समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध पाचवा - अध्याय १७ वा
गंगेचे विवरण आणि भगवान शंकराकडून संकर्षण देवाची स्तुति -
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! जधि राजा बळीच्या यज्ञशाळेसी साक्षात्
यज्ञमूर्ती भगवान् विष्णुने त्रिलोका व्यापिण्या
आपुल्या पाया विस्तारिले, तदा तयाच्या डाव्या
पायाच्या अंगुष्ठ नखे ब्रह्मांडाच्या वरचा कवच
भाग फाटला । त्या छिद्रातुनी ब्रह्मांडा बाहेरच्या
जलाची धारा पातली, ती तयाच्या चरणकमला
धुवुनि तियेत लागल्या केशरे लाल जाहली । त्या
निर्मल जलस्पर्शे संसाराचे सर्व पापे नष्टती, परंतु
ती स्वये निर्मळचि राहतसे । प्रथम तिज अन्य
नामा शिवाय भगवत्पदीचि म्हणती । ती धारा
हजारो युग नंतरे स्वर्गाच्या शिरोभागी स्थित
ध्रुवलोकी उतरली, जिला विष्णुपद ही म्हणती ॥ १ ॥
वीरव्रत परीक्षिता ! त्या ध्रुवलोकी उत्तानपादपुत्र
परम भागवत ध्रुव निवसे । तो अव्याहत वाढत्या
भक्तिभावाने ‘हे आमुच्या कुलदैवताचे
चरणोदक ’ म्हणुनि आजही त्या जळां आदरे
शिरि घे । त्या वेळी प्रेमावेशा कारणे तयाचे हृदय
अत्यंत गद्गद, उत्कंठावश भरल्या नेत्रातुनि
दोन्ही कमलनेत्रातुनी निर्मळ अश्रूंच्या धारा
वाहती नी शरीरी रोमांच उठती ॥ २ ॥
तयाचे पश्चात् आत्मनिष्ठ सप्तर्षिगण तयाचा
प्रभाव जाणण्या ‘हीच तपस्येची अंतिम
सिद्धी ’असे मानुनी आजही आदरे आपुल्या
जटाजुटावरि तैसेचि धारिती, जैसे मुमुक्षु
जन मिळाल्या मुक्तिसी । ते तो बहुहि
निष्काम, सर्वात्मा भगवान् वासुदेवाच्या
निश्चल भक्तिलाचि आपुले परम धन मानुनी
तयांनी आपुल्या सर्व कामना त्यजिल्या,
एवढया की ते तया पुढे कांहीच न मानिती ॥ ३ ॥
तिथे गंगाजी करोडो विमानांनी घेरुनी
आकाशातुनी उतरे नी चंद्रमंडला आप्लाविता
मेरुशिखरावरी ब्रह्मपुरीत पडे ॥ ४ ॥
तिथे सीता अलकनंदा चक्षु नी भद्रा या चारी
नावाने चार धारात विलगे तथा विविध चारी
दिशांसी वाहता अंती नद-नदीश्वर समुद्रीं पडे ॥ ५ ॥
सीताही यांच्यातिल ब्रह्मपुरीहुनी केशरांचल
सर्वोच्च शिखरा वरुनी वाहता गंधमादना
वरुनी पुढे भद्राश्ववर्षा प्लावित करुनी पूर्वेसी
खार्या समुद्रा मिळे ॥ ६ ॥
या परी चक्षमाल्यनच्या शिखरावरी पहुचुनी
तेथुनी उत्तुंग केतुमाल पर्वता वरुनी वाहता
पश्चिमीं क्षार समुद्रा मिळे ॥ ७ ॥
भद्रा मेरुपर्वत शिखराहुनि उत्तरे उत्तर दिशीं एक
पर्वताहुनी दुसर्यां जाउनी शेवटी शृंगवान्
शिखराहुनी पडता उत्तरकुरु देशीं प्रगटुनी
वाहता समुद्रा मिळे ॥ ८ ॥
अलकनंदा ब्रह्मपुरीहुनी निघुनि दक्षिणे कडील
पर्वत शिखरां ओलांडुनी हिमगिरि शिखरां
चिरुनि भारतवर्षीं येउनि दक्षिण समुद्री मिळे ।
इयेत स्नान करिता पदोपदी अश्वमेधाचे नी
राजसूय यज्ञाचे फल न दुर्लभ ॥ ९ ॥
प्रत्येक वर्षीं मेरु आदी पर्वतांहुनि निघती
आणखी शेकडो नद नी नद्या ॥ १० ॥
या सर्व वर्षात भारत भूमीचि कर्मभू उर्वरित
आठीही वर्ष तो स्वर्गीय लोकांच्या भोगा
पासुनि उरलेल्या पुण्यायींची भोगस्थाने । त्या
मुळे त्यांना भूलोकाचे स्वर्गही म्हणती ॥ ११ ॥
तेथील देवतुल्य जे जीव त्यांची आयू आपुल्या
गणने दहा हजार वर्षे । तयांचे बलही दहाहजार
हत्तींसम तया वज्रासम सुदृढही शरीरी नी शक्ती
यौवन नी उत्साहही, त्या कारणे ते बहुत समय
मिथुनादी भोगही भोगिती। अंती जेंव्हा भोग
सरती तदा त्यांची आयु राही एक वर्षाचि, तदा
त्यांच्या स्त्रीया होती गर्भवती । या परी तेथे
सदा त्रेतायुग समानचि जाय समय ॥ १२ ॥
तिथे ऐसे आश्रम भवन वर्ष नी पर्वत की
जयांची उपवने सदाचि पुष्पगुच्छ, फळे नी नव
पल्लवांनी लता नी वृक्ष भारे झुकुनि शोभती,
तिथे निर्मल जले भरलेली सरोवरेही, जिथे तर्हे
तर्हेची कमळे विकसली नी तये गंधे प्रमोदित
होउनी राजहंस जलकोंबडया सारस
चक्रवाकादी पक्षी विविध भाषा बोलती नी
विभिन्न जातीचे उन्मत्त भृंग मधुर मधुर गुंजारव
करिती । त्या आश्रमी भवनीं पर्वती जलाशयीं
तेथील देवेश्वर गण परम सुंदरी देवांगनां समवेत
कामोन्माद सूचक हास-विलास नी लीला
कटाक्षे मन नी नेत्रा आकृष्ट होउनी जलक्रीडादी
खेळ करिता स्वच्छंद विहरती नी तयांचे प्रमुख
अनुचरगण अनेक सामग्रीने तयांचा सत्कार
करिती ॥ १३ ॥
या नवू वर्षीं परम पुरुष भगवान् नारायण तेथील
पुरुषा अनुग्रहा या वेळीही आपुल्या विविध
रुपे विराजती ॥ १४ ॥
इलाव्रतावर्षीं फक्त भगवान् शंकरचि पुरुष । श्री
पार्वतीजीचा शाप जाणता कोणीही पुरुष न
जाय तिथे, जायी तेथे तो स्त्री रुपचि होतसे ।
याचे कथन पुढे नवव्या स्कंधी वदूचि ॥ १५ ॥
तिथे पार्वती नी लक्षावधी तिच्या दासी भगवान्
शंकरा सेविति, तो परम पुरुष परमात्मा वासुदेव,
प्रद्युम्न अनिरुद्ध नी संकर्षण संज्ञक चतुविध
मूर्तीत आपुल्या कारणरुपा संकर्षण नाम
तमप्रधान चवथ्या मूर्तीचा ध्यान स्थित मनोमय
विग्रहरुपी चिंतन करी नी या मंत्राचा उच्चार
उच्चार करुनी स्तुती करितसे ॥ १६ ॥
श्री भगवान शंकर म्हणतात -
ॐ नमो भगवते महापुरुषा, सकलगुण संपन्ना,
अनंता, अव्यक्ता ॐ नमो ॥ १७ ॥
(इंद्रवज्रा)
नमो भजन्या ! तव पादपद्म
भक्ताश्रयो ऐश्वर आश्रयो ही ।
मुक्तीच देसी प्रगटोनि भक्ता
अभक्त त्यांना भवबंध देसी ॥ १८ ॥
प्रभो ! मनाचा नच क्रोध थांबे
पापास दृष्टी चिकटे त्वरेने ।
साक्षीरुपाने जग पाहसी तू
न कोण इच्छी तव भक्ति देवा ॥ १९ ॥
ज्यांना तुझे लाल अरुण नेत्र
प्राशीयले जै मधु-आसवादी ।
मायेचि तैसे गमते भ्रमाने
मिथ्याचि त्यां दर्शन ते घडे की ॥
तुझ्या पदाचा परिस्पर्श होता
त्या नागपत्न्या मनिं चंचला ज्या ।
लज्जावशेची असमर्थ होती
पूजाविधी तो तव साधण्याला ॥ २० ॥
ते वेद गाती गुण विग्रहाते
गुणातिता तूचि अनंत ऐसा ।
सहस्त्रशीर्षा वरि हे तुझ्या की
भूमंडलाची गति रेणु ऐसी ॥ २१ ॥
तुझ्या अहंकार रुपातुनी ते
तेजोमयी त्रीगुण देवताही ।
तुझ्या महत्तत्व गुणे करोनी
ब्रह्मा तयातूनिच जन्म घेतो ॥ २२ ॥
ही सृष्टि सारी अन देव आम्ही
पक्ष्या परी बंधनि हो तुझ्याचि ।
इच्छा तुझी जाणुनि ती मनीची
सृष्टी रचीतो अन मोडितो ही ॥ २३ ॥
हे मोहिले जीव सत्वादिकांनी
नी कर्म माया जरि जाणिती ते ।
परी तयांना नच मुक्ति लाभे
तुला नमस्ते विलयादि रुपा ॥ २४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥ ५ ॥ १७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|