समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय २ रा

राजा अग्नीध्रचरित्र -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
या परी पिता जाता तपस्येसी राजा अग्नीधरे
आज्ञा मानुनि जंबुद्वीपी धर्मानुसार पुत्रवत्‌
प्रजापालनी लागला ॥ १ ॥
एकदा त्याने पितृलोक इच्छुनि सत्‌पुत्र प्राप्त्यर्थे
पूजासामग्री योजुनी मंदराचल पर्वतराजीं सुर
सुंदरियांच्या क्रीडास्थळी हो‌उनि तत्पर एकाग्र चित्त
करुनी ब्रह्माजींच्या लागले उपासनीं ॥ २ ॥
जाणोनी आदिदेव ब्रह्मे अभिलाषा । आपुली
गायिका पूर्वचित्ती अप्सरा त्याचे कडे धाडिली ॥ ३ ॥
आश्रमाजवळि अग्निध्रच्या एक रमणीय होते
उपवन । ती अप्सरा तेथे लागली विचरु । स्वर्णलता
तरू तरूसि उपवनी शोभल्या । तेथे बसुनि मयुरादि
स्थलचर द्विजजोडी सुमधुर बोला बोलती । षड्‌जादी
स्वरयुत ध्वनी ऐकुनी सचेत जलकुक्कुट कारंडन
कलहंसादी जलपक्षी विविध रवे कुंजले । यामुळे
कमलवन सुशोभित सरोवर गुंजू लागले ॥ ४ ॥
विलासपूर्ण सुललित गतिविधि नि पदन्यास
शैल्ये पदोपदी पूर्वचित्तीचे पैंजव झनकारू लागले ।
हे ऐकुनि मनोहर ध्वनी राजकुमारे कमलकलिका
परि सुंदर नेत्रे उघडिले जे समाधि योगे जड वाटती, तै
दिसली अप्सरा ही । भ्रमरीपरी एकेक फुलाजवळि
जात सुंगित फुलां देवतां नि मनुष्यमनां नि नयनां
जी आल्हाद दे ऐसी विलासपूर्ण गति नी क्रीडाचापल्य
लज्जा एवं विनय दृष्टि मधुरवाणि, तया अंगावयवां
कामदेवां पुरुष हृदया जणु प्रवेशद्वारचि करी ॥ ५ ॥
जेंव्हा हास हासुनि लागली वदो तै भासले जणु
आमृतमय मादक मधु झरुं लागले । निःश्वास गंधे तिच्या
होवुनि मदांध भृंग घोंगावती मुखा भोवती तिच्या ।
तयांना चुकविण्या गतिपद चालता कुचकुंभ वेणी
करधनी हालवताना बहुहि विलोभनीयचि दिसे । हे
पाहण्या कामदेवा अवसर मिळुनि आग्निध्रच्या ह्रदयि
शिरता त्याच्या आधिने वेड्यापरी वदु लागला ॥ ६ ॥
(हाताकडे पाहून)
(वसंततिलका)
हो नाम काय मुनिजी अशि काय शैली
मायाचि काय भगवान्‌ पुरुषोत्तमाची
हे हात भासति जणु धन्‌ दोखीण ॥ ७ ॥
(दृष्टीस पाहून)
हे दोन बाण भुवया अति तीक्ष्ण भास ।
    ओहो ! ययास पर पद्मदळेचि शांत ।
येथे कुणास करिता नच लक्ष्य कोणी
    ही वीरताचि मतिमंद हितास आहे ॥ ८ ॥
शिष्यो सभोवति पाठहि गाति देवा
    ते सामगान प्रभूचे गमते मनाला ।
जैसे ऋषीगण सदा वदतात वेद
    तै वेणिपुष्प गळती तव हे भुमीसी ॥ ९ ॥
(नूपुरांकडे पाहून)
ब्रह्मन्‌ ! पदीं तितर बंदहि पिंजर्‍यात
    येती तयेचि परि न दृश्यमान ।
(करधनीसहित पिवळ्या साडीतील अंगाची उत्प्रेक्षा)
जै पद्म ते विभागते कटिबंध कैसे ।
    हे दागिने दिसति पै वसने न कां हो ॥ १० ॥
(कुंकम मंडित स्तनांकडे पाहून)
विप्रा तुम्ही भरियले ययि शृंगि काय
    हो त्यात रत्न म्हणुनी कृशदेह वाही ।
तेथे बघोनि नच दृष्टि फिरे पुन्हा नी
    तो लाल लेप कसला उधळी सुगंध ॥ ११ ॥
मित्रा ! तुझा मजसि दावचि देश कैसा
    अद्‌भूत तेथ सगळ्यां निजवक्ष ऐसे ।
प्राणासि जे हरिति क्षुब्ध मनात होते
    हे हाव भाव नि असे सुमधूर बोल ॥ १२ ॥
आहार काय तव जै पसरे सुगंध
    मित्रा गमे तव कला भगवंत तूची ।
हां ही तुझी मकर कुंडल कर्णि शोभा
    आहे सरोवरचि जै मुख शांत तैसे ।
हे नेत्र चंचल जसे भयभीत मत्स्य
    दंतावलीहि दिसते जणु हंसमाळ ।
भुंगे जसे दिसति मोहक तै तुझा हा
    काळा तसाचि कुरुळा बहु केशभार ॥ १३ ॥
तू चेंडु खेळसि जधीं कर चापटीने
    जाता दिशा विदिशि चंचल नेत्र तेंव्हा ।
होतो मनात गलका तव केस मुक्त
    हा दुष्ट वात उडवी नव वस्त्र कैसे ॥ १४ ॥
केले कुठे तप द्विजा मिळण्या रुपा हा
    सारे तपीहि भुलुनी मनि भ्रष्ट होती ।
ये, ये करू तप इथे मिळुनीहि दोघे
का विश्व विस्तारविण्या मज देव घाला ॥ १५ ॥
ब्रह्मरजिची खरिच तू देण वाटे
    ना सोडितो तुजसि मी मन ना निघे की ।
हे शृंगि तू महसि ने तव पाठि येतो
मी दास याहि सखया मज सोबती व्हा ॥ १६ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन्‌ आग्निध्र तो बहु बुद्धिमान्‌ देवता समान
नि करण्या प्रसन्न ललना बहुहि कुशल यापरी
रतिचातुर्य गोड वदुनि तये त्या अप्सरेला प्रसन्न
केले असे ॥ १७ ॥
वीराग्रणी बुद्धी शील रूप अवस्था लक्ष्मी नी
उदारता बघुनि आग्निध्रा ती जाहली मोहित ती
जंबुद्वीपाधिपतिच्या सह राहुनिया हजारो वर्षे
धरा तसे स्वर्गीचे भोग भोगित राहिली ॥ १८ ॥
नंतरे नृपवरे अग्निध्रने तिच्या गर्भाने नाभी किंपुरुष
हरिवर्ष इलावृत रम्यक्‌ हिरण्यमय कुरू भद्राश्व नी
केतुमाल या नऊ पुत्रांना दिलासे जन्म ॥ १९ ॥
यापरी नऊ वर्षे एकेक करुनि नऊ पुत्रांना जन्म
देउनि पूर्वचित्ती तयांना सोडुनि राजभवनि
ब्रह्माजीचे सेवेत पातली ॥ २० ॥
अग्निध्राचे हे पुत्र मातानुग्रहे स्वभावत सुडौल
सबलचि होते । अग्निध्राचे जंबुद्वीपाचे केले
समान नामे नऊद्वीपे निर्मुनि न‌उ खंडा न‌ऊ पुत्रां
दिधले । सर्वचि आपल्या राज्या भोगू लागले ॥ २१ ॥
सर्व हे भोगुनिया भोग अग्निध्र अतृप्तचि राहिला
मनीं । अप्सरा भोगण्या मानी सदैव पुरुषार्थचि ।
वैदिक कर्मे करुनि तोचि लोक केला प्राप्त तये
जेथे पितृलोकी सदैव तृप्ती मानिती ॥ २२ ॥
पिता जाता परलोकी नऊ बंधुंनी वरिल्या क्रमाने
नवु कन्या कशा । मेरुपुत्रि मेरुदेवी प्रतिरुपा
उग्रदंष्ट्री लता रम्या श्यामा नारी भद्रा नी
दववीति नामे जयां ॥ २३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ ५ ॥ २ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP