समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय १५ वा

भरताच्या वंशाचे वर्णन -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! भरतपुत्र सुमति हा पूर्वीच बोलिलो ।
तये ऋषभदेवा अनुसरिले । त्या मुळे कलियुगी
बहु पाखंडी अनार्य आपुल्या दुष्ट बुद्धिने वेद
विरुद्ध कल्पना करूनि तयां देवता मानितील ॥ १ ॥
तयाची पत्नी वृद्धसेने पासुनी देवताजित पुत्र
जाहला ॥ २ ॥
देवताजिता पत्नी आसुरीचे पासुनी गर्भीं
देवद्युम्न, देवद्युम्ना धेनुमती पासुनी परमेष्ठी
तया सुवर्चला गर्भे प्रतीह नाम पुत्र जाहला ॥ ३ ॥
येणे अन्य पुरुषा आत्मविद्या उपदेशुनी स्वयं
शुद्ध चित्त हो‌उनी परम पुरुष नारायनाचा
साक्षात्कार मेळिला ॥ ४ ॥
प्रतिहतभार्या सुवर्चलाच्या गर्भे प्रतिहर्ता,
प्रस्तोता नी उद्‌गाता नामे तीन पुत्र जाहले । ते
यज्ञादी कर्मी बहु निपुण । तयात प्रतिहर्ताची
भार्या स्तुति । तियेचे गर्भे अज नी भूमा नावाचे
दोन पुत्र ॥ ५ ॥
भूमाला ऋषिकुल्या पासुनी प्रस्ताव नी
प्रस्तावाच्या नियुत्सेच्या गर्भे विभु नाम पुत्र
जाहला । विभुच्या रतिउदरी पृथुषेण, नी तयाच्या
आकूती पासुनी नक्त नी नक्ताच्या द्रुतिच्या गर्भे
उदार कीर्ती राजर्षि प्रवर गय जन्मला । हा
जगद्‌रक्षणा सत्वगुण स्वीकार करणार्‍या साक्षात्
भगवान् विष्णुचा अंशची । संयमादी अनेक
गुणांच्या कारणे ययाची महापुरुषी गणना ॥ ६ ॥
महाराज गयने प्रजेचे पालन पोषण रंजन लाड
नी शासनादी करूनी निष्काम भावे केवल
भगवत्प्रीती साठी आपुला धर्म आचरिला ।
तयाने तयां सगळ्या कर्मा सर्वश्रेष्ठ परम पुरुष
परमात्मा श्रीहरीसी अर्पित हो‌उनी परमार्थरूप
जाहला । तेणे नि तसे ब्रह्मवेत्ता महापुरुषांच्या
चरण सेवेने तयां भक्तियोग प्राप्त जाहला । तदा
निरंतर भगवच्चिंतन करुनी तये आपुले केले
चित्त शुद्ध नी देहादी अनात्म वस्तुंचा अहंभाव
झटकुनी ते आपुल्या आत्म्याला ब्रह्मरूप बघूं
लागले । हे सर्व हो‌उनीही ते निरभिमान राहुनी
पृथ्वी सांभाळू लागले ॥ ७ ॥
परीक्षिता ! प्राचीन इतिहास जाणकारांनी,
महात्म्यांनी राजर्षी गयच्या विषयी ही गाथा
वर्णिली ॥ ८ ॥
(इंद्रवज्रा)
कर्मी गयाची सर ये कुणाला ?
    साक्षात् हरीची गय या परी तो ।
यज्ञीं अनुष्ठानि नि धर्मत्राता
    सत्पूरुषां माजि असेल सांगा ?
श्रद्धा दया मैत्रि या दक्षकन्या
    गंगादि यांना अभिषेकिले त्यां ।
न मोह त्यासी परि या धरेने
    रत्नादि सारे हि दिले तयाला ॥ १० ॥
न कामना त्यां परि यज्ञ देवे
    दिले तया भोगहि ते अनेक ।
युद्धात राजे मग भेटि देती
    द्विजे दिले पुण्य षडांग तुष्टये ॥ ११ ॥
इंद्रे पिता सोमचि माजला नी
    विशुद्ध श्रद्धा अन निश्चयाला ।
पाहूनि यज्ञेश्वर तो हरी तै
    समक्ष येता यजभाग घेई ॥ १२ ॥
तुष्टीं जयांच्या तृण ब्रह्म सारे
    तत्काल तृप्ती सगळ्या मिळे तो ।
विषात्मको श्रीहरि यज्ञि धाला
    तुळा गयाची नच ये कुणाला ॥ १३ ॥
(भृंगनाद)
महाराजा गयाच्या गयंतीच्या गर्भी चित्ररथ,
सुगति, नी अवरोधन हे त्रय पुत्र जाहले । तयात
चित्ररथपत्नी उर्णे पासूनी सम्राट जन्मला ॥ १४ ॥
सम्राटाच्या उत्कले पासुनी मरिचीच्या बिंदुमति
कडुनी बुद्धिमान् नामक पुत्र जाहला । तयाच्या
घरघा पासुनी वीरव्रत नी वीरव्रताच्या भोज पासुनी
मन्थु नी प्रयन्थु हे दोन्ही पुत्र, तयातील मन्थूच्या
सत्याच्या गर्भे भौवन, भौवनाच्या दूषणाच्या
उदरी त्वष्टा त्वष्टाच्या विरोचना पासुनी विरज नी
विरजाच्या विषुचि भार्येसी शतजितादी शंभर पुत्र
नी एक कन्या जन्मली ॥ १५ ॥
(विरजा संबंधी एक श्लोक प्रसिद्ध आहे)
(अनुष्टुप्)
ज्या परी भगवान् विष्णू देवांना शोभवीतसे ।
तसाचि प्रियव्रत्‌वंशा विरजो यशभूषण ॥ १६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥ ५ ॥ १५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP