समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय ३० वा
प्रचेत्यांना भगवान विष्णूचे वरदान -
विदुरजींनी विचारिले -
(अनुष्टुप्)
ब्रह्मन् ! त्या राजपुत्रांनी रुद्रगीतास गाउनी ।
मेळिली कोणती सिद्धी प्राचीन्बर्हिसुते तदा ॥ १ ॥
(इंद्रवज्रा)
नारायणासी प्रिय त्या हराचे
सान्निध्य आकस्मिक ते तयांना ।
लाभे कसे ते मजला कळेना
ते सर्व सांगाच कृपा करोनी ॥ २ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
पित्राज्ञा घेउनी सर्व प्रजेचे उदधी मधे ।
राहिले स्तोत्र ते गाता भगवान् पावला हरी ॥ ३ ॥
तपस्या करिता झाले सहस्रदश वर्ष ते ।
तपस्याक्लेश सारोनी भेटला भगवान् हरी ॥ ४ ॥
बैसला गरुडस्कंधी मेरु जैसा सुशोभला ।
दिशा तेजाळल्या तेव्हा पीतांबर नि कौस्तुभे ॥ ५ ॥
(वसंततिलका)
आभूषणेहि सजले मुखमंडलाला
माथ्यावरी मुकुट तोहि झळाळला की ।
आठी भुजात प्रभुच्या आयुधेहि होते
होते सवे गरुड किन्नर गात कीर्ति ॥ ६ ॥
आठीं बलिष्ट भुजमंडलि लक्षुमीसी
स्पर्धा करोनि विलसे वनमाळ ऐसी ।
आदी पुरूष भगवान् शरणागती त्यां
प्रचेतियां निरखुनी घननादि बोले ॥ ७ ॥
श्री भगवान म्हणाले -
(अनुष्टुप्)
कल्याण तुमचे होवो राखिता बंधुप्रेम हे ।
धर्म हा पाळिला तुम्ही मागा जो वर मानसीं ॥ ८ ॥
रोज सायं तुम्हा गाता बंधूचे स्नेह होइल ।
सर्व जीवांप्रती त्याचा मित्र भावहि होय तो ॥ ९ ॥
प्रातः सायं मला ध्याता रुद्रगीतास गाउनी ।
तया मी शुद्ध बुद्धी नी अर्पील इच्छिला वरो ॥ १० ॥
शिरोधार्यचि आज्ञा ती पित्याची मानिली तुम्ही ।
कमनीय अशी कीर्ती वाढेल तुमची जगी ॥ ११ ॥
संतान ते तुम्हा एक लाभेल पुत्र वीर जो ।
प्रति ब्रह्मा असाची तो त्रिलोकी वंश वाढवी ॥ १२ ॥
कंडुऋषि तपोभंगा प्रम्लोचा अप्सरा हिला ।
इंद्रे जै धाडिले तेंव्हा सुरेख पुत्रि जाहली ॥
स्वर्गासी अप्सरा जाता वृक्षांनी पोषिले तिला ॥ १३ ॥
भूकें व्याकुळता बाळ औषधीराज चंद्रने ।
अमृतवर्षिणी बोट दयेने दिधले मुखी ॥ १४ ॥
संतान निर्मिण्या आज्ञा तुम्हासी देउनी पिता ।
लागला भजनी माझ्या कन्या ती वरिणे तुम्ही ॥ १५ ॥
तुमचा एकची धर्म स्वभाव एकची असे ।
तुमच्या योग्य ती कन्या सर्वांनी वरिणे तिला ।
सर्वांसी सारखे प्रेम करील पत्नि होउनी ॥ १६ ॥
दिव्यवर्ष दशलक्ष कृपेने माझिया तुम्ही ।
बलवान् राहुनी दिव्य भोगाल भोग सर्व ते ॥ १७ ॥
शेवटी भक्तिने माझ्या जळेल वासनामळ ।
नर्कतुल्य अशा भोगा त्याग लाभेल मोक्ष तो ॥ १८ ॥
कृष्णार्पण जया बुद्धी ऐके नित्यहि कीर्तने ।
गेहात राहुनी त्याला बंधाचे कारणीं नसे ॥ १९ ॥
नित्य जे ऐकती लीला माझ्या या द्विजयां मुखे
नित्य नवा असा मी त्या भासतो वसतो हृदीं ।
प्राप्ती माझीच होता तै न मोह शोक राहि तो ॥ २० ॥
मैत्रयजी सांगतात -
तेव्हा प्रचेते हरि दर्शनाने
रजो तमा पासुनि मुक्त झाले ।
बोल असे जै भगवंत त्यांना
सगद्गदे ते वदले हरीला ॥ २१ ॥
प्रचेते म्हणाले -
नमो नमः क्लेशविनाशकाला
ते वेद गाती तव गूण नाम ।
तै वाणि नी ते मन ही न पोचे
पुनःपुन्हा आम्हि तुला नमीतो ॥ २२ ॥
तू स्थीत रुपी अन शुद्ध शांत
मना निमित्ते मुळि द्वैत भास ।
घेसी रुपे तीने त्रये अवस्थीं
आम्ही तुला श्री हरि रे नमीतो ॥ २३ ॥
(अनुष्टुप्)
नमो विशुद्धसत्वा तू हरिसी भवबंधने ।
वासुदेवा नि कृष्णाला नमितो आम्ही रे पुन्हा ॥ २४ ॥
नमो कमलनाभाला पद्ममाळीसही नमो ।
नमो कमलपादाला कमलाक्षा नमो नमः ॥ २५ ॥
केसरी स्वच्छ तू वस्त्रे धारिसी नित्य दिव्य तू ।
साक्षी आश्रय भूतांचा आम्ही रे नमितो तुला ॥ २६ ॥
भगवान् ! तव हे रूप संपूर्ण क्लेश नासिते ।
अविद्या अस्मिता रागद्वेषादी क्लेश पीडित ।
असता मुक्तची झालो आणखी काय पाहिजे ॥ २७ ॥
प्रभो ! अमंगलहारी संतासी करणे कृपा ।
दीनांना एवढी की ती वाटावे हे हि आमुचे ॥ २८ ॥
आश्रितां शांत हो चित्त हीन जीवीहि तू वसे ।
मग तू आमच्या चित्ता न जाणी कधि ना असे ॥ २९ ॥
मोक्षमार्गास दाता तू पुरुषार्थस्वरूप तू ।
प्रसन्न जाहला आम्हा याहुनी काय ते हवे ॥ ३० ॥
तरीही इच्छितो कांही परेशा ! अंत ना तुला ।
म्हणोनी वदती सारे अनंत नाम ठेउनी ॥ ३१ ॥
कल्पवृक्षचि भृंगाला लाभता नच तो भ्रमे ।
तैसे या चरणी येतो मागावे काय ते तुला ॥ ३२ ॥
आत्तापर्यंत आम्ही तो मायेने भ्रमलो सदा ।
जोवरी जन्मणे आहे तोवरी संतसंग द्या ॥ ३३ ॥
क्षणाच्या संतसंगाने मोक्षही तुच्छ वाटतो ।
तरी त्या भोग भोगाची गोष्ट ती मुळिही नसे ॥ ३४ ॥
भक्तांच्या संगती मध्ये मधूर गोष्टि त्या तुझ्या ।
ऐकता भोग हो शांत उद्वेग वैर ना उरे ॥ ३५ ॥
कथेने चांगले चित्त निष्काम भाव ठेउनी ।
श्री नारायण देवाचे नित्य किर्तन ते घडे ॥ ३६ ॥
पवित्र करण्या तीर्था साधू ते पायि चालती ।
भवाचे भय ज्या जीवा सत्संग नावडेल का ॥ ३७ ॥
(इंद्रवज्रा)
तुझा सखा तो हर भेटताची
साक्षात् तुझे दर्शन लाभले हे ।
तू वैद्य मोठा भवरोगि यासी
म्हणोनि आलो तव या पदासी ॥ ३८ ॥
त्यागोनि अन्नादिक त्या जलाला
हे दीर्घकाली तप आचरीले ।
हे सर्व होवो तवची प्रसन्ना
हा एकची तो वर दे अम्हाला ॥ ३९ ॥
स्वामी तुझा थांग न ब्रह्मजीला
हरांहि नाही म्हणुनी स्तवीती ।
त्या शुद्ध चित्ते स्तुति गाति सर्व
गातो यथा बुद्धि तुझ्या यशाते ॥ ४० ॥
(अनुष्टुप्)
नमो समान शुद्धाला श्रेष्ठ या पुरुषास नी ।
सत्व तू वासुदेवा रे भगवंता नमो नमः ॥ ४१ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
अशी प्रचेत्ये स्तुति गायिली नी
तथास्तु बोले हरि तो प्रसन्ने ।
मधूरमूर्ती बघता न तृप्ती
न सोडिता तो मग गुप्त झाला ॥ ४३ ॥
(अनुष्टुप्)
प्रचेत्ये भूमिसी येता पाहिली वृक्ष अंकिता ।
स्वर्गाच्या आड जे आले कोपले ते तरुंवरी ॥ ४४ ॥
पृथ्वीस वृक्ष वेलिंच्या रहीत करण्या तयें ।
मुखीचा सोडिला अग्नी पाठीसी वायु सोडिला ॥ ४५ ॥
जळती वृक्ष ते सारे ब्रह्म्याने पाहिले तदा ।
युक्तीने बर्हिपुत्रांना शांत केले कसे तरी ॥ ४६ ॥
पुन्हा जे वाचले वृक्ष तयांनी ब्रह्मजी पुढे ।
कन्या ती त्या प्रचेत्यांना दिधली वरण्या तदा ॥ ४७ ॥
आज्ञेने ब्रह्मजीच्या त्या मारिषा वरिली तये ।
जन्मला दक्ष त्यां पोटी शिवाचा मृत सासरा ॥ ४८ ॥
ह्याचि दक्षे प्रजा सर्व चाक्षुषी निर्मिली असे ।
पूर्वसर्गा मधे झाली नष्ट मानव जात जी ॥ ४९ ॥
जन्मता कांतिमानाचे तेज येणे हरीयले ।
कर्मात बहु हा दक्ष म्हणोनी नाम दक्ष यां ॥ ५० ॥
प्रजारक्षार्थ ब्रह्म्याने प्रजापतिस नायक ।
म्हणोनी स्थापिले याला याने त्या मरिच्यादिका ॥ ५१ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसावा अध्याय हा ॥ ४ ॥ ३० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|