समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय १२ वा

रहुगणाचा प्रश्न आणि भरताकडून समाधान -

राजा रहूगण म्हणाला -
(इंद्रवज्रा)
हरी ! तुम्हाते नमितो असा मी
    विश्वोद्धराया अवतीर्ण रूपा ।
द्विजस्वरूपा धरिले जडाते
    पुनःपुन्हा हा प्रणिपात माझा ॥ १ ॥
द्विजा मधू औषध रुग्ण आणि
    तृषार्तता अमृत तुल्य पाणी ।
माझ्या अहंकारचि सर्पडंखा
    बोधामृते औषधि ही मिळाली ॥ २ ॥
देवा मनीचा जिरवेल किंतू
    अध्यात्म ज्ञाने मज बोध केला ।
सोप्याचि शब्दे मज सर्व सांगा
    उत्कंठलो मी समजोनि घेण्या ॥ ३ ॥
योगेश्वरा हा जरि त्रास माझा
    व्यव्हारमात्रे जरि तो समक्ष ।
तत्वीं तयाचा मुळि हेतु नाही
    मी तो भ्रमी ना मुळि जाणिले मी ॥ ४ ॥
जडभरत म्हणाले -
पृथ्वीपते ! देह पृथ्वी विकारी
    न भेद अश्मादिकहून कांही ।
हा चालतो तै मग भार वाही
    पायावरी भार क्रमेचि देह ॥ ५ ॥
खांद्यावरी भारहि पालखीचा
    तिच्यात पार्थीव विकारि राजा ।
मी सिंधुदेशीय अशाचि गर्वे
    मदेचि तू अंधहि जाहलासी ॥ ६ ॥
येणे न होई परि सिद्ध श्रेष्ठ
    तू तो खरा दुष्ट नि क्रूर ऐसा ।
बळे कहारा धरि पालखीला
    महापुरुषा नच शोभते हे ॥ ७ ॥
चराचरा जन्म धरेतुनीची
    नी पृथ्विमाजी लिन होय सर्व ।
तयां क्रियेभेद विभिन्न नाम
    सांगी मला याहुनी वेगळाले ॥ ८ ॥
पृथ्वादि शब्दे व्यवहार खोटा
    ती लीन होई परमाणु सूक्ष्मीं ।
पृथ्वीचिये हेतु अणू अविद्या
    त्याचीहि सत्ता मुळि सत्य नाही ॥ ९ ॥
नी कृश जाडा अन सान थोर
    सचेतनादी गुणि हा प्रपंच ।
तेणे स्वभावो द्रव आशयो नी
    तो काल कर्मादिहि देव माया ॥ १० ॥
ते ज्ञान शुद्धो परमार्थरूप
    अभेद्य ती वस्तुचि सत्य एक ।
ती निर्विकारी अन आत राही
    साधू तया बोलति वासुदेव ॥ ११ ॥
रहूगणा ! त्या पदधूळि मध्ये
    संतांचिया न्हायलिया विना ना ।
वैदीक कर्मे तप दान सेवा
    त्यांच्यामुळे ते परमात्म ज्ञान ॥ १२ ॥
या कारणे संत समूदयात
    त्या श्रीहरीचे गुण चर्चितात ।
जेणे न वार्ता मुळि वासनेची
    कथेत बुद्धी हरिरूप होई ॥ १३ ॥
जो पूर्वजन्मी पृथिवीपती नी
    विरक्त तो नी हरिचिंतनी ही ।
मोही मृगाच्या पडताच भ्रष्ट
    हो‌ऊनि जन्मे मृगयोनि माजी ॥ १४ ॥
परी हरीच्या तप साधनेने
    त्या योनिमाजी स्मरलेचि सारे ।
त्यांच्या मुळे मी जन संग सोडी
    नी गुप्त रूपेचि असा रहातो ॥ १५ ॥
सत्संग होता मग मोह कापा
    त्या ज्ञान खड्गा करि घेउनीया ।
पुन्हा हरीचे गुण-गान गावे
    तेणेचि पावे मग कृष्ण देव ॥ १६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ ५ ॥ १२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP