समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध पाचवा - अध्याय ७ वा
भरतचरित्र -
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! महाराज भरत होते मोठेचि भगवद्भक्त ।
भगवान् ऋषभदेवे आपुल्या संकल्पे तया
पृथिवि रक्षणार्थे केले नियुक्तहि ॥ १ ॥
ज्या परी तामस अहंकारे शब्दादी पांच भूततन्मात्र
होती त्या परी पंचजनीच्या गर्भे तयां सुमति
राष्ट्रभृत सुदर्शन आवरण नी धूम्रकेतू नामक पाच
पुत्र जाहले, जे सर्वथा त्याच्या समानचि ॥ २ ॥
या राष्ट्रा अजनाभवर्ष नामाभिधान पहिले । परि
राजा भरता पासुनि या राष्ट्रा ‘भरत वर्ष’
संबोधिले ॥ ३ ॥
होते महाराजा बहुज्ञचि । आपापल्याकर्मीं
लागल्या प्रजेचे आजोबा-वडीलां समानचि
सांभाळू लागले ॥ ४ ॥
तये होता, अध्वर्यु, उद्गाता, नि ब्रह्मा या चारि
ऋत्विजांद्वारा केले जाणारे प्रकृती नि विकृति
हे दोन्हीही अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास,
चातुर्मास्य, पशु नि सोमादी सान-थोर क्रतुच्या
माध्यमे यथासमय श्रद्धा पूर्वक यज्ञ नी क्रतुरूप
श्रीभगवंता याजिले ॥ ५ ॥
या परी अंग नी क्रिया सहित भिन्न भिन्न यज्ञाचे
समयि जेंव्हा अध्वर्युगण आहुती देण्या हवि घेत
करीं तो यजमान भरत त्यांचे पुण्यफला यज्ञपुरुष
भगवान् वासुदेवासचि अर्पिती । वस्तुतः ते
परब्रह्मचि, इंद्रादी समस्त देवतांचे प्रकाशक,
मंत्रप्रतिपाद्य नि देवतांचे नियामक असुनी
मुख्यकर्ता एवं प्रधान देवचि । या परी भगवद्दर्पण
बुद्धि रुप कुशले हृदयींचे राग द्वेषादी मळा मार्जन
करिता ते सूर्यादि सर्व यज्ञभोक्ता देवतांचे
भगवंताच्या नेत्रादी अवयव रूपात चिंतन
करिती ॥ ६ ॥
या परी कर्म शुद्धीने तयाचे जाहले अंतःकरण
शुद्धचि । तेंव्हा तये अंतर्मयरूपे विराजमान,
हृदयाकाशीच अभिव्यक्त, ब्रह्मस्वरूप अशा
महापुरुषांच्या लक्षणे उपलक्षित भगवान् वासुदेवीं
जे श्रीवत्स कौत्सभ वनमाला चक्र शंख नि
गदादींनी सुशोभित तथा नारदादी निजजनांच्या
हृदयी चित्रसमान निश्चल भावे स्थित असे-दिन
दिन वेगपूर्वक उत्कट भक्ती प्राप्त जाहली ॥ ७ ॥
या परी एक कोटि वर्षे सरता तयाने राज्यभोग
प्रारब्ध क्षीण झाले जाणुनी आपुली वंश
परंपरागत संपत्ती आपुल्या पुत्रात यथा योग्य
वाटिली । पुन्हा आपुल्या सर्व संपत्ति-संपन्न
महालातुनि निघुनि ते पुलहा श्रमी-हरीहर क्षेत्रीं
पातले ॥ ८ ॥
या पुलहाश्रमी राहणार्या भक्तांवर भगवंताचे
मोठेचि वात्सल्य । ते आजहि त्यांच्याशी
इष्टरूपे प्राप्त होती ॥ ९ ॥
तेथे चक्रनदी-गंडकी सरिता चक्राकार शालिग्राम
शीलांना ज्यांच्या खाली नि वरी दोन्ही बाजूंना
नाभिसमान चिन्ह असति । चोहोकडुनि ऋषिंच्या
आश्रमा पवित्र करिते ॥ १० ॥
त्या पुलहाश्रमी वनात एकटेचि राहुनी अनेक
प्रकारची पाने फुले तुलसीदल नी कंद मूळ
फलादी उपहारे भगवत् आराधनी लागले ।
तयाने त्यांचे अंतःकरण समस्त विषयाभिलाषां
मधुनि निवृत्त जाहले, शांत जाहले, परम आनंद
प्राप्त जाहला ॥ ११ ॥
या प्रकारे जेंव्हा ते भगवंताची नियमपूर्वक
परिचर्या करुं लागले तेंव्हा त्यांचा प्रेमाचा वेग
वाढूं लागला, जेणे तयांचे हृदय द्रवीभूत होउनी
शांत जाहले, रोमांच अंगी नी उत्कंठेने नेत्रीं
प्रेमाश्रू ओघळले जेणे त्यांची दृष्टी थांबली ।
अंती जेंव्हा आपुले प्रियतम अरुण चरणार-
-विंदाच्या ध्यानाने भक्तियोगाचा आविर्भाव
जाहला तेंव्हा परमानंदे ओसंडुनि हृदयरूप
गंभीर सरोवरी बुद्धी बुडता त्यांना त्या नियम
पूर्वक भगवद्भक्तीचे स्मरण न राहिले ॥ १२ ॥
या प्रकारे ते भगवत्सेवीं तत्पर राहिले शरीरावरी
कृष्णमृगचर्म धारियले नि त्रिकाल स्नान रोज
करिता भिजुनि तयांचे केस भोरे नी कुरुळे
जाहले, जयांनी ते विशेष प्रसन्नचि गमले । ते
उगवत्या सूर्यमंडली सूर्य संबंधी नि ऋचाद्वारा
ज्योतिर्मय परम पुरुष भगवान् नारायणाची
उपासना करिता यापरी म्हणती ॥ १३ ॥
(इंद्रवज्रा)
देवा तुझे तेज पराप्रकृती
संकल्पुनी तूं जग निर्मियेले ।
नी रक्षिसी आत प्रवेशुनिया
त्या बुद्धिदात्यां शरणात आम्ही ॥ १४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ ५ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|