समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध पाचवा - अध्याय १६ वा
भुवनकोषाचे वर्णन -
राजा परीक्षिताने विचारिले -
(भृंगनाद)
मुनिवरा ! जिथवरी सूर्यप्रकाश पडे नि जिथवरी
तारांगणा सहित चंद्रदेव दृष्टी पडे, तिथवरी
आपुला भूमंडळविस्तार ॥ १ ॥
तयातही तुम्ही वदले महाराजा प्रियव्रताच्या रथात
चाकांनी सातलोकां सात समुद्र करविले, जये
कारणे या भूमंडला सात द्वीपी विभागिले । तेंव्हा
भगवन् ! आता मी या सर्वांचे परिमाण नी लक्षणां
सहित संपूर्ण विवरणा जाणु इच्छी ॥ २ ॥
कां की हे मन भगवंताच्या या मायागुणमय
स्थूल विग्रहीं लागू शके, तयाने त्यास वासुदेव
संज्ञक स्वय़ंप्रकाश निर्गुण रुपिही लागणे
संभव । तेंव्हा गुरुवर्य ! या विषयी विस्ताररुपी
वर्णन करण्या करावी कृपा ॥ ३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
महाराजा ! भगवत्मायेच्या गुणांचा विस्तार
एवढा की जरी कोणी देवतां समान
आयु घेउनिहि मन वाणीने तिचा अंत पाहूं न
शके । या साठी आम्ही नाम रुप परिमाण नी
लक्षणांद्वारे ठळक ठळक गोष्टी घेउनीचि या
भूमंडलाच्या विशेषतांचे वर्णन करुं ॥ ४ ॥
हे जंबूद्वीप, जयीं आम्ही राहतो, भूमंडलरुप
कमळाच्या कोषस्थीय जे सात द्वीप तयात
सर्वांच्या आतला कोष । त्याचा विस्तार एकलाख
योजन नि हे कमलपत्राच्या सम गोलाकारची ॥ ५ ॥
तया मध्ये नऊ नऊ हजार योजने विस्ताराचे
नऊ वर्ष, जे यांच्या सीमांना विभाग करणारे
आठ पर्वतीं वाटिले ॥ ६ ॥
त्याच्या मधोमध इलावृत नावाचे दहावे वर्ष,
ज्यामध्ये कुलपर्वतांचा राजा मेरुपर्वत । ती माना
भूमंडलरुप कमल कर्णिका । ते वरुनि खाल पर्यंत
सुवर्णमय नी एक लक्ष योजन उंच । त्याचा विस्तार
शिखरावरी बत्तीस हजार नी तळासी सोळा हजार
योजने तथा सोळा हजार योजनेचि तो भूमिच्या
आत घुसला या अर्थे तो भूमिच्या बाहेरी उंचीने
चौर्यांशी हजार योजने ॥ ७ ॥
इलावृत वर्षाचे उत्तरक्रमे क्रमशः नील श्वेत नी
शृंगवान नावाचे तीन पर्वत - जे रम्यक हिरण्मय
नी करु नावाच्या वर्षांची सीमा बांधिती । ते
पूर्वे पासुनी पश्चिम पर्यंत पसरले तया
प्रत्येकाची रुंदी दोन हजार योजने नी लांबी
पहिल्या प्रमाणे क्रमशः दशमांशाने थोडी
कमी रुंद नी उंची तो सर्वांची समचि ॥ ८ ॥
या प्रकारे इलावृत दक्षिणेकडे एकेका नंतर
निषध हेमकूट नी हिमालय नावाचे तीन पर्वते ।
नीलादी पर्वतां समान ते ही पूर्व ते पश्चिम
पसरले दहा दहा हजार योजने उंच । याचे
क्रमशः हरिवर्ष, किंपुरुष नी भरतवर्ष सीमीं
विभाग ॥ ९ ॥
इलावृत पूर्व पश्चिम नी उत्तरेसी नील पर्वत नी
दक्षिणीं निषध पर्वता पर्यंत पसरले गंधमादन
नी माल्यवान् हे दो पर्वत । तयांची रुंदी दोन
दोन हजार योजने नी ते भद्राश्व एवं केतुमाल
नामक दोन वर्षांची सीमा करिति ॥ १० ॥
याचे शिवाय मंदर, मेरुमंदर, सुपार्श्व, नी
तेवढेचि रुंद पर्वत मेरुपर्वत आधारभूत
रांगाप्रमाणेचि घडले ॥ ११ ॥
या चारींच्या वरी तयांच्या ध्वजे समान क्रमशः
आम्र जांभुळ कदंब नी वड हे चार वृक्ष । तयांच्या
प्रत्येकाच्या शत योजने उंचीला नी तेवढाचि शाखा
विस्तारहि तयाच्या फांद्याही शत-शत योजने ॥ १२ ॥
भरत श्रेष्ठा ! या चारी पर्वता वरी सरोवरेहि चार,
जे क्रमे दुग्ध, मधु ऊसरस नि गोडजले भरले ।
याचे सेवने उपदेवादी यक्ष-किन्नरा आपैस योग
सिद्धी लाभती ॥ १३ ॥
याच्यावरी क्रमे नंदन चैत्ररथ वैभ्राजक नी
सर्वतोभद्र नामे चार ती उपवने ॥ १४ ॥
ययात प्रधान प्रधान देवगण अनेक सुर
सुंदरियांचे नायक होउनी सह विहार करिती ।
त्या समयी गंधर्वादी उपदेवगण तयाची महिमा
वर्णिती ॥ १५ ॥
मंदराचल कुशीत जो बाराशे योजने उंच
देवतांसाठी आम्रवृक्ष, तया पासोनी
गिरिशिखरां एवढाले अमृतासम स्वादिष्ट फळे
पडती ॥ १६ ॥
ती जेंव्हा पिकती तदा तयातुनी बहु सुगंधित
नी गोड लाल-लाल रस वाहतो । तोचि पुढे
अरुणोदा नावाच्या नदीने प्रगटतो । ही नदी
मंदराचल शिखरा पासुनी पडुनी आपुल्या जले
इलावृत वर्षाच्या पूर्वेसी सिंचिते ॥ १७ ॥
श्री पार्वतीजीच्या अनुचरि यक्षपत्न्या हिचे जल
प्राशिती । तये प्राशने तयां अंगाचा सुगंध असा
निघे की अंगा स्पर्शुनि हवा दहा-दहा योजने
सुगंध पसरुनी देशासी सुगंधमय करी ॥ १८
त्याचिपरी जांभूळ वृक्षाची हत्तीच्यापरी प्रचंड
नी तसे विना बीयांची फळे पडती । उंचावरुनी
बहु पडता ते फुटती । रसे तयांच्या जंबू नामक
नदी प्रगटते, जी मेरुमंदर पर्वताच्या दहा हजार
योजने उंच शिखराहुनि पडते नी इलावृताच्या
भूभागा सिंचिते ॥ १९ ॥
त्या नदीच्या दोन्ही किनारीची माती भिजुनी वायू
नी सूर्यकिरण संयोगे सुकुनि देवलोकांना विभूषित
करणारे जांबूनद नावाचे सुवर्ण होतसे ॥ २० ॥
तये देवता नी गंधर्वादी आपुल्या तरुण
स्त्रियांसह मुकुट कंकण करधनी आदी
आभूषण रुपे धारिती ॥ २१ ॥
सुपार्श्व पर्वती जो विशाल कदंब वृक्ष, तयाच्या
पाच डहाळ्यां पासुनी गोड पाच धारा निघती,
तयांचा विस्तार पाच पुरां एवढा । हे सुपार्श्व
पर्वता पासुनी पडुनी इलावृत वर्षाच्या
पश्चिमभागा सुगंधे सुवासित करिती ॥ २२ ॥
जे लोक या मधुपाना करिती तयांच्या मुखिच्या
वायूने शत शत योजने गंध पसरे ॥ २३ ॥
या परी कुमुदपर्वतावरी जो शतवल्श नावाचा
वटवृक्ष, तयाच्या पारंब्या खालुनी अनेक नद
वाहती, ते सर्व इच्छानुसार भोग देती । तया
पासुनी दूध दही मधु घृत गूळ अन्न वस्त्र शय्या
आसन नी आभूषणादीही सर्व पदार्थ लाभू
शकती । हे सर्व कुमुदशिखरा पासुनी पडुनी
इलावृताच्या उत्तरभागा सिंचिती ॥ २४ ॥
तये दिलेल्या पदार्थाते उपभोगिता तेथील
प्रजेचे त्वचेसी पडणे गुडया, केश पांढरे, थकणे
घाम नी दुर्गंध म्हातारपण, जरा, मृत्यू, सर्दी नी
उन्हाचा त्रास, कांतिहीन शरीर अस्थिभंग
आदी त्रास मुळीचि न हो नी संपूर्ण जीवनी
पुरे-पुर लाभे सुखचि ॥ २५ ॥
राजन् ! कमलकर्णिकेसी जैसे चोहीकडूनि
केशर - तसेचि मेरुच्या मध्यभागी नी
चोहीकडुनि कुरंग कुरर कुसुंभ वैकंक त्रिकुट
शिशिर पतंग रुचक निषध शिनीवास कपिल
शंख वैदूर्य जारुधी हंस ऋषभ नाग कालंजर
नी नारद आदी वीस पर्वते ॥ २६ ॥
याचे शिवाय मेरुच्या पूर्वेसी जठर नी देवकूट
हे दोन पर्वत, जे आठरा आठरा हजार योजने
लांब नी दोन-दोन हजार योजने रुंद नी उंचही ।
या परी पश्चिमेकडुनि पवन नी परियात्र दक्षिणे
कडुनी कैलास नी मकर नाम पर्वत । या या
आठी पर्वते घेरिला सुर्णगिरी, अग्नीसमान
झळके ॥ २७ ॥
म्हणतात की मेरुच्या शिखरावरी मध्यीं
भगवान् ब्रह्माची सुवर्णमय पुरी, जी आकारे
सम चौरस तथा करोडो योजने विस्तारली ॥ २८ ॥
तिच्या खाली पूर्वादी अष्ट दिशा, उपदिशा,
नी अधिपती इंद्रादी आठ लोकपालांच्या आठ
पुर्या । ते आपापल्या दिशात नी परिमाणे
ब्रह्माजीच्या पुरीहुनी चौथाईची ॥ २९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥ ५ ॥ १६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|