समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय १० वा

जडभरत आणि राजा रहुगणाची भेट -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! एकदा सिंधु सौवीर देशिचा स्वामी रहुगण
पालखीत बसुनी जात होता । जेंव्हा तो
इक्षुमति नदीकिनारी पहुचला तेंव्हा तया पालखी
उचलिण्या एका कहाराची आवश्यकता पडली ।
कहाराच्या शोधी दैववशे तया हे
ब्राह्मणदेवतांचि लाभले । तया पाहुनि तये मनी
चिंतिले की धष्ट पुष्ट नी बांधीव अंगाचा तरुण ।
या मुळे हा तो बैल वा गाढवा परी चांगलेचि
वाहील ओझे । असे चिंतुनि तये अन्य कहारां
करवि बळे पकडुनि पालखीस जुंपिले । महात्मा
भरतजी जरी न योग्य कोणत्याच कामी परी
चूपचाप पालखी उचलुनि चालावया लागले ॥ १ ॥
ते द्विजवर कोण्या जीवा पायी तुडवु नये
म्हणुनि एक बाण अंतरे भू पाहूनि चालूं लागले ।
तेंव्हा दुसर्‍या कहारांच्या सोबती चालण्याचा
मेळ न लागे, जेंव्हा पालखी वाकडी हो‌उनि
हले तेंव्हा राजा रहूगण कहारांना बोलला-
कहारांनो चांगले चाला, पालखी वरी खाली
करित कां चालता ॥ २ ॥
तेंव्हा आपुल्या स्वामीचे बोलणे, आक्षेप वचना
कहारांना भीती वाटली की राजा आपणा
दंडिल । तेंव्हा ते या परी त्याते बोलले ॥ ३ ॥
महाराजा ! नच हा आमुचा प्रमाद, आम्ही तो
मर्यादेनुसार पालखी नेतसो । हा नवा कहार
आताचि कामा लाविला, तोच त्वरे चाले,
आम्ही या सवे पालखी न नेवूं शकू ॥ ४ ॥
कहारांचे वचन ऐकुनी राजा विचारी म्हणे
एकाच्या संसर्गे हेही बिघडतील, नि सर्वांचे
चालणे बिघडेल की हळु हळू याचा प्रतिकार
करणेचि योग्य । ऐसा विचार करिता रहुगण
झाला क्रोधित । जरी तये महापुरुषा सेविले तरी
क्षत्रिय स्वभाववश बळेचि बुद्धी रजोगुणें व्याप्त
जाहली नी तो द्विज श्रेष्ठा, जयाचे ब्रह्मतेज
झाकिल्या राखेत अग्नी न दिसे अशा व्यंगभरे
बोलू लागला ॥ ५ ॥
अरे भैय्या ! मोठी दूःखाची गोष्ट की अवश्यक
तुम्ही थकले । ज्ञात होते की थोडीही विश्रांती
न दिली तुला या सहकार्‍यांनी । एवढया दूर तू
एकटयाने पालखी घेता चाललासी । तुझे शरीर
तो धट्‌टे-कट्‌टे नि ताजे-तवाने, नि मित्रा ! दडले
तुझ्यात वृद्धत्व । या परी अनेक प्रकारे टोचोनी
बोलता पुन्हाहि ते चुपचाप पहिल्यापरी
पालखी उचलिता राहिले चालत । तये याचे न
कांही मानिले वाईट, कां की तये दृष्टीने पंचभूत
इंद्रिय नि अंतःकरण समुही हे आपुले शरीर
अविद्य कार्यचि । ते विविध अंगे युक्त दिसुनि
ते नसे तसे, या साठी त्यात मी माझ्यापणाच्या
मिथ्या ध्यासी निवृत्त जाहले नि ब्रह्मरूपचि ॥ ६ ॥
तरीही पालखी आणखीही न चालीं चले, हे
पाहुनी राजा रहूगण क्रोधे विस्तवापरि नेत्रीं
लाल जाहला नि वदला, अरे ! तू काय जिते
प्रेत कां ? तू माझ्या अनादरे उल्लंघिसि आज्ञा ।
समजतोस तू प्रमादिची । अरे ! जसा यमराज
दंडी जसाच उपाय मी योजितो । तेंव्हा शुद्ध
उघडे तुझी ॥ ७ ॥
रहुगणा राजाभिमान, त्यामुळे बहुत अद्वा-
तद्वा बोलला । तो स्वयं समजे विद्वान्-
पंडित, अतः रज तम युक्तभिमाने वशीभूत
हो‌उनी तये भगवंताच्या अनन्य प्रीतिपात्र
भक्ताचा भरताचा केला तिरस्कारचि ।
योगेश्वराच्या अवचनीय अद्वितीय करणीच
तया नव्हता पत्ताचि । तयाची ऐसी अपक्व
पाहुनी बुद्धी संपूर्ण प्राणिमात्राचा आत्मा नि
सुहृदय, ब्रह्मभूत ब्राह्मणदेव हासले नि
कसलाही अभिमान न दाविता वदले ॥ ८ ॥
जडभरत म्हणाला -
(इंद्रवज्रा)
राजा तुझे बोल यथार्थ सारे
    जो भार त्याला उचलोनि न्यावे ।
जिवंत सारे चलती भुमीसी
    मोठेपणा या तनुसीच सारा ।
आत्म्यास कोणी नच श्रेष्ठ मानी
    जाडा न ज्ञानी वदतात ऐसे ॥ ९ ॥
जाडा कृशा आधि नि व्याधि भूक
    तृष्णा भिती भांडण आणि इच्छा ।
वृद्धत्व निद्रा अन क्रोध प्रेम
    तो शोक नी गर्वचि सर्व धर्म ।
देहाभिमाना सह त्या जिवासी
    याचा मुळी लेश मला नसे की ॥ १० ॥
तू जीवन-मृत्यु जे बोललासी
    विकारि त्या सर्वचि नष्ट होती ।
यशो नरेशा जर स्वामि तेथे
    आज्ञा तिथे सेवक झेलिती ते ॥ ११ ॥
राजा असे तू अन मी प्रजा की
    या बुद्धि भेदा विणकांहि नाही ।
ना कोणि स्वामी नच कोणि दास
    गर्वी असा तू करू काय सेवा ॥ १२ ॥
वीरा ! असा मत्त नि जाडया मी तो
    माझ्या प्रबंधे तुज काय लाभ ।
प्रमादि मी नी जड वास्तवात
    पिशास बोधी मग तू पिसाची ॥ १३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
परीक्षिता ! मुनिवर जडभरते यथार्थ तत्वोपदेश
करूनी पुन्हा धारिले मौन । तयांचे देहात्मबुद्धिचे
हेतुपूर्वक अज्ञान संपविले ते कारणे ते परम
शांतचि । अतः एवढे वदुनि भोगद्वारे
प्रारब्धक्षयार्थ ते पुनश्च पहिल्यापरि पालखीसी
खांद्यावरि उचलु लागले ॥ १४ ॥
सिंधुसौवीर नरेश रहुगण हि आपुल्या श्रद्धे
तत्वजिज्ञासी अधिकारिचि, तेंव्हा तये
द्विजश्रेष्ठा अनेक योगग्रंथे समर्पित नी हृदयग्रंथी
छेदणारी वचने ऐकिविली तदा तो पालखी
खाली उतरला नि पायीं शिर झुकवुनि अपराधा
क्षमा मागण्या या परी बोलू लागला ॥ १५ ॥
(इंद्रवज्रा)
यज्ञोपवीता तुम्हि धारियेले
    प्रछन्नभावी तुम्हि कोण सांगा ।
दत्तात्रयो का अवधूत तुम्ही
    कोणाचिये पुत्र कुठून आले ।
आले असा येथ हितास आम्हा
    कपीलजी तो नच काय तुम्ही ॥ १६ ॥
न इंद्रवज्राचिहि भीति आम्हा
    ना त्रीशुळाची तयि येमदंडी ।
कुबेर अग्नी अन चंद्र सूर्य
    परी भितो मी द्विजशाप यासी ॥ १७ ॥
विज्ञानशक्ती तुम्हि झाकिता की
    सांगा मला कोण तुम्ही कृपेने ।
मूर्खापरी सोंग कशासि घेता
    गोसावि ऐसे गमतात आम्हा ।
न जाणतो मी नच थांग लागे
    संदेह माझा नच दूर होता ॥ १८ ॥
मी आत्मज्ञानी गुरु आणि साक्षात्
    योगेश्वराचे कपिलावतार ।
यांना पुसाया निघलो असे की
     विश्वात कोणा शरणार्थ जाऊ ॥ १९ ॥
ते तो तुम्ही काय आहात ऐशा
    रूपात विश्वा फिरता पहाया ।
घरात गुंतोनि विवेकहीन
    योगेश्वराची गति मी न जाणी ॥ २० ॥
मी शुद्धकर्मीं थकलो बहूत
    घेवोनि ओझे बहु चाललो मी ।
व्यवहार मार्गे कळले मला हे
    कच्च्या घडयाशी नच वारि घेणे ॥ २१ ॥
चुलीवरी पातिले तापते नी
    ते त्यात पाणी उकळे तदाची ।
तो भात तांदूळ पुन्हाच होतो
    भोगी तसाची तनुपात्रि आत्मा ॥ २२ ॥
राजा खरा दास प्रजाजनांचा
    तो ठेविला शासनि दंड देण्या ।
पिशापरी ते नच कर्म व्यर्थ
    धर्मार्थ दंडी अन पाप नाशी ॥ २३ ॥
राजत्व गर्वे मनि माजलो मी
    झाली अवज्ञा तुम्हि दीन बंधू ।
कृपा करोनी मज कांहि सांगा
    सुटावया या अपराध पापे ॥ २४ ॥
देहाभिमानी नच तू हरीच्या
    अनन्यभक्ता नच हो विकार ।
प्रभाव माझा शिव मी प्रती की
    होईल तो या अपराधि नष्ट ॥ २५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ ५ ॥ १० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP