समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय २५ वा
पुरंजनउपाख्यान आरंभ -
मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
या परी त्या प्रचेत्यांना शंकरे उपदेशिले ।
शिवाला पूजिता त्यांनी समक्ष गुप्त जाहला ॥ १ ॥
दहाहजार वर्षे ते प्रचेत्यें तप साधिले ।
उभे जळात राहोनी योगादेशचि जापिले ॥ २ ॥
या दिनीं कर्मकांडात रमला बर्हि तो बहू ।
कृपाळू नारदे त्याला तत्वज्ञान प्रबोधिले ॥ ३ ॥
बोलले सर्व कर्माने काय कल्याण साधिसी ।
परमानंद नी दुःखनाशी कल्याण ते असे ॥ ४ ॥
महाराज प्राचीन बर्हि म्हणाले -
न जाणी मी महाभाग बुद्धी कर्मात गुंतली ।
सांगा शुद्ध असे ज्ञान कर्मबंधन तोडण्या ॥ ५ ॥
पुत्र दारा धनामध्ये पुरुषार्थचि मानुनी ।
अज्ञानी वागती त्यांना कधी कल्याण ना मिळे ॥ ६ ॥
नारदजी म्हणाले -
प्रजापते ! पहा पाहा निर्दये पशुचे बळी ।
यज्ञात दिधले तू ते आकाशी पाहि पाहि रे ॥ ७ ॥
तुम्ही जो दिधला त्रास मनासी आठवोनिया
क्रोधोनी तीक्ष्ण शिंगे ती वाट सूडार्थ पाहती ।
मरणोत्तर ते शिंगे तुलाच छेदतील की ॥ ८ ॥
इथे या विषयी एक प्राचीन गोष्ट सांगतो ।
पुरंजन चरित्राते स्वस्थचित्तेचि ऐकणे ॥ ९ ॥
राजा रे पूर्वकाळात नामे पुरंजनो नृप ।
मित्र त्याचा अविज्ञात ज्याचे कार्य अगाधची ॥ १० ॥
पुरंजन रहायासी फिरला सगळी धरा ।
न योग्य लाभता स्थान उदास जाहला तदा ॥ ११ ॥
भोगांची लालसा मोठी पूर एकहि या जगीं ।
वाटले नच की त्यासी रम्य ते राहण्यास हो ॥ १२ ॥
एकदा नउ द्वाराची या भारतभूमधे ।
नगरी दिसली त्याला त्या हिमाचल दक्षिणीं ।
शिखरी सर्व संपन्न सर्वलक्षणयुक्त ती ॥ १३ ॥
तटबंदी सभोवर तोरणे बगिचे नि त्या ।
खिडक्या राजद्वारांची शोभा ती वेगळीच की ।
लोह चांदी नि सोन्यांची शिखरे मंदिरे बहू ॥ १४ ॥
स्फटिक नील वैडुर्य पन्ने मोती नि लालच्या ।
तेथील फरशा होत्या जशी भोगावती पुरी ॥ १५ ॥
सभागृहे तसे चौक क्रीडाभवन मार्ग ते ।
विश्रामस्थान बाजार मनोरे सजले किती ॥ १६ ॥
दिव्य वृक्ष लता यांची बाहेर बाग शोभली ।
मध्ये एक तळे रम्य पक्षी भुंगेहि गात तै ॥ १७ ॥
तटासी शोभले वृक्ष वासंतीवायु वाहता ।
हलती रम्य त्या फांद्या तटीं शोभाच वाढली ॥ १८ ॥
पशू जे हिंस्त्र त्यांनी ही हिंसा त्यजुनि राहिले ।
कोकिळा कुंजती नित्य विश्रामा बाहती जणू ॥ १९ ॥
अकस्मात् दिसली तेथे राजासी एक सुंदरी ।
दहा सेवक सेवेला सहस्त्र नायकीनिही ॥ २० ॥
द्वारपाल तिथे पाच फड्यांचा साप रक्षणी ।
किशोर भोळिभाळी ती पती इच्छूनि पाहि जी ॥ २१ ॥
नासिका दंतपंक्ती नी कपाळ मुख सुंदर ।
हालती कर्णि ते छान समान कुंडले तशी ॥ २२॥
कटी मोहक नी छान सावळा रंग शोभला ।
साडी ती पिवळी चाळझंकार चालता निघे ॥ २३॥
तारुण्य दाविती गोल स्तन ते घट्ट ते तिचे ।
उघडे पडता झाकी बाला ती गजगामिनी ॥ २४॥
कामेच्छें आवळी बाहू तिरक्या दृष्टिच्या तिरें ।
घायाळ जाहला राजा हासोनी गोड बोलला ॥ २५॥
मला गे सांग तू कोण कमलपत्रलोचने ।
कोणाची पुत्रि तू साध्वी ! कोठोनी पातली भिरु ?
पुराच्या समिपी काय करणे इच्छिसी मनीं ॥ २६॥
सुभ्रू ! हे कोण गे वीर सेवेसी आणिले सवे ।
मैत्रिणी आणि हा साप चालतो कोण तो पुढे ॥ २७॥
(इंद्रवज्रा)
लक्ष्मी उमा की कुणि ब्राह्मणी तू
कंजो कुठे ते जर ती रमा तू ।
एकांती कोणा वनि शोधिसी तू
इच्छोनि ज्याला मन तृप्त होते ॥ २८॥
हे स्पर्शिले पाय भुमीस तेंव्हा
तू मानवी तो मजला सवे घे ।
विष्णू रमेच्या परि राहु दोघे
मी श्रेष्ठ पाही बहु वीर आहे ॥ २९॥
तुझा रतीभाव नि बाहुवेग
पाहूनिया मी मनि दंग झालो ।
त्या कामदेवे पिडीलो असा मी
हे सुंदरी पाहि कृपे मला तू ॥ ३०॥
शुचिस्मिते बाहु सुरेख नेत्रे
मुखारविंदी कचभार शोभे ।
नी गोड शब्दे हरिले मला तू
न लाजता पाहि मला स्वनेत्रे ॥ ३१ ॥
नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्)
अधीर होउनी ऐसी याचिता त्या पुरंजने ।
मोहीत जाहली तीही संकेत हासुनी दिला ॥ ३२ ॥
वदली नर श्रेष्ठा रे न मी जाणी कुणासही ।
माझे नी पितरांचे नी कुळाचे नामही तसे ॥ ३३ ॥
वीरा रे सगळे आम्ही आज तो येथ राहतो ।
या विना नच ते ठावे पूर हे रचिले कुणी ॥ ३४ ॥
प्रिया पुरुष हे मित्र आणि या सखया अशा ।
जेंव्हा मी झोपतो तेंव्हा सर्प हा रक्षितो पुरा ॥ ३५ ॥
शत्रुघ्ना पातसी येथे सौभाग्य मम केवढे ।
इच्छिसि मनि जे भोग आम्ही ते देउ सर्वची ॥ ३६ ॥
प्रभो या नव द्वारांच्या पुरीचे सर्व भोग ते ।
देते मी तुजला येथे शेकडो वर्ष राहि की ॥ ३७ ॥
तुला मी सोडुनी आता कोणाच्या सोबती रमू
दुसर्या सर्व या लोका न कळे रतिसौख्य ते ।
न काळज्ञान ही त्यांना पशूतुल्यचि सर्व हे ॥ ३८ ॥
मृत्युलोकात या धर्म अर्थ काम नि मोक्ष तो ।
संतान यशही लाभे यतींना नच हे कळे ॥ ३९ ॥
वदती संत ते थोर पितरे देव नी ऋषी ।
मनुष्य सर्व प्राण्यांचा गृहस्थाश्रम धन्य हा ॥ ४० ॥
वीरा जगात ती कोण माझिया परि सुंदरी ।
तुमच्या सारखा चांग पतीसी नच का वरी ॥ ४१ ॥
(इंद्रवज्रा)
विशालबाहो तव बाहुमध्ये
ना कोणती स्त्री पृथिवीवरी या ।
विसावयाला नच लालचावे
तू हासुनी शांतविसी मनाला ॥ ४२ ॥
नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्)
राजा रे यापरी दोघे दोघांचे शब्द मानिले ।
या परी शतवर्षे ते रमले भोग भोगिता ॥ ४३ ॥
सर्वत्र गायिली गीते गायके कीर्ति मानुनी ।
ग्रीष्मीं तळ्यात तो पोहे स्त्रीया घेवोनी कैक त्या ॥ ४४ ॥
नगरां सात ते द्वार वरी नी खालती द्वय ।
विवीध देशि जाण्याते परी ना नृप तै कुणी ॥ ४५ ॥
पूर्वेस पाच ते द्वार एकेक दक्षिणोत्तरी ।
पच्छिमेसहि ते दोन तयांचे नाम सांगतो ॥ ४६ ॥
आयुर्मुखी नि खद्योत एकाच ठायि निर्मिले ।
विभ्राजित् देशि तो जाई द्युमान् मित्रासवे नृप ॥ ४७ ॥
नालिनी नलिनी द्वार या परी एक ठायिची ।
अवधूता सवे जाई राजा सौरभ देशिला ॥ ४८ ॥
पूर्वमूख्या असे द्वार रमज्ञा विपणा सवे ।
जाई बहुदनी देशी क्रमाने तो पुरंजन ॥ ४९ ॥
दक्षीणद्वार पितृहू श्रुतधारा सवे तसे ।
पांचाल दक्षिणी देशी पुरंज नृप जातसे ॥ ५० ॥
उत्तरी देवहू द्वार तेथुनी ही श्रुतोधरा ।
सवेचि जाइ तो राजा पांचाल देशि उत्तर ॥ ५१ ॥
आसुरी पश्चिमी द्वार दुर्मदा सोबती तसा ।
ग्रामको देशि तो जाई स्वये होवोनि त्यातुनी ॥ ५२ ॥
निर्ऋती पश्चिमी द्वार दुसरे त्यातुनी नृप ।
लुब्धकासह तो जाई वैशसो नाम देशिला ॥ ५३ ॥
निवाक पेशकृत् दोघे निवासी अंध तेथले ।
तयांचे मानुनी सर्व डोळसो राज्य तै करी ॥ ५४ ॥
अंतःपुरात तो जाई विषूचीना सवे तदा ।
स्त्री पुत्र मोह त्या होई हर्षादींचे विकारही ॥ ५५ ॥
कर्मात फसले चित्त दैवाने रमणीत तो ।
फसला करि जे राणी कर्म ते तोहि आचरी ॥ ५६ ॥
तिने ते प्राशिता मद्य झिंगे प्राशूनि हा तसा ।
जेविता जेवि हा आणि चघळी वस्तु हा तसा ॥ ५७ ॥
गाण्यात जुळवी गाणे रडण्यात रडे हि तो ।
मिसळी हास्य हास्यात बोलता शब्द मेळवी ॥ ५८ ॥
पळता पळु हा लागे थांबता हाहि थांबतो ।
झोपता सोबती झोपे बैसता हाहि बैसतो ॥ ५९ ॥
ऐकता हाहि ते ऐके पाहता पाहु लागला ।
सुंगिता सुंगि हा ही नी स्पर्शिता हाहि स्पर्शि ते ॥ ६० ॥
शोकाकुल प्रिया होता व्याकूळ होइ हा तसा ।
प्रसन्न हो प्रसन्नोची मोदाने मोदिं हा भरे ॥ ६१ ॥
सुंदरी राणिच्या द्वारा या परी फसला नृप ।
विवशो होउनी वागे पाळल्या माकडापरी ॥ ६२ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचविसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|