समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय १२ वा
ध्रुवाला कुबेराचे वरदान, विष्णुलोक प्राप्ती -
मैत्रेयजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
निवृत्त होता ध्रुव यक्षयुद्धी
कुबेर तेथे स्वय पातले नी ।
गाती तयां चारण यक्ष गाणी
ध्रुवे उठोनी प्रणिपात केला ॥ १ ॥
कुबेरजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
दुस्त्यज्य असुनी क्रोध क्षत्रिया त्यजिसी असा ।
तुझे हृदय ते शुद्ध प्रसन्न जाहलो तुला ॥ २ ॥
खरे तो तू न यक्षांना यक्षांनी तव बंधुला ।
मारिले नच तो काल एकमात्र विनाशक ॥ ३ ॥
मी-तूपण जिवालागी अज्ञाने भासते असे ।
या मळे दुःख बंधादी मनुष्य स्थिती भोगितो ॥ ४ ॥
ध्रुवारे म्हणुनी जावे भगवान् शुभ ते करो ।
संसारपाशमुक्त्यर्थ हरीची भजने करी ॥ ५ ॥
युक्त तो मोहशक्तीने परी तो मुक्त त्यातुनी ।
चरणांबुज त्याचेची योग्य सर्वांसि चिंतना ॥ ६ ॥
(इंद्रवज्रा)
ऐकून आम्ही हरिच्या समीप
तू राहसी नित्य पदास सेवी ।
मागी वराते तुज जे हवे ते
संकोच शंका त्यजुनी मनीची ॥ ७ ॥
मैत्रेयजी सांगतात -
धरी जधी आग्रह तो कुबेर
तेंव्हा ध्रुवो तो हरिच्या पदाची ।
राहो स्मृती हेच वरासि मागे
जेणे भवापारचि जीव होतो ॥ ८ ॥
(अनुष्टुप्)
इड्विडापुत्र राजाने प्रसन्ने भगवत्स्मृती ।
देताचि गुप्त तो झाला स्वराज्यीं ध्रुव लोटला ॥ ९ ॥
प्रचंड दक्षिणा देता आराधी यज्ञदेवता ।
द्रव्य क्रिया फलो यांचा दाता तो समजे मनी ॥ १० ॥
उपाधीशून्य सर्वात्मा भक्तिचे बळ पाहुनी ।
श्रीहरी सर्वव्यापी तो ध्रुवामाजी विराजला ॥ ११ ॥
शीलवान् ब्राम्हणोभक्त ध्रुव तो दीनवत्सल ।
धर्माज्ञा पाळुनी राही प्रजापाळी पित्यासम ॥ १२ ॥
ऐश्वर्य भोग पुण्याचे भोग यज्ञेचि त्यागिण्या
साठी तो पापनाशार्थ योजुनी कर्म आचरी ।
छत्तिस् हजार वर्षे तै पृथ्वीचे राज्य तो करी ॥ १३ ॥
जितेंद्रिय ध्रुवे तेंव्हा धर्मार्थ काम योजुनी ।
करिता राज्य हे ऐसे राज्य ते उत्कला दिले ॥ १४ ॥
प्रपंच सगळा भास गंधर्व नगरी जसी ।
स्वप्नवत् मानिली त्याने अविद्ये रचिता अशी ॥ १५ ॥
(वसंततिलका)
स्त्रीयानि पुत्र तनु सैन्यानि मित्र द्रव्य
अंतःपुरे नि बगिचे सगळेचि विश्व ।
सारेचि काळ भवर्या मधि गुंतलेले
त्यागुनिया बदरिकेश्वरि तो निघाला ॥ १६ ॥
स्नानास तेथ करुनी मग शांत झाला
प्राणासि रोधुनि मना हरिरूप योजी ।
ध्यानात तो हरपला नच ध्येय ध्याता
ब्रह्मातुनी हि परता मग शून्य झाला ॥ १७ ॥
दाटूनि भक्ति मनि नेत्र पुरास वाहे
रोमांच अंगि उठले ह्रदयो द्रवोनी ।
देहभिमान सगळा गळाला मनीचा ।
मी ‘ध्रुव’ ही हि नच राहिलि ती स्मृती की ॥ १८ ॥
(अनुष्टुप्)
आकाशी ध्रुव तै पाही विमान श्रेष्ठ सुंदर ।
दिशा तैं व्यापिल्या तेजे पोर्णिमाशशि पै तदा ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
चतुर्भुजी दोन तयात दूत
जे श्यामवर्णी कमलाक्ष लाल
हाती गदा त्या तरुणाहि होत्या
किरीट वस्त्रादि अलंकृती जे ॥ २० ॥
अधीर तो ध्रूव बघे तसांची
पूजाक्रमादी विसरुनि सारे ।
करुनि नामस्मरणा हरीच्या
करांसि जोडूनि नमी तयांना ॥ २१ ॥
तल्लीन झाला हरिच्या पदासी
जोडूनि हातास विनम्र राही ।
सुनंदनंदे हरिपार्षदांनी
समीप जाता वदले हसोनी ॥ २२ ॥
नंद व सुनंद म्हणाले -
(अनुष्टुप्)
राजा ! कल्याण हो सारे ऐक सावध होउनी ।
पाचव्या वर्षि तू विष्णू केलासी की प्रसन्न तो ॥ २३ ॥
त्या जगन्नाथ विष्णूचे आम्ही सेवकची असो ।
श्रेष्ठ त्याच्याचि धामासी तुला नेण्यास पातलो ॥ २४ ॥
(इंद्रवज्रा)
दुष्प्राप्य विष्णूपद जिंकिले तू
जेथे न सप्तर्षि कधीच गेले ।
प्रदक्षिणा घालिति सूर्य चंद्र
त्या विष्णूधामा निवसी पुढे तू ॥ २५ ॥
(अनुष्टुप्)
कोणीही पितरे तेथे कधीही नच पोंचले ।
भगवान् विष्णूचे धाम जगासी वंदनीय की ।
चलावे तिकडे आणि विराजावे तये पदीं ॥ २६ ॥
पुण्यश्लोक हरीने हे विमान तुज साठिच ।
धाडिले चढणे यात आयुष्मन् पात्र तू तसा ॥ २७ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
अमृतवाणी अशि ऐकिताची
स्नानादि संध्या करुनी पुन्हा तो ।
मांगल्य ते भूषण घेउनीया
आशीष घेई मुनि वंदुनीया ॥ २८ ॥
(अनुष्टुप्)
विमान पूजुनी त्याने प्रदक्षिणाहि घातली ।
पार्षदा नमुनी देह कांतिमान् घेतला तदा ॥ २९ ॥
ध्रुवाने मूर्तिमान् काल समोर देखिला तदा ।
मृत्युशिरीं पदा ठेवी विमानी दिव्य बैसला ॥ ३० ॥
आकाशी दुंदुभी भेरी मृदंग ढोल वाजले ।
श्रेष्ठ गंधर्व गावोनी फुलेही वर्षु लागले ॥ ३१ ॥
निघता भगवत् धामा मातेला आठवी मनीं ।
म्हणे मनी “तिला येथे ठेवुनी जाउ मी कसा” ॥ ३२ ॥
सुनंदनंदने सारा ध्रुवाचा हेतु जाणिला ।
दाविली सुनिती माता विमानी दुसर्या तदा ॥ ३३ ॥
क्रमाने ग्रह ते सर्व पाहिले जै प्रशंसिती ।
विमानी बसुनी देव यांना पुष्पेहि अर्पिती ॥ ३४ ॥
त्रिलोक पार ते झाले विमानी दिव्य बैसुनी ।
सप्तर्षिच्यावरी गेले भगवान् विष्णुधामि त्या ।
अविचला गती तेंव्हा अशी त्यालाचि लाभली ॥ ३५ ॥
(इंद्रवज्रा)
स्वयं प्रकाशी परिनित्य धाम
तेणे प्रकाशीत तिन्हीहि लोक ।
हिंसी तिथेना कधि पोचतात
भूतीं दया तोचि पदास जातो ॥ ३६ ॥
(अनुष्टुप्)
समदर्शी शुद्धशांत जिवांना मोद देत जो ।
सुह्रद् मानितो भक्त तोचि या धामि पावतो ॥ ३७ ॥
उत्तानपादराजाचा यापरी पुत्र तो ध्रुव ।
चुडामणी अशा लोकी विराजमान जाहला ॥ ३८ ॥
खळ्यात बांधिता बैल चौबाजू फिरती जसे ।
सुवेगे ज्योतिषीचक्र पदा या फेरिती तसे ॥ ३९ ॥
पाहुनी महिमा त्याची देवर्षि नारदे विणें ।
प्रचेता यज्ञशालेत गायिले तीन श्लोक हे ॥ ४० ॥
नारदजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
पतिव्रता त्या सुनिताकुमारे
तपे ध्रुवाने गति मेळवीली ।
त्यजूनि भक्ती मुनिसी मिळेना
राजास यज्ञी मग काय लाभ ॥ ४१ ॥
सावत्रमाता कटुशब्द देता
तो पाचवर्षीय वनी निघाला ।
माझ्याचि बोधे मिळवी हरी ते
जो भक्तिला वश्य अवश्य होतो ॥ ४२ ॥
त्या पाचवर्षीय ध्रुवे तपाने
थोड्या दिनी ते पद श्रेष्ठ प्राप्त ।
केले, असे ना कुणि थोरल्याने
तपे करोनी कधि मेळवीले ॥ ४३ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
विदुरा ! कीर्तिमान् ध्रूव कथा जी पुसली मला ।
संपूर्ण वदलो तुम्हा साधू नित्य प्रशंसिती ॥ ४४ ॥
आयुवृद्धी धन येश वाढवी मंगलप्रदा ।
स्वर्गादि पद ते श्रेष्ठ लाभते ऐकता कथा ॥
देवत्व लाभते आणि समस्त पाप नासते ॥ ४५ ॥
श्रद्धेने ऐकता नित्य भगवद्भक्ति लाभते ।
जेणे सर्व अशी दुःखे श्रवणे नाश पावती ॥ ४६ ॥
गुणा शीला महत्तत्वा इच्छिता स्थान लाभते ।
इच्छिता वाढते तेज मनस्व्या मान वाढतो ॥ ४७ ॥
पवित्र ध्रुवकीर्तीला सायं प्रातः स्मराद्विज ।
समाजी एकचित्ताने वर्णावे गुण आवडी ॥ ४८ ॥
निष्काम भाव ठेवोनी भक्त जो करितो कथा ।
पोर्णिमा नी अमावास्यीं द्वादशी नी तिथीक्षयी ॥ ४९ ॥
श्रवण व्यतिपातात संक्रांती रविवारि ही ।
आत्मासंतुष्टची होतो सिद्ध ही होतसे पहा ॥ ५० ॥
ज्ञानामृत असे साक्षात् अनभिज्ञासि सांगता ।
दीनवत्सल त्या भक्ता देवता पावती सदा ॥ ५१ ॥
(इंद्रवज्रा)
ध्रुवाचिये कर्म प्रसिद्ध शुद्ध
खेळासि त्यागूनि वनासि जातो ।
श्री विष्णुपाया स्मरतो मनात
पवित्र कीर्ती तुज बोललो ही ॥ ५२ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ ४ ॥ १२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|