समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय २० वा

अन्य सहा द्वीपे नी लोकालोक पर्वतांचे वर्णन -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! आता परिमाण नी लक्षणां सहित
स्थितीनुसार प्लक्षादी अन्य द्वीपांचे वर्ष
विभाग वर्णितसो ॥ १ ॥
ज्या परी मेरुपर्वत जंबूद्वीपे घेरिला, त्या परी
जंबूद्वीपही आपुल्या समान परिमाणे नी विस्तारे
खार्‍या समुद्रे परि वेष्ठित । पुन्हा खंदक जसा
बाह्य उपवने झाकिला, त्या परी खारा सागरही
आपुल्या द्विगुणे विस्तार प्लाक्षद्वीपे घेरिला ।
जंबूद्वीपे जेवढा प्रचंड जांभुळवृक्ष तेवढया
विस्तारे हा सुवर्णमय औदुंबर (प्लक्ष) वृक्ष ।
तयाच्या कारणे या प्लक्षद्वीप हे नाम । तेथे सप्त
जिव्हांचे अग्निदेव निवसती । या द्वीपाचे
अधिपती प्रियव्रतपुत्र महाराज इध्मजिव्ह होते ।
तयांनी याते सात वर्षीं विभागिले, नी तये त्या
सातवर्षा समान नामाचे सातपुत्रा सोपविले नी
स्वयं अध्यात्म योग आश्रये झाले उपरत ॥ २ ॥
या वर्षांची नावे शिव यवस सुभद्र शांत क्षेम
अमृत नी अभय । ययांत ही सात पर्वत नी
सात नद्या प्रसिद्ध ॥ ३ ॥
तेथे मणिकूट वज्रकूट इंद्रसेन ज्योतिष्मान् सुपर्ण
हिरण्यष्ठीव नी मेघमाल हे पर्वत सात नी तशा
अरुणा नृम्णा आंगिरसी सावित्री सुप्रभात ऋतंभरा
नी सत्यंभरा या सात नद्याही । तेथे हंस पतंग
ऊर्ध्वायन नी सत्यांग नावाचे चार वर्ण ।
उक्त नद्यांचे स्नान करिता तयांचे रजो-तमोगुण
क्षीणती । ययांची आयू सहस्त्रवर्षे । ययांच्या
शरिरी देवतांसम थकवा नी घाम नसतो, नी
संतान उत्पत्ती ही तयांसम । हे त्रयी विद्यांचे
द्वारा तिन्ही वेदांनी वर्णिल्या स्वर्गद्वारभूत
आत्मस्वरुप सूर्या उपासिती ॥ ४ ॥
ते वदती -
(अनुष्टुप्)
विष्णुचे रुप जे सत्य ऋतवेद शुभाशुभ ।
अशा नारायणा सूर्या आम्ही नित्यचि प्रार्थितो ॥ ५ ॥
(भृंगनाद)
प्लाक्षादी पाच द्वीपी सर्व जन्मेचि आयु इंद्रिय,
मनोबल, इंद्रियबल, शारीरिकबल, बुद्धी नी
पराक्रम समान रुपे सिद्ध असती ॥ ६ ॥
प्लक्षद्वीप आपुल्या परिविस्तारे इक्षुरस समुद्रे
घेरिले । तयाचे पुढे दुप्पट परिमाणे शाल्मली
द्वीप, जे तेवढयाचि परिमाणे मदिरा सागरे
घेरिले ॥ ७ ॥
प्लक्षद्वीपासह वृक्षाबरोबर शाल्मली वृक्ष ।
वदती हा आपुल्या वेदमय पंखे भगवत् स्तुति
करणारे पक्षिराज गरुडाचे निवासस्थान या
द्वीपाचा नामकरण हेतू ही तसा ॥ ८ ॥
या द्वीपाचे अधिपती प्रियव्रतपुत्र होते महाराज
यज्ञबाहू । तयांनी त्याचे सुरोचन सौ‌मनरस्य
रमणक देववर्ष परिभद्र आप्यायन नी अविज्ञात
नावाच्या साती मुला सोपविले हे भाग करुनी ॥ ९ ॥
ययी ही सातवर्षा पर्वत नी सातची नद्या
सुप्रसिद्ध । स्वरस शतभृंग वामदेव कुंद मुकुंद
पुष्णवर्ण नी सहस्त्रश्रुति ही पर्वते । नी नद्या
अनुमती सीनिवाली सरस्वती कुहू रजनी नन्दा
नी शका या अशा ॥ १० ॥
या वर्षीं राहणारे श्रुतधर वसुंधर नी इषंधर हे
चार वर्ण वेदमय आत्मस्वरुप भगवान् चंद्राची
वेदमंत्रे उपासना करिती ॥ ११ ॥
(अनुष्टुप्)
कृष्ण नी शुक्लपक्षात किरणासी विभागुनी ।
देतो जो पितरा देवा प्राण्यांना अन्न सर्वदा ॥
तो चंद्रदेव हा राजा आमुच्या रंजनी असे ॥ १२ ॥
(भृंगनाद)
या परी मदिरा सागरा पुढे तयाच्या दुप्पट
परिमाणे कुशद्वीप । पूर्वोक्त द्वीपासमान हे ही
आपुल्या सम विस्तारे घृतसागरे घेरिले । ययात
भगवंते रचिलेला कुशवृक्ष, तयाचे नामे या
द्वीपा तेचि नाम । ते दुसर्‍या अग्निदेवासम
आपुल्या कोमल शिखा कांतीने समस्त दिशां
प्रकाशिते ॥ १३ ॥
राजन् ! या द्वीपाचे अधिपती प्रियव्रतपुत्र
महाराज होते हिरण्यरेता । तयांनी याचे सात
भाग करुनी एकेक पुत्रा दिधले नी स्वयं गेले
तपासी, त्या पुत्रांचे नी द्वीपांची नामे वसु
वसुदान दृढरुची नाभिगुप्त स्तुत्यव्रत विविक्त
नी वामदेव ॥ १४ ॥
तयांच्या सीमा निश्चित करणारी पर्वते नी सप्त
नद्या । नामे पर्वत चक्र, चतुःशृंग, कपिल,
चित्रकूट, देवानिक, ऊर्ध्वरोमा नी द्रविण ।
नद्यांची नामे रसकुल्या, मधुकुल्या, मित्रविंदा,
श्रृतविंगा, वेदगर्भा, घृतच्युता नी मंत्रमाला ॥ १५ ॥
यांच्या जलीं स्नान करुनी कुशद्वीपवासी
कुशल, कोविद, अभिव्यक्त नी कुलक वर्णाचे
अग्निस्वरुप भगवान् हरिचे यज्ञादी कर्मकौशले
पूजन करिती ॥ १६ ॥
(नी या परी स्तुती करिती)(अनुष्टुप्)
अग्नी तू परब्रह्माला प्रत्यक्ष हवी पोचिशी ।
देवतापुरुषांगा नी तोषोनि हरी तोषवी ॥ १७ ॥
(भृंगनाद)
राजन् ! घृतसागरापुढे तयाच्या द्विगुणे परिमाण
क्रौंचद्वीप । ज्या परी कुशद्वीपी घृतसागरे
घेरिले तसे येणेही आपुल्या विस्तारे दूध सागरे
घेरिला । तेथे क्रौंच नामक प्रचंड पर्वत, तयाचे
कारणे या द्वीपा नाम क्रौंचद्वीप ॥ १८ ॥
पूर्वकाली कार्तिक स्वामीच्या शस्त्र प्रहारे याचा
कटिप्रदेश नी लता नी कुंजादी क्षत विक्षत
जाहले परी क्षीरसागरे सिंचिल्या मुळे नी वरुण
कृपे पुन्हा झाला निर्भय ॥ १९ ॥
या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र महाराजा
होता घृतपृष्ठ । ते श्रेष्ठ ज्ञाते । तयांनी तया सप्त
भागी विभागुनी आपुल्या सप्तपुत्रां समान
उत्तराधिकारी केले नी स्वयं संपूर्ण जीवांचा
अंतरात्मा परममंगलमय कीर्तिशाली भगवान्
हरिच्या पावन पदरविंदी घेतला आश्रय ॥ २० ॥
महाराजा घृतपृष्ठाचे आम्र मधुरुह मेघपृष्ठ सुधामा
भ्राजिष्ठ लोहिताण नी वनस्पती हे सात पुते ।
पर्वतांची नामे शुक्ल वर्धमान भोजन उपबर्हिण
नंद नंदन नी सर्वताभद्र हे तथा नद्यांची नामे
अभया अमृतौघा आर्यका तीर्थवती
वृचिरुपवती पवित्रवती नी शुक्ला ॥ २१ ॥
ययांचे पवित्र निर्मलजल सेविती तेथील पुरुष,
पाण्याच्या ओंजळीद्वारा आपोदेवता उपासिती ॥ २२ ॥
नी वदती -
(अनुष्टुप्)
पुरुषवीर्य तू देवा भू र्भुवःस्वः करीसि तू ।
पवित्र पापनाशा तू पवित्र शरिरा करी ॥ २३
(भृंगनाद)
या परी क्षीरसागरा पुढे तयाचे चोहीकडुनी
बत्तीसलक्ष योजन विस्तार शाकाद्वीप जे
आपुल्या परी परिमाणे मातीच्या समुद्रे घेरिले ।
तयीं शाका नाम बहू विशाल वृक्ष । त्या कारणे
नाम यासी तसे । तयाच्या अत्यंत सुगंधे सारे
द्वीपही दरवळे ॥ २४ ॥
मेधातिथी अधिपती तेथील तोही प्रियव्रत
पुत्रची । तयेही या द्वीपासी सप्तवर्षी विभागिले
नी आपुल्या सप्तपुत्रा दिधले, तयांच्या समागमे
द्वीपासीही नामे ते असे-पुरोजव, मनोजव,
पवमान, नी धूम्रानिक, चित्ररेफ, बहुरुप, नी
अश्वधार, नी स्वयं भगवान् अनंती दत्तचि हो
तपोवना पातले ॥ २५ ॥
या वर्षी ही सप्तमर्यादा पर्वते नी नद्याही । ईशान
उरुशृंग बलभद्र शतकेसर सहस्त्रस्त्रोत देवपाल
नी महानस पर्वते तथा नद्या अनघा आयुर्दा
अभयस्पृष्टी अपराजिता पंचपदी सहस्त्रस्त्रुति नी
निजघृती ॥ २६ ॥
त्या वर्षी ऋतव्रत सत्यव्रत दानव्रत नी अनव्रत
नावाचे पुरुष प्राणायामे आपुल्या रजो
तमोगुणा क्षीण करिती नी महान् समाधी द्वारा
वायूरुप श्रीहरीसी उपासिती ॥ २७ ॥
(नी या परी तयांची स्तुति करिती)
(अनुष्टुप्)
निवृत्तरुप प्राणादी ययांनी जीव पाळिता ।
जग हे तव आधीन वायु रक्षो प्रभो अम्हा ॥ २८ ॥
(भृंगनाद)
या परी मृत्तिकासमुद्रा पुढे चोहीकडुनि द्वीगुणे
पुष्करद्वीप । ते आपुल्या परी विस्तारे मधुर जले
घेरिले । तेथे अग्निशिखासम दैदिप्यमान् लाखो
स्वर्णमय पाकळ्यांचे प्रचंड पुष्कर(कमळ) जे
ब्रह्म्याचे आसन ॥ २९ ॥
त्या द्वीपा मधोमध पूर्वीय नी पश्चिमीय
विभागांच्या मर्यादेचा मानसोत्तर नावे पर्वत ।
हा दहाहजार योजने उंच नी लांबही तेवढा ।
या परी चौ दिशासी इंद्रादी लोकपालांच्या चारी
पुर्‍या । या वरी मेरु पर्वताच्या चोहीकडे
फिरणारे सूर्याचे रथाचे संवत्सर रुप चाके
देवतांचे दिन नी रात्र जे दक्षिणायन नी
उत्तरायण क्रमे सर्वदा फिरे ॥ ३० ॥
त्या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र वीतहोत्र
हा आपुले पुत्र रमणक नी धातकिसी दोन्ही
वर्षांचे अधिपती बनवुनी स्वयं ज्येष्ठ बंधू सम
भगवत् सेवेतचि राहिले ॥ ३१ ॥
तेथील निवासी ब्रह्मरुप भगवान् हरिची
ब्रह्मसालोक्यादिक प्राप्तीस्तव कर्मा आचरिती
नी या परी स्तुती करिती ॥ ३२ ॥
(अनुष्टुप्)
कर्मफळरुपी साक्षात् ईश्वरीं स्थित पूज्य जो ।
एकांत साधनोरुपा शांत ब्रह्मा नमो नमो ॥ ३३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजा ! या पुढे लोकालोक नावाचा पर्वत । हा
पृथ्वीवरी सूर्यादी द्वारा प्रकाशित नी अप्रकाशित
प्रदेशाच्या मध्ये विभागां स्थित ॥ ३४ ॥
मेरु पासुनी मानसोत्तर पर्वत अंतर तेवढीच भू
शुद्धोदक समुद्राच्या पुढे । तया पुढे सुवर्णमय
भू जी आरशासम विमल । तेथे पडलेली वस्तू
परत न मिळे, या साठी तेथे देवतां शिवाय
कोणी न वसती ॥ ३५ ॥
लोकालोक पर्वत सूर्यादींनी अप्रकाशित
भूमिभागा मध्ये, त्यामुळे त्यासी नाम हे ॥ ३६ ॥
यया परमात्मे त्रिलोका बाहेर चौबाजूसी केले
सीमारुपी स्थापित । हा एवढा उंच नी लांब की
याच्या एका बाजूसी त्रिलोक प्रकाशित करणार्‍या
सूर्यापासुनी ध्रुवा पर्यंत समस्त ज्योतिर्मंडलाची
किरणे दुसरी कडे जाऊ शकती ॥ ३७ ॥
विद्वानांनी प्रमाण लक्षण नी स्थितीच्या
अनुसारे संपूर्ण लोकींचा विस्तार एवढाचि
कथिला । हा सर्व भूगोल पन्नास कोटी योजने ।
याच्या चौथाई लोकालोक पर्वत ॥ ३८ ॥
याच्या वरी चौदिशीं समस्त जगद्‌गुरु स्वयंभू
श्रीब्रह्माजीने संपूर्ण लोकांच्या स्थितीशी ऋषभ
पुष्करचूड नी अपराजित नावाचे गजराज
नेमिले ॥ ३९ ॥
या दिग्गजांची नी आपुली अंशरुप इंद्रादी
लोकपालांची विविध शक्ती वृद्धी तथा समस्त
लोकांच्या कल्याणा परम ऐश्वर्याचे अधिपती
सर्वांतर्यामी परम पुरुष श्रीहरी आपुल्या
विष्वक्‌सेनादी पार्षदांसह या पर्वतावरी सर्वत्र
विराजती । ते आपुल्या शुद्ध सत्वा(श्री विग्रह)
जे धर्म ज्ञान वैराग्य नी ऐश्वर्यादी आठ महा
सिद्धींनी संपन्न नी धारिते । तयांच्या करकमलीं
शंख चक्रादी आयुधे सुशोभिती ॥ ४० ॥
या परी आपुल्या योगमाये रचिलेल्या विविध
लोकांच्या व्यवस्थे सुरक्षित ठेवण्या ते लीलामय
रुपाने कल्पांता पर्यंत सर्वत्र निवसती ॥ ४१ ॥
लोकालोकाच्या अंतर्वर्ती भूभागाचा विस्तार
जेवढा, तयाच्या दुसरीकडे अलोक प्रदेशाची
व्याख्या घेणे समजावुनी । तयाच्या पुढे तो
केवळ योगेश्वरांची योग्य गती हो शके ॥ ४२ ॥
(अनुष्टुप्)
स्वर्ग नी पृथिवी मध्ये ब्रह्मांड केंद्र जे असे ।
सूर्याची स्थिती ती आहे पंचविस् कोटि योजने ॥ ४३ ॥
मृतांडी सूर्य तो शोभे मार्तंड नाम त्या मुळे ।
हिरण्मयातुनी झाला हिरण्यगर्भ त्या मुळे ॥ ४४ ॥
दिशा आकाश द्यूलोक भूलोक स्वर्ग मोक्षही ।
रसातळ तसा नर्क सूर्यची तो विभागितो ॥ ४५ ॥
मनुष्य़ देवता तीर्यक् सरीसृप लतादिही ।
जीवांचा जीवही सृष्टीचा तो अधिष्ठिता ॥ ४६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर विसावा अध्याय हा ॥ ५ ॥ २० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP