समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १७ वा

महाराज पृथु पृथ्वीवर कोपित होतात पृथ्वी स्तुती करते -

मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
या परी पृथुचे गान गाते झालेहि वंदि ते ।
पृथुने इच्छिती ते त्यां वस्तू देवोनी तोषिले ॥ १ ॥
तसेच चारि वर्णांचे मंत्री सेवक नी गुरु ।
विवीध व्यवसायींचे योग्य सत्कार योजिले ॥ २ ॥
विदुरजी म्हणाले -
गाय रूपीच कां झाली पृथ्वी तो बहुरूपिणी ।
राजाने दोहिले तेंव्हा वासरु पात्र कोणते ? ॥ ३ ॥
सखल उंचही पृथ्वी स्वभावे असता हिला ।
ती कां समतला केली इंद्रे का हय चोरिला! ॥ ४ ॥
सनत्कुमारा पासोनी ज्ञान विज्ञान घेउनी ।
राजर्षीस गती कैसी लाभली तेहि सांगणे ॥ ५ ॥
श्रीकृष्ण भगवान्‌ पृथुरूपाने अवतारला ।
तेंव्हा श्री हरीची सारी कीर्ती ती पुण्यदा असे ॥ ६ ॥
पृथू संबंधि ते ऐसे सांगावे मज कारणे ।
श्रीकृष्णचंद्र याचे तो मी-तुम्ही भक्तची असो ॥ ७ ॥
सूतजी सांगतात -
विदूर पुसता प्रश्न वासुदेव कथेस जे ।
मैत्रेय पावले तोष वदले ते प्रशंसिता ॥ ८ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
द्विजे पृथूला अभिषिक्त होता
    उद्‌घोष केला जन रक्षिण्याचा ।
नापीक होती धरणी तदा ती
    भुकी प्रजा बोललि राजियास ॥ ९ ॥
कोपात आतून जळे तरु जै
    तैसे भुकेने जळतोय आम्ही ।
म्हणून आम्ही चरणासि आलो ॥ १० ॥
रक्षार्थ तुम्ही अमुचे असा की
    क्षुधीत त्यांचे तुम्हि स्वामि राजे ।
द्यावे तुम्ही अन्न अम्हा भुकेल्यां
    ना लाभता अन्न मरुन जाऊ ॥ ११ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
कुरुश्रेष्ठा! असे बोल करुणामय ऐकता ।
विचार करता त्याला कळले मग कारण ॥ १२ ॥
पृथ्वीनेच स्वयं अन्न औषधी पोटि घेतल्या ।
निश्चये घेतला बाण शंकरा सम क्रोधुनी ॥ १३ ॥
पाहता कंपली पृथ्वी मृग व्याधा पुढे जसे ।
भयाने पळते जैसे गोरुपे धावु लागली ॥ १४ ॥
पाहता पृथुचे नेत्र क्रोधाने लाल जाहले ।
जिथे जाईल तेथे तो बाण वेधूनि धावला ॥ १५ ॥
दिशा नी विदिशा स्वर्ग आकाशी धावली धरा ।
वळोनी पाहता शस्त्रधारी पृथु दिसे तिला ॥ १६ ॥
मानवा मृत्युपासोनी कोणी जै नच वाचवी ।
त्रिलोकी तैं नसे थारा तेंव्हा ती स्थिर जाहली ॥ १७ ॥
म्हणाली हे महाभागा धर्मज्ञा दीनवत्सला ।
रक्षिसी सर्व प्राण्याना माझी रक्षाहि तू करी ॥ १८ ॥
दीन मी अपराधो ना मारु कां मज इच्छिसी ।
धर्मज्ञ म्हणुनी ख्याती स्त्रीसी तू वधतोस कां ॥ १९ ॥
स्त्रियांची घडता चूक शूद्रही नच क्रोधती ।
दीन वत्सल हे ऐसे कधीही करु ना शके ॥ २० ॥
दृढ मी नाव जैशी ती माझ्यात विश्व ते स्थित ।
मला तोडोनि तू कैसा रक्षिसी जन सागरी ॥ २१ ॥
महाराज पृथु म्हणाले -
वसुधे मोडिसी आज्ञा यज्ञाचा भाग घेउनी ।
न देसी अन्न खाण्याला आज मी वधितो तुला ॥ २२ ॥
हिरवे तृण तू खासी न देसी स्तनिचे दुध ।
दुष्टता करिता ऐसी दंड देणेचि योग्य ते ॥ २३ ॥
अज्ञानी तू अशी आहे ब्रह्म्याच्या पूर्वकाल ते ।
अन्नादी बीज ते लीन केले नी गर्भि ठेविले ॥ २४ ॥
आता बाणे तुझे खंड करितो मेद मेळितो ।
तयाने क्षुधि दीनांचे क्रंदनो शांत मी करी ॥ २५ ॥
दुष्ट जे पोसिती देह निर्दयी स्त्री पुरूष नी ।
नपूंसक जरी होय वधिता पाप ना अम्हा ॥ २६ ॥
गर्विष्ठ नि मदोन्मत्ता माये गोरूप धारिसी ।
करितो तुकडे पृथ्वे योगाने पोसितो जना ॥ २७ ॥
काळाच्या परि त्या राये क्रोधरुप धरीयले ।
ऐकता शब्द ती पृथ्वी कंपोनी विनवीतसे ॥ २८ ॥
पृथ्वी म्हणाली -
(इंद्रवज्रा)
साक्षात्‌ हरी तू अवतारलासी
    निर्गूण ऐसा गुण दावितोसी ।
तुला न स्पर्शी गुणदोष कांही
    पुनःपुन्हा मी नमिते तुला रे ॥ २९ ॥
तू निर्मिता ही रचिलीस सृष्टी
    सर्वाश्रया तू परि वेगळाची ।
तू शस्त्र अस्त्रे वधिण्यास येता
    कोणापुढे मी शरणार्थ जाऊ ॥ ३० ॥
आरंभकल्पे लिन माययोगे
    रचूनि सृष्टी परितोषिली तू ।
तू धर्मवेत्ता मज गोरुपीला ।
    कोण्या प्रकारे वधितोस सांग ॥ ३१ ॥
तू एक ऐसा गमसी अनंत
    ब्रह्म्यास निर्मून सृष्टी रचीसी ।
सर्वेश्वराअज्ञ तुझ्या लिलांना
    न जाणती ते मतिमूढ मायें ॥ ३२ ॥
तू पंचभूता अन इंद्रियांना
    बुद्धी अहंकार रुपेचि शक्ती ।
योजूनि सारा करितोसि खेळ
    जगद्‌विधात्या तुज मी नमीते ॥ ३३ ॥
प्रभो अजन्मा रचिलेस भूतां
    इंद्रीय नी या जगतास स्थीत ।
करावया आदिवराह झाला
    रसातळातूनिहि काढिले तू ॥ ३४ ॥
उद्धार माझा किती एकवेळा
    केला नि नामो धरणीधरा हे ।
तुला मिळाले परि दूध ना दे
    म्हणोनि तू तो वधिसी मला कां ? ॥ ३५ ॥
मायें तुझ्या मोहित जीव सारे
    माझ्यापरी जे मुळि अज्ञ होती ।
नेणो तुझ्या नी तव भक्त लीला
    तू संयमी वीर तुला नमस्ते ॥ ३६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥ ४ ॥ १७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP