समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय १ ला

प्रियव्रतचरित्र -


राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्‌)
प्रियव्रत्‌ भगवद्‌भक्त आत्मारामचि तो मुने ।
रमला घरि तो कैसा भुलता कर्मि बांधिला ॥ १ ॥
विप्रा ! निस्संग पुरुषा गृहस्थाश्रमि निश्चित ।
परिणाम असा व्हावा हे तो उचित ना कधी ॥ २ ॥
संशयो यात ना कांही शांत शीतल त्या पदी ।
छायेत बसला त्याला गेहासक्ती मुळी नसे ॥ ३ ॥
साशंक मनि मी ब्रह्मन्‌ राये आसक्त राहुनी ।
केलीसे सिद्धि ती प्राप्त जिने भक्तीच लाभते ॥ ४ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले -
राजा ! वचन बहु चांग आहे तुझे । ज्यांचे चित्त
पवित्रकीर्तिहरिच्या परम मधुर चरणकमल
मकरंदरसोचि गेले मिसळुनि, ते कधिच न सोडिती
भगवद्‌भक्त परमहंसाचे प्रियवासुदेव भगवत्‌
कथाश्रवण रूपी परम कल्याणमय मार्गा चित्त,
चित्ती कितीही जरि बाधा ठाकल्या ॥ ५ ॥
होते प्रियव्रत श्रेष्ठ नि श्री हरीभक्त ऐसे, श्री नारदचरण
उपासिता त्यां झाला परमात्म बोध सहजचि ।
ते ब्रह्मास्त्रदीक्षित नी अभिषिक्त कुशल भूपती
गुणसंपन्न पित्राज्ञा अंकित असे, स्वायंभुवे परमपुत्र
शास्त्रनिपुण करुनि आज्ञापिले । परंतु प्रियव्रत
समाधियोग करुनि इंद्रिये नी कर्म सर्व हरि वासुदेव
चरणी अर्पिते जाहले । तेंव्हा उल्लंघन पित्राज्ञा
करण्या नच केला विचार राज्याधिकार
स्विकार करिता आत्मस्वरुप जे स्त्री पुत्रादी
मोहीचि झाकियेले त्या राज्यीं गेही फसुनि
सर्वचि विस्मृति हो म्हणुनि तये न केली
स्वीकृति ॥ ६ ॥
आदिदेव स्वायंभूव भगवान्‌ ब्रह्म्याला सदैव विचार
असतो प्रपंच विस्तारण्या । त्यांना सर्व जीवांचा
अभिप्रायहि माहित असे । जेंव्हा त्यांनी पाहिली
प्रियव्रताची वृत्ति ही अशी, तेंव्हा ते मूर्तिमान्‌
चारी वेद नि पार्षदां सहित मरीचि आदी सहीत
उतरले आपुल्या लोकातुनि ॥ ७ ॥
येताना इंद्रादी थोर देवता यांनी पूजियले तयांना
नी संघ संघ करुनि जे सिद्ध, गंधर्व, साध्य, चारण
नी मुनिजन पातले त्यांनी स्तविले ब्रह्मादिका ।
जागोजागी यापरी घेत सन्मान ते निघाले नक्षत्रनाथ
चंद्रापरि गंधमादन पर्वतशिखरीं प्रकाश टाकित
प्रियव्रतापाशी पहुचले ॥ ८ ॥
आत्मविद्या प्रियव्रतास उपदेशिण्या मुनि नारदहि
आले तिथे । ब्रह्माजी तेथे हंसवाहना सह
पहुंचताच पाहुनि जाणिले आले पिताजी इथे तेंव्हा
ते स्वायंभुव मनूसहित, प्रियव्रता सहित राहिले
उभे नी कर जोडुनि प्रणाम केला तयां ॥ ९ ॥
नारदांनी सर्वोपकारी पूजा करुनि तयां सुमधुर
वचनांनी वर्णिले गुण नि अवतार विशेषा ।
तेंव्हा आदिपुरुष भगवान्‌ ब्रह्म्याने प्रियव्रताकडे
मंदहास्य‌युक्त दया दृष्टीने बघुनि बोलले यापरी ॥ १० ॥
ब्रह्मदेवजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
तू ऐक पुत्रा जयि सांगतो मी
    त्या सत्वसिद्धांत अशाच गोष्टी ।
न दोषदृष्टी बघु तू हरीला
    अधीन त्याच्या सगळेच आम्ही ॥ ११ ॥
त्याच्या विधाना नच कोणि टाळू-
    -शके तपे बुद्धि नि धर्म योगे ।
जो देहधारी कुणिही असो तो
    स्वये सहाय्ये करुनी कुणाच्या ॥ १२ ॥
अव्यक्त ईशे दिधल्या शरीरा
    ते जीव सारे भय क्रोध मोह ।
नी जन्म मृत्यू सुख दुःख भोगा
    नी कर्म सारे करिती स्विकार ॥ १३ ॥
वत्सा पशू वेसिणि टोचिलेले
    वाही मनुष्यी बहुभार तैसा ।
त्या वेदवाक्ये जिव बांधिलेले
    कर्मे हरीच्या पुजनात येती ॥ १४ ॥
कर्मा गुणा पाहुनिया प्रभू तो
    इच्छोनि योनीतचि जन्म घेतो ।
त्याचेचि इच्छे सुख दुःख लाभे
    जै डोळसा मानिति अंध सारे ॥ १५ ॥
जे मुक्त तेही हरिच्याच इच्छे
    घेती तनूसी जणु स्वप्न सारे ।
न त्या अवस्थीं मुळि गर्व त्यांना
    तो जन्म त्यांना पुढती असेना ॥ १६ ॥
जो इंद्रियांचा वशिभूत त्याला
    वनातही जन्ममृत्यू भयादी ।
न सोडिता षड्रिपु त्या नराला
    स्वानंदि त्यांना भय ना भवाचे ॥ १७ ॥
जो षड्रिपुंना जितण्यास इच्छी
    राही घरी नी वश त्या करीतो ।
क्षीणास शत्रू सहजीच जिंकी
    तै बुद्धिवान्‌ हे रिपु जिंकिती की ॥ १८ ॥
तू पद्मनाभा चरणाविंदी
    दुर्गी सुरक्षीत तुला न भीती ।
भोगी हरीच्या मनिचेच भोग
    निस्संग आत्मा स्थितरुप होई ॥ १९ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
जेंव्हा त्रिलोकगुरु श्री ब्रह्मा या परि बोलला तै परम
भागवत प्रियव्रते विनम्रे शिर झुकवुनि ‘जी आज्ञा’ वदुनि
एवढे मानिली आज्ञा शिरोधार्यची ॥ २० ॥
तेंव्हा प्रसन्न मन करुनी भगवान्‌ ब्रह्म्यास विधिवत्‌
पूजिले स्वायंभूवे । पश्चात ते मन वाणी अविषयी
आयतेचि रमले नि बाह्ये परब्रह्म चिंतुनि गेले आपुल्या
सत्यलोका । तेंव्हा प्रियव्रत नि मुनि नारद सरल
स्वभावे त्यांचेकडेचि पाहु लागले ॥ २१ ॥
होताचि ब्रह्माजिच्या कृपे मनोरथ पुरे मनुने पुसुनि
नारद प्रियव्रता भूमंडळ रक्षार्थ सोपवुनि विषारी
जलाशय अशा प्रपंची निवृत्त जाहले ॥ २२ ॥
आता पृथिविपती महाराजा भगवान्‌ हरिच्या इच्छेने
राज्यशासन कार्यी जाहले नियुक्त । जो संपूर्ण जगता
सोडवु शके समर्थ असा अशा आदिपुरुष भगवान्‌
चरणयुगुलि ध्याना लावुनि क्रोधादी मळ नष्ट करुनी
ह्रदया विमल केले, तरिही श्रेष्ठांच्या आज्ञेचा सन्मान
राखिण्या पृथ्वीचे राज्या लागले ॥ २३ ॥
नंतरे ते प्रजापति विश्वकर्मापुत्रि बर्हिष्मतीसह
झाले विवाहित । झाले पुत्र दहा सर्वचि समान
गुणि शीलवान्‌ कर्मनिष्ठ रूपवान्‌ आणि तैसेचि
पराक्रमिहि । सर्वात शेंडेफळ पुत्रि त्यांना
ऊर्जस्वतिहि जाहली ॥ २४ ॥
आग्निध्र इध्मजिव यज्ञबाहू महावीर हिरण्यरेता
घृतपृष्ठ सवन मेधातिथि वीतिहोत्र कवी हे
अग्नि नामे जाहले ॥ २५ ॥
यांच्यातिल कवी महावीर सवन नैष्ठिक ब्रह्मचारी
राहिले, त्यांनी बालवयी शिकुनि आत्मविद्या
केला संन्यासाश्रम ग्रहण ॥ २६ ॥
संन्यासी राहुनि या त्रये जीवाधिष्ठान भवभय-
नाशक भगवान्‌ वासुदेवाच्या परम सुंदर
चरणाविंदी अखंड ध्यान लाविले । चिंतने ऐशा
भक्तियोगाच्या निरंतरे विशुद्ध चित्त तयांचे जाहले,
उपाधी त्यागिता आत्माभूत प्रत्यगामी संपूर्ण
जीवांच्या स्थिति जाहली ॥ २७ ॥
महाराजां प्रियव्रता पत्‍नी जी दुजी तिला उत्तम तामस
रैवत हे तीन पुत्र जाहले जे आपुल्या नामे मन्वंतरे
आधिपतिहि जाहले ॥ २८ ॥
यापरी प्रियव्रते कवी आदी तिन्हि पुत्रां जाहल्या
निवृत्ति तदनंतरे जत्पति म्हणुनि बारा अर्बुद वर्षे
केले शासन । ज्यावेळी अखंड पुरुषार्थमयि नि
वीर्यशालिनी भुजांनी प्रत्यंचा ओढिता करे टणत्‌कारे
तेंव्हा नच थांग द्रोही कुठेत दडले । आमोदे प्रमोदे
नी अभ्युत्थानादी क्रीडेसाठी बर्हिष्मतिचे दिन दिन
वाढविण्या हावभाव लज्जेने संकुचित मंदहास्य बघणे
नी मनास लोभविणे ऐसे विनोदादीने महामना
प्रियव्रत विवेक विसरुनि, आत्मज्ञान विसरुनि,
सर्व भोग भोगु लागले । परंतु त्यांच्यात त्यांची
आसक्ती मुळिहि नव्हती ॥ २९ ॥
एकदा पाहिले त्याने भगवान्‌ सूर्य सुमेरूची
परिक्रमा करिता लोकालोक पर्यंते पृथ्वीच्या
अर्धांगा अवलोकितो नि अर्धा भाग राही तमेचि
लोपिला हे ऐसे रायां मुळि न रुचले । तेंव्हा त्याने
संकल्पिले की मी रात्रीचाही करिन दिन तेंव्हा
त्याने वेगवान्‌ रथीं चढुनि सूर्याच्या पाठीसी
सात फेर्‍याहि घेतल्या । भगवान्‌ उपासन्ये
त्याचे तेज नि प्रभावहि अलौकिक वाढला ॥ ३० ॥
त्या वेळी रथाच्या चाकाच्या सात फेर्‍या होताचि
सप्तसमुद्रे सप्त द्वीपे जाहली ॥ ३१ ॥
जंबू प्लक्ष शाल्मलि कुश क्रौंच शाक नि पुष्कर
ऐसे सप्तद्वीपे क्रमाने नामे तयां । एकाच्या द्विगुणी
असे विस्तारले नी सागराबाहेर पृथिवी व्यापिलीसे सगळी ॥ ३२ ॥
क्रमाने खारे जल ऊसरस मदिरा नी तूप दूध
मातट नि गोड जले भरले । या साती द्वीपांना
क्रमाने वेढिलेले नि समान त्यांच्या बाहेर स्थितचि
तयां । बर्हिष्मतिपती महाराजा प्रियव्रते आपुल्या
परि अग्निध्रा इध्मजिव्हा यज्ञबाहो हिरण्यरेता
घृतपृष्ठा मेधातिथि नि वीतहोत्रा एकेका क्रमे
सप्त द्वीपी राज्यां स्थापिले ॥ ३३ ॥
ऊर्जस्वती कन्येचा विवाह तये शुक्राचार्यासी
केला तयांच्या पोटी जाहली देवयानी ॥ ३४ ॥
(वसंततिलका)
तृष्णाहि षड्‌गुण तसे षट‌इंद्रियांना
    संते जये जितलि त्यां नवलाव नाही ।
चांडाळ पापि कितिही असला तरीही
    तो एकदाचि स्मरता भवमुक्त होतो ॥ ३५ ॥
(भृंगनाद)
या परी अतुलबल पराक्रमयुक्त महाराजा प्रियव्रत
एकदा नारदपदी शरणी जाऊनिहि पुन्हा दैववश
प्राप्त प्रपंची फसुनि अशांत जाहला, मनोमनी
हो‌उनी विरक्ति बोलला असे ॥ ३६ ॥
आऽरेऽऽरेऽऽऽ फार झालेसे वाईट, माझ्या
विषय लोलुप इंद्रिये मज अंधारीकूपीं टाकिले ।
पुरे, पुरे झाले फारचि हे । हाय मी स्त्रियांचा
क्रिडामृगचि जाहलो । त्यांनी मला नाचविले
माकडा समानचि । माझा धिक्कार असो । यापरी
स्वतःशी बहुत ऐसे बोलला ॥ ३७ ॥
जाहली विवेकवृत्ति जागृत त्या हरी कृपे । पृथ्वी
पुत्रांना वाटुनि राजलक्ष्मी सहित राणीला मृतदेहा
सम सोडुनी ह्रदयीं वैराग्य बांधुनि भगवत्‌लीलांचे
चिंतन करिता त्या प्रभावे नारदांनी बोधिलेला
मार्ग अनुसरु लागला ॥ ३८ ॥
महाराज प्रियव्रतांविषयी श्लोकोक्त्ती -
(अनुष्टुप्‌)
नृपाने कर्म जे केले ईशा विण न शक्य ते ।
अंधार नाशण्या त्याने रथाने द्वीप निर्मिले ॥ ३९ ॥
प्राण्यांच्या सोयिसाठी ही पृथ्वी द्वीपात भागिली ।
नद्या नी पर्वते यांनी सीमाही पाडिल्या तये ॥ ४० ॥
प्रेमी त्या नारदांचा तो स्वर्ग पाताळ मृत्यु या ।
कर्मयोगाप्त त्या राज्या मानी तो नरकासम ॥ ४१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ ५ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP