समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २३ वा

पृथुराजाची तपस्या व परलोकगमन -

मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
यापरी पृथुराजाने अन्नादी पूर-ग्रामिच्या ।
व्यवस्था लावुनी सर्व केले धर्मेचि राज्य ते ॥ १ ॥
‘अवस्था ढळली माझी मृत्युलोकात जन्मलो
प्रजेची करुनी रक्षा ईश्वराज्ञाहि पाळिली ।
मोक्षार्थ करणे कांही’ मनासी स्मरता असे ॥ २ ॥
विरहीपृथ्वि पुत्रांच्या सांभाळी घातली असे ।
प्रजेला सोडुनी आला पत्‍नीसह तपोवनी ॥ ३ ॥
वानप्रस्थाश्रमी येथे तपासी घोर लागला ।
पूर्वाश्रमी जसे पृथ्वीविजयाप्रत लागला ॥ ४ ॥
कंदमूळ फलाहार वाळले पर्ण खाउनी ।
पुढे पक्षीं जळा घे नी पुन्हा वायूच भक्षिला ॥ ५ ॥
राहिला मुनिवृत्तीने पंचाग्नी सेवुनी पृथु ।
वृष्टीच्या जलधारा घे आकंठ जलिं तिष्ठला ॥
शय्या ती मृत्तिकेचीच झोपे ओट्यावरीच तो ॥ ६ ॥
शीतोष्ण साहिले आणि ब्रह्मचर्ये नि संयमे ।
प्राणांना बांधिले त्याने केले भक्त्यर्थ ते तप ॥ ७ ॥
तपस्या जाहली पुष्ट कर्माचे फळ नष्टले ।
शुद्धची जाहले चित्त वासना बंध नष्टले ॥ ८ ॥
जशी सनत्कुमाराने दीक्षा ती दिधली असे ।
त्या परी पृथु तो लावी हरीच्या भजनी मन ॥ ९ ॥
सर्वोच्च जाहली भक्ती सदाचारहि जाहला ।
तेणे त्या परब्रह्मात अनन्य भक्ति जाहली ॥ १० ॥
(वसंततिलका)
झाले विशुद्ध मग ते परिकर्म सारे
    वैराग्य ज्ञान मिळले मग भक्तिमध्ये ।
ज्ञानातुनीच मग गर्वहि संपला तो
    जो सर्व आश्रयचि संशय यास ऐसा ॥ ११ ॥
देहत्मबुद्धि हरता हरिरुप झाला
    झाला उदास मग सिद्धहि पाहुनीया ।
ज्ञाने प्रमाद सरतो भ्रम ना सरे तो
    ज्ञानास त्यागि पृथु त्या जयिं भक्ति ना हो ॥ १२ ॥
(अनुष्टुप्‌)
अंतकाळ पुन्हा येता चित्तासी दृढ बांधुनी ।
स्थिराविले हरीमध्ये शरीरा त्यागिले तये ॥ १३ ॥
गुदासी टाच लावोनी मूलाधारा मधोनिया ।
नाभी हृदय वक्षाच्या कंठमार्गेचि मस्तकीं ॥
नेला प्राण हळूवार केला स्थित तिथे पुन्हा ॥ १४ ॥
वरच्या ब्रह्मरंध्रात क्रमाने ठेविला तिथे ।
प्राणवायू समष्टीत शरीरा पृथिवी मधे ॥
समष्टी तेज तेजात केले लीन स्वये तदा ॥ १५ ॥
महाकाशात हृदयो समष्टीं रुधिरा जलीं ।
पुन्हा पृथ्वी जलामध्ये जला तेजामधे तसे ॥
तेजाला वायुमध्ये नी वायु आकाशि ओढिला ॥ १६ ॥
मनाते इंद्रियामध्ये तन्मात्रीं इंद्रियांस त्या ।
आकाशी इंद्रिया आणि अहंकारात व्योम ते ॥
अहंकारा महत्तत्त्वी करोनी लीन घेतले ॥ १७ ॥
मायोपाधी जिवामध्ये सर्वची गुण भाव ते ।
उपाधी ज्ञान वैराग्ये ब्रह्मरूपात त्यागिली ॥ १८ ॥
पृथुपत्‍नी अर्चिरा जी वनात सह सोबती ।
भूमिचा स्पर्श ना पाया अशी ती सुकुमार जी ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
सेवा करी राणि तपात थोर
    खावोनि कंदे अन मूळ तैसे ।
झाली कृशा ती परि होय धन्य
    स्पर्शी पतीला अन मोद पावे ॥ २० ॥
पाही जधी चेतना हीन देहा
    आलाप केला तयि अर्चिरे ने ।
नी पर्वासी रचुनी चिता त्या
    चितेत प्रेता मग ठेवियेले ॥ २१ ॥
करोनि कर्मा मग स्नान केले
    जलांजली ती दिधली पतीला ।
परीक्रमा तीन करोनि अर्ची
    अग्नीत गेली स्मरता पतीला ॥ २२ ॥
(अनुष्टुप्‌)
वीर त्या पृथुची पत्‍नी निघाली सति तेधवा ।
हजारो देवपत्‍न्यांनी स्तविले अर्चिरा हिला ॥ २३ ॥
मंदराचल शिखरी तयांनी पुष्प वाहता ।
वाद्ये वाजविली देवे देवपत्‍न्याहि बोलल्या ॥ २४ ॥
देवी म्हणाल्या -
अहो ! ही धन्य स्त्री आहे पतीभक्तचि ही खरी ।
यज्ञेश्वरास श्री तैसी सेविले पतिसी हिने ॥ २५ ॥
अचिंत्य कर्म साधोनी सती लाजवुनी अम्हा ।
पतीच्या सह ती जाते सर्वोच्च लोकि ती पहा ॥ २६ ॥
त्या लोकी राहता थोडे आत्मज्ञानचि लाभते ।
तेणे वैकुंठ लाभे नी कायसे तेथ ते उणे ॥ २७ ॥
जन्मोनी मानवी देही रमे जो विषयातची ।
ठकला आत्मघाती तो हाय हायचि निश्चित ॥ २८ ॥
मैत्रेयजी सांगतात -
देवांगना अशा जेंव्हा गायिल्या गुण सर्व हे ।
पतीच्या सह ती अर्ची परंधामास पावली ॥ २९ ॥
हरिभक्त पृथू ऐसा पुण्यवान्‌ जाहला असा ।
उदार इतिहासा या तुमच्यासाठि बोललो ॥ ३० ॥
श्रद्धेने सांगती आणि वाचिती ऐकती तया ।
वैकुंठधाम ते लाभे पृथुच्या परि सर्व ते ॥ ३१ ॥
सकामे वाचिता याला ब्रह्मतेजहि लाभते ।
क्षत्रीय नृप नी वैश्य प्रधान शूद्र साधु हो ॥ ३२ ॥
त्रिवार ऐकल्याने हे नर वा नारि हो कुणी ।
वंध्यांना लाभती पुत्र दरिद्र्या धन लाभते ॥ ३३ ॥
कीर्तिहीना यश लाभे मूर्ख विद्वान होतसे ।
मनुष्या क्षेमची होते अमंगल निवारते ॥ ३४ ॥
धन नी यश आयुष्य वाढोनी स्वर्ग लाभतो
कलीचे नष्टती दोष पुरुषार्था सहाय्य हे ।
धर्मार्थ काम नी मोक्ष सर्व सिद्धी हव्या तरी
श्रद्धेने पृथुची वार्ता ऐकिली पाहिजेच ही ॥ ३५ ॥
जयार्थ निघता राजा ऐकिल्याने कथेस या ।
पृथुच्या परिही त्यासी राजे सन्मान अर्पिती ॥ ३६ ॥
आसक्ती सोडुनी सार्‍या भक्ती नी भाव ठेवुनी ।
पृथूची वाचणे वार्ता ऐकावी सांगणे तशी ॥ ३७ ॥
विदुरा ! भगवत्‌कीर्ती कथाया कथिली कथा ।
कथेत ठेविता प्रेम पृथूची गति लाभते ॥ ३८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेविसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP