समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ३१ वा

प्रचेत्यांना नारदाचा उपदेश व त्यांना परमपद प्राप्ती -

मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
दशलक्ष असे वर्ष जाता प्रचेतियां पुन्हा ।
विवेक जाहला, पुत्र मातेसी सोपवोनिया ॥ १ ॥
पश्चिमी तटि सिंधूच्या जाजली मुनिच्या स्थळी ।
पातले घेतली दीक्षा ब्रह्मसत्रास बैसले ॥ २ ॥
(इंद्रवज्रा)
जिंकीयले प्राण मनें नि वाण्यें
    जिंकीयले आसन विग्रहात ।
जो वंदनीयो सुर आसुरांना
    त्या नारदा ते दिसले प्रचेते ॥ ३ ॥
(अनुष्टुप्‌)
आलेले पाहुनी त्यांना प्रचेत्यें अभिवंदिले ।
तदा नारद आनंदे बसता बंधु बोलले ॥ ४ ॥
प्रचेते म्हणाले -
सुस्वागतम्‌ मुनी ब्रह्मन्‌ ! भाग्याने दिसले तुम्ही ।
भ्रमता भानुच्या ऐसे देता अभयदान ते ॥ ५ ॥
प्रभो ! श्री शंकरे आणि विष्णुने उपदेशिले ।
त्याचा विसर तो झाला गृहासक्तीत राहुनी ॥ ६ ॥
पुन्हा त्या परमार्थाची पेटवा आत्मज्योत ती ।
भवाचे भय ते जेणे संपेल सहजी असे ॥ ७ ॥
मैत्रेयजी सांगतात -
भगवान्‌ नारदाचे ते कृष्णात चित्त सर्वदा ।
ऐकता प्रश्न हा त्यांचा तयांना बोलु लागले ॥ ८ ॥
नारदजी म्हणाले -
राजांनो जगतामध्ये तो जन्म कर्म आयु नी ।
मन वाणीस साफल्य सेविता हरि ईश्वर ॥ ९ ॥
साक्षात्‌कार हरीचा त्या स्वरुपे नच जाहला ।
तयाचे ते तिन्ही जन्म वेदोक्त कर्म आयु नी ॥ १० ॥
चातुर्य वाणिचे तैसे शास्त्र ज्ञान तसे तप ।
बुद्धी नी स्मरणीशक्ती चापल्य बल आणि ते ॥ ११ ॥
योग सांख्य नि संन्यास मंत्र वैराग्य नी व्रते ।
अन्यान्य साधनांचा त्या पुरुषा लाभ काय तो ॥ १२ ॥
क्षेमावधी हि आत्मा तो तयाचे ज्ञान दे हरी ।
तोचि संपूर्ण प्राण्यांचा प्रियात्मा सर्वतोपरी ॥ १३ ॥
(इंद्रवज्रा)
त्या वृक्षमूळीं जळ घातल्याने
    शाखा नि पर्णे मग पोसतात ।
नी भोजनाने तनु पोसते तै ।
    त्या सर्व पूजा हरिसीच जाती ॥ १४ ॥
पाऊस होता मग सूर्य तेजे
    पुनश्च होती ढग वर्षण्या ते ।
तैसे हरीपासुनि जन्मलेले
    त्यासीच लीनी मग सर्व जाती ॥ १५ ॥
हा विश्व‌आत्मा परि वेगळाची
    गंधर्वपूरा परि भास विश्व ।
झोपीत होती लिन शक्ती जैशा
    ते सर्व तैसे प्रलयात होते ॥ १६ ॥
नभीं जसे तेज नि अंधकार
    जन्मोनि लीनी ढग त्यात जाती ।
तिन्ही गुणांच्या त्रय शक्ति योगे
    निर्मोनि जाते जग त्यात तैसे ॥ १७ ॥
तेव्हा भजावा हरि तो अभिन्ने
    आत्मा जिवांचा परि एकटा तो ।
तो जन्मदाता नियता हरी जो
    संहारितो तो मग कालशक्त्ये ॥ १८ ॥
(अनुष्टुप्‌)
भगवान्‌ सर्वभूतांना वर्षतो प्रेम सारिखे ।
संतुष्ट राहणे चित्ती त्यागाने शीघ्र पावतो ॥ १९ ॥
(पुष्पिताग्रा)
निघुनि सकल जाति वासना त्या
    रति मद हृदयो हि होय शुद्ध ।
तरि मग हरि संत ध्यानि गुंते
    हृदयिच राही न जायही कोठे ॥ २० ॥
न भजति कुमने करीति द्वेष
    धनहिन साधुपरी असोनि त्याचा ।
प्रभु नच करि प्रीति त्या जनांसी
    हरिभजनी धन मानि पावतो त्यां ॥ २१ ॥
नरपति लछमीसि मानिना तो
    स्वयि परिपूर्ण न देवतास मानी ।
अधिनचि निजभक्त जे भजोत
    मग हरिपाद कृतज्ञ सोडि कैसा ॥ २२ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
असे प्रचेतेराजांना नारदे उपदेशिले ।
लीला त्या हरिच्या कैक बोधोनी रिघले पुढे ॥ २३ ॥
प्रचेते मुखिची त्यांच्या कथा पावन ऐकुनी ।
हरीच्या पदि ध्यानास लावोनी मुक्त जाहले ॥ २४ ॥
विदुरा ! पुसली तुम्ही प्रचेते-नारदी कथा ।
हरी संबंधि संवाद बोललो सर्व तो तुम्हा ॥ २५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
राजन्‌ ! येथवरी सर्व स्वायंभूव सुवंश हा ।
वर्णिला प्रियव्रताचा वंश तो ऐकणे पुढे ॥ २६ ॥
नारदा कडुनी आत्मविद्या त्याचि प्रियव्रते ।
घेउनी त्यागिले राज्य पृथिवी दिधली मुलां ॥ २७ ॥
(इंद्रवज्रा)
मैत्रेय यांच्या मुखिची कथा ही
    गुणानुवादी, मग तो विदूर ।
ढाळूनिया प्रेम अश्रू तदाची
    ध्याता हरीसी मुनिपाद सेवी ॥ २८ ॥
विदुरजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
महायोगी तुम्ही आज कृपाकेली मला अशी ।
आणुनी ज्ञान तेजात दीनांचा नाथ दाविला ॥ २९ ॥
शुकदेवजी सांगतात -
कृतज्ञ बोल बोलोनी मैत्रेया वंदुनी तदा ।
विदूर पुसुनी त्यांना हस्तिनापुरि पातले ॥ ३० ॥
राजन्‌ ! या हरिच्या लीला पवित्र ऐकती तया ।
दीर्घायू यश नी वित्त क्षेमश्वर्यहि तै मिळे ॥ ३१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकतिसावा अध्याय हा ॥ ४ ॥ ३१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP