समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध पाचवा - अध्याय १८ वा
भिन्न भिन्न देशांचे वर्णन -
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! भद्राश्ववर्षी धर्मपुत्र भद्रश्रवा नी तयाचे
प्रमुख सेवक भगवान् वासुदेवाची हयग्रीव
संज्ञक धर्ममयी प्रीय मूर्तीला अत्यंत समाधी
निष्ठेद्वारा हृदयीं स्थापित करुनी स्तुती करिती
मंत्र जापुनि हा ॥ १ ॥
"ॐ नमो भगवते धर्मा
आत्म शोधना नमो नमो ॥ २ ॥
(इंद्रवज्रा)
अहो ! विचित्रा भगवद्लिला या
काळा बघे नी जिव पाप इच्छी ।
पिता मुलाचे जरि प्रेत जाळी
तरीहि इच्छी जिव तो जगाया ॥ ३ ॥
ज्ञानी जगा नश्वरची पहाती
तरी प्रभो मोह न सोडि त्यांना ।
अनादि आश्चर्य असाचि तू तो
माझा तुला हा प्रणिपात देवा ॥ ४ ॥
जरी अकर्ता तरि लोक तूंते
लयादि कर्मीं तुज मानितात ।
नाश्चर्य कांही तव काळ सारा
अतीत तू त्या सगळ्या मधोनी ॥ ५ ॥
मनुष्य-घोडा तव विग्रहो हा
वेदासि दैत्ये लयिं लोपवीले ।
ब्रह्मासि ते तूं दिधले स्वयेची
अशी तुझी कीर्ति तुला नमस्ते ॥ ६ ॥
(भृंगनाद)
हरिवर्षीं भगवान् नृसिंह रुपे वसती । ज्या कारणे
तये हा अवतार त्याची कथा पुढे सप्तम स्कंधी
वदू । भगवंताच्या त्या प्रिय रुपा महाभागवत
प्रल्हादजी त्या वर्षीं अन्य पुरुषांसह निष्काम
एवं अनन्य अनन्य भक्तीने पूजिती । प्रल्हादजी
महापुरुषोचितगुणे संपन्न तथा यांनी आपुले
शील नी आचरणे दैत्य नी दानव कुलां केले
पवित्र । ते या मंत्राचा नी स्तोत्राचा जप-पाठ
करिती ॥ ७ ॥
ॐ नमो भगवते नरसिंहाय । तुम्ही अग्न्यादी
तेजाहुनी ही तेजाळ नमस्कार आपणा, हे
वज्रनख हे वज्रदंष्ट्र तुम्ही या असे प्रगट व्हा,
जाळा आमुच्या कर्म वासना, जाळा। नष्ट करा
आमुच्या कर्म वासना नष्ट करा । ॐ स्वाहा ।
आमुच्या हृदयी प्रकाशित व्हा देवोनी
आभयदान । ॐ क्षौम् ॥ ८ ॥
(इंद्रवज्रा)
कल्याण हो या जगतास सारे
दुष्टां सुबुद्धी अन मित्रभाव ।
जावे सुमार्गे मन आमुचे नी
निष्काम होता भजण्या हरीला ॥ ९ ॥
स्त्री पुत्र गेहो धन बंधु यांची
आसक्ति होवो हरिसी भजाया ।
निर्वाह होता मन तुष्ट त्याला
त्या प्राप्त सिद्धी, नच लोभ राही ॥ १० ॥
त्या भक्तसंगे हरिकीर्तनाच्या
पवित्र तीर्थे बळ तेज वाढे ।
त्या सेवने तो हृदयात येतो
नष्टी मळा त्या नच कोण इच्छी ॥ ११ ॥
निष्काम भक्ता हृदयात देव
धर्मादि ज्ञाना सह सर्व येती ।
न भक्त त्याच्या हृदयात ना ये
तो तुच्छ मोहावरि धाव घेतो ॥ १२ ॥
माशास जैसे जळ प्रीय आत्मा
जीवा तसा श्रीहरि प्रीय आत्मा ।
त्या त्यागिता गर्वचि वाढतो नी
वाढे परी ना गुण कांहि अंगी ॥ १३ ॥
असूर यांनी अभिमान क्रोध
विषाद इच्छा भय दीनता नी ।
संसार चक्री गृहत्यागि व्हावे
नृसिंह पायी मग आसरा हो ॥ १४ ॥
(भृंगनाद)
केतुमालवर्षीं लक्ष्मीसी नी संवत्सर नामक
प्रजापतीपुत्र नी पुत्रिंना प्रिय करण्या भगवान्
कामदेवरुपे निवसती । त्या रात्रीच्या अभिमानी
देवतारुप कन्या नी दिवसाभिमानी देवता
पुत्रांची संख्या मनुष्याच्या शतवर्ष दिन नी रात्र
एवढी अर्थात् छत्तीस हजार वर्षे आयू नी ते तेवढे
अधिपती । त्या कन्या परम पुरुष श्री
नारायणाच्या सुदर्शना घाबरती । तेणे प्रतिवर्ष
तयांचे नष्टती गर्भ नी पडती ॥ १५ ॥
भगवान् आपुल्या सुललित गतिविलासे सुशोभित
मधुर-मधुर मंदस्मिते मनोहर लीलापूर्ण चारु
चितवने काही खुणावुनी सुंदर सुंदर भूमंडळ छटां
द्वारा वदनारविंदाच्या राशी-राशी सौंदर्या प्रगटुनी
सौंदर्यदेवी लक्ष्मीसी अत्यंत प्रमोदित करिती नी
स्वयंही आनंदित राहती ॥ १६ ॥
श्री लक्ष्मीजी परम समाधी योगद्वारा भगवत्
मायामय स्वरुपाची रात्र समयीं प्रजापती
संवत्सराच्या कन्या सहीत नि दिवसा तयांच्या
पतींच्या सवे आराधना नी या मंत्री जापुनी
भगवत् स्तुती करिती ॥ १७ ॥
‘ॐ र्हां र्हीं र्हूं ॐ नमो भगवते हृषिकेशाय ’
जो इंद्रिया नियंता नी संपूर्ण श्रेष्ठ वस्तूं सहित
क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती नी संकल्प -
अध्यवसायादी चित्त धर्म तथा तयांच्या विषया
अधीश्वर, त्या मानसिक ऐंद्रियिक तथा शारिरिक
बलस्वरुप परम सुंदर भगवान् कामदेवा नमितो ॥ १८ ॥
(इंद्रवज्रा)
स्त्रीया व्रताते करिती कठोर
मिळावया लौकिक तो पती नी ।
परंतु पुत्रा धन आयु यांची
तो रक्षिता ना स्वयची पराय ॥ १९ ॥
खरा पती जो स्वय निर्भयो नी
दुज्या भयापासुनि रक्षि तोची ।
तू एकलाची भय मुक्त भर्ता
तू लाभला श्रेष्ठचि लाभ आहे ॥ २० ॥
जी स्त्री पुजीते तव पादपद्म
न इच्छिताही सगळेचि लाभे ।
परी सकामे पुजिती तयांना
जे इच्छिले ते मुळि एक लाभे ।
न भोग होता मग नष्ट सारा
संताप राही मनि एकला तो ॥ २१ ॥
अजित् मला मेळविण्यास इंद्र
ब्रह्मा नि रुद्रो तप थोर घेती ।
मला तुझ्या पादपद्मीच सेवा
हवी, नको कांहि मुळीच अन्य ॥ २२ ॥
हे अच्युता तू निज पाद देसी
भक्तां शिरी, ते मम ठेव डोई ।
स्त्रीलांछना तू धरिलेस वक्षीं
रहस्य लीला नच कोणि जाणे ॥ २३ ॥
(भृंगनाद)
रम्यक्वर्षीं भगवंते तेथील मनुला पूर्व कालीं
आपुले परमप्रिय दाविले मत्स्यरुप । मनुजी
या रुपा आजही मोठया श्रद्धें उपासिती नी
या मंत्रा जापुनि स्तुती करिती ॥ २४ ॥
‘ॐ नमो भगवते मुख्य तमाय नमः ’
सत्व प्रधान प्रमुख प्राण सूत्रात्मा तथा मनोबल,
इंद्रीयबल नी शरीरबल ओंकारपद अर्थात् सर्वश्रेष्ठ
भगवान् महामत्स्या नमस्ते वारंवार नमस्ते ॥ २५ ॥
(इंद्रवज्रा)
तो नाचवी जै नट बाहुल्यांना
तै विप्रसूत्रे जग नाचवीसी ।
तुला न ब्रह्मादिक जाणतात
तू सर्वव्यापी तव शब्द वेद ॥ २६
होता मनीं गर्व त्या लोकपाला
ते आपुल्या भिन्न रुपा पहाती ।
नी स्थावरो जंगम जीव यांचे
यत्नेहि रक्षार्थ अपात्र होती ॥ २७ ॥
माझ्या सवे तू वन औषधी नी
पृथ्वीस घेवोनि जलीं लयासी ।
मोठया समुद्रात विहार केला
तू रे नियंता नमितो तुला मी ॥ २८ ॥
(भृंगनाद)
हिरण्मय वर्षीं भगवान् कूर्मरुपा घेउनी निवसती ।
अर्यमा पितृराज निवासियां सहित या रुपाची
उपासना करिती नी या मंत्रे स्तुति करिती ॥ २९ ॥
"ॐ नमो भगवते अकूपाराय" संपूर्ण
सत्वगुणयुत, जलीं विचरता जया न स्थान
कांही नी काला पासुनि दूरो, त्या ओंकाररुप
सर्वव्यापक सर्वाधार भगवान् कूर्मा नमस्कार
पुनःपुन्हा ॥ ३०
(इंद्रवज्रा)
मिथ्या असे हा जगभास सारा
म्हणोनि त्याला नच मोजिता ये ।
तरी तुझे हे रुप सर्व आहे
अवर्णनीया नमितो तुला मी ॥ ३१ ॥
जरायुजस्वेदज अंडजो नी
उद्भीज नी जंगम स्थावरे नी ।
ऋषी तथा दैवत पितृ भूत
हे विश्व सारे तव रुप भिन्न ॥ ३२ ॥
असंख्य रुपे नि नामे अनंत
चोवीस तत्वे कथिले कपीले ।
ते सर्व होती अन नष्ट जाती
त्या सर्व रुपा नमितो पुन्हा मी ॥ ३३ ॥
(भृंगनाद)
उत्तर कुरुवर्षीं भगवान् यज्ञपुरुष वराहमूर्ती
धारण करुनी विराजती । तेथील जिवासियां
समवेत साक्षात् पृथ्वीदेवी तयांना अविचल
भक्तिभावे उपासिते नी परमोत्कृष्ट या मंत्रा
जापुनि स्तुति करिते ॥ ३४ ॥
‘ॐ नमो भगवते मंत्र तत्व लिंगाय ’ज्याचे
तत्व मंत्रे समजते तो यज्ञ नी क्रतुरुप तथा श्रेष्ठ
अंग जया, त्या ओंकारस्वरुप शुक्लकर्ममय
त्रियुगमूर्ती पुरुषोत्तम भगवान् वराहा वारंवार
नमस्कार ॥ ३५ ॥
(इंद्रवज्रा)
अग्नी जसा त्या अरणी मधोनी
तसे विवेकी शरिरातुनी त्या ।
रुपास घेती मथुनी तुझ्याची
तैशा तुझ्या त्या स्वरुपा नमी मी ॥ ३६ ॥
द्रव्य क्रिया हेतु तनू नि ईश
कर्ता नि काळादि अशीच माया ।
या आकृतिंच्या विरहीत तुम्ही
सदा तुम्हा हा प्रणिपात माझा ॥ ३७ ॥
त्या चुंबकाचा सहयोग होता
लोहासि चैतन्य घडे नि नाचे ।
तूं इच्छिता सर्व घडे नि मोडे
साक्षी जगा तू तुजला नमस्ते ॥ ३८ ॥
हत्ती दुजांते उचलोनि फेकी
तसाचि तूं दैत्याहि फेकिला की ।
वराहरुपा जगकारणा तूं
तू शक्तिमान् मी नमिते सदाची ॥ ३९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हा ॥ ५ ॥ १८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|