समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय ६ वा

ऋषभदेवांचा देहत्याग -

राजा परीक्षिताने विचारिले -
(भृंगनाद)
भगवन् ! योगरुपी वायूने प्रज्वलित ज्ञान‌ अग्नित
क्रोधादी कर्मबीज जळता त्या आत्माराम
मुनिना दैवे जरि स्वयं अणिमादी सिद्धी प्राप्त
होती तो त्यांच्या राग द्वेषादि क्लेशा मुळि न
कारणचि । तो भगवान् ऋषभे त्यांचा स्विकार
का न केला ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
सत्यचि बोल हे तुमचे परी संसारी जसा चतुर
व्याध आपुल्या पकडिल्या मृगा विश्वास न
करि तैसे बुद्धिमान् नर या चंचल चित्ता विश्वास
न करिती ॥ २ ॥
(असेही सांगितले आहे) -
(अनुष्टुप्)
नको मित्रत्व चित्तासी चंचळां मोहिनीरुपा
कडोनी हर तो क्षीण संचीत तपि जाहला ॥ ३ ॥
जारा विश्वासुनी हत्त्या पतीची व्यभिचारिणी
करी, तै योगि विश्वासे चंचलो मन मारिती ।
काम क्रोधादी शत्रूंना नष्टिण्या गुंतवी मन ॥ ४ ॥
कामक्रोध मद लोभ भय मोहादि शत्रुचे ।
बंधाचे मन हे मूळ योगी विश्वासि ना तया ॥ ५ ॥
(भृंगनाद)
येणे भगवान् ऋषभदेव इंद्रादी सर्व लोकपालांना
भूषणस्वरुप जाहले, तरी ते जड पुरुषांप्रमाणे
अवधूत वेषें नि विविध भावें आपुल्या ईश्वरीय
प्रभाव लपवुनीच राहती । अंती योगियांना
देहत्याग शिकविण्या आपुल्या देहत्याग करणे
इच्छिले । ते आपुल्या अभेदरूपाने स्थित
परमात्म्याला अभेदरूप पाहुनी वासनांच्या
अनुवृत्तीतूनि सुटुनि लिंगदेहाच्या अभिमानींमुक्त
हो‌उनी पार जाहले ॥ ६ ॥
या परी लिंगदेहाभिमान मुक्त भगवान् ऋषभदेवांचे
शरीर योगमायेच्या वासनामुक्त अभिमानाभास
आश्रयेचि पृथिवीतळी विचरते राहिले । दैववशे
ते कोंक वेंक नि दक्षीण आदी कुटक कर्नाटकी
पातले नि मुखीं पाषाणखंड ठेवुनि, दिगंबर,
उन्मत्तापरि केस विखरुनी कुटकाचल पर्वती भटकू
लागले ॥ ७ ॥
या वेळी झंझावाते वंश घर्षणे प्रबल दावाग्नी
पेटोनी उठला नि सार्‍या वनात लाल-लाल अग्ने
घेरुनि ऋषभदेवांसहित भस्म करिता जाहला ॥ ८ ॥
राजन् ! ज्या वेळी वाढेल अधर्म कलियुगि,
तेंव्हा कोंक वेंक नी कूटक देशिचा मंदमतिराजा
अर्हत तेथिल ऋषभदेवांचे आश्रमातीत
आचरण वृतांत ऐकुनी नी स्वयं तो ग्रहण करुनि
लोकांच्या पूर्वसंचित पापफलरुप पापरूपा
वशिभूत हो‌उनी भयरहित स्वधर्म मार्गाचा
परित्याग करुनि आपुल्या बुद्धीने अनुचित नी
पाखंडपूर्ण कुमार्गाचा करील प्रचार ॥ ९ ॥
तेणे कलियूगी देवमाये मोहित अनेक अधम
आपुल्या शास्त्रविहित शौच नी आचारा सोडोनी
बसतिल । अधर्मबहुल कलियुगप्रभावे होता
बुद्धिहीन झाल्याने न स्नान करणे, न आचमने,
अशुद्ध राहुनि विंचरूनि केस ईश्वराचा तिरस्कार
करणारे पाखंड धर्माचा आपुल्या मते वाटल्या
प्रकारे करितील नी वेद ब्राह्मण नि भगवान्
यज्ञपुरुषा निंदू लागतील ॥ १० ॥
ते आपुली नवीन अवैदिक स्वेच्छाकृत प्रवृत्तीत
अंध परंपरेसी विश्वसोनि, मत्त राहोनी, स्वयंहि
पडतील घोर नरकी ॥ ११ ॥
रजोगुणे जे भरले त्यांच्या मोक्षमार्गा शिक्षणार्थ
भगवत् अवतार हा ॥ १२ ॥
तस्य गुणान् श्लोकान् गायन्ति -
(इंद्रवज्रा)
सातासमुद्री अन सप्त द्वीपी
    अशा धरेच्या वरि पुण्यभूमी ।
ही भारती कारण येथ गान
    होती हरीची नित कीर्तने ती ॥ १३ ॥
प्रियव्रताचा बहु वंश श्रेष्ठ
    यशस्वि झाला इथल्या भुमीसी ।
नारायणाचा अवतार झाला
    त्या मोक्षमार्गा समजूनि देण्या ॥ १४ ॥
न कोणि जाऊ शकतो यती ही
    मार्गी अशा त्या ऋषभाशिवाय ।
सिद्धीत गुंते मन योगियांचे
    नृपे तयाला मुळि त्यागिले की ॥ १५ ॥
(भृंगनाद)
या परी संपूर्ण वेद लोक देवता द्विज नि गाईंचे
परम गुरु भगवान् ऋषभदेवांचे विशुद्ध चरित्र मी
तुम्हा कथियले । हे तो समस्त मानवांचे
पापहारकचि । जो या परम मंगलमय चरित्रा
एकाग्रे श्रद्धेने निरंतर ऐकवितो, ऐकतो त्या दोघा
भगवान् वासुदेवी अनन्य भक्ती साधते ॥ १६ ॥
अनेक प्रकारे पापे घडति नी अंतःकरणा
पंडितजन या भक्तिसरिती निरंतर न्हाविती ।
तेणे तयांना तो लाभे परम शांतिची, ते होती
अतीशय आनंदमय नि पुन्हा ते त्याच्या पुढे
आपैसचि मोक्षरुप पुरुषार्थाही न आदरिती ।
भगवंताचे स्वजन होवोनिच तयांचे सर्व सिद्ध
होती पुरुषार्थ ते ॥ १७ ॥
(वसंततिलका)
श्री कृष्ण तो स्वयं यदू अन पांडवांचा
    हो इष्टदेव गुरु मित्र नि रक्षिताही ।
तो किंकरापरि श्रमे अन मुक्ति देई
    ती श्रेष्ठ भक्ति परि ना भलत्यास देई ॥ १८ ॥
जे नित्य इच्छिति मनी विषयी सुखाला
    त्या झोपल्या चिरजना करुणार्णवाने ।
बोधियले स्वरुप चिंतुनि मुक्त होता
    ऐशा नमो भगवता ऋषभास आम्ही ॥ १९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥ ५ ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP