समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय ११ वा

राजा रहुगणाला भरतजीचा उपदेश -

जडभरतजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
तू कोविदाचा जरि आव घेसी
    ज्ञान्यात नाही गणती तुझी की ।
ज्ञानी न मानी अविचार पंथे
    हा स्वामि तो सेवक या रुपांना ॥ १ ॥
न सत्य लौकिक नि वैदिकाचा
    तो मार्ग दावी विधि गुंतण्यास ।
क्रोधादि दोषा विण तत्वज्ञान
    नाही तयामाजि मुळीच व्यक्त ॥ २ ॥
स्वर्गादि सौख्ये जरि सत्य भास
    यज्ञादि कर्मे मिळती तरी ते ।
स्वप्नापरीची सुखसर्व होती
    त्या सत्य ज्ञाना नच वेद गाती ॥ ३ ॥
ते जोवरी सत्व रजादि तत्वी
    गुंतोनी देती मन मानवी हे ।
पर्यंत तै तो विण अंकुशाच्या
    कर्मे करी तो शुभ नी अशूभ ॥ ४ ॥
सोळा कलांमाजिहि हेच चित्त
    विकारि नी ते विषयांध पाही ।
ते घेतसे नाम जिवा-शिवाचे
    उपाधि भेदे मग हीन थोर ॥ ५ ॥
मायामयी हे मन त्या भवात
    जीवास त्रासी अन या तनूच्या ।
गर्वात मेळी सुख दुःख भोगी
    मोहेचि मागे फळ त्या रुपाने ॥ ६ ॥
राही जधी हे मन या अवस्थी
    पाही तदा जीवनि या प्रकाश ।
पंडीत याचे गुण त्यागुनीया
    त्या मोक्ष कार्यास जितोनि घेती ॥ ७ ॥
गुणी मनासी भव दुःख सारे
    निर्गूण त्यासी मग मोक्ष लाभ ।
तुपात वाती भिजता दिवा तो
    खातो द्वयांना धुर सोडुनीया ॥
सरोनि जाता घृत त्या दिव्याचे
    त्या अग्नि तत्वात मिळोनि जाती ।
आसक्ति जेंव्हा सरती मनाच्या
    तेंव्हाचि ते लीन तत्वात होते ॥ ८ ॥
एकादशी त्या जरि वृत्ति चित्ता
    तन्मात्र नी कर्म तसे शरीर ।
वीरा तयांचाच आधार नी हे
    संबोधिती त्या विषयेचि ज्ञानी ॥ ९ ॥
स्पर्श स्वरूपी रस गंध शब्द
    संभोग शौचा गमने नि भाष्य ।
व्यव्हार नी ती मनिची अहंता
    या वृत्ति त्याच्या समजोनि घ्याव्या ॥ १० ॥
द्रव्य स्वभावाशय कर्म यांनी
    असंख्य त्याचे मग भेद होती ।
क्षेत्रज्ञ आत्मा नृप तेथ होय
    मिळे न तो त्यात कधीहि एकी ॥ ११ ॥
जीवातुनी निर्मित सारि माया
    अशुद्ध कर्मे भव भोगवीते ।
जागृत स्वप्नी प्रगटे मनात
    सुषुप्ति मध्ये मग लोपते ती ।
विशुद्ध क्षेत्रज्ञ यया द्वयात
साक्षी रुपाने मन-वृत्ति पाही ॥ १२ ॥
क्षेत्रज्ञ आत्मा परमात्म रूप
    आदी परीपूर्ण स्वयं प्रकाश ।
अजन्म ब्रह्मादिक यां नियंता
    चैतन्य रूपी हरि वासुदेव ॥ १३ ॥
वायू जसा स्थावर जंगमात
    प्रेरी तयां प्राण रुपे प्रवेशे ।
तसाचि साक्षी हरि वासुदेव
    सार्‍या जगामाजि भरोनि राही ॥ १४ ॥
जै वेळपर्यंत न ज्ञानद्वारा
    माया तिरस्कार मनात होय ।
शत्रू सहाही नच जिंकिता तो
    हे क्षेत्र दुःखी नच जाणितो तो ॥ १५ ॥
नी तो फिरे या जगतात सार्‍या
    हे चित्त त्याचे मग शोक मोह ।
ते रोग नी क्रोध नि लोभ वैर
    वृद्धी करी त्या ममतेत नित्य ॥ १६ ॥
तुझे तुला हे मन श्रेष्ठ शत्रू
    दुर्लक्षिता हे बळवंत झाले ।
मिथ्या तरी झाकियलास आत्मा
    गुरू हरीच्या चरणासि जावे ॥ १७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥ ५ ॥ ११ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP