समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय २८ वा
पुरंजनाला स्त्रीयोनीची प्राप्ती, अविज्ञाताच्या उपदेशाने मुक्ती -
नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्)
राजन् ! यवन राजाचे प्रज्वारा सह सैनिक ।
कालकन्या सवे पृथ्वी वरी ते फिरु लागले ॥ १ ॥
प्रचंडे नगराला त्या घेरिले सैनिकांसह ।
सर्व संपन्न म्हातार्या पुरासी सर्प रक्षि तो ॥ २ ॥
पुरुष फसतो जैसा स्त्रीच्या लाडात शीघ्रची ।
तैसे त्या कालकन्येने सर्वां सत्वर घेरिले ॥ ३ ॥
त्या वेळी काळकन्येच्या सवे यवन तो नृप ।
लागला करु विध्वंस चौद्वारे घुसुनी बहू ॥ ४ ॥
जनांसी पीडुनी तैसे तयांचा स्वामि तो तया ।
लागले क्लेशि त्रासाया बहुभोगी पुरंजना ॥ ५ ॥
आलिंगी कालकन्या तै सर्व श्री नष्ट जाहली ।
नष्टली बुद्धि नी दीन झाला ऐश्वर्य संपता ॥ ६ ॥
नष्ट भ्रष्ट असे पूर पाहिले त्या पुरंजने ।
भृत्य पुत्र तसे पौत्र मंत्रीही अवमानिती ॥ ७ ॥
स्नेहशून्य अशी झाली देहासी वश ती जरा ।
शत्रूंनी व्यापिला देश सचिंत जाहला मनी ॥ ८ ॥
भोगात दीन तो झाला जरें निस्सार जाहला ।
मृत्युची गति पाही नी त्यजिले बंधु सर्वही ॥
स्त्री पुत्रादिकांच्याच चिंतेत नित्य लागला ॥ ९ ॥
सुटता इच्छिता तो तो बाधाही जाहल्या बहू ।
गंधर्वे घेरिले आणि काळकन्येचि ठेचिले ॥ १० ॥
भयाच्या बंधुने हीत बंधूचे साधिण्या पुरां ।
लाविली आग ती सारी प्रज्वराने भयानक ॥ ११ ॥
जळता नगरी तेंव्हा पूरवासी नि सेवका ।
संतान स्वामिनी आणि राजासी दुःख जाहले ॥ १२ ॥
कालकन्याकरी पूर पडता सर्प पीडला ।
प्रज्वारे आक्रमोनीया यवने गृह घेतले ॥ १३ ॥
कोपांत जळता वृक्ष भयाने साप धावती ।
तसा तो पळण्या इच्छी शरीर कंपले तरी ॥ १४ ॥
गलीतगात्र ते झाले गंधर्वे शक्ति नष्टिली ।
शत्रूने रोधिले तेंव्हा दुःखाने रडु लागला ॥ १५ ॥
तो पुरंजन आसक्त ममत्व ठेविता पहा ।
बुद्धिहीनच की झाला स्त्रीप्रेमीं फसला अती ॥ १६ ॥
संपत्ती पुत्र पौत्रांना सोडण्याच्या प्रसंगि तो ।
मायेने मोहिला फार चिंताकांतचि जाहला ॥ १७ ॥
माझी ही गृहभार्या तो गृहस्थी राहिली अशी ।
मीच जेंव्हा मरे तेंव्हा निर्वाहा काय साधिल ॥ १८ ॥
स्नानादी भोजना नित्य सेवेत नित राहिली ।
रुष्टता भयही मानी क्रोधता गप्पही बसे ॥ १९ ॥
विसरे मी तदा सांगे विरहे सुकुनी बसे ।
जरी ती वीरमाता हो प्रपंच नचले मुळी ॥ २० ॥
आश्रयो वाढले माझ्या पुत्र पौत्रहि सर्व हे ।
मरता बुडती नाव त्यांजला बुडवेल की ॥ २१ ॥
ज्ञानाने पाहता शोक कारणे व्यर्थ ते असे ।
अज्ञाने तो करी शोक भयराजहि पातला ॥ २२ ॥
भयाने बांधिले आणि स्वस्थाने ओढिले जधी ।
सर्व अनुचरे तेंव्हा शोकाने पातले तिथे ॥ २३ ॥
यवने बांधिला सर्प तोही त्यांच्या सवे रिगे ।
जाता ते सर्वची पूर छिन्नविच्छीन्न जाहले ॥ २४ ॥
महाबळी भयराजे ओढिले त्या पुरंजना ।
नाठवे भयग्रस्तासी अविज्ञात हितैषी तो ॥ २५ ॥
निर्दये पशु जे यज्ञीं टाकिले क्रोध पावले ।
स्मरोनी पूर्व पीडा ती कुठारे तोडु लागले ॥ २६ ॥
अंधारकोठडीमध्ये कैक वर्षेहि कष्टला ।
स्त्रैणवृत्तीमुळे राजा दुर्गतीं पावला असा ॥ २७ ॥
अंतकाळीहि स्त्रियेच्या चिंतनी बुडला नृप ।
विदर्भ नृपवंशात कन्या होवोनि जन्मला ॥ २८ ॥
सुंदरी थोर ती होता घोषणा तात तो करी ।
देणे ही थोर वीराला ऐकता मलयध्वजे ॥
त्या थोर पांड्य राजाने राजकन्येस जिंकिले ॥ २९ ॥
तिच्या पासोनि तो पांड्य पुत्री ती श्यामलोचना ।
जन्मवी सात पुत्रांना द्रविडी सात भूप जे ॥ ३० ॥
राजन् ! विस्तार तो थोर जाहला पुढती पहा ।
मागे सध्या भविष्यात पृथिवी भोगिती असा ॥ ३१ ॥
व्रतशील अशी पुत्री पांड्याची थोर ती पुढे ।
अगस्त्य मुनिची पत्नी तिचा पुत्र दृढच्युत ॥ ३२ ॥
पृथिवी सर्व पुत्रांना वाटुनी मलयध्वज ।
इच्छुनी कृष्णभक्तीस गेला ध्यानार्थ पर्वती ॥ ३३ ॥
चंद्रिका चंद्रदेवासी तशी ही अनुसारली ।
पतीच्या पाठिसी गेली तयाची मत्त लोचना ॥ ३४ ॥
वटोदका ताम्रपर्णी आणि चंद्रवसा तिन्ही ।
नद्यांच्या संगमा मध्ये स्नान ते नित्य घेउनी ।
विशुद्ध होत ते नित्य आत बाहेर रोजची ॥ ३५ ॥
कंदमूळ फळे पुष्प भक्षुनी तप थोर ते ।
करिता जाहले देहीं कृश ते पुढती बहू ॥ ३६ ॥
मनात सम दृष्टी नी शीतोष्ण वायु पाउस ।
तृष्णा क्षुधा सुखोदुःख द्वंद्वा या जिंकिले असे ॥ ३७ ॥
तपाने वासना मेल्या नियमे प्राण इंद्रिय ।
रोधोनी आत्मब्रह्मात सद्भाव ठेविला सदा ॥ ३८ ॥
स्थाणूच्या परि ते स्थीर राहूनी शतवर्षही ।
भगवान् वासुदेवाच्या हरले प्रेमि भान ते ॥ ३९ ॥
गुरुस्वरुप साक्षात हरीने उपदेशिता ।
हृदयी आत्मज्योतीने स्वप्नाच्या परि पाहता ॥ ४० ॥
उपाधीव्याप्त नी भिन्न देहापासोनि तो हरी ।
कळता सर्व हे झाले उदास बहुही मनीं ॥ ४१ ॥
पुन्हा त्या आपुल्या आत्म्या ब्रह्मात लावुनी बघे ।
अभिन्न ब्रह्म आत्म्यासी पाहता तेहि सोडिले ॥ ४२ ॥
वैदर्भी सर्व त्या वेळी प्रेमाने मलयध्वजा ।
राहिली नित्य सेवेत त्यागिता भोग सर्वही ॥ ४३ ॥
धारुनी चिरवस्त्रे ती उपासे कृश जाहली ।
बटा त्या जाहल्या केशी ज्वाळेच्या सम शोभिली ॥ ४४ ॥
पती तै सोडिता देहा दिसला पूर्ववत् स्थित ।
रहस्य ते न जाणोनी पूर्ववत् सेविं लागली ॥ ४५ ॥
चरणा स्पर्शिले तेंव्हा थंड ते पाय लागले ।
व्याकूळ जाहली चित्ती चुकली हरिणी जसी ॥ ४६ ॥
निबीड वनि त्या दीन शोकाने रडली बहू ।
आक्रोश जाहला मोठा अंश्रुंनी भिजले स्तन ॥ ४७ ॥
बोलली उठिरे ऊठ राजर्षी ही वसुंधरा ।
त्या अधार्मिक राजांना भीतसे रक्षिणे हिला ॥ ४८ ॥
अबला पतिसेवार्थ गेलेली नी विलाप हा ।
करिता पडली पायी रडोनी अश्रु ढाळिता ॥ ४९ ॥
लाकडे रचुनी तेथ पतीचे शव ठेविले ।
रडोनी लाविला अग्नी सती जाण्यास सिद्धली ॥ ५० ॥
हे राजा ! याच वेळेला ज्ञानी मित्र द्विजो तिथे ।
पातला वदला तीते शब्दांनी समजावुनी ॥ ५१ ॥
ब्राह्मण (अविज्ञात) म्हणाला -
कोण तू पुत्रि कोणाची रडसी काय कारणे ।
झोपला तो तुझा कोण मला का नोळखिसी तू ।
मी तो तुझा जुना मित्र फिरलो किति आपण ॥ ५२ ॥
सखे स्मरसि की नाही अविज्ञात तुझा सखा ।
पृथ्वीचा भोग भोगाया मजला सोडिलेस तू ॥ ५३ ॥
सरोवरी जसे हंस दोघांची मैत्रि ती तसी ।
हजार वर्ष पर्यंत राहिलो बिन गेहिचे ॥ ५४ ॥
परंतु मज सोडोनी भोगार्थ पृथिवीवरी ।
येता तू पाहिले पूरा स्त्रियेने रचिले अशा ॥ ५५ ॥
उद्याने पाच नी द्वारे नऊ रक्षक साप तो ।
वैश्यकूळ सहा तेथे त्रिकोटीं हाट पाच ते ॥
उपादानेचि ते सर्व स्वामी नी एक स्त्री तिथे ॥ ५६ ॥
विषयेंद्रिय उद्याने नऊ इंद्रीय द्वार ते ।
तेजादी जल हे कोट मनादी वैश्य ते सहा ॥
कर्मेंद्रियेचि बाजार उपादाने न क्षीण ते ॥ ५७ ॥
स्वामिनी बुद्धि शक्ती ती अशा या नगरीत त्या ।
जाताचि ज्ञान ते संपे आत्मरुपासि विस्मृती ॥ ५८ ॥
बंधो ! त्या नगरीमध्ये मोहात पडला तिच्या ।
चुकला आत्मरूपाला संगाने दुर्दशा अशी ॥ ५९ ॥
न तू विदर्भकन्या नी पती ना मलयध्वज ।
न तू पुरंजनीचाही बंदिस्त पति त्या पुरा ॥ ६० ॥
पुरूष पूर्वजन्मी नी या जन्मी सति मानिसी ।
माझीच सर्व ही माया पुरूष नच स्त्रीहि तू ॥
तू नी मी हंस दोघे की वास्तवा पाहि तू असे ॥ ६१ ॥
मित्रा ईश्वर मी नी तू जीवची भिन्न ना मुळी ।
मी तू नी तूच मी आहे ज्ञानी ना भेद मानिती ॥ ६२ ॥
आरशीं प्रतिमा भासे दुजाच्या नयनी तसे ।
तसा विद्येत तो ईश अविद्यीं जीव भासतो ॥ ६३ ॥
या परी हंस हंसाने बोधिता ज्ञान जाहले ।
आत्मस्वरूप जीवाला जाहले आत्मदर्शन ॥ ६४ ॥
प्राचीन्बर्हि ! तुला मी हे परोक्ष ज्ञान बोधिले ।
जगत्कर्त्या जगदीशा परोक्ष कीर्ति आवडे ॥ ६५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठाविसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|