समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय १९ वा
महाराज पृथूचे शंभर अश्वमेघ -
मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
त्या ब्रह्मावर्त क्षेत्रासी पूर्ववाही सरस्वती ।
दीक्षा तै अश्वमेधाची पृथूने घेतली असे ॥ १ ॥
पाहता न सहे इंद्रा म्हणे हा कर्म वाढवी ।
घेई हा पद माझे तो वाढता कर्म हे असे ॥ २ ॥
साक्षात पातला यज्ञीं भगवान् हरि ईश्वर ।
सर्वात्मा सर्वभूतांचा सर्वलोकगुरु प्रभू ॥ ३ ॥
सोबती रुद्र नी ब्रह्मा लोकपाल तसे गण ।
पातले गात गंधर्व अप्सरा हरिकीर्तने ॥ ४ ॥
सिद्ध विद्याधरो दैत्य यक्ष दानव पार्षद-
- सुनंद-नंद हरिचे त्याच्या सेवेत पातले ॥ ५ ॥
नारदो दत्त कपिलो पातले सनकादिक ।
योगेश्वर तसे आले पृथूच्या यज्ञमंडपी ॥ ६ ॥
भारता ! यज्ञसामग्री देणारी कामधेनु भू ।
स्वयेचि राहिली यज्ञीं सामग्री काय ती कमी ॥ ७ ॥
मधुपर्क नद्या देती वृक्ष ते अन्न नी घृत ।
दूध नी दहि आदीही सामग्री त्या समर्पिता ॥ ८ ॥
सिंधू तो रत्नराशी नी गिरी अन्न चतुर्विध ।
लोकपाले किती एक आणिले उपहार ते ॥ ९ ॥
पृथू अधोक्षजलाची मानी तो आपुला प्रभू ।
त्या कृपे जाहले यज्ञ इंद्रे विघ्नहि आणिले ॥ १० ॥
पृथू अंतीम यज्ञाने यज्ञदेवास पूजिता ।
इंद्रे ईर्ष्ये गुप्तरुपे यज्ञाचा हय चोरिला ॥ ११ ॥
स्वरक्षार्थ तदा इंद्रे पाखंड वेष घेतला ।
घोडा घेवोनि आकाशी अत्रिला दिसला तसा ॥ १२ ॥
अत्री हे सांगता तैसे पृथुपुत्र महारथी ।
इंद्राच्या धावला मागे वदला थांब थांब रे ! ॥ १३ ॥
जटाजूट असा इंद्र भस्मचर्चित भासला ।
धर्मसाक्षात् असे इंद्र पृथुपुत्रे न मारिला ॥ १४ ॥
परतता पुन्हा अत्री वदला पृथुनंदना ।
यज्ञास दुष्ट इंद्राने नाडिले मार त्यास तू ॥ १५ ॥
कुमार भरला क्रोधे मुनिंचे बोल ऐकता ।
जटायू रावणामागे धावला जै तसाच हा ॥ १६ ॥
पाहता जाहला गुप्त त्यजिता वेष नी हय ।
घेवोनी अश्व तो वीर यज्ञशाळेत पातला ॥ १७ ॥
शक्तिमान् विदुरा त्याचा पाहोनी तो पराक्रम ।
ॠषींनी ठेविले नाम विजिताश्व असे तया ॥ १८ ॥
चषाल यूप मध्यात बांधिला यज्ञअश्व तो ।
इंद्राने परतोनीया घोर अंधार दाटिला ॥
लपोनी चोरिला अश्व सुवर्ण पिंजर्यासह ॥ १९ ॥
वेगाने पळता त्याला अत्रीने पाहिले पुन्हा ।
कपाल खट्वांगधार्या न वधी पृथु नंदन ॥ २० ॥
अत्रीने सांगता सत्य क्रोधे इंद्रासि लक्षिता ।
तदाचि सोडुनी घोडा जाहला गुप्त तो पुन्हा ॥ २१ ॥
वीर तो घेउनी घोडा यज्ञशाळेत पातला ।
निंदीत वेष इंद्राचा कोण्या मूर्खेचि घातला ॥ २२ ॥
इंद्राने हरण्या अश्व जे जे रूप धरीयले ।
पापखंड तया रूपा पाखंड नाम जाहले ॥ २३ ॥
विध्वंसा यज्ञ इंद्राने घेतले रुप टाकिले ।
रक्तांबर तसे नग्न कापालिक तसे पुढे ॥ २४ ॥
नास्तीक वाटती छान युक्तिने बाजु मांडिती ।
भ्रमती उपधर्मा त्या आसक्त होउनी जन ॥ २५ ॥
इंद्राची पाहता चेष्टा पृथु तो बहु क्रोधला ।
धनुष्य घेउनी त्याने बाणही स्थापिला असे ॥ २६ ॥
(इंद्रवज्रा)
क्रोधायमाना नच पाहु ऐसा
असह्य झाला पृथु मारण्याते ।
ॠत्वीज त्यां थांबविताच बोले
दीक्षीत त्याने वधिणे न कोणा ॥ २७ ॥
तुझ्या यशाने हततेजशक्र
शत्रू तुझा तो हतवीर्य झाला ।
अमोघ मंत्रे मग त्यास येथे
बोलावुनी अग्निमधे हवीतो ॥ २८ ॥
(अनुष्टुप्)
क्रोधाने याजके यज्ञीं इंद्रा आवाहिले ऐसे ।
आहुती टाकण्या त्याची ब्रह्म्याने रोधिले तया ॥ २९ ॥
बोलले याजको त्याला इंद्राचा वध न करी ।
यज्ञीच्या देवता सर्व इंद्रांग असती पहा ॥ ३० ॥
यज्ञात विघ्न आणोनी इंद्रे पाखंड मांडिले ।
न रोधावे तयासी तो पाखंड वाढवील की ॥ ३१ ॥
नव्व्याण्णवचि राहो दे यज्ञ हे जाहले पुरे ।
जाणसी मोक्ष तू राजा यज्ञहेतु तुला नसे ॥ ३२ ॥
शुभ होवो तुझे राजा तुझी नी इंद्रकीर्ति ही ।
हरीचे अंग ते आहे नको क्रोध तया करु ॥ ३३ ॥
(इंद्रवज्रा)
चिंता नको तू मुळिही करू ती
देवोनि चित्ता मग ऐक सारे ।
ईशे लयासी जयि कार्य नेले
माणूस तेचि रचि कोपुनीया ॥ ३४ ॥
(अनुष्टुप्)
करावा बंद हा यज्ञ पाखंडे धर्म नाशतो ।
देवता जाहल्या हट्टी तेणे हे घडले असे ॥ ३५ ॥
पहा तू हे जराशीच इंद्र तो चोरुनी हय ।
नेता पाखंड ते छान दिसता जन हर्षल ॥ ३६ ॥
(इंद्रवज्रा)
तू अंश विष्णू नि हरीच साक्षात्
झालाचि होता जयि धर्म लुप्त ।
उचीतवेळी करण्यास रक्षा
तू वेणदेहातूनि जन्मलास ॥ ३७ ॥
तेंव्हा पृथूजी अवतार हेतू
जाणोनिया जे भृगु इच्छि चित्ती ।
ते विश्व सारे रचिणे पुन्हा तू
पाखंड माया हरिशील तू की ॥ ३८ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
लोकगुरु असा ब्रह्मा बोलता पृथुरायने ।
त्यागिला यज्ञसंकल्प इंद्रासी स्नेह साधिला ॥ ३९ ॥
पुन्हा त्या पृथुने केले यज्ञान्त स्नानही तसे ।
दिधले देवतांनी ते अभीष्ट वर सर्व ही ॥ ४० ॥
विप्रांना दक्षिणा श्रद्धें दिधली पृथुने तदा ।
संतुष्ट द्विज होवोनी आशिर्वाद दिले तयां ॥ ४१ ॥
आवाहिता महाबाहो! देवता पितरे ॠषी ।
आले जे सर्वही त्यांना दाने गौरविले असे ॥ ४२ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणिसावा अध्याय हा ॥ ४ ॥ १९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|