समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय १९ वा

किंपुरुष नी भरतवर्षाचे वर्णन -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! किंपुरुषवर्षीं श्री लक्ष्मणबंधू आदीपुरुष
सीताहृदयाभिराम भगवान् श्रीरामाच्या चरण
सन्निधरसिक परम भागवत श्री हनुमानजी
अन्य किन्नरां सहित अविचल भक्ति भावे तया
उपासिती ॥ १ ॥
तेथे अन्य गंधर्वांसहित आर्ष्टिसेन तयांचे स्वामी
भगवान् रामाची परम कल्याणमय गुणगाथा
गातात । श्री हनुमानजी जे ऐकती, नी स्वयं या
मंत्राचा जप करुनि स्तविती ॥ २ ॥
"ॐ नमो भगवते उत्तम श्लोकाय नमः "
आम्ही ओंकार स्वरुप पवित्रकीर्ती भगवान्
श्रीरामा नमितो । आपणासी उत्तम पुरुष
लक्षणे, शील नी आचरणही संयतचित्त,
आपण लोकाराधन तत्पर, साधुतेच्या परीक्षार्थे
अत्यंत द्विजभक्त । अशा महापुरुषा महाराज
रामा आमुचा वारंवार प्रणिपातची ॥ ३ ॥
(इंद्रवज्रा)
विशुद्ध बोधस्वरुपी तुम्ही तो
    रुप प्रकाशे भ्रम नष्टितात ।
सर्वांतरात्मा अन शांत ज्ञान
    या शून्यरुपा प्रणिपात माझा ॥ ४ ॥
न राक्षसां केवळ मारण्याला
    दावावया मार्गचि जन्मला तू ।
प्रत्यक्ष तू तो जगदात्म ऐसा
    सीता वियोगे तुज दुःख कैसे ॥ ५ ॥
आत्मा असे धैर्यवंतासि तू तो
    आसक्त ना तू तुचि वासुदेव ।
न मोह होतो तुजला सितेचा
    न त्यागिसी लक्ष्मण बंधु यासी ॥ ६ ॥
लोके शिकाया तव हा व्यव्हार
    चातुर्य बुद्धी अन गूण रुप ।
तुझ्या प्रसन्ने विण ना मिळे की
मैत्री तरी वानरासी करीसी ॥ ७ ॥
त्या देवता ‍ऽ सूर नि वानरांनी
    श्रीरामरुपा भजणे हिताचे ।
साक्षात् हरी तू नररुप रामा
    तू दिव्य धामा जनताचि नेली ॥ ८ ॥
(भृंगनाद)
भारतवर्षीं ही भगवान् दयावश नर-नारायण
रुप धरुनी संयमी पुरुषां अनुग्रह करण्या
अव्यक्त रुपे कल्पांता पर्यंत तप करिती ।
तयांची तपस्या ऐसी की जये धर्म ज्ञान वैराग्य
ऐश्वर्य शांती नी उपरतीची उत्तरोत्तर वृद्धी हो‌उनी
अंती लाभते आत्मस्वरुपची ॥ ९ ॥
तिथे भगवान् नारदजी स्वयं श्री भगवंते कथिला
त्या सांख्ययोगशास्त्रा सहित भगवत् महिमा प्रगट
करणारे पंचरात्र दर्शन सावर्णिक मुनिना
उपदेशिण्या, भारतवर्षाची वर्णाश्रम धर्मावलंबिनी
प्रजेसहित अत्यंत भक्तिभावे भगवान् श्रीनर-
नारायणाची उपासना करिती नी या मंत्राचा जप
करुनी स्तोत्रा गाउनी स्तुती करिती ॥ १० ॥
"ॐ नमो भगवते उपशम शीलाय "ओंकार
स्वरुप, अहंकार रहित, निर्धन्यांचे धन, शांत
स्वभाव-ऋषि प्रवर भगवान् नर नारायणा
नमितो । ते परमहंसाचे गुरु नी आत्म्याचे
अधीश्वर । तयांना पुनः पुन्हा नमितो ॥ ११ ॥
ते गाती स्तोत्र हे -
(इंद्रवज्रा)
सर्गादि कर्ता असुनी निगर्वी
    राही तनूसी नच भूक तृष्णा ।
द्रष्टा असोनी नच दृष्टि लिंपे
    असंग सत्वा नमितो तुला मी ॥ १२ ॥
योगेश्वरा ! ब्रह्माजीने कला नी
    या साधनांची महती कथीली ।
त्या अंतकाळी अभिमान सोडा
    नी भक्ति द्वारा हरि तो स्मरावा ॥ १३ ॥
चिंता करीता धन पुत्र यांची
    भितात मूढोमरणास नित्य ।
विद्वान भीती मरणा तसेची
    तेंव्हा तसे ज्ञान ठरेचि व्यर्थ ॥ १४ ॥
अधोक्षजा ! ही तव प्रेम भक्ती
    जेणे सरे ही ममता शरीरी ।
दुर्भेद्य ऐसे दृढ बद्धपाश
    गर्वी रुपाचा मग कापु आम्ही ॥ १५ ॥
(भृंगनाद)
राजन् ! या भारतवर्षीं ही बहुत पर्वत नी सरिता -
जै हिमाचल्, मंगलप्रस्थ मैनाकत्रिकुट ऋषभ
कूटक कोल्लक सह्य देवगिरी ऋष्यमूक श्रीशैल
वेंकट महेंद्र वारिधार विंध्य शुक्तिमान् ऋक्षगिरी
पारियात्र द्रोण चित्रकूट गोवर्धन रैवतक कुकुभ
नील गोकामुख इंद्रकील नी कामगिरी आदी ।
या परी शेकडो हजारो पर्वते । तयाच्या तट प्रांते
निघणारे नद नी नद्याही अगणित ॥ १६ ॥
या नद्या आपुल्या नामेही जीवां पवित्र करिती नी
भारतीय प्रजा ययांच्या जलीं स्नानादी करिते ॥ १७ ॥
तयातिल प्रमुख नद्या ह्या अशा-चंद्रवसा
ताम्रपर्णी अवटोदा कृतमाला वैहायसी कावेरी
वेणी पयस्विनी शर्करावर्ता तुंगभद्रा कृष्णा
वेण्या भीमरथी गोदावरी निर्विंध्या पयोष्णी
तापी रेवा सुरसा नर्मदा चर्मण्वती सिंधू अन्ध
नी शोण नद, महानदी वेदस्मती ऋषिकुल्‌या
त्रिसामा कौशिकी यमुना सरस्वती दृषन्दती
गोमती शरयू रोधस्वती सप्तवती सुषोमा शतद्रू
चंद्रभागा मरुद्‌वृधा वितस्ता असिकी नी विश्वा ॥ १८ ॥
या वर्षी जे पुरुष जन्मती ते आपुल्या कृत
सात्विकी राजस नी तामस कर्मानुसार क्रमशः
नाना प्रकारे दिव्य माणुष नी नारकीयोनी
मेळविती, कारणे कर्मानुसार क्रमशः नाना
प्रकारे दिव्य माणुष नी नारकीयोनी मेळविती,
कारणे कर्मानुसार सर्व जीवां सर्व योनी
लाभती । या वर्षीं आपापल्या वर्णी करिता
नियत धर्माचे विधिवत् अनुष्ठाने मोक्षही मिळे ॥ १९ ॥
परीक्षिता ! संपूर्ण जीवात्मा रागादी दोष रहित
अनिर्वचनीय निराधार परमात्मा भगवान् वासुदेवीं
अनन्य नि अहैतुक भक्तिभावे मोक्षपदही मिळे,
जेंव्हा अनेक परि गति प्रगटणारी अविद्यारुप
हृदयग्रंथी छेदते, तदा भगवत् प्रियभक्ता संग
मिळे ॥ २० ॥
(या वर्षी जे मानव जन्मती,
तयांची महिमा गाती देवही अशी)
(इंद्रवज्रा)
ओहो ! जिवांचे तरि काय भाग्य
    भक्त्यर्थ हा मानव जन्म झाला ।
का श्रीहरी पावन याज झाला
    न भाग्य आम्हा तळपून ऐसे ॥ २१ ॥
आम्ही तपो यज्ञ व्रतेहि केले
    केले तये तुच्छहि स्वर्ग लाभ ।
भोगेचि येथे स्मृति नष्ट होते
    नारायणाचे पद नाठवे ती ॥ २२ ॥
ही कल्प आयू सरता पुन्हा त्या
    संसारचक्री पडणेचि आम्हा ।
ब्रह्मादिकां भारतभूमि मध्ये
    जन्मावया आवडते खरेची ।
क्षणात तेथे हरिसी शरीर
    अर्पोनि लाभे पद श्रेष्ठ त्याचे ॥ २३ ॥
जेथे न वाहे नद कीर्तनाचा
    तेथे कधीही नच संत येती ।
ज्या यज्ञशालीं नच गान-नृत्य
    त्या श्रीहरीचे, तर तुच्छ स्वर्ग ॥ २४ ॥
जेथे जिवा ज्ञान नि कर्म द्रव्य
    लाभे अनूकूलचि भारतात ।
ना हो मनासी भवमुक्त होण्या
    तो व्याध फासी फसलाच पक्षी ॥ २५ ॥
अहो कसे भाग्यचि भारताचे
    अनेक द्रव्ये हविती यजात ।
सघोष मंत्रे मनि भाव होता
    प्रसन्न तेणे हरि पावतोही ॥ २६ ॥
सकाम भक्ता जरि वस्तुलाभ
    पुन्हा तयाच्या मनि लोभ होतो ।
निष्काम योगे भजता हरीला
    तेणेचि प्राप्ती हरिपादपद्म ॥ २७ ॥
येथे सुखासी जरि भोग झाला
    जे पुण्य गाठीं तयि लाभ व्हावा ।
राहो स्मृती त्या हरिकीर्तनाची
    नी जन्म व्हावा मग भारतात ॥ २८ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! सगरराजपुत्रे आपुल्या यज्ञाचा हय
शोधिण्या पृथ्वीते खोदिले चारि दिशां । तेणे
जंबूद्वीपातही अष्टभाग जाहले ऐसे कोणी वदती ॥ २९ ॥
ते स्वर्णप्रस्थ चंद्रशुक्ल आवर्तन रमणक्
मंदरहरिण सिंहल नी लंका हे असे ॥ ३० ॥
भरतश्रेष्ठा ! या परी मी गुरुमुखिचे ऐकिले,
तैसेचि मी जंबूद्वीप वर्षाचे भाग कथिले ॥ ३१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणिसावा अध्याय हा ॥ ५ ॥ १९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP