समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २७ वा

पुरंजनपुरीवर प्रचंड चढाई, कालकन्येचे चरित्र -

नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
यापरी सुंदरी कैक नखरे करुनी तदा ।
पुरंजनास मोहूनी आनंदी करि ही तशी ॥ १ ॥
करोनी मंगलस्नान शृंगार करुनी बहू ।
भोजनें तृप्तही झाली नृपाने महिषीस त्या ॥
प्रसन्न पाहुनी केले अभिनंदन ही तदा ॥ २ ॥
(इंद्रवज्रा)
आलिंगिले त्या द्वयि एकमेका
    एकांति शब्दे गुज बोलले नी ।
त्या कामिनीसी मन लाउनीया
    गेला बहू तो दिन रात्र काल ॥ ३ ॥
मदे भरोनीच प्रियाभुजासी
    टेकून डोकेच पडून राही ।
तो मानि तेची फळ श्रेष्ठ विश्वी
    अज्ञो न जाणी स्वय नी प्रभूला ॥ ४ ॥
(अनुष्टुप्‌)
नृपा रे ! या परी राजा कामातूरचि हो‌उनी ।
विहार करिता नित्य क्षणवत्‌ आयु संपली ॥ ५ ॥
त्या पुरंज पुरंजीसी बाराशे पुत्र नी तशा ।
जाहल्या शत कन्या ज्या सुशिला गुणग्राहिका ॥ ६ ॥
नामे पौरंजनी ख्याता जगती जाहल्या पुढे ।
जाहली आयु आर्धी त्या राजाची दीर्घ हो जरी ॥ ७ ॥
पांचालपतिने त्यांना वंशवृद्ध्यर्थ शोधुनी ।
पुत्रांचे थाटिले लग्न कन्यांचे योग्य त्या परी ॥ ८ ॥
शत त्या प्रतिपुत्रांना जाहली ती मुले पुढे ।
वंश तो वाढुनी गेला पांचालदेश व्यापला ॥ ९ ॥
पुत्र पौत्र तसे कोश गृह सेवक मंत्रि या ।
सर्वात जडता प्रेम विषयी बद्धला पुन्हा ॥ १० ॥
तुमच्या परिही त्याने कामना इच्छुनी मनी ।
दीक्षीत हो‌उनी केले यज्ञ ते पशु मारिता ॥ ११ ॥
खरे कल्याण सोडोनी कुटुंबी व्यस्त राहिला ।
वृद्धापकाळ ही आला न रुचे लंपटा कधी ॥ १२ ॥
चंडिवेग अशा नामे गंधर्वराज तो असे ।
बलीष्ठ तीनशेसाठ गंधर्व आधिनी तया ॥ १३ ॥
पुरंजनास आनंदी करी तैसीच मोहवी ।
मिथुनी भाव ठेवोनी तेवढ्या कृष्णश्वेत त्या ।
गंधर्व्या पाळिपाळीने विलास लुटिती सदा ॥ १४ ॥
चंडिवेगानुचारीं ते लुटण्या सिद्ध जाहले ।
पुरंजन पुराच्या त्या सापाने रोधिले तयां ॥ १५ ॥
बलवान्‌ सर्प तो तेंव्हा लढला एकटा पहा ।
बलवान्‌ सातशेवीस लोकांच्या सह नित्य ही ॥ १६ ॥
लढता क्षीण तो झाला राजाने पाहिले तया ।
राष्ट्र नी नगरीच्यांना चिंता ती बहु लागली ॥ १७ ॥
कर घेवोनि पांचाळ देशिचा भोग भोगिता ।
स्त्रियांसी रमता त्याला भय ते नाठवे मुळी ॥ १८ ॥
बर्हिष्मन्‌ ! या दिना माजी काळकन्या वरार्थची ।
फिरली ती त्रिलोकात न वरी कोणिही तिला ॥ १९ ॥
लोक त्या भाग्यहीनेला दुर्भागी बोलु लागले ।
तुष्टली एकदाची ती पुरुला राज्यही दिले ॥ २० ॥
ब्रह्मलोकातुनी येता एकदा मज भेटली ।
ब्रह्मचारी असोनीया इच्छिले मजला तिने ॥ २१ ॥
प्रार्थना नच मी मानी तेंव्हा ती कोपुनी मला ।
शाप हा वदली बोले एक जागी न थांबसी ॥ २२ ॥
निराश जाहली कन्या मजला पुसुनी तिने ।
भय हा यवनोराजा तयासी वरिले असे ॥ २३ ॥
म्हणाली यवनीश्रेष्ठा करिते प्रेम मी तुम्हा ।
तुम्ही जे आणिता चित्ती न ते व्यर्थ कधीच हो ॥ २४ ॥
सत्‌पात्री दान ना देती न घेती योग्य दान जे ।
दोघेही मूढ ते होती शोचनीय असेच की ॥ २५ ॥
भद्रा ! या समयी मी तो सेवेत पातले तुझ्या ।
स्वीकारी धर्म हा आहे पौरुषकारणे दया ॥ २६ ॥
ऐकुनी काळकन्येचे गुप्त जे विधि कार्य ते ।
इच्छोनी यवनी राजा हांसोनी बोलला तिला ॥ २७ ॥
पाहिले योगदृष्टीने पती तू मज योजिला ।
अनिष्ट करिसी तू तै म्हणोनी कुणि ना वरी ॥ २८ ॥
कर्म ना जाणती त्यांना बळाने भोग तू करी ।
माझी सेनाहि तू नेई कोणी ना हरवू शके ॥ २९ ॥
प्रज्वार बंधु हा माझा तू माझी भगिनीच हो ।
अव्यक्त रुप घेवोनी गतीने सृष्टि ही फिरु ॥ ३० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्ताविसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP