समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध पाचवा - अध्याय १४ वा
भवाटवीचे स्पष्टीकरण -
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! देहाभिमानी जीवांकडुनि सत्वादी गुण भेदे
होती शुभ अशुभ नि मिश्र कर्म हे ।त्या कर्मे निर्मित
नाना प्रकारे तनुच्या सवे संयोग वियोगादीरूप
अनादी संसार जीवास मिळे, तयाचे अनुभव मन
नि पंचेंद्रिय ही सहा द्वारे । तये विवश होउनी हे
जीवलोक मार्ग विसरति नि भयंकर वनीं भटकता
धनलोभे बनजारासम परम समर्थ भगवान्
विष्णूच्या अश्रित माया प्रेरणेने निबिड वनासम
दुर्गम मार्गी पडुनि संसार वनीं गवसतो । ते वन
स्मशानासम अति अशुभ । तयात भटकता तया
आपुल्या शरीर निर्मित कर्माचे होते फळ भोगणे ।
या अनेक विघ्न कारणे तया आपुल्या व्यापारीं
सफलता न मिळे तरीहि तो त्याते शांत करण्या
श्रीहरी तथा श्रीगुरुच्या चरणारविंदमकरंदमधुच्या
रसिकभक्त भ्रमराचा मार्ग न अनुसरे या संसारवनीं
मनासह सहा इंद्रिये आपुल्या कर्मे चोरांसमान
असति ॥ १ ॥
पुरुष बहु कष्टुनी धना मिळवी, धर्मासी वेचणे तो
धर्म जर साक्षात् भगवान् पुरुषाच्या आराधनी
रूपी मिळता तो तये परलोकी निश्रेयस हेतूं
कथिला । परंतु जयाचा बुद्धिरूपि सारथी
विवेकहीन घडे नि मनावरी न ताबा राही, तया
धर्मोपयोगी धना हे मन सहित सहा इंद्रिये पाहणे
स्पर्शिणे, हुंगणे संकल्प विकल्प नि निश्चय करणे
या वृत्तीं द्वारा गृहोचित विषय भोगीं फसवुनि
तया लुटिती, जसे फसव्या नेत्याच्या अनुगमने
असावधनाचे धन बनजारा चोर लुटिती ॥ २ ॥
एवढेच ना, त्या संसार वनी तयाचे कुटुंबहि स्त्री
पुत्रादी असती, परंतू जयांचे कर्म साक्षात्
लांडगा वा गिधडा परि, धन लोलूप कुटुंबही
तयाची इच्छा नसता सारे द्रव्य हरिती जसे लांडगे
बोकडां सहज उचलिती ॥ ३ ॥
ज्या परी शेतीस न नांगरता नि झाड-झुडुपे न
जाळिता ते पुनश्च उगवती नी तेथे तृण लतादी
माजती, तसे गृहस्थाश्रम कर्मभूमीचि, हे ही कर्म
न कधी नष्टति ती तो कामनांची हाकाटी ॥ ४ ॥
त्या गृहस्थाश्रमी आसक्त व्यक्तिच्या धनरूप
प्राणा डास, चिलपदी नी टिटवी, चोर,
उंदिरादी सम नीच पुरुष क्षती पोचिती । कधी
मार्गीं भटकता भटकता या अविद्या कामना
नि कर्मे कलूषित अशा चित्ते दृष्टिदोष कारणे
या मर्त्यलोका गंधर्व नगरी समान असत्य
असुनी सत्य समजे ॥ ५ ॥
पुन्हा खाणे-पिणे नी स्त्रीप्रसंगादी व्यसनीं
फसुनी मृगजळ समान विषयाकडे लागतो
धावावया ॥ ६ ॥
कधी बुद्धीच्या रजोगुणे प्रभावित होउनी
सगळ्या अनर्थांच्या जड अग्निच्या मलरूप
सोन्यालाचि सुख मानुनी तया मेळिण्या लालसे
धावतो । या परी जसा वनात थंडीने कुडकुडता
अग्निसाठी व्याकूळता पिशाच दिवटयांच्या
मागे अग्नि समजुनि धावणे ॥ ७ ॥
कधी या शरीरा जीवित ठेविण्या अन्न जल नी
धनादी अभिनिवेश करूनि या संसारारण्यी
इकडुनि तिकडेचि भटके ॥ ८ ॥
कधी वावटळी समान डोळ्यात धूळ फेकणारी
स्त्री कुशीत घेउनि बसे, तदा क्रोधोनी सत्पु-
रुषांचीही सांडी मर्यादा अविचारे । तदा
रजोगुण धूलिकण भरता बुद्धी मलिन हो नी
आपुल्या कर्माच्या साक्षी दिशा नी देवताहि
विसरे ॥ ९ ॥
कधी एखादे समयि मिथ्यत्व कळुनिही
वाळवंटी वाळूसम विषयाकडेचि धावे ॥ १० ॥
कधी प्रत्यक्ष घुबडापरी शब्द करणार्या शत्रू
कडे नि घालुनि बोलणार्या घुंगुरडासम राजाचे
अति कठोर नि मन जाळणारी दटावणीने
कानही मना बहू व्यथित करिती ॥ ११ ॥
क्षय होताचि संचित पुण्य हा जीवित असुनी
मुडद्या समचि हो, कडुवृंदावनापरि विषारी
फळ पाप वृक्ष नी तशा दूषित वेली नी विषारी
विहिरी समचि जे तथा जयाचे धन या लोकी
नी परलोकी कामा न ये नि जो जिवंत
मुडद्यापरि त्या कृपण पुरुषाचा घे आश्रय ॥ १२ ॥
कधी असत् पुरुषांच्या संगती बुद्धि बिघडुनी
सुखाच्या सरितीं पडता दुःख्यापरी या लोकीं
नी परलोकीं पाखंडमतींच फसतो ॥ १३ ॥
जेंव्हा दुसर्या सताविता अन्न न मिळे तेंव्हा तो
स्वजन, पित्रा या पुत्रापासी खडकुहि दिसता
फाडुनि खाण्या सिद्धचि ॥ १४ ॥
कधी दावानला समान प्रियविषय शून्य नी
परिणामे दुःखभरे घरा पहुचतो, तो तेथे इष्ट
जनांच्या वियोगादीने तयाची आग भडकते,
तये संतप्त होउनी तो बहुही खिन्न होतसे ॥ १५ ॥
कधी काळाच्या सम भयंकर राजकुलरूप
राक्षस तयाचे परम प्रिय धनरूप प्राणां हरिते,
तेंव्हा तो मृतवत् होतो निर्जिव ॥ १६ ॥
कधी मनोरथाचिये पदार्थापरि अत्यंत असत्
पिता-पितामह आदी संबंधा सत्य समजुनी
तयांच्या सहवासे स्वप्ना समान क्षणिक सुख
अनुभवे ॥ १७ ॥
गृहस्थाश्रमासाठी ज्या कर्म विधिचा महान्
विस्तार, तयाचे अनुष्ठान पर्वत शिखरा परी
कठीण । लोकांची तयाकडे ओढ बघता तयाच्या
बरोबरीस हा पूर्ण यत्न करी, तेंव्हा तर्हे तर्हेच्या
अडथळ्यां क्लेशित होउनी काटे नी कंकरभर्या
भूमीत पहुचल्या व्यक्तीसम दुःखी होतसे ॥ १८ ॥
कधी आगीने उदरिच्या असह्य होउनि आपुल्या
कुटुंबावरीही बिघडे ॥ १९ ॥
पुन्हा तो जेंव्हा निद्रारूपी अजगराच्या वेढयात
फसे तेंव्हा अज्ञान रूपघोर अंधारी बुडुनी निर्जन
वनीं फेकल्या मुडद्या सम राही झोपुनी । त्या
वेळी यया कोणतीच शुद्ध न राही ॥ २० ॥
कधी पुर्वजन्मरूप चावरे जीव एवढे चावती
नी तयांचे गर्वरूप दंत दुसर्यास चावता तुटती ।
तेंव्हा तया अशांती मुळे न ये निद्राही तसे मर्म
वेदनांमुळे क्षणोक्षणी विवेक शक्ति क्षीण होता
शेवटी अंधळ्यापरी हा नरक रूप अंधार्या
कूपीच पडे ॥ २१ ॥
कधी विषयरूप सुखमधुकण्या धुंडिता जेंव्हा
लपुनि छपुनि परस्त्री किंवा परधामा लुटू इच्छी
तेंव्हा तयांचे स्वामी किंवा राजाकडुनि मारला
जाउनी नरकी पडे जया न अन्य गति ॥ २२ ॥
तया ऐसे वदती की प्रवृत्ती मार्गी राहुनी केले
जे लौकिक नी वैदिक दोन्ही मार्गाचे कर्म
जिवाला संसारी मिळवी तो ॥ २३ ॥
जरी प्रयत्ने राजादिबंधनि सुटला तरी अन्याये
अपहृत स्त्री नी धना देवदत्त कुणी हिसकावितो
नि तया विष्णुमित्र नावाचा कोणी तिसरा
उपटितो । या परी ते भोग एकाकडुनि अन्य
पुरुषासी जाती, ते न ठरती एकाचि ठायी ॥ २४ ॥
कधी कधी तो शीत नी वायू आदी अनेक
आधिदैविक आधिभौतिक नी आध्यात्मिक
दुःखाची स्थिती निवारण्या समर्थ न ठरे नि हो
उदास ॥ २५ ॥
कधी परस्पर व्यवहार देवाण-घेवाणी दुसर्यासी
दमडीभर अथवा त्याहुनि कमी धन चोरिता
बेइमाने वैरचि ठरे ॥ २६ ॥
राजन् ! या मार्गे पूर्वोक्त विघ्ना शिवाय सुख-
दुःख, राग-द्वेष, भय-अभिमान, प्रमाद, शोक,
लोभ-मत्सर, ईर्ष्या, अपमान, क्षुधा, पिपासा,
आधि, व्याधि, जन्म, जरा, मृत्यू, आदी अनेक
विघ्ने ही ॥ २७ ॥
(या विघ्नबहुल मार्गी या प्रकारे भटकणारा जीव)
कोण्याही वेळी देवमायारुपिणी स्त्रीच्या
बाहुपाशीं पडुनि विवेकहीनचि हो । तेंव्हा
तयाच्या साठी विहारवन आदी बनविण्या
चिंतीचि पडे नी जे आश्रित राहणारे पुत्र, पुत्री
नी अन्य स्त्रीयांच्या गोड गोड बोल नी नेत्र
कटाक्षी नी नखर्यांनी आसक्त हो, तयात चित्त
फसता तो इंद्रियांचा दास पडे अपार
अंधकारमय नरकीं ॥ २८ ॥
कालचक्र साक्षात् भगवान् विष्णूचे आयुध ते
परमाणु पासुनी द्वीपरार्धा पर्यंत क्षण-घटि
आदी अवयवे युक्त । ते निरंतर फिरे, लवकर-
लवकर बदलणारी बाल्य, यौवनादी अवस्था
या रूपे वेग तया । तयांचे द्वारा तो ब्रह्मा पासुनि
तृष्णापर्यंत सर्व भूतां संहारी निरंतर । कोणीही
न तयाची गति थांबवू शके । तयाचे भय मानुनी
ज्याचे हे कालचक्र आयुध, त्या साक्षात् भगवान्
यज्ञपुरुषाची आराधना सोडुनी हे मंदमती मनुष्य
पाखंडीयांच्या चक्री पडुनि कंक गृध्र बगळा या
सम आर्यशास्त्र देवतांचा आश्रय घे, जयां केवल
वेदबाह्य अप्रामाणिक आगमांनी उल्लेखिले ॥ २९ ॥
हे पाखंडी तो स्वयं संकटी, तेंव्हा हा त्यांना ठकोनि
ये तदा हो दुःखी, तदा ब्राह्मणा शरण ये । परी
उपनयन संस्कारानंतर श्रौत-स्मार्त कर्माने भगवान्
यज्ञपुरुषाची आराधना करणे आदी शास्त्रोक्त
आचार तया न रुचे, नी वेदोक्त आचारानुकूल
आपुल्यात शुद्धी न हो कारणे तो कर्मशून्य
शूद्रकुळी शिरे, ज्याचा स्वभाव वानरासम केवल
कुटुंब पोषण नी स्त्रीसेवनचि ॥ ३० ॥
तेथे विना अडथळा राजरोस स्वच्छंद विहार
करण्या बुद्धि अत्यंत दीन हो, नी परस्परा
मुखावलोकनादी विषयभोगी फसुनि मृत्यू-
काळास न स्मरे ॥ ३१ ॥
वृक्षासमान जयाचे लौकिक सुखफलचि त्या
घरां सुख मानुनी वानरापरी स्त्री-पुत्रांदीत
आसक्त होउनी हा आपुला समय मैथुनादी
विषय भोगीच वेची ॥ ३२ ॥
या परी प्रवृत्तीमार्गी पडुनि सुख दुःख भोगा हा
जीव रोगरूपी पर्वतगुंफी फसुनि तयीं राहणार्या
मृत्यूरूप हत्तीस भितो ॥ ३३ ॥
कधी कधी शीत वायु आदी अनेक प्रकारे
आधिदैविक आधिभौतिक नी अध्यात्म दुःखी
निवृत्ती करिता असफल, तदा तो विषय चिंते
खिन्न होतसे ॥ ३४ ॥
कधी आपसात क्रय-विक्रय व्यापारे बहुत
कृपणता करूनि थोडे धन हाति ये ॥ ३५ ॥
कधी धन नष्टता खाणे-पिणे शय्या नी बसण्याही
साहित्य नुरे, तेंव्हा आपुले भोग न मिळता तो स्वये
चोरी आदी उपाया निश्चय करी । तयात तया जिथे-
तिथे दुसर्या कडुनि अपमानित होणे घडे ॥ ३६ ॥
या परी धनासक्तीने परस्परा वैरभाव वाढताही
हा आपुल्या पूर्ववासना विवश होउनी आपसात
विवाहादी संबंध करोनी सोडितो ॥ ३७ ॥
या संसार मार्गी चालणारा जीव अनेक प्रकारचे
क्लेश नी विघ्न बाधानी बाधित होउनी ही मार्गी
जया आपत्ती ये अथवा जो कोणी मरे तया
तेथेचि सोडोनी जाय नी जे जन्मले तयांच्या
सोबती रमे, नि कधी कुणासाठी रडे, कधी
कोणाचे दुःख पाहता मूर्च्छित हो, कधी वियोग
आशंके भयभीत होउनी उठे, कधी भांडे, रडे,
ओरडे, दुःखीं, कधी कोणी प्रसन्ने वदता
समाधान न पावे, कधी गातो नी कधी बंधनी
हिसकतो,या पासी संत कधि न फिरकती, हा
सत्संग वंचित । या प्रकारे तो जातो पुढे पुढेचि ।
जेथुनी जन्म यात्रा आरंभे नी हो शेवट तिथे न
पहूंचे ॥ ३८ ॥
परमात्मा पर्यंत तो योगशास्त्री न पहुचती, जेणे
सर्व दंडासी त्यागिले, ते निवृत्तीपरायण,
संयतात्मा मुनिजनचि त्या मेळिती ॥ ३९ ॥
जो दिग्गजांना जिंकिता नि श्रेष्ठ यज्ञा
अनुष्ठानिता राजर्षिहि तेथवरी गति न पावे । ते
संग्रामभूमीत लढत लढता त्यागिती प्राणा नि
जयात ‘हे ’माझे ऐशा अभिमाने वैर मांडिती
त्या पृथ्वीतचि आपुला देह सांडुनी परलोकी
गमति । या संसारी ते ही न तरति ॥ ४० ॥
आपुल्या पुण्यकर्मरूप लतांचा आश्रय जर
अन्य प्रकारे या जीवा मिळता ते या
आपत्तीतुनी वा नरकातुनी सुटतीहि, तरी पुन्हा
ते या संसार मार्गे भटकुनि पुन्हा जनसमुदायी
मिळती । जरी दशा स्वर्गादी ऊर्ध्वलोकी
जाणार्यासही ॥ ४१ ॥
(अनुष्टुप्)
राजा ! राजर्षि भरता विषयी ज्ञानि सांगति ।
सर नये नृपा कोण्या माशीला न गरुडि जै ॥ ४२ ॥
अनुरक्त हरीपायी राहोनी पुत्र मित्र नी ।
तरुणपत्नि राज्यादी मलवत् त्यागिले पहा ॥ ४३ ॥
(वसंततिलका)
त्या देवताहि धन पुत्र नि स्त्री ययात
गुंतोनि होति परि लक्ष्मिसि तो न पाही ।
ज्याच्या मनात रमतो मधुसूदनो तो
तो मोक्षही समजतो अतितुच्छ भोग ॥ ४४ ॥
जेणे शरीर त्याजिता मृगजन्मिचे ते
उच्च स्वरेचि म्हटले नमितो हरी मी ।
जो योग गम्य निपुणो मुळि धर्मसांख्यी
जो यज्ञमूर्ति अन सर्व जिवीं वसोनी ॥ ४५ ॥
(भृंगनाद)
राजन ! राजर्षी भरताचे पवित्र गुण नी कर्माची
भक्तजनहि प्रशंसा करिती । तयाचे हे चरित मोठे
कल्याणकारी आयू नी धन वर्धिते, लोकीं सुयश
वाढवी नि अंती स्वर्ग नी मोक्षदायी । जो ऐके
ऐकवी नी कौतुक करी तयाच्या कामनाना सर्व
पुरति, दुजासी कांही न मागणे पडे ॥ ४६ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥ ५ ॥ १४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|