समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २१ वा

महाराज पृथूचा आपल्या प्रजेस उपदेश -

मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
त्या वेळी पृथूचे पूर मोत्यांनी पुष्पमाळिने ।
द्वारे सुवर्ण वस्त्रांनी गंध धूपेहि शोभले ॥ १ ॥
गल्ल्यां नी चौक रस्त्यात चंदनीजलसिंचने ।
अक्षता फल पुष्पांनी मंगलप्रद जाहले ॥ २ ॥
जागजागी फळे पुष्प यांचे गुच्छ सुशोभले ।
केळिंचे खांब नी पर्ण तोरणे शोभले बहू ॥ ३ ॥
पृथू तो नगरीं येता आरत्या घेउनी करीं ।
कुमारिका नि लोकांनी केले स्वागत तेधवा ॥ ४ ॥
शंख दुंदुभिचे बाजे वेदांचा ध्वनि जाहला ।
वंदींनी गायिले गीत ऐकिले पाहिले तरी ॥
पृथूला गर्व ना झाला महाली तो प्रवेशला ॥ ५ ॥
पूर नी देशवासींनी मार्गात शुभ चिंतिले ।
प्रसन्ने वर देवोनी तोषिले पृथुने तया ॥ ६ ॥
(इंद्रवज्रा)
थोरा नि साना पृथु पूज्य राजा
    उदार केले बहु राज्य तेणे ।
विस्तारिले येश तसेचि श्रेष्ठ
    अंती हरीच्या पदि पावला तो ॥ ७ ॥
सूतजी सांगतात -
मैत्रेय यांच्या मुखिची पृथूची
    संपन्न गाथा यश सर्व ऐसे ।
ऐकोनि तेंव्हा विदुरे अनेक
    केली तयांची अभिनंदने ती ॥ ८ ॥
विदुरजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
ब्रह्मन्‌ ! द्विजे अभिषेक पृथुला करिता तदा ।
दैवते वर देवोनी वैष्णवी तेज घेउनी ॥
पृथिवी दोहिली त्याने स्वबाहूच्या पराक्रमे ॥ ९ ॥
(इंद्रवज्रा)
उच्छिष्ट राही अणुभार ऐसे
    ते खाउनी आजहि तृप्त जीव ।
ना कोण इच्छी मग या कथेला
    सांगा कथा शेष पवित्र त्याच्या ॥ १० ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
पुण्यवंता ! महाराजा पृथू त्या यमुना तसे ।
गंगेच्या मधल्या भागी वैराग्ये राज्य ते करी ॥ ११ ॥
द्विजवंश तसे संत यांना केवळ सोडुनी ।
सप्तद्वीपावरी त्याचे नित्य शासन राहिले ॥ १२ ॥
दीक्षा ती एकदा त्याने महासत्रचि घेतली ।
देव द्विज ॠषी कैक जमले तेधवा तिथे ॥ १३ ॥
सर्वांचे पृथुने तेंव्हा केले सत्कार योग्य ते ।
नभात चंद्रमा ऐसा मंडपी राहिला उभा ॥ १४ ॥
शरीर उंच नी बाहू बलिष्ट रंग गौर नी ।
पद्माक्षीं अरुणी वर्ण नासिका मुख सुंदर ॥
स्वरुप सोम्य नी स्कंध उंचे नी दंत हासरे ॥ १५ ॥
रुंद ती छाती नी पृष्ठभागी स्थूल सुशोभला ।
सोन्याचे पिंपळीपान तसे पोटहि शोभले ॥ १६ ॥
कुरुळे कृष्ण ते केस गळा शंखासमान तो ।
धोती उत्तम लेवोनी शाल सुंदर घेतली ॥ १७ ॥
नियमे दागिने सर्व त्यागिता छान शोभला ।
मृगाजीन शरीरासी कुशा हातात घेतली ॥
नित्यकर्म यथास्थीत करोनी राहिला तिथे ॥ १८ ॥
हर्षाने मोहिले सर्वां स्नेहाने पाहिली सभा ।
चौफेर दृष्टि लावोनी भाषणा वदला पुढे ॥ १९ ॥
सुरेख वाक्य योजोनी मधूर स्पष्ट गंभिर ।
उपकारार्थ तै त्याने प्रतिती कथिली तदा ॥ २० ॥
महाराज पृथु म्हणाले -
होवो कल्याण सर्वांचे महानुभाव आपण ।
संतां जिज्ञासु यांनी तो वदावा निश्चयो जसा ॥ २१ ॥
प्रजेच्या शासना आणि रक्षिण्या पोषिण्या तसे ।
मर्यादा राखण्या सर्व लोकांनी राज्य हे दिले ॥ २२ ॥
तेंव्हा त्यां पालनीं लाभो इच्छिला लोक तो मला ।
वेद संतां मते जैसा होता तो हरि पावला ॥ २३ ॥
प्रजेला धर्म ना देता जो राजा कर घेइ त्यां ।
पापाचा भाग ये वाट्यां ऐश्वर्य संपते तदा ॥ २४ ॥
लोकांनो ! प्रियराजाला परत्री सुख लाभ्ण्या ।
अद्वेष्टे आचरा कर्म सर्वांचे हित त्यात की ॥ २५ ॥
प्रसन्न देवता पित्रे ऐकावे ॠषि प्रार्थना ।
उपदेष्टा तसा कर्ता स्तोत्याचे फळ एकची ॥ २६ ॥
सज्जनांनो तसे श्रेष्ठ मानिती यज्ञपूरुषा ।
कर्माचे फळ तो देतो दिसे तेजाळ उंच तो ॥ २७ ॥
मनू ध्रुवपिता आणि तसा ध्रुव महीपती ।
आजोबा अंग ते माझे राजर्षी तो प्रियव्रत ॥ २८ ॥
प्रल्हाद शिव नी ब्रह्मा बळीच्या परि ते किती ।
सगळे मानिती ऐसे पुरुषार्थात स्वर्ग तो ॥ २९ ॥
स्वाधीन फळदाता तो गदाधारीच ईश्वर ।
वेनाच्या परि ते थोडे नगण्य भेद मानिती ॥ ३० ॥
(इंद्रवज्रा)
अशा पदापासुनि दूर त्यांच्या
    सेव्यार्थ गंगा परि नित्य वाहे ।
संसार तापे बहु तप्त जीव
    क्लेशास त्यांच्या करितेय नष्ट ॥ ३१ ॥
ज्याच्या पदाचा परिस्पर्श होता
    धुवून जाती मनिचेहि क्लेश ।
वैराग्य ज्ञाना बलरुप योगे
    पुन्हा न जाणे भवसागरात ॥ ३२ ॥
आजीविकायोग्य अशाचि धर्मे
    काये नि वाचे भजणे तयाला ।
शंका न घेता मग निश्चयाने
    भजा तयाला फल प्राप्त होते ॥ ३३ ॥
विशुद्ध विज्ञानघनी समस्त
    विशेषणांच्या विरहीत देव ।
परंतु यज्ञीं प्रगटे रुपाने
    मंत्रे तसे द्रव्य गुणक्रियेने ॥ ३४ ॥
जै अग्नि भासे विविधो रुपाने
    अदृष्ट काले प्रकृतीं तसाची ।
त्या वासनांनी बनल्या शरीरीं
    राही स्थितो नी हवनात भासे ॥ ३५ ॥
अहो धरेच्या वरि तुम्हि सारे
    त्या यज्ञभोक्त्या हरिच्या अधीन ।
भावे करीता नित पूजने ती
    उपकृती ते मजसीच आहे ॥ ३६ ॥
क्षमा तपस्या अन ज्ञान ऐशा
    विभूति योगे द्विज वैष्णवांचे ।
पवित्र होई कुल ते स्वभावे
    त्यांच्यावरी राज प्रभाव नोहे ॥ ३७ ॥
ब्रह्मादि सार्‍याहि महापुरूषीं
    पुराण विष्णू नि द्विजास वंदी ।
योगे तयाने स्थिर लक्ष्मि नी ती
    पवित्र कीर्ती मिळली तयाला ॥ ३८ ॥
तुम्ही समूदाय करोनि धर्म
    तो आचरीता प्रियवंश राखा ।
सेवा कराया हरि तुष्टि मानी
    तेंव्हा विनम्रे द्विजपाद सेवा ॥ ३९ ॥
सेवा अशी ही नित सेविल्याने
    चित्त स्थिरावे अन मोक्ष लाभे ।
तो कोण विश्वात द्विजाहुनीही
    मोठा जयाच्या मुखिं हव्य पावे ॥ ४० ॥
ज्यांच्या मुखे ज्ञान गतार्थ होते
    ऐशा द्विजांच्या मुखि तृप्त देव ।
घेवोनि होती हवनीय वस्तू
    तैसे न होती कधि यज्ञर्‍यागी ॥ ४१ ॥
भासे जसे बिंबहि आरशात
    भासे तसे विश्व हरीकडोनी ।
त्याच्यात जे शुद्ध सनातनी त्या
    तत्त्वास घेण्या नित वेद गाती ॥ ४२ ॥
सत्‌संग नी संयम नी समाधी
    जे साधिती त्या द्विजपाद धूळी ।
घ्यावी मुकूटावरि ती असे की
    नासोनि जाते मग पाप सारे ॥ ४३ ॥
ऐशा गुणी शील कृतज्ञ शिष्या
    आपैसि लाभे मग संपदा ती ।
मी इच्छि गोवंश नि भक्त विप्र
    यांचा कृपालाभ सदाचि होवो ॥ ४४ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
महाराज पृथू याचे भाषणा ऐकता अशा
सगळे साधु साधू या शब्दांनी स्तविती तदा ॥ ४५ ॥
पुत्रपुण्ये गती पित्रां श्रुतीचे वाक्य सत्य हे ।
शापाने नारकी वेना पुण्ये सद्‌गति लाभली ॥ ४६ ॥
हिरण्यकशपू ऐशा निंदिता नर्क लाभणे ।
परी प्रल्हाद पुण्याने हरीने उद्धरीयला ॥ ४७ ॥
वीरश्रेष्ठा पृथू तूते पृथ्वीने मानिला पिता ।
तुझी ही दृढची भक्ती जग तू कैक वर्षही ॥ ४८ ॥
(इंद्रवज्रा)
पवित्र कीर्ती यश ते महान
    प्रसारिसी तू हरिकीर्ति लोकीं ।
हे भाग्य मोठे मिळले तुला रे
    हे राज्य रामापरि मोक्षदायी ॥ ४९ ॥
(अनुष्टुप्‌)
नाथा आश्चर्य ते नाही प्रजेसी बोधिले असे ।
प्रजेसी राखणे प्रेम थोरांची वृत्ति ही असे ॥ ५० ॥
विवेकहीन हो आम्ही संसारवनि घेरिले ।
अज्ञान तम यातून मुक्त केले तुम्ही प्रभो ॥ ५१ ॥
शुद्धसत्वमयी तू तो ब्राह्मणातून क्षत्रिय ।
होवोनी रक्षिसी पृथ्वी नमस्कार तुला असो ॥ ५२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकविसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP