समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध पाचवा - अध्याय २३ वा
शिशुमार चक्राचे वर्णन -
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! सप्तर्षिंच्या तेरा लक्ष योजने वरी
ध्रुवलोक । यासी भगवान् विष्णुचे परमपद
म्हणती । इथे उत्तानपाद राजाचे पुत्र परमभक्त
ध्रुवजी निवसती । अग्नी इंद्र प्रजापती कश्यप
नी धर्म हे सर्व अत्यंत आदरे सवेचि यासी
प्रदक्षिणा करिती । आताही कल्प पर्यंते
निवसणारे लोक ययांचे आधारा हे स्थित ।
यांचा या लोकीचा पराक्रम या पूर्वी चतुर्थ
स्कंधी वर्णिला ॥ १ ॥
सदैव जागता अव्यक्तगति भगवान् काळाच्या
द्वारे जे ग्रह-नक्षत्रादी ज्योतिर्गण निरंतर जाते
फिरविले, भगवंते ध्रुवलोकासिच सर्वांचा
आधारस्तंभ रुपे केलेसे नियुक्त । तेंव्हा हे
एकाची स्थानी राहुनी सदा प्रकाशति ॥ २ ॥
जसे खळ्यासी बैल लांब आखुड दोरे बांधिता
कमी-अधिक क्रमशः निकट-दूर नी मध्यम
ठेवुनी खांबाच्या चोहीकडे मंडलाकारे सगळे
नक्षत्र नी ग्रहगण आत बाहेर क्रमे या कालचक्री
नियुक्त होउनी ध्रुवलोकाचाचि घेउनी आश्रय
वायूच्या प्रेरणे कल्पांता पर्यंत राहती फिरत
राहती । ज्या परी मेघ नी ससाणा आदी पक्षी
आपुल्या कर्माच्या सहायतेने वायूच्या आधीन
राहुनी आकाशी उडत राहती, त्या प्रकारे हे
ज्योतिर्गण ही प्रकृती नी पुरुष संयोगवश
आपापल्या कर्मानुसार फेर्या मारिती, न
पडती पृथिवीवरी ॥ ३ ॥
कोणी पुरुष भगवत् मायेच्या आधारे या स्थिर
चक्राचे शिशुमार(मगर) च्या रुपी वर्णने करिती ॥ ४ ॥
हा शिशुमार कुंडली मांडुनी अधोमुख । याच्या
शेपटीच्या टोकावरी स्थित ध्रुव । नी पुच्छमध्या
प्रजापती अग्नी इंद्र नी धर्म । पुच्छ्मुळासी धाता
नी विधाता । याच्या कटि प्रदेशी सप्तर्षी । हा
शिशुमार उजवीकडे वळुनि कुंडली मारिता ।
या स्थिती अभिजिता सवे पुनर्वसु पर्यंते जे
उत्तरायणी चौदा नक्षत्रे, ते याच्या उजवीकडे
नी पुष्यासह उत्तराषाढा पर्यंते ते दक्षिणायनचि ।
नक्षत्रे चौदा ती डावीकडे । लोकातही जधी
शिशुमार कुंडलाकार हो, तदा दोहो अंगीची
संख्या सम हो या परी येथे नक्षत्रांची संख्या
सम । ययाचे पाठीसी(अजविथी) मूळ
पूर्वाषाढा नी उत्तराषाढा या तिन्ही नक्षत्रांचा
समुह, नी उदरी आकाश गंगा ॥ ५ ॥
राजन् ! याच्या उजव्या नी डाव्या कटितटीं
पुनर्वसु नी पुष्य नक्षत्रे, पाठीसी उजव्या नी
डाव्या पायीं आर्द्रा नी आश्लेषा नक्षत्रे तथा
उजव्या नी डाव्या नाकासी क्रमशः अभिजित्
नी उत्तराषाढा । या परी उजव्या नी डाव्या नेत्री
श्रवण नी पूर्वाषाढा एवं उजव्या नी डाव्या कानीं
धनिष्ठा नी मूळ नक्षत्रे । मघादी दक्षिणायनीचे
आठ नक्षत्रे उजव्या फासळीसी नी विपरित क्रमे
मृगशिरा आदी आठ नक्षत्रे डाव्या फासळिसी ।
शतभिषा नी ज्येष्ठा हे दो नक्षत्रे क्रमशः उजव्या
नी डाव्या जागी स्कंधिच्या ॥ ६ ॥
याच्या वरच्या जबडयासी अगस्त्य, खालच्या
दाढेसी नक्षत्ररुप यम मुखी मंगल लिंगी शनी
कमरेसी बृहस्पती छातीसी सूर्य हृदयी नारायण
मनीं चंद्रमा स्तनीं अश्विनीकुमार, प्राण नी
अपानी बुध नाभिसी शुक्र गळ्यासी राहू, समस्त
अंगी केतू नी रोमीं समस्त तारांगण स्थित ॥ ७ ॥
राजन् ! हे भगवान् विष्णुचे सर्वदेवमय स्वरुप ।
यांचे प्रतिदिन सायंकाली पवित्र नी मौन होउनी
दर्शन, चिंतन करणे - या मंत्रे जप करणे -
"संपूर्ण ज्योतिर्गणाश्रय, कालस्वरुप,
सर्वदेवाधिपती, परम पुरुषाचे परमात्म्याचे
आम्ही नमस्कार पूर्वक ध्यान करितो ॥ ८ ॥
(इंद्रवज्रा)
तारा ग्रहे आदिहि दैवि रुपे
हरी प्रकाशे, स्मरणे त्रिकाळ ।
स्मरे त्रिकाळी अन वंदितो जो
समस्त पापे हरती तयाची ॥ ९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेविसावा अध्याय हा ॥ ५ ॥ २३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|