समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय ९ वा

भरतजीचा ब्राह्मणकुळी जन्म -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! आंगिरस गोत्रज जो दम तप स्वाध्याय
वेदाध्ययन त्याग संतोष तितिक्षा विनय विद्या
अनसूया आत्मज्ञान नि आनंद यापरी गुणकर्म
संपन्न होते एक ब्राह्मण । तयांना त्यांच्या ज्येष्ठ
पत्‍नी पासुनी तिच्या समचि विद्या शील आचार
रूप नी उदारतादी गुणी नवू पुत्र नी कनिष्ठ
पत्‍नीपासुनी जुळे पुत्र नी कन्या प्राप्त जाहली ॥ १ ॥
या जुळ्यात एक पुत्र तोचि भरत । ते मृगशरीरा
त्यागुनि अंतिम जन्मी ब्राह्मण जाहले ऐसे
महापुरुष वदति ॥ २ ॥
या जन्मीही भगवत्‌कृपे तयां आपुली पूर्वजन्म
परंपरा स्मरल्यामुळे ते या आशंकेने की कांही
विघ्न न येवो, आपुल्या स्वजन भेटीनेही भीत
असत । जयाचे प्रत्येक समयि श्रवण, स्मरण
नि गुण कीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधने कापिते,
श्रीभगवच्चरणयुगुल हृदयीं धारिता दुसर्‍यांच्या
दृष्टीने ते स्वतःच वेडा मूर्ख अंध नि बहिर्‍या
समान दिसती ॥ ३ ॥
पित्याचे तयावरि प्रेमचि । करिता ब्राह्मणदेवे
आपुल्या वेडया मुलाही शास्त्रानुसार समावर्तन
पर्यंते विवाहपूर्व संस्कार करण्या विचारे केले
उपनयन संस्कार । जरि तयां नसता इच्छा परि
पिताकर्तव्ये पुत्रास दीक्षा दिली, शास्त्रविधीनुसार
तये शौच आचमनादी कर्मीं दिली दीक्षा ॥ ४ ॥
परंतु पितया समोरचि भरत आज्ञे विरुद्धचि
वागे । पित्याने इच्छिले की वर्षाकाली याचे
वेदाध्ययना आरंभ करू । परंतू चैत्री वैशाखी
ज्येष्ठी नी आषाढी तया शिकवुनि तया व्याहृति
नी शिरोमंत्रा प्रणवासहित त्रिपाद गायत्रीही
योग्य स्मरणी न राहिली ॥ ५ ॥
ऐसे हो‌उनिहि तयांचा आपुल्या पुत्रावरि
आत्म्यापरीच अनुराग । तेणे ते त्याची प्रवृत्ती
नसुनिहि उत्तम शिकविण्या अनुचित आग्रहे शौच
वेदाध्ययन व्रत नियम नी गुरू नी अग्नि सेवादी
ब्रह्मचर्याश्रम आवश्यक नियमा शिकविती । परी
उत्तम शिक्षित पुत्र पाहण्याचे मनोरथ नच पूर्ण नि
स्वयंही भगवद्‌भजनरूप कर्तव्या असावध राहुनि
घर-प्रपंची व्यस्त राहिले नि जो भगवान् काल तो
सदैव सजग तये तयां अंती नेले ॥ ६ ॥
तदा या जुळ्यासी आपुल्या सवतिसी
सोपवुनि माता गेली सती ॥ ७ ॥
भरताचे बंधू कर्मकांडा मानिती सर्वश्रेष्ठ । ते
ब्रह्मज्ञान रूप पराविद्यीं अनभीज्ञचि । तेणे ते
भरत प्रभाव न जाणिति, तेणे ते भरता वेडा नी
मूर्खचि मानिती । पुढे पितामृत्यूच्या नंतरे
तयांनी तया शिकण्या आग्रहहि सोडिला ॥ ८ ॥
भरतां मानापमान नव्हता । जेंव्हा सामान्य नर-
पशू तया मूर्ख नी बहिरा म्हणुनि बोलती तदा
तेहि त्या समचि संभाषण करित । जे स्वेच्छे
करी ते काम तैसेचि करी । कष्टकरी, मजूर या
रूपे अथवा मागता न मागता बरे वाईट जे मिळे
अन्न ते जिव्हेने स्वाद न घेताचि सेवित । अन्य
कोण्या कारणे जो न मिळे तो स्वसिद्ध केवळ
ज्ञानानंदरूप आत्मज्ञान तयां प्राप्तचि यासाठी
शीतोष्ण मानापमानादी द्वंद्वे सुख दुःखादी
प्राप्ते तया न स्फूर्ती ॥ ९ ॥
ते ऊन्ह पाऊस थंडी नी वार्‍याचे वेळी उंटिणी
प्रमाणे नागवेचि पळति । ते सर्वांग धष्टपुष्टचि ।
तो पृथिवीवरीच पडे, तेल वा उटणे न लावी कधी
नी स्नानही न करी, तेणे शरीरा मळ साचले ।
तयाचे ब्रह्मतेज जसे मूल्यवान रत्‍न धुळीने लोपे
तसेचि लोपले । कमरेस मळके एकचि वस्त्र
गुंडाळले । यज्ञोपवीतहि मळके बहू । तेणे तया
अज्ञानी कोणी द्विज, कोणी अधमब्राह्मण
बोलुनी तिरस्कारिति, परंतू त्याचा ते न करिता
विचार स्वच्छंदेचि विचरति ॥ १० ॥
जेंव्हा तया मजुरी करूनी पोटपोषक बघो तदा
तये बंधूच्या शेतीत बंधू बांध खोदण्यासि
लावीती, परंतु तयां ते करिता उंची वा खोली न
ध्यानी ये तयां भूमि समतलही । तयांचे बंधू तया
साळीचे भूस वा कण्या वा भरडिले उडिदहि देत
खाण्या तदा ते अमृतचि मानुनि सेवितसो ॥ ११ ॥
एके समयि डाकूंच्या सरदारे ज्याचे मांडलिक
जहागीरदार शूद्रचि तये पुत्रप्राप्त्यर्थ
भद्रकालीसी बळी संकल्पिला ॥ १२ ॥
तयांनी जो पुरुष-पशुबळि पकडिला, तो दैववशे
बंधनातुनि सुटला-पळाला । तया धुंडिण्या
चारीदिशा सेवक धावले परि अंधार्‍या रात्री न
तो सापडला । याचि वेळे दैवयोगे अकस्मात्
तयांची दृष्टी मृग वराहादीपासुनि शेत रक्षिण्या
जे वीरसनी बैसले आंगीरस गोत्रज ब्राह्मणकुमार
ययांवरि पडली ॥ १३ ॥
तयांनी पाहिले की हा पशू तो सुलक्षणी, या
मुळे आमुचे स्वामिचे कार्य अवश्यहि होय
साध्य । असा विचार करिता तयांच्या मुखीं
आनंद विलसला नि तयें दोरांनी तया बांधुनी
चंडिकामंदिरी आणिले ॥ १४ ॥
पुन्हा त्या चोरांनी तयांच्या पद्धतीनुसार तया
विधिपूर्वक अभिषेक एवं स्नान घालुनि नवी
वस्त्राभूषणे नेसवुनि नी चंदन माला तिलके
भूषविले नी चांगले दिले भोजनही । पुन्हा धूप
दीप माला पत्र अंकूर नी फलादी उपहार
सामग्रीने बलिदान विधिगान, स्तुति नि मृदंग
ढोल आदी महान ध्वनी करूनि त्या नर-पशूते
भद्रकालीच्या सामोरी मान खाली करवुनि
बैसविले ॥ १५ ॥
त्या पश्चात् दस्युराजपुरोहिते-चोरे नर-पशु
रुधिराने देवीसी तृप्त करण्या देविमंत्रे
अभिमंत्रिले नि एक क्षण खड्‌ग उचलिले ॥ १६ ॥
स्वभावे ते चोर होते रजो-तमोगुणिचि,
धनोन्मादे तयांचे चित्त आणखीच उन्मत्त ।
स्वाभाविक रुचि त्यांची तो हिंसाचि असे ।
या समयी तो ते भगवान् अंशरूपी ब्राह्मणकुळ
तिरस्कारे स्वच्छंदे कुमार्गा अधिकचि उफाळले ।
आपत्कालीच हिंसा अनुमोदिली, तयीं
ब्राह्मणवध सर्वथाचि निषिद्ध, तरिहि ते साक्षात्
ब्रह्मभावप्राप्त वैरहीन नि सर्वप्राणिमित्र
महर्षिकुमरा बळि देण्या इच्छिती । पाहुनि हे
भयंकर कुकर्म देवी भद्रकालीच्या शरीराच्या
अतिदुःसह ब्रह्मतेजे जाहला दाह नि ती अचानक
मूर्ती फोडुनि प्रगटली ॥ १७ ॥
अत्यंत असह्य नि क्रोधे बाहू उचलिल्या, कराल
दाढा नि नेत्री लाली चढली नि त्या कारणे चेहरा
भयंकरचि जाहला । तिच्या त्या त्वेषे ती जणू
विश्वसंहार करिते असेचि भासली । क्रोधे तिने
मोठा-प्रचंड ध्वनि काढिला, नि उसळुनी
त्या अभिमंत्रित खड्गेचि तयांच्या गळ्याच्या
गरम गरम रुधिररूपी आसवा पिउनि उन्मत्त
हो‌उनि नी उंच स्वरे गात नाचत त्या शिरांचे
चेंडू खेळू लागली ॥ १८ ॥
सत्यची, महापुरुषां प्रति जे केले जाती
अत्याचाररूप अपराध ते त्या प्रकारे जशास
तसेचि आपुल्यावरी पडती ॥ १९ ॥
परीक्षिता ! ज्यांची देहाभिमानरूप सुदृढ
हृदयग्रंथी सुटली, जो समस्त प्राण्यांचा सुहृदय
नि आत्मा नि वैरहीनची, साक्षात् भगवंतचि
भद्रकाली आदी भिन्न-भिन्न रूपे घेउनि आपुले
न चुकणारे कालचक्ररूप सर्वश्रेष्ठ शस्त्रें रक्षितो
नि जये भगवंताच्या चरणकमलाचा निर्भय
आश्रय घेतला-त्या भगवद्‌भक्ता परमहंसा
साठी आपुले शिर कापण्या प्रसंगिहि व्याकुळे
हे कांही न आश्चर्यचि ॥ २० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ ५ ॥ ९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP