समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय ५ वा

ऋषभजींचा आपल्या पुत्रांना उपदेश, अवधूत वृत्ती ग्रहण -

श्री शुकदेवजी सांगतात -
(शालिनी)
नाही भोगा देह भूमीस दुःख
    ते तो लाभे हीन ऐशा पशूस ।
व्हावे देहे दिव्य ते ध्यान शुद्ध
    तेणे लाभे ब्रह्म‌आनंद थोर ॥ १ ॥
लाभे मुक्ती संत सेवा करीता
    कामीनींचा संग तो नर्क द्वार ।
अक्रोधी नी शांतदृष्टी समान
    शुद्धाचारी तो महात्माचि जाणा ॥ २ ॥
(इंद्रवज्रा)
किंवा मला प्रेम करोनि धन्य
    नी इंद्रियांची करण्यात चर्चा ।
स्त्री पुत्र द्रव्यीं मन गुंतलेल्या
    निर्वाह घेई त्यजुनी जगाला ॥ ३ ॥
घडे चुकोनी जरि पाप सारे
    तो वागतो इंद्रिय तुष्टिण्याला ।
मानी न मी त्या मग चांगले की
    तेणेचि लाभे मग दुःख सारे ॥ ४
जीवा न हो तत्व‌इच्छा मनाने
    अज्ञान तै ते लपले म्हणावे ।
वैदीक कर्मी फसता मनात
    त्या वासना बंधनि टाकितात ॥ ५ ॥
अज्ञान झाकी जयि आत्मरूपा
    तै बांधिती कर्मिहि वासना त्या ।
नी वासुदेवात नसेल प्रीती
    तरी न सोडी भवबंध त्यासी ॥ ६ ॥
स्वार्थात वेडे जिव आश्रयी ना
    जायी नि पाही हिन भोग सारे ।
तै आत्मरूपा हरवून बैसे
    अज्ञानि क्लेशा बहु भोग भोगी ॥ ७ ॥
पुरूष स्त्रीच्या मनप्रेमभावा
    दांपत्यभावो कुणि गाठ मानी ।
देहाभिमानी परि कैक ग्रंथी
    तयात पूर्वीच वसोनि होती ॥ ८ ॥
ममत्वग्रंथी जधि हो शिथील
    दांपत्यभावा विसरोनि जायी ।
हेतू अहंकार त्यज्योनि मुक्त
    मेळी करासी पद दिव्य तोची ॥ ९ ॥
तरावयासी भव सिंधु व्हावे
    कौशल्य नी भाव मला गुरुत्वी ।
ध्यावे मला त्यागुनि ती तहान
    द्वंद्वे सहावी मनि भीति जन्मी ॥ १० ॥
जिज्ञासुने ते तप आचरीता
    सकाम कर्मा मग त्याग व्हावा ।
माझ्या गुणा कीर्तनि नित्य गावे
    वैराग्य शांती समभाव व्हावा ॥ ११ ॥
शांतीत त्याग मग मीपणाला
    अध्यात्मशास्त्रास अनुशीलनाने ।
एकांति व्हावा मग संयमो नी
    त्या संतवाक्य वरि भाव ठेवा ॥ १२ ॥
त्या ब्रह्मचर्यीं नित सावधानी
    संयेमि पाहा हरि सर्व व्याप्त ।
योग अहंकाररुपी तनूते
    ज्ञानेचि की लीन करोनि टाका ॥ १३ ॥
कर्मी अहंची बहु बद्ध ग्रंथी
    अज्ञानरूपी, अशि शास्त्र योगे ।
या साधनांनी मग नाश व्हावा
    नी शेवटी साधनही त्यजावे ॥ १४ ॥
पुत्रा नि शिष्यापरि त्या नृपाने
    गुरू जसा बोधि तसे वदावे ।
न क्रोधि होता जनबोध व्हावा
    कर्मा जरी ते बहु वर्ततात ॥
गुंतो तयां कर्मि भले न कांही
    बुद्ध्याच खड्डीं जणु अंध न्यावा ॥ १५ ॥
कल्याण जे हे नच जाणितात
    बांधोनि वैरा मग भोग घेती ।
वैरे विरोधे नरकीच जाणे
    ना मूर्ख जाणी जरि दुःख घोर ॥ १६ ॥
खड्डयासि जाता उलट्या दिशेने
    ना डोळसाते बघवे कदापी ।
अज्ञानि जाती जधि दुःखमार्गी
    हो कोण साधू बघतो सुखाने ॥ १७ ॥
देवूनि भक्ती नच फास सोडी
    न तो गुरु नी नच माय बाप ।
न स्नेहि तो नी नच इष्टदेव
    पती पती तो नच मानणे की ॥ १८ ॥
न मूढ जाणी मम जन्म कर्मा
    धर्मस्थिती शुद्ध नि सत्व मी तो ।
अधर्म मी तो ढकलून देई
    तेणेचि माझे ऋषभोचि नाम ॥ १९ ॥
या शुद्ध चित्तातचि वाटते की
    तुम्ही करावी भरतार्थ सेवा ।
माझीच सेवा मग मी स्मरेन
    तुम्हा प्रजेचे नच अन्य कार्य ॥ २० ॥
त्या सर्व जीवांहुनि श्रेष्ठ वृक्ष
    त्यांच्याहुनी जे चालती पुन्हा ते ।
नी ज्ञान ऐसे पशु त्याहुनी नी
    मनुष्य गंधर्व नि किंन्नरे ते ॥ २१ ॥
क्रमे असूरे सुर इंद्र नी ते
    दक्षादि मध्ये मग रुद्र श्रेष्ठ ।
त्याचा पिता तो मग श्रेष्ठ ब्रह्मा
    त्याहुनि मी नी मजहूनि विप्र ॥ २२ ॥
(सभेत ब्राह्मणांकडे पाहात)
समान कोणी नच ब्राह्मणांच्या
    तो कोण यांच्याहुनि श्रेष्ठ सांगू ।
यांच्या मुखाने मज भोज प्राप्ती
    ना ती तशी अग्निहोत्रा मधेही ॥ २३ ॥
ज्यांनी अती सुंदर मूर्ति माझी
    ती वेदरूपी अशि धारियेली ।
पावित्र्य सत्वो शम नी दमादी
    दया तपो आणि तितिक्ष ज्ञान ॥
संपन्न आठीं गुण कोण ऐसा
    या ब्राह्मणांच्या हुनि श्रेष्ठ अन्य ॥ २४ ॥
ब्रह्मादिच्याहूनि मी श्रेष्ठ आणि
    अनंत मोक्षदिहि सर्व देतो ।
न मागती ते अतिप्रीय माझे
    राज्यादिकांची मुळि ज्या न इच्छा ॥ २५ ॥
पुत्रो ! तुम्ही सर्व चराचरास
    माझी तनू मानुनि शुद्ध भावे ।
सेवा करावी पद-पाद त्यांची
    ती सत्य पूजा मज लाभते की ॥ २६ ॥
वाचा मने दृष्टि नि इंद्रियांचे
    साफल्य ऐशा पुजनात माझ्या ।
याच्या विना ना सुटकाच केंव्हा
    त्या काल-मोहा मधुनी कधी ही ॥ २७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन्‌ ऋषभदेवपुत्रो यद्यपि स्वयं शिकलेचि परंतु
लोकशिक्षणार्थे महाप्रभावी परम सुहृद भगवान्‌
ऋषभे तयां उपदेशिले । ऋषभदेवाच्या शतपुत्रांत
भरत ज्येष्ठची । ते भगवंताचे परम भक्तचि असे ।
ऋषभदेवे पृथिवि पालनार्थे तयास राजगादीवरी
बैसविले । नि स्वयं उपशमशील वृत्तिपरायण
महामुनींचे भक्ति ज्ञान वैराग्यरुप परमहंसोचित
धर्मशिक्षण देण्या विरक्त जाहले । केवळ शरिर
मात्रा परीग्रह ठेवुनि सर्वची त्यागिले घरी राहुनी ।
आता सर्व वस्त्रहि त्यागुनी राहिले दिगंबरचि ।
स्थितीत या ते अग्निहोत्रा स्वतात लीन करुनी
संन्यासी जाहले नि ब्रह्मावर्त देशा बाहेर निघाले ॥ २८ ॥
ते राहिले सदैव मौनस्थ । जरी बोलावे वाटे
कांही तरिहि न बोलती । मंद अंध बहिरा मुका
पिशाच्च नी वेड्यापरी सहुनी अवधूत हो‌उनी
जिकडे तिकडे भटकू लागले ॥ २९ ॥
कधी नगरीं कधी ग्रामी कधी गोठ्यावरी
वाडीवस्त्यात नि कधी बागेत पहाड ग्रामी कधी
छावनीत नी कधी गोशाला अहिर वस्तीत नि
धर्मशाळेत ते राहिले । पर्वतीं जंगली आश्रमीं
फिरती कधी । जेथे जाती तेथे जसे वनीं कुंजर
फिरता मक्षिका जशा त्रासिती तसे मूर्ख त्यांना
पाठिसी जाउनी सताविती । धमकावी कुणी,
कुणी मारी, नि कोणी मारी धक्काही । विष्ठा
धूळ लघवी थुंकी चिखल फेकुनी त्रासिती नि
कोणी अधोवायू सोडुनि, खरे खोटे बोलुनि
तिरस्कारिती । परंतु त्यांच्याकडे हे न लक्ष देती ।
परंतू भ्रजे जी काया सत्य समजुनि मिथ्या
शरीरीं अहंता-ममता थोडीही नव्हती त्यांची ।
ते कार्यकारणरूप सर्वप्रपंचसाक्षी असुनी
आपुल्या परमात्मरूपी स्थित, तेणे ते एकटे
अखंड चित्तवृत्तीने विचरती पृथिवीवरी ॥ ३० ॥
यद्यपि त्यांचे हात पाय छाती बाहू खांदे लांब
रूंद तरीहि सुकुमार गळा मुख आदी अंग
भासे, स्वाभाविक मुख मधुहास्य विलसे नि
ते सुंदरचि वाटे, नविन कमळदळापरी नेत्र
विशाल नी लालिमायुक्तचि दिसती ती मूर्ती
शांत नि शीतल संतापहारिणीच गमे । कपाळ,
कान नासिका समसमा प्रमाणी सुंदर अस्फुट
हास्ये मुखारविंदी मनोहर पाहता पुरनारींच्या
मनीं कामदेवचि संचरे, तथापी मुख, पृष्ठभागी
भोरे, कुरुळे, लांब केसभार मोठा नी धूसर देहाने
ते ग्रहग्रस्त गृहस्थापरीच भासती ॥ ३१ ॥
जेंव्हा ऋषभदेवे जाणिले की जनता साधनीं
योगाच्या विघ्नरूपीचि तेंव्हा त्यांनी
अजगरवृत्तीने विभास वृत्तीने राहुनी पडल्या
पडल्या खाणे-पिणे चघळणे, नि मल-मूत्र
त्यागणे करू लागले । त्यागिला मळीं लोळुनी
अंगा बरबटूं लागले ॥ ३२ ॥
परि मळा न दुर्गंधी, परिमळचि वाटे । नी वायू
त्या सुगंधा दश दिशा दश योजने पसरुनी
साऱ्या देशा गंधित करी ॥ ३३ ॥
या परी गो, मृग नी काकवृत्ती स्विकारुनी कधी
चालती, त्यांच्या परि कधी उभेचि, कधी
बसताचि नि कधी लवंडल्या लवंडल्या खाणे-
पिणे नि मल-मूत्र त्याग करुं लागले ॥ ३४
परीक्षिता परमहंसां ना त्यागाची शिकवण करण्या
मोक्षपति भगवान्‌ ऋषभदेवे कितिएक तर्‍हेच्या
योगचर्यांचे केले आचरण । त्यांच्या दृष्टीने
निरुपाधिकरुपे संपूर्ण प्राणियांचा आत्मा आपुल्या
आत्मस्वरुप भगवान्‌ वासुदेवाच्या मधे कोणताहि
नव्हता । त्या योगे त्यांचे सकल पुरुषार्थ पूर्ण जाहले ।
आकाश गमन, मनोजवित्व नि अंतर्धान परकाया
प्रवेश नि दूरश्रवण, दूरदर्शनादी सिद्धि सेवा करण्या
तयांच्या पाशी आपोआपचि पातल्या, परंतू त्यांनी
त्यांचा मनें केला नच स्विकार ॥ ३५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ ५ ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP