समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २४ वा

पृथुची वंशपरंपरा प्रचेत्यांना भगवान रुद्राचा उपदेश -

मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
विजिताश्व पृथूपुत्र पुन्हा तो नृप जाहला ।
बंधु प्रेमे तये चार दिशांना राज्य त्यां दिले ॥ १ ॥
हर्यक्षा पूर्व नी धूम्रकेशीला दक्षिणेस नी ।
वृकपाला पश्चिमेसी द्रविणा उत्तरेस ते ॥ २ ॥
अंतर्धान गती त्याने इंद्राकडुनि घेतली ।
शिखंडिनी तया पत्‍नी तीन पुत्र तिला असे ॥ ३ ॥
पावको पवमानो नी शुचि हे नाम त्यांचिये
वसिष्ठे शापिल्यानेच जन्मले अग्नि हे तिघे ।
पुढे ते योग मार्गाने अग्निरुपचि जाहले ॥ ४ ॥
दुजी नभस्वती हीस हविर्धान्‌ पुत्र जाहला ।
उदार त्या हविर्धाने पूर्वी शक्रा न मारिले ॥ ५ ॥
कर दंड वसुलीच्या कर्तव्यी राज्य योजुनी ।
दीर्घ यज्ञात दिक्षीत राहण्या राज्य त्यागिले ॥ ६ ॥
यज्ञाने ज्ञान त्यां झाले स्वभक्त भयभंजक ।
श्रीहरीभक्तिध्यानाने दिव्यलोकहि लाभला ॥ ७ ॥
हविर्धानी हिच्या पोटी हविर्धानासि ते सहा ।
जाहले पुत्र हे ऐसे नावे ऐसी सहांचि ही ॥ ८ ॥
विदुरा तो हविर्धानपुत्रो श्रेष्ठचि बर्हिषद्‌ ।
कुशलो कर्मकांडात झाला योगी प्रजापती ॥ ९ ॥
स्थळ ते बदलोनीया एकापाठोनि एक ते ।
एवढे यज्ञ ते झाले कुशाने झाकिली धरा ॥ १० ॥
ब्रह्माजीच्याच इच्छेने बर्हि ते शतदृतिला
वरिली सागरी कन्या सर्वांगसुंदरी अशी ।
सप्तपदीसमयासी अग्निही मोहिला तदा
जसा तो शुकिच्या मोही मोहनी इच्छु लागला ॥ ११ ॥
शतदृती नवरीने नुपूरे झनकारिता ।
असूर देवता सिद्ध गंधर्व मुनि नाग ही ॥
आणि त्या सर्व लोकांना करोनी वश घेतले ॥ १२ ॥
गर्भीं शतदृतीच्या त्या प्राचीनबर्हिसी दहा ।
पुत्र धार्मिक ते झाले एकाच्याहून एकही ॥ १३ ॥
संतान निर्मिण्या त्यांना बोलला बर्हि त्यांजला ।
समुद्रीं रिघले सर्व तपस्या घोर योजुनी ॥ १४ ॥
तपस्यार्थ घरातूनी निघता श्री शिवे तयां ।
कृपेने बोधिले तैसे पूजिला हरि तो तये ॥ १५ ॥
विदुरजी विचारले -
द्विजजी ! शिव तो मार्गी प्रचेत्यां भेटला कसा ।
भेटता बोलला काय सार युक्तचि सांगणे ॥ १६ ॥
ब्रह्मर्षे मानवालागी शिवभेट कठीण की ।
आसक्ती सोडुनी योगी ध्याता ही ते न भेटती ॥ १७ ॥
आत्माराम शिव जरी स्वार्थ त्यां नच कांहिही ।
लोकरक्षार्थ तो हिंडे शक्तीच्या सह नित्य की ॥ १८ ॥
मैत्रेयजी सांगतात -
प्रचेतागण ते साधू पित्राज्ञा शिरि वंदुनी ।
तपासी लावुनी चित्त गेले ते पश्चिमेकडे ॥ १९ ॥
सागरापरि ते थोर वाटेमाजी सरोवर ।
दिसले शुद्ध जै संत मत्स्यादी तेथ नांदती ॥ २० ॥
निळे नी लाल ते कंज तेथे नित्यचि शोभले ।
तटी सारस नी हंस अन्यान्य पक्षि राहती ॥ २१ ॥
चौदिशीं वृक्ष वेली नी भुंगे ते गुंजती तया
रोमांच उठती अंगी उत्सवापरि तेधवा ।
वायुच्या संगती वाहे परागपुंज पद्मिंचा ॥ २२ ॥
मृदंग पणवादींचा ध्वनी मंजुळ ऐकता ।
संथ त्या रागदारीने हर्षले राजपुत्र तै ॥ २३ ॥
तदाचि त्या तळ्यातून शंकरो सेवकांसह ।
येताना पाहिला त्यांनी कांतिमान्‌ स्वर्णराशि जै ॥ २४ ॥
नीलकंठ विशालाक्ष उद्यतो उपदेशिण्या ।
गंधर्व गाति त्या गाणी प्रचेत्ये नमिला शिव ॥ २५ ॥
धर्मवत्सल त्या देवे प्रसन्न हो‌उनी तदा
धर्मज्ञ शीलसंपन्न राजपुत्रासि बोधिले ॥ २६ ॥
महादेवजी म्हणाले -
प्राचीनबर्हिपुत्रांनो तुमचे क्षेम हो सदा ।
आपुले जाणि मी कार्य त्यामुळे भेटलो तुम्हा ॥ २७ ॥
व्यक्ती जो वासुदेवास प्रत्यक्ष शरणार्थ ये ।
मला तो प्रियची श्रेष्ठ असा भक्त मनातुनी ॥ २८ ॥
(इंद्रवज्रा)
स्वधर्म निष्ठीं शतजन्म होता
    ब्रह्माजिचे क्षेत्र मिळे परंतु ।
अधीक होता जर पुण्य गाठीं
    तेंव्हाचि तो ये मज पादतीर्थी ।
परंतु विष्णू मनि जो भजे तो
    वैकुंठधामा नर थेट जातो ।
जे धाम अस्मादिक देवातांना
    विभूति त्यागाविण ते मिळेना ॥ २९ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
तुम्ही तो भगवद्‍भक्त मला प्रीय हरीपरी ।
तसे तुम्हासिही प्रीय नसे माझ्याहुनी कुणी ॥ ३० ॥
पवित्र स्तोत्र मी एक आता तुम्हासि सांगतो ।
कल्याणप्रद जे नित्य श्रद्धेने जापणे तुम्ही ॥ ३१ ॥
तेंव्हा कारुण्य सिंधूने हरिभक्त अशा शिवे ।
गायिले स्तोत्र ते तेंव्हा प्रचेत्यां ऐकवीयण्या ॥ ३२
भगवान रुद्र म्हणाले -
ज्ञान्यांचे स्वति साधाया उत्कर्ष तुमचा असे ।
स्वरुपी रमता तुम्ही होवो कल्याण ते मम ॥
तुम्ही सर्वात्मको तैसे आत्मरुपी तुम्हा नमो ॥ ३३ ॥
नमो पंकजनाभाला भूतसूक्ष्मेंद्रियात्मला ।
वासुदेवास शांतास कूटस्थासीं नमो नमो ॥ ३४ ॥
संकर्षणास सूक्ष्मास नी दुरंतांतकासही ।
नमो विश्वप्रबोधासी प्रद्युम्ना अंतरात्म तू ॥ ३५ ॥
नमो श्रीअनिरुद्धाला ह्रषीकेशेंद्रियात्मला ।
नमो परमहंसाला पूर्ण तू वृद्धि ना क्षय ॥ ३६ ॥
स्वर्गापवर्गद्वारा तू राहसी शुद्धचित्ति तू ।
नमो हिरण्यवीर्यासी चातुर्होत्रहि तूच की ॥ ३७ ॥
वेदांचा तू अधिष्ठाता सोम तू तुजला नमो ।
सर्वजीवतृप्तरसा नमस्ते आपणा पुन्हा ॥ ३८ ॥
सर्वांचे देह नी पृथ्वी विराटरूपही तुझे ।
नमो त्रिलोकपालाला सह ओज बळास की ॥ ३९ ॥
अर्थ लिंगास नभ तू नमोऽन्तर्बहिरात्मला ।
नमोजी पुण्यवान लोका नमस्ते हो पुनःपुन्हा ॥ ४० ॥
प्रवृत्ती नी निवृत्ती हे कर्मही पितृदेवचे ।
अधर्म दुःखदामृत्यु तूच की तुजला नमो ॥ ४१ ॥
नमस्ते वरदाईशा कामनापूर्ति कारणा ।
श्री कृष्णा सर्व धर्मा तू बुद्धीचा पार ना तुझ्या ॥
पुराण पुरुषा सांख्ययोगेश्वर तुला नमो ॥ ४२ ॥
कर्ता कारण नी कार्य या त्रया तूचि आश्रय ।
रुद्र तू वाणीचा ईश नमस्कार तुला असो ॥ ४३ ॥
दर्शना इच्छितो मी तो स्वभक्तप्रीय हो तुम्ही ।
दाखवा निजस्वरुपाला इंद्रिया तृप्त जे करी ॥ ४४ ॥
स्निग्धवर्ण घनश्याम सर्वसौंदर्यसंग्रह ।
विशाल चार या बाहू सुजातरुचिरानन ॥ ४५ ॥
पद्‌कोशापरी नेत्र सुंदरभ्रू सुनासिका ।
सुदंत तैचि ते गाल समकर्ण विभूषणे ॥ ४६ ॥
प्रीतिहास्य स्मित दृष्टी कुरुळे कृष्णकेस ते ।
पद्मपरागसे वस्त्र कुंडले चम्‌चमाटती ॥ ४७ ॥
किरीट झळके तैसी विचित्र भूषणे करी ।
शंखचक्रगदापद्म कंठी वन्‌माळ कैस्तुभ ॥ ४८ ॥
सिंहाच्यापरी ते स्कंध कौस्तुभे मान शोभली ।
श्रीचिन्ह श्यामवक्षासी कासोट्याहुनि सुंदर ॥ ४९ ॥
पिप्पलोपर्ण तै पोट श्वासे हलुनि मोहिते ।
भोवर्‍यापरि ती नाभी लीन ज्यां विश्व होतसे ॥ ५० ॥
कटी पितांबरो शोभे सोन्याची मेखळा तशी ।
सुडौल पिंढर्‍या पाय मांड्या नी गुडघे तसे ॥ ५१ ॥
(इंद्रवज्रा)
ते पाय पद्मासहि लाजवीती
    नखप्रकाशे तम घोर नाशे ।
कृपा करा नी निजरूप दावा
    तुम्हीच आम्हा गुरु ज्ञान देण्या ॥ ५२ ॥
(अनुष्टुप्‌)
प्रभूजी ! चित्तशुद्ध्यर्थ करावे तव ध्यान हे ।
हीच भक्ती स्वधर्म्यांना अभयो नित्य देतसे ॥ ५३ ॥
इंद्रही स्वर्गशास्ता तो इच्छितो भक्ति आपुली ।
दुर्लभो आपुली भेटी भक्त ती नित्य इच्छि ती ॥ ५४ ॥
अनन्य भक्तिने विष्णू प्रसन्न जाहल्यावरी ।
शहाणा कोण तो ऐसा दुसर्‍या वस्तु इच्छि जो ॥ ५५ ॥
भोवईच्या तव खुणे काळ संहारितो जगा ।
तुझ्या जे चरणी लीन त्यांना तो कधि स्पर्शिना ॥ ५६ ॥
अशा त्या तव भक्तांची क्षणार्थ भेट झालिया ।
स्वर्ग मोक्षहि त्या तुच्छ पृथ्विचे भोग काय ते ? ॥ ५७ ॥
(इंद्रवज्रा)
पायी तुझ्या ती जळतात पापे
    त्या गांगतीर्थे तनु शुद्ध होय ।
जे आत बाहेरहि शुद्ध झाले
    त्यांचा सदसचा सहवास लाभो ॥ ५८ ॥
जो भक्तिमध्ये रमला सदाचा
    न चित्त त्याचे भटके कुठेही ।
अज्ञानगुंफी कधि ना फसे तो
    अनायसे त्या दिसते स्वरूप ॥ ५९ ॥
(अनुष्टुप्‌)
ज्याच्यात दिसते सृष्टी भास हा सर्व सृष्टिचा ।
विशाल नभ ते तैसा प्रकाशमय ब्रह्म तू ॥ ६० ॥
(इंद्रवज्रा)
माया तुझी ती बहु रुप धारी
    रची नि मोडी जणु पुण्यकर्म ।
तिचा तुला तो मुळी स्पर्श नाही
    स्वतंत्र तूते अम्हि मानितो की ॥ ६१ ॥
भूतेंद्रिया प्रेरक रूप तूझे
    जे कर्मयोगी तव या सगूणी ।
रूपास ध्याती पुजिती सदाचे
    मर्मज्ञ ते वेद नि शास्त्र यांचे ॥ ६२ ॥
तू एक आदी मग सूप्त माया
    तिच्यातुनी तीन गुणास घेसी ।
गुणातुनी जन्मति तत्व सारे
    त्या देवता प्राणि नि सृष्टि सारी ॥ ६३ ॥
चतुर्विधी जीव तया शरीरी
    तू अंशरुपे शिरसी तयात ।
जै मक्षिका सेविति गंध सारा
    तै अंशरुपे सुखदुःख घेसी ॥ ६४ ॥
न गोचरी ते तव तत्वज्ञान
    त्यांना अनूमानिच जाणणे हो ।
तू कालरूपे लिनि सर्व घेसी
    पर्जन्य वायूतचि ध्वंसितोसी ॥ ६५ ॥
हे मूढ प्राणी स्मरती सदाचे
    हे कार्य माझे करि मीच सत्य ।
पै सर्पसा काळ तुझा टपोनी
    विध्वंसितो नी लिनि सर्व घेतो ॥ ६६ ॥
आयू स्वताची मग कोण व्यर्थ
    घाली सुबुद्धो नच भक्ति सेवी ? ।
ती काळ शंका मनि घेउनीया
    मनू नि ब्रह्मा तूज पूजितात ॥ ६७ ॥
(अनुष्टुप्‌)
व्याकूळ जग हे सारे काळ भेणे असे असे ।
जाणता एकला तूची आम्हाला आसरा पहा ॥ ६८ ॥
स्वधर्म आचरोनीया विष्णूस चित्त लाविता ।
जापा हे राजपुत्रांनो विशुद्ध भाव ठेवुनी ।
स्तोत्र हे जापता तोची करील शुभ सर्वची ॥ ६९ ॥
हृदयीं स्थिर तो सर्व भूतात्मी पाहुनी हरी ।
वारंवार स्तवा त्याला पूजिणे चिंतिणे मनी ॥ ७० ॥
योगादेश असे स्तोत्र तुम्हासी कथिले असे ।
राहोनी त्यागवृत्तीने अभ्यासा एकचित्तची ॥ ७१ ॥
स्तोत्र हे पूर्वकाळात जगद्‌विस्तार हेतुने ।
भृग्वादीपुत्र आम्हाला ब्रह्म्याने कथिले असे ॥ ७२ ॥
जेंव्हा आज्ञापिले आम्हा प्रजाविस्तार कारणे ।
अज्ञान नष्टिले स्तोत्रे आणि ही सृष्टि निर्मिली ॥ ७३ ॥
आतही एकचित्ताने भक्त जो नित्य जापितो ।
शीघ्र कल्याण हो त्याचे हरिभक्ती परायणा ॥ ७४ ॥
मोक्षाचे ज्ञान ते श्रेष्ठ कल्याणार्थ त्रिलोकिही ।
बैसता ज्ञाननौकेत सहजी तरणे भवी ॥ ७५ ॥
कठीण वाटता भक्ती तर हे स्तोत्र आवडीं ।
करावा पाठची नित्य सहजी पावतो हरी ॥ ७६ ॥
प्राप्तव्य एक भगवान्‌ कल्याण साधनात तो ।
तैचि मी गायिले स्तोत्र गाता सर्वचि लाभते ॥ ७७ ॥
उषःकाली उठोनीया श्रद्धेने कर जोडुनी ।
ऐकती वाचिती जे त्यां सर्व बंधनि मुक्तिची ॥ ७८ ॥
(इंद्रवज्रा)
मी स्तोत्र जे हे कथिले तुम्हाते
    एकाग्रचित्ते स्मरणे ययाला ।
होता तपस्या मग पूर्ण तेंव्हा
    अभीष्ट लाभे फळ ते तुम्हाला ॥ ७९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चोविसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP