समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २६ वा

राजा पुरंजन शिकारीस जातो राणी कोपित होते -

नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
पुरंजन एकदा तो धनुष्य कवचा सह ।
पंचाश्व रथि बैसोनी पंचप्रस्थात पातला ॥
सवे सेनाधिपो घेता अकरावाहि सोबती ॥ १ ॥
रथास दोन दांड्या नी दोन चाक नि आख तो ।
सारथी, सारथीस्थान ध्वजदंडहि शोभला ॥ २ ॥
दोन जू आयुधे पाच सात आच्छादने तया ।
चाले तो पाच चालिंनी सजला बहु सुंदर ॥ ३ ॥
प्रियेसी क्षणही एक सोडण्या बहु दुष्कर ।
परंतु मृगया छंदे गर्वे त्यागोनि चालला ॥
धनुष्या लाउनी बाण मृगया करु लागला ॥ ४ ॥
वाढली असुरीवृत्ती कठोर जाहला मनीं ।
कैक निर्दोष प्राण्यांना तीराने वधिले तये ॥ ५ ॥
मोठी आसक्ति ज्या मांसी अनिषिद्ध पशू असे ।
शास्त्र कर्मास अर्पाया राजाने वधिने तयां ॥
थांबण्या खोड वृत्तीची सीमा शास्त्रेचि घातली ॥ ६ ॥
राजा विद्वान जो ऐसा कर्माने वागतो तया ।
ज्ञानाच्याकरणीभूत लिंपे ना कर्म त्यास ते ॥ ७ ॥
ना तो वाटेल ते तैसे गर्वाने कर्म बंधनी ।
पडतो नासते बुद्धी क्षुद्र योनीस जन्मतो ॥ ८ ॥
तीक्ष्ण बाणे तदा जीव कष्टाने मरु लागले ।
दयाळू व्यक्ति पाहोनी बहू दुःखीत जाहल्या ॥ ९ ॥
डुकरे नीलगायी नी रेडे नी मृग आदि ते ।
बहूत वध तो होता थकलासे पुरंजन ॥ १० ॥
भुकेने व्याकुळ झाला लोटला राजमंदिरी ।
स्नान भोजन विश्रांती तयाने घेतली असे ॥ ११ ॥
गंध चंदननी माळा दागिने लेयिले तसे ।
तेंव्हा त्यास मना मध्ये स्मरली आपुली प्रिया ॥ १२ ॥
तृप्त मोदे मदोन्मत्ते कामाने पीडिता मनी ।
सुंदरी शोधिली भार्या परी ना दिसली कुठे ॥ १३ ॥
अंतःपुरात स्त्रीयांना पुसले सुंदर्‍या ! अहो ।
तुमची स्वामिनी क्षेम आहे ना पाहिजे तशी ॥ १४ ॥
संपत्ति जाणवे क्षीण घरात पत्‍नि ना तदा ।
चाकाविना रथा ऐसा कोण सूबुद्ध राहतो ॥ १५ ॥
कुठे ती सुंदरी सांगा बुडता दुःख सागरी ।
काढिता वरती आम्हा निवारी संकटा मम ॥ १६ ॥
स्त्रिया (दास्या) म्हणाल्या -
नरनाथा ! न जाणोत तिच्या ते काय जे मनी ।
शत्रुघ्ना ! पाहि ती भूसी शय्येच्या विण झोपली ॥ १७ ॥
नारदजी सांगतात -
स्त्रीयेच्या संग योगाने राजाची बुद्धि नासली ।
अस्ताव्यस्त तिला पाही तेणे व्याकूळ जाहला ॥ १८ ॥
बोलला गोड शब्दाने तैसेची समजाविले ।
परी त्या प्रेयसीअंगी प्रणयो कोपला नसे ॥ १९ ॥
समजावुनि तै बोले घेवोनी उदरासही ।
पायासी स्पर्शिले तैसे बोलला प्रेम बोल हे ॥ २० ॥
पुरंजन म्हणाला -
सुंदरी ते अभागीच दास मोठे हि निश्चये ।
कां की स्वामी तया ना दे प्रमादीं दंड योग्य तो ॥ २१ ॥
स्वामीचा दंड तो भृत्या उपदेश ठरे पहा ।
मूर्ख भृत्यचि क्रोधाने न जाणी उपकार ते ॥ २२ ॥
(वसंततिलका)
दंतावली सुघड नी भुवया सुरेख
    सोडोनि क्रोध बघ तू मज लाजुनीया ।
दाखीव ते प्रणयभार मुखारविंदी
    वाणी नि केश सुघड नाक मनास मोही ॥ २३ ॥
वीरांगने कुणिहि तो अपराध केला
    मी ठार त्यास करितो जर विप्र ना तो ।
भक्ता शिवाय हरिच्या कुणि ना सुखाने
    होवोनि चूक तरि ही जगि हर्ष मानी ॥ २४ ॥
मी ना कधी तिलकवर्जित देखियेले
    या कांतिहीन अन म्लान तुझ्या मुखाला ।
शोकश्रु हे भिजविती तव या स्तनाते
    बिंबाधरास पडली फिकि लालिमाही ॥ २५ ॥
मी छंदवश्य मृगया करण्या रिघलो
    मी ना पुसे तरि असा अपराध झाला ।
होई प्रसन्न तुज आधिन कामदेव
    ना स्त्री कुणीहि जगती पतिहीत त्यागी ॥ २६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सव्विसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP