समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १५ वा

महाराज पृथुचा अवतार व राज्याभिषेक -

मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
पुन्हाही ब्राह्मणे वांझ वेनाच्या बाहु मंथिल्या ।
स्त्री पुरुष असा जोडा जन्मला त्या भुजांतुनी ॥ १ ॥
ॠत्विजे पाहुनी जोडा हर्षले मनिं खूप ते ।
भगवद्‌अंश जाणोनी प्रसन्न बहु जाहले ॥ २ ॥
ॠषी म्हणाले -
भगवान्‌ विष्णूची ही तो कला जी विश्व पालनी ।
प्रगट जाहला आणि अनपायिनि ही दुजी ॥ ३ ॥
यशा ते प्रथितो यासी पृथु सम्राट बोलिजे ।
मानवी नृप हा श्रेष्ठ जगात पहिला असे ॥ ४ ॥
सुंदरा दंतपंक्तीची सगुणा ही विभूषित ।
वरील पृथुसी आणि नाम अर्चि पडे हिचे ॥ ५ ॥
रुपात पृथुच्या विष्णु अंशाने रक्षिण्या जग ।
जाहला अर्चिच्या रुपे पत्‍नी ही लक्ष्मि जन्मली ॥ ६ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
विप्रांनी स्तविले त्यासी गंधर्वे गुण गायिले ।
अर्पिले पुष्प सिद्धांनी अप्सरा नाचु लागल्या ॥ ७ ॥
मृदंग तुरही शंख दुंदुभी वाजल्या नभीं ।
समस्त देवता पित्रे ऋषीही तेथ पातले । ८ ॥
ब्रह्मा जगद्‌गुरु आणि देवेश्वरहि पातले ।
पृथूच्या करिच्या रेषा पायाचे पद्मचिन्ह जे ॥ ९ ॥
देवतांनी पाहताच श्रीहरी अंश मानिला ।
अखंड चक्र ही होते पृथुच्या तळव्यात ते ॥ १० ॥
वेदवादी द्विजे तेंव्हा पृथूला अभिषेकिण्या ।
योजिले सर्वची लोक सामग्री आणु लागले ॥ ११ ॥
त्या वेळी पर्वतें सर्पे नद्या गायी तसे मृगें ।
स्वर्ग पृथ्वी नि पक्षांनी उपहार दिले तयां ॥ १२ ॥
वस्त्रालंकार देवोनी पृथूसी अभिषेकिले ।
पृथू अर्चि सवे तेंव्हा अग्नीच्या परि शोभला ॥ १३ ॥
सोन्याचे ते कुबेराने सिंहासन तया दिले ।
श्वेतछत्र शशीने जे तुषार जल सिंचि ते ॥ १४ ॥
वायूने दोन चौर्‍या नी धर्माने कीर्तिमाळ ती ।
टोप सुंदर इंद्राने यमाने दंड तो दिला ॥ १५ ॥
वेदो कवच ब्रह्माने शारदेनेहि हार तो ।
हरीने चक्र नी लक्ष्मी हिने स्थीरचि दौलत ॥ १६ ॥
चंद्रे खड्‌गहि रुद्राने अंबिकाने हि ढाल ती ।
अमृतमय ते अश्व सोमाने दिधली रथा ॥ १७ ॥
अग्नीने अज-गाईंच्या शिंगांचे धनु ते दिले ।
तेजस्वी बाण सूर्याने पृथ्वीने इष्ट पादुका ॥
आकाश अभिमानी त्या देवानी पुष्प माला ही ॥ १८ ॥
नाट्य गीत नि वाद्यांच्या शक्ती त्या खेचरे दिल्या ।
आशिर्वाद ऋषींनी नी समुद्रे शंख मार्ग जो ॥ १९ ॥
अखंड दिधला त्याते सदाचा उपहारची ।
स्तुत्यर्थ जमले सूत मागधो जनवंदि ते ॥ २० ॥
पृथूने अर्थ जाणोनी मेघगंभीरवाणिने ।
हांसोनी मागधादींना पुसले प्रश्न हे असे ॥ २१ ॥
पृथु म्हणाला -
(इंद्रवज्रा)
हे सूत हे मागध सौ‍म्य वंदी
    लोकांत माझे गुण वर्णिता हे ।
गाता तुम्ही कोणते गूण माझे
    ना व्यर्थ गावे दुसर्‍यास गा जा ॥ २२ ॥
कालांतरे मी प्रगटेन शौर्ये
    तेंव्हाचि गा कीर्ति तशी विपूल ।
ते सभ्य सारे हरिकीर्ति गाती
    तुच्छाचिया कीर्ति कधी न गाती ॥ २३ ॥
गुणेहि श्रेष्ठी असता समर्थ
    न अंगि होता गुण ऐकती ना ।
ही वंचना जाणिजे चित्ति सूता
    श्रोता न जाणी समजूनि गाती ॥ २४ ॥
(अनुष्टुप्‌)
निंदित कृतकर्माच्या चर्चेने थोर लाजती ।
तसेच लोक विख्यात स्तुती निंद्यचि मानिती ॥ २५ ॥
सूतांनो एकही कृत्य आम्ही केले न कांहिही ।
मुलांच्या परि या लाकी गाणार स्तुति कोणती ? ॥ २६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥ ४ ॥ १५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP