समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय १३ वा

भवाटवीचे वर्णन, रहूगणाचा संशय नाश -

जडभरतजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
धनार्थ वाणी फिरती जगी जै
    तसाचि हा जीव समूह आहे ।
कठीण मार्गी भ्रमताचि मोहे
    भवाचिया जंगलि सौख्य नाही ॥ १ ॥
तो दुष्ट नेता मग नेई तेथे
    लुटोनि घेती धन सर्व चोर ।
नी लांडगे ओढुनि नेत जेंव्हा
    गिधाडि द्रव्या उचलोनि नेती ॥ २ ॥
वृक्षादिके वेष्टित रान सारे
    नी मच्छरादी बहु दंशितात ।
गंधर्वपूरे दिसती कितेक
    वेताळ नाचे पुढती कधी तो ॥ ३ ॥
व्यापारिजत्था भटके वनात
    जला धना शोधित सर्व मार्गी ।
तै वादळे धूळ शिरेचि नेत्रीं
    तदा दिशा ते विसरोनि जाती ॥ ४ ॥
केकाटती वाघुळ भीतिदायी
    उल्लूचिये शब्द अभद्र येती ।
क्षुधीत होता नच सावली नी
    मृगीसलीला बघतात तृष्ण्यें ॥ ५ ॥
नी कोरडया त्या सरितीं कधी ते
    परस्परा याचिति अन्न खाया ।
दावानळी ते कधि भाजतात
    प्राणास यक्षे कधि ओढिती ते ॥ ६ ॥
परस्परांचे धन चोरिती नी
    त्या शोक मोहे पडतात मूर्च्छी ।
गंधर्वपूरी क्षण पोचल्याने
    त्यां मोद होतो विसरोनि दुःख ॥ ७ ॥
ते इच्छिती पर्वति जावयासी
    खडे नि काटे रुतती पदासी ।
कुटुंब मोठे बहु खावयाला
    मिळे न तेंव्हा जळतो दुज्यासी ॥ ८ ॥
देहास टाकी कधि सर्प घासीं
    न शुद्ध राही मुळि त्यास तेंव्हा ।
कधी विषारी जिव जंतु दंशे
    अंधत्व येवोनि कुपीं पडे तो ॥ ९ ॥
शोधीत जाता मध तो कधी तो
    दंशोनि माशा तयि त्रासितात ।
जरी प्रयासे मध मेळवीला
    हरोनि नेती प्रियबंधु सारे ॥ १० ॥
कैं शीत उष्णी अन पावसात
    वार्‍यामधे तो असमर्थ होतो ।
व्यापार होता धन अल्प लाभे
    त्याच्या मुळे वैर मिळे सदाचे ॥ ११ ॥
होता तिथे नष्टचि द्रव्य सारे
    मिळे न शय्या अन वाहनादी ।
मागोनि कांही न मिळेचि तेंव्हा
    होतो तिरस्कारित सर्व लोकीं ॥ १२ ॥
वाढोनि द्वेषा असल्या व्यव्हारे
    तरी वणिक् ते करितात सख्य ।
अन्यान्य मार्गे हरितात द्रव्य
    नी संकटी तो मृतप्राय होतो ॥ १३ ॥
साथी मरे एक-एका त्यजोनी
    चाले सवे तो वनवासि यांच्या ।
वीरा ! कुणी ना परतोनि आला
    ना भ्रष्ट मार्गे हरिसी मिळाला ॥ १४ ॥
दिक्पाल ऐसे धिर-वीर राजे
    पृथ्वीसि माझी म्हणुनी जुझी तो ।
निर्वेर संता मिळती पदे जी
    ती श्रीहरीची मिळती न त्यांना ॥ १५ ॥
भवाटवीं या भटकंति होता
    बंजार तांडा स्थिरतो लतेसी ।
नी गोड शब्दा फसतो खगांच्या
    त्या सिंहभेणे रमतो बकासी ॥ १६ ॥
जेंव्हा फसे तो उठुनी तिथोनि
    त्या हंस पंक्तीत प्रवेश इच्छी ।
आचार त्याचा नच होय शुद्ध
    तेणे मिळे तोचि स्वभावकीस ।
त्या वानरांच्याच जाती स्वभावे
    रती सुखां आयुष वेचितो तो ॥ १७ ॥
वृक्षात जे क्रीडति पुत्र स्त्रीया
    प्रेमीं तयांच्या मग बंदि होतो ।
मैथून इच्छा दृढते अशी की
    त्या त्यागिण्या तो न सहे कधीही ।
असावधाने पडता गुफेत
    हत्ती भये तो लटके लतेसी ॥ १८ ॥
शत्रुघ्न तो जै सुटतो तिथोनी
    पुनश्च चक्री मिळण्यास येतो ।
माये मुळे जी गति ती मिळे त्यां
    मेला तरी ना मिळते हिताचे ॥ १९ ॥
रहूगणा तू भटक्या असाची
    न दंडिता तूं जिवमित्र होई ।
नी ईंद्रियांची त्यजि लालसा नी
    त्या ज्ञान खड्गे भवमार्ग तोडी ॥ २० ॥
राजा रहूगण म्हणाला -
हा जन्म आहे सकलात श्रेष्ठ
    देवांदिकांही नच लाभ ऐसा ।
तिथे न लाभे हृषिकेश याचा
    पवित्र संकीर्तन येश लाभ ॥ २१ ॥
पदांबुजाचा कण आपणाला
    मिळोनि जाता जळतात पापे ।
भक्ती हरीची सहजेचि लाभे
    झाले मला ज्ञान मिटोनि किंतू ॥ २२ ॥
ब्रह्मज्ञ जेठी नमितो तया मी
    शिशू तरूणा नमितो तसा मी ।
जे खेळती बाळ तयां नमस्ते
    जे ब्रह्मज्ञानी फिरती धरेसी ।
जे विप्र येथे अवधूत वेषे
    उन्मत्त आम्हास करोत भद्र ॥ २३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
या परी उत्तरानंदना ! त्या परम प्रभावी ब्रह्मर्षिपुत्रे
आपुला जो अवमान कर्ता सिंधु नरेश रहुगणाही
अत्यंत करुणावश आत्मज्ञाने उपदेशिले । तेंव्हा
राजा रहुगणे दीनभावे तयांचे चरण वंदिले । पुन्हा
ते शांत समुद्रापरी चित्ती उपरतेंद्रिय हो‌उनी
पृथिवीवरी फिरू लागले ॥ २४ ॥
तयांच्या सत्संगे परमात्मतत्वज्ञान घेउनि
सौरवीरपति रहुगणेही हृदयीं अविद्यावश आरोपित
देहात्मबुद्धी त्यागिली । राजन ! जे भगवद्
भक्ताश्रित अनन्य भक्ता सेविती तयासिच
प्रभाव गमतो, तयापाशी अविद्या ती नच ठरे ॥ २५ ॥
राजा परीक्षित म्हणाला -
महाभागवत मुनिश्रेष्ठा ! विद्वानचि ! तुम्ही
रूपके अप्रत्यक्षरूपे जिवांचा संसार मार्ग
कथिला, या कल्पनेते विवेकी पुरुषे केली
बुद्ध्याचि, ती अल्पमतिने नच उमगे । तेंव्हा
मी प्रार्थितो की या दुर्बोध विषया-रुपका
स्पष्टिकरणात्मक अशा शब्दे उलगडोनि वदणे ॥ २६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ ५ ॥ १३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP