समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १६ वा

वंदिजनांकडून महाराज पृथुची स्तुती -

मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
नृपती बोलता ऐसे ते गायक सुखावले ।
प्रोत्साहने मुनिंच्या तै स्तुति ही गाऊ लागले ॥ १ ॥
(इंद्रवज्रा)
साक्षात्‌ प्रभू हा अवतार भूसी
    समर्थ आम्ही गुण गावया ना ।
प्रेतातुनी जन्म तुम्हास झाला
    ब्रह्मादिकांची न चलेचि बुद्धी ॥ २ ॥
तरी तुझ्या कीर्तनि भाव होतो
    मुनिप्रबोधे तुजला स्तवीतो ।
साक्षात्‌ हरीचा अवतार तू तो
    उदार ऐशी तव कीर्ति आहे ॥ ३ ॥
(अनुष्टुप्‌)
दाविशील जना धर्म धार्मिकां माजि श्रेष्ठ तू ।
धर्मसीमा करोनीया धर्मेचि दंडिसील तू ॥ ४ ॥
पाळिसील प्रजेला नी पोषोनी रंजिसीलही ।
यज्ञे देव तशी सृष्टी वृष्टीने तोषिशील तू ॥ ५ ॥
सूर्या परि समदर्शी सूर्य जैं शोषितो जल ।
वर्ष तो चार मासात तसे तूं द्रव्य सर्व ते ॥
मेळसील करां द्वारे खर्चिशील जनां हितीं ॥ ६ ॥
दयावंत असा होसी जरी तो दीन कोणि ही ।
मस्तकी पाय ही देता क्षमाची करिसील तूं ॥ ७ ॥
आवर्षणे प्रजा जेंव्हा प्राणाच्या संकटी पडे ।
इंद्राच्या परि तू वृष्टी करिता रक्षिशील ती ॥ ८ ॥
मुखचंद्र मनोहारी हासुनी बोलसील कीं ।
प्रेमाने पाहता लोकां हर्षीत करशील तूं ॥ ९ ॥
(इंद्रवज्रा)
जाणील ना कोणि गती तुझी ती
    गंभीर चित्ता अन गुप्त वित्ता ।
अनंत माहात्म्य गुणाश्रयोनी
    साक्षात्‌ वरुणासम तू मनस्वी ॥ १० ॥
(अनुष्टुप्‌)
वेनाच्या मंथिता बाहू अग्नीच्या परि जन्मला ।
शत्रूचा काळ हा होई शत्रू यां नच हारवी ॥ ११ ॥
शरीरी राहतो आत्मा उदास राहतो परी ।
गुप्त हेरें जरी ज्ञाता तरी ना निंदिसील तू ॥ १२ ॥
धर्ममार्गी स्थिरावेल शत्रूचा पुत्र न्यायि ही ।
असता नच दंडील पुत्रा अन्यायि दडि हा ॥ १३ ॥
पृथिवी वरती सर्व सूर्याची किरणे जिथे ।
पडती तेथ पर्यंत विस्तारील हि राज्य हा ॥ १४ ॥
देईल सुखची लोकां करेल लोकरंजन ।
रंजनीकर्म पाहोनी राजा नाम पडेल या ॥ १५ ॥
संकल्पी निश्चयी आणि द्विज भक्त निघेल हा ।
करेल वृद्धसेवा हा शरणागतवत्सल ॥
देईल मान प्राण्यांना दीनांचा वत्सलू निघे ॥ १६ ॥
पर स्त्री परि मातेच्या पत्‍नी अर्धांगी मानिल ।
पाळील पुत्रवत्‌ लोका ब्रह्मवाद्यासि सेवक ॥ १७ ॥
दुजेही लाविती प्रेम सुहृदा मोद वाढवी ।
वैराग्यासी धरी प्रेम दुष्टांना शासिता यम ॥ १८ ॥
(इंद्रवज्रा)
तिन्ही गुणांचा तुचि स्वामि राजा
    नी निर्विकारी हि तसाचि तूची ।
हा अंशरुपे अवतार आहे
    ज्ञानी जया मानिति मिथ्य नित्य ॥ १९ ॥
स्वामी जगाचा मग एकला हा
    पूर्वांचलापासुनि रक्षि राज्य ।
रथात बैसे जय शील यां नी
    सूर्यापरी हा पृथवी फिरेल ॥ २० ॥
जेथे तिथे सर्वहि लोकपाल
    पूजूनि भेटीस समर्पितील ।
याच्या स्त्रिया गातिल यास गाणी
    या आदि राजा हरि मानुनीया ॥ २१ ॥
राजाधिराजा मग गोधरेला
    दोहूनि निर्वाह स्वये करील ।
धनुष्य टोका खुपसूनि भेदी
    त्या पर्वतांना समताल व्हाया ॥ २२ ॥
रणात याचा नच वेग साहे
    जै सिंह हिंडे वनिं निर्भये तै ।
धनुष्य घेता जग हा फिरेल
    भिऊनि त्यासी लपतील पापी ॥ २३ ॥
सरस्वतीच्या उगमस्थलाला
    करील राजा शत अश्वमेध ।
अंतीम यज्ञीं हय अश्वमेधीं
    हरोनी नेईल शतक्रतू तो ॥ २४ ॥
स्वराज गेहीं बगिच्या मधे त्या
    सनत्कुमारा मग भेट होई ।
सेवूनि त्यांचे पद भक्तियोगे
    लाभेल यासी पद ब्रह्म तेंव्हा ॥ २५ ॥
(अनुष्टुप्‌)
शौर्य याचे असे सारे जनता सर्व पाहता ।
पराक्रमास गायील जेथे तेथे तशी पुन्हा ॥ २६ ॥
(इंद्रवज्रा)
आज्ञा विरोधी नच कोणि होई
    ते क्लेश काटे उपटोनि टाकी ।
सम्राट होईल दिशा जितोनी
    गातील तेंव्हा असुरो सुरो ही ॥ २७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥ ४ ॥ १६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP