलकमल लालकमल नी
शतपत्र कमल आदीचा समुहही हले । या
कमलवनी राहती ते खग बहु मनोहर शब्दे कूंजती
तया ऐकोनी इंद्रिया लाभे सुख । तदा समस्त इंद्रिया
उत्सवगमे ॥ १० ॥
तेथे सूर्याचा प्रकाश न शिरे कारणे दिन-रात्र्यादी
भेद ही तेथ नसे ॥ ११ ॥
तेथील तिमिरा श्रेष्ठ सर्प फडीवरी रत्ने घेवुनी
मिरवी ॥ १२ ॥
या लोकीचे जन औषधी रस रसायन अन्न पान
नी स्नानादिक करिती, ते सर्व पदार्थ दीव्यची,
या दिव्य पदार्थे तयांचे शारीरिक नी मानसिक
रोग हरती । तथा तयांच्या त्वचेसी गुडया घाम
दुर्गंधी थकावट शैथिल्य न ये तथा आयुसवे
शरीरा बदल ही न घडें ॥ १३ ॥
त्या पुण्य पुरुष भगवंताच्या तेजरुप सुदर्शन
चक्राशिवाय कशानेही ते न मरती ॥ १४ ॥
सुदर्शनचक्र येताचि भये असुर रमण्यांचा गर्भ
गळे ॥ १५ ॥
अतललोकीं मय दानवाचा पुत्र असुर बल
राहतो । तये शहान्नव प्रकारे माया रचिली ।
तयातिल कांही आजही मायावी पुरुषा मिळे ।
तये एकदा जांभयी घेतली त्या समयी मुखातुनी
स्वैरिणी कामिनी नी पुश्चली या तीन
जन्मल्या स्त्रिया । त्या या लोकी राहणार्या
पुरुषा हाटक नामक रस पाजुनी संभोगा समर्थ
करिती नी पुन्हा तयां सवे हावभाव दृष्टीने
प्रेममयी हासुनी प्रेमालाप नी आलिंगुनी यथेष्ट
रमण करिती । त्या हाटक रसा पिउनी होती
मदांध नी आपणा दहा हजार हत्तीचे बळ
समजुनी ‘मी ईश्वर, मी सिद्ध’ या परी बरळुनी
गोष्टी करिती ॥ १६ ॥
तयाचे खाली वितल लोकीं भगवान् हाटकेश्वर
नामक महादेव आपुल्या पार्षद भूतगणांसह
निवसती । ते प्रजापतीच्या सृष्टीवृद्ध्यर्थ
भवानी सवे विहार करिती । त्या दोहोंच्या तेजे
एक हाटकी नामक नदी निघे । तियेच्या जलां
वायूंने प्रज्वलित अग्नी मोठया उत्साहे पीतसे ।
तो हाटक नामक सुवर्ण थुंके तयाच्या
आभूषणा दैत्य राजाच्या अंतःपुरातिल स्त्रीया
पुरुषाही धारिती ॥ १७ ॥
वितलाच्या खाली सुतल लोको । तै महा
यशस्वी पवित्र कीर्ती विरोचनपुत्र बली निवसे ।
भगवंते इंद्रा खूश करण्या अदीतीगर्भे बटुवामन
रुपी अवतीर्ण होउनी तया कडुनी तिन्ही लोक
हिसकाविले । पुढे भगवत्कृपेचि तयाचा या
लोकी प्रवेश जाहला । तेथे त्यांना जी संपत्ती
लाभली तशी इंद्रापासीही नसे । तेंव्हा ते त्या
पूज्यतम प्रभुची आपुल्या धर्माचरण द्वारा
आराधना करिती नी आजही निर्भय
वसती ॥ १८ ॥
राजा ! समस्त जीवांचे नियंता नी आत्मस्वरुप
परमात्मा भगवान् वासुदेव जैसे पूज्यतम,
पवित्र पात्रीं येउनी तये परम श्रद्धा नी आदरे
स्थिर चित्ते दिधल्या भूमिदाना न हे फळ परी
सुतल लोकाचे जाहले प्राप्त ऐश्वर्य तो अखंडची ।
परंतु ते भूमिदान साक्षात् द्वार मोक्षाचेची ॥ १९ ॥
भगवंताचे तो शिंकणे पडणे नी विवश समयी
एकदाही मनुष्ये नाम घेता कर्माचे तुटती बंधने,
जधी मुमुक्षू या कर्मबंधना योगसाधना आदी
अन्य उपाये आश्रया घेवुनी कष्टेही न कापू
शकती ॥ २० ॥
तदा आपुले संयमी भक्त नी ज्ञानियांना
स्वस्वरुप प्रदान करणारे नी समस्त प्राणियांचे
आत्मा श्रीभगवंता आत्मभावे केलेल्या
भूमिदानाचे हे फळ न होऊ शके ॥ २१ ॥
भगवंते जरी बळीसी तयाचे सर्वस्व दानाचे
फलित आपुली विस्मृती करणारा हा मायामय
भोग नी ऐश्वर्य ही दिले हा तो न तया
अनुग्रह ॥ २२ ॥
ज्या वेळी कांही अन्य न उपाय दिसता भगवंते
याचनेने छळुनी तयाचे त्रिलोकीचे राज्य
हिराविले नी तयापासी तयाचे केवळ शरीर
ठेविले,तदा देवे वरुणपाशी तया बांधुनी पर्वत
गुहेत टाकिता वदला ॥ २३ ॥
वाटे खेद की- हे ऐश्वर्यवंत इंद्र, विद्वान
असुनीही आपुला खरा स्वार्थ करण्या कुशल
ना । येणे घेण्या संमती बृहस्पतीसी अनन्य भावे
करिला मंत्री आपुला, पुन्हाही त्यांची
अवहेलना करुनी श्री विष्णुभगवंताचे दास्य
न करिता माझ्या कडुनी आपुल्या आपुल्या
साठी हे मागितले भोग । हे तिन्ही लोक तो
केवळ एक मन्वंतरची राहती जे अनंत काळाचे
एक अवयव । भगवंताच्या सेवे पुढती या तुच्छ
भोगा काय ती किंमत असे ॥ २४ ॥
आमुचे पितामह प्रल्हादजीने भगवत्करें पिता
हिरण्यकश्यप मारिला जाता-प्रभूच्या सेवेचा
वर तो घेतला । भगवान् देवो इच्छिती परी
पित्याचे निष्कंटक राज्यही न घेतले ॥ २५ ॥
ते मोठेची महानुभाव । माझ्यावरी तो न भगवत्
कृपा न शांत वासनाही, तेंव्हा माझ्या परी कोण
साहस करी जो तया पासी जाण्याचे ? ॥ २६ ॥
राजन् ! या बळीचे चरित्र आम्ही पुढे अष्टम
स्कंधी विस्तारे कथोची । आपुल्या भक्ताप्रती
भगवत्हृदय कृपेने ओसंडे भरुनी । या मुळे
सर्व जगताचे परम पूजनीय गुरु भगवान्
नारायणाच्या हाती गदा नी ते सदैव बळीच्या
द्वारी तिष्ठती । एकदा जधी दिग्विजय करुनी
गर्वे रावण तिथे पहुंचला, तेंव्हा तया भगवंते
आपुल्या पदांगुष्ठे ठोकरोनी फेकिले लाखो
योजने दुरी ॥ २७ ॥
सुतल लोकाच्या खाली तळातळ । तिथे
त्रिपुराधिपती दानव राज मय निवसे । पहिल्या
तिन्ही लोकां शांती देण्या भगवान् शंकरे
तयांची तिन्ही पुरे होते केले भस्मची । पुढे
तयांचेची कृपे यया लाभले स्थान हे । तो
मायावियांचा परम गुरु, नी महादेवजी कडुनी
रक्षिता, या मुळे तयां नाही मुळि भय सुदर्शन
चक्राचेही । तेथील निवासी तयाचा करिती
बहुही आदर ॥ २८ ॥
तयाचे खाली महातळी कद्रूने निर्मित अनेक
मुखीच्या सर्पाचा क्रोधवश नामक एक निवसे
समुदाय । तयात कूहक तक्षक कालीय नी
सुषेणादी प्रधान । तयांचे मोठे मोठे फणे । ते
सदाची भगवत्गरुडा भिती, तरीही कधी कधी
स्त्रीया, पुत्र मित्र नी परिवारा संगे प्रमत्त होवुनी
करिती विहार ॥ २९ ॥
तयांचे खाली रसातळी पणि नावाचे दैत्य नी
दानव निवसती । ते निवात कवच कालेय नी
हिरण्यपुरवासीय ही म्हणविती । दैत्यांचा
देवतांच्या बरोबर विरोध । ते जन्मताचि बलवान
नी महान साहसी । परी तयांचा प्रभाव संपूर्ण
लोकी पसरला त्या श्रीहरीच्या तेजे
बलाभिमानाचा चुरा झाल्या कारणे ते
सर्पासमानचि लपती, तथा इंद्राची दूती सरमाने
म्हटलेल्या मंत्र वर्ण रुप वाक्य कारणे इंद्रासी
भिती ॥ ३० ॥
रसातळाच्या खाली पाताळ । तेथे शंख कुलिक
महाशंख श्वेत धनंजय धृतराष्ट्र शंखचूड कंबल
अश्वतर नी देवदेवतादी मोठे क्रोधी नी प्रचंड
फण्याचे नाग निवसती । ययात प्रधान
वासुकी । तयात कुणा पाच कुणा सात कुणा
दश नी कुणा सहस्त्र शिरे । तयांच्या शिरावरी
प्रकाशक मणि आपुल्या प्रकाशे
पाताळ लोकांचा सारा अंधार करिती नष्ट ॥ ३१ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चोविसावा अध्याय हा ॥ ५ ॥ २४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|