समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २० वा

महाराज पृथूच्या यज्ञात श्रीभगवान विष्णू प्रगटतात -

मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
नव्व्याण्णव पृथूयागे यज्ञभोक्ताहि तोषला ।
इंद्राच्यासह श्रीविष्णु प्रत्यक्ष अवतारला ॥ १ ॥
श्री भगवान म्हणाले -
यज्ञात शंभराव्या त्या शक्राने विघ्न आणिले ।
क्षमा तो इच्छि तुमची करावी त्याजलागुनी ॥ २ ॥
बुद्धिसंपन्न जे साधू जीवांचा द्रोह नेच्छिती ।
कां की शरीर हे सारे आत्मा तो मुळिही नसे ॥ ३ ॥
मम मायें तुम्हा ऐसे जाता मोहोनि मानिजे ।
सेवेने सगळ्या त्याच्या जाहले श्रम केवळ ॥ ४ ॥
अविद्या वासना कर्म यांची ही पुतळी तनू ।
ज्ञानी हे जाणिती आणि आसक्त नच राहती ॥ ५ ॥
आसक्ति तनुसी होते जाणुनी कोण ज्ञानि तो ।
पुत्र गेह तसे द्रव्य यांच्यात मोह ठेवितो ॥ ६ ॥
विशुद्ध नी स्वयंतेज निर्गुण आश्रयो गुणा ।
सर्वव्यापी तसा भिन्न आत्मा तो एकचि असे ॥ ७ ॥
आत्म्यासी जाणती ऐसे ते या देहात राहुनी ।
राखिता स्नेह त्याच्यासी न लिंपे कधिही तयीं ॥ ८ ॥
राजन्‌ निष्काम कर्माने धर्माने भक्तिपूर्वक ।
करिता मम ती भक्ती चित्त ते शुद्ध होतसे ॥ ९ ॥
तयासी लाभते ज्ञान माझी त्या स्थिति लाभते ।
परंशांती अशी तीच ब्रह्मकैवल्य ते असे ॥ १० ॥
इंद्रियां साक्षि तो आत्मा विमुक्त राहतो परी ।
ज्यांना हे कळते सारे त्याला मोक्षचि लाभता ॥ ११ ॥
(इंद्रवज्रा)
इंद्रीय भूते अन इंद्रियांच्या
    त्या देवता चेतनरूप देह ।
यांना मुळी स्पर्शित तो न आत्मा
    न शोक त्याला नच हर्षही त्या ॥ १२ ॥
जो उच्च नीचाधमलोक यांना
    समान पाही सुख दुःख त्यागी ।
वीरा जितेंद्रीय असाच हो तू
    मंत्र्यासवे रक्षुनि राज्य सारे ॥ १३ ॥
श्रेयो प्रजापालनि राजियाचे
    साचे तयाने मग पुण्य मोक्षा ।
ना रक्षिता घे कर त्यां कडोनी
    तो पाप भोगी जन घेति पुण्य ॥ १४ ॥
त्या ब्रह्मणांचे मत घेउनीया
    परंपरा धर्मचि मेळवावा ।
आसक्त ना हो निति नेम पाळी
    तेणे घरी सिद्धहि भेटतील ॥ १५ ॥
गुण स्वभावा तुज मी प्रसन्न
    झालो मला माग वरा हव्या त्या ।
दुष्प्राप्य मी त्या तप योग यज्ञे
    क्षमा समत्वी वसतो सदा मी ॥ १६ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
सर्वलोकगुरूविष्णु विदुरा वदता असे ।
विश्वजित्‌ पृथुने आज्ञा शिरोधार्यचि मानिली ॥ १७ ॥
मनात लाजला इंद्र लवला पाद सेविण्या ।
परी पृथू तयासी घे ह्रदया प्रेमपूर्वक ॥ १८ ॥
पूजिला पृथुने तेंव्हा विश्वात्मा भक्तवत्सल ।
भक्तिमग्न अशा भावे धरिले हरिपाद ते ॥ १९ ॥
श्रीहरी इच्छिता जाण्या पृथुने थांबवीयले ।
कमलाक्ष असा विष्णु पाहता थांबला तिथे ॥ २० ॥
(इंद्रवज्रा)
तदा पृथूचे भरलेच नेत्र
    दाटोनि येता मग कंठ त्याचा ।
शके न बोलू नच दर्शनोही
    आलिंगुनी हात जुळोनि ठेला ॥ २१ ॥
पृथ्वीस स्पर्शोनि उभा प्रभू तो
    कराग्र ठेवोनि गरुडस्कंधी ।
नेत्राश्रु तेंव्हा पुसुनी प्रभूला
    म्हणे पृथू पाहुनिया असे ते ॥ २२ ॥
महाराज पृथु म्हणाले -
मोक्षाधिपा तू वरदेश्वरा रे
    न बुद्धिवाला तुज वस्तु मागे ।
ते भोग सारे नरकात नेती
    तेंव्हा न मी त्या विषयास इच्छी ॥ २३ ॥
ना मोक्ष इच्छी मधुपादपद्म
    तो जो स्त्रवे जेथ कुणा मुखाने ।
दहा हजारो मज देइ कान
    ऐकावया कीर्तनची तुझे ते ॥ २४ ॥
हे पुण्यश्लोका तव पादपद्म -
    -गंधा सवे शब्दचि कानि येता ।
अज्ञास ही ज्ञान मिळोनि जाते
    तेंव्हा दुजे कांहि नको मला ते ॥ २५ ॥
हे कीर्तिमंता तव कीर्तनाने
    मूर्खाहि तृप्ती, नच ज्ञानी त्यागी ।
साधवयासी पुरुषार्थ चारी
    लक्ष्मीहि ऐके तव कीर्तनाते ॥ २६ ॥
लक्ष्मीपरी मी तव इच्छि सेवा
    गुणालयाची पुरुषोत्तमाची ।
परी पती एकचि सेविताना
    स्पर्धाहि ना हो अन भांडणे ती ॥ २७ ॥
जगज्जनन्या परि लक्ष्मिजीच्या
    मनात येईल तसे खरे ही ।
आशा मनी की मम पक्ष घेसी
    स्वरम्य तू ना रमशी तिच्यात ॥ २८ ॥
म्हणूनि निष्काम तुलाच ध्याती
    माया अहंकार तुला न कांही ।
तुझ्या पदाच्या स्मरणाशिवाय
    त्या संतलोका नच अन्य हेतू ॥ २९ ॥
निरीच्छ हेते भजतो तुला मी
    देसी वरो तू तव मोह-माया ।
तू बांधले लोकहि वेदवाक्ये
    ना हो तसे तो मग मोह काय ? ॥ ३० ॥
माया तुझी तोडि स्वरूप पाह्या
    नी अज्ञ स्त्री-पुत्र मनात इच्छी ।
पिता मुलाची नच इच्छि जैसी
    विनंति, तैं तू पुरवीशि सारी ॥ ३१ ॥
मैत्रेयजी सांगतात - (अनुष्टुप्‌)
तो आदिराजा पृथु प्रार्थिताच
    बोले हरी भूपति ! सत्य शक्ती ।
हे भाग्य की चित्त मला दिले तू
    मायेतुनी ते सुटणे कठीण ॥ ३२ ॥
(अनुष्टुप्‌)
चित्त सावध देवोनी आज्ञापाळी प्रजापते ।
आज्ञा जो पाळितो माझी त्याचे मंगल होतसे ॥ ३३ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
विदुरा या परी देवे आदरे बोल मानिले ।
पृथुने पूजिले त्याला जाण्यासी हरि सज्जला ॥ ३४ ॥
तेंव्हा त्या पृथुने सर्व देवता पितरे ॠषी ।
गंधर्व चारणा नागा किन्नरा अप्सरा ययां ॥ ३५ ॥
पक्षादी प्राणिमात्रांना हरीच्या पार्षदासही ।
देताचि भक्तिने दान गेले स्वस्थानि सर्व ते ॥ ३६ ॥
भगवान्‌ अच्युतो हे ही पृथूचे नी द्विजादिचे ।
निघाले चित्त चोरोनी स्वधामा तद नंतर ॥ ३७ ॥
पुन्हा स्वरुप दावोनी जाहले गुप्त तेधवा ।
नमस्कारुनिया देवा नगरीं पृथु पातला ॥ ३८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर विसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP