समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय १३ वा
ध्रृवाच्या वंशाचे वर्णन, राजा अंगचे चरित्र -
सूतजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
श्री शौनका ! मैत्रमुनी मुखीचे
विष्णुपदा ध्रूव चढोनि गेला ।
ऐसी कथा ऐकुनि त्या विदुरे
दाटोनि भक्ति पुसलेहि प्रश्न ॥ १ ॥
विदुरजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
प्रचेते कोण ते आणि कुणाचे पुत्र ते असो ।
कोणत्या वंशिचे होते केला यज्ञ कुठे तये? ॥ २ ॥
नारदे भगवद्भक्ते पंचरात्र पुजाविधी ।
निर्मिली बोधिली लोकां श्रीहरी योग साधण्या ॥ ३ ॥
प्रचेता ते जधी यज्ञीं अराधुनिहि श्रीहरी ।
स्वधर्म पाळिला तेंव्हा नारदे ध्रुव गायिला ॥ ४ ॥
देवर्षिंनी तिथे ज्या ज्या भगवन् गायिल्या कथा ।
सर्व त्या मज सांगाव्या मी तो उत्सुक ऐकण्या ॥ ५ ॥
श्री मैत्रेयजी म्हणाले -
महाराजा वनामाजी जाता त्या पुत्र उत्कले ।
राजसिंहासना आणि वैभवा त्यागिले असे ॥ ६ ॥
जन्मता शांत तो चित्ती आसक्तीशून्यची असा ।
समदर्शी बघे सर्वां सर्वांना स्वयिं ही बघे ॥ ७ ॥
त्याचे ते वासना क्लेश योगाग्ने भस्म जाहले ।
त्यामुळे शुद्ध बोधाने आनंद व्याप्त पाहि तो ॥ ८ ॥
अभेद ब्रह्म रूपाला आपुले पाहि नित्य ही ।
आत्म्याहुनी निराळे ते कांहीही न दिसे जनीं ॥ ९ ॥
सामान्य स्थळ नी मार्गी वेडा मूर्ख नि अंधही ।
भासे अज्ञानि लोकांना परी तो नव्हता तसा ॥ १० ॥
भ्रमिष्ट जाणुनी त्याला मूर्ख जे कुलमंत्रि ते ।
तयांनी भ्रमि पुत्राला वत्सरा अभिषेकिले ॥ ११ ॥
स्वर्वीथि पत्नि ती त्याची तिच्या पोटी सहा मुले ।
पुष्पार्ण तिग्मकेतू नी इष ऊर्जा वसू जय ॥ १२ ॥
प्रभा दोषा अशा दोघी पुष्पार्णा प्रिय पत्नि त्यां ।
प्रातः मध्यांदिन सायं झाले ते तीन पुत्रची ॥ १३ ॥
प्रदोष निशिथ व्युष्ट दोषाला पुत्र तीन ते ।
व्युष्टा पुष्करणी पोटी सर्वतेजाचि जाहला ॥ १४ ॥
तयाची आकुती पत्नी हिने चक्षूस जन्मिले ।
चाक्षूष मन्वंतरचा हाच तो मनु जाहला ॥ १५ ॥
नड्वला चक्षुची पत्नी हिला कुत्स पुरू त्रित ।
सत्यवान् नी द्युम्न ऋतो अग्निष्टोम व्रत शिबी ।
प्रद्युम्न नी अतिरात्र अल्मुक पुत्र जाहले ॥ १६ ॥
त्यात उल्मूक पत्नीजी पुष्करिणी हिने पुढे ।
अंग गय क्रतू ख्याती अंगिर सुमना असे ॥
जन्मिले त्या सहा पुत्रा उत्तम गुणि सर्व ही ॥ १७ ॥
अंग पत्नी सुनीथाने वेनला जन्म तो दिला ।
त्याच्या त्या क्रूरकर्माने अंगाने राज्य त्यागिले ॥ १८ ॥
वज्राच्या परि ते श्रेष्ठ मुनींचे बोलणे असे ।
शापाने मरता वेन राजा कोणी न राहिला ॥ १९ ॥
चोरांनी लुटिता लोक प्रजा सर्वहि कष्टली ।
लोकांनी पाहुनी सारे वेनाची उजवी भुजा ॥
मंथिता पृथु हा त्यात विष्णु अंशचि जन्मला ॥ २० ॥
विदुरजीने विचारिले -
ब्रह्मन् अंग महाराज साधू नी शीलवान असे ।
द्विज भक्त महात्म्याला कुपुत्र जाहला कसा ।
जयाच्या कारणे त्याने त्यागिले नगर प्रिय ॥ २१ ॥
राजदंडाधिकारी त्या वेनाचा काय दोष तो ।
धर्मज्ञ मुनिने त्यासी ब्रह्मदंड कशां दिला ॥ २२ ॥
प्रजेचा धर्म तो राजा पापी ही जरि जाहला ।
तिरस्कार करावा ना धरि तो सर्व तेज ही ॥ २३ ॥
ब्रह्मन् भूत भविष्याते सांगण्या श्रेष्ठची तुम्ही ।
म्हणुनी वेन राजाची कथा सांगा सविस्तर ॥ २४ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
एकदा अंग राजाने अश्वमेध असा महा ।
योजिता भाग घेण्याला देवता नच पातल्या ॥ २५ ॥
स्तिमीत ऋत्विजे होता यजमानास बोलले ।
राजा रे! घृत इत्याई पदार्था देवता न घे ॥ २६ ॥
हविष्य ते नसे राजन् दूषीत तुम्हि भाविक ।
आणिले मंत्र ही सारे बलवान् वेदमंत्र ते ॥
ऋत्वीज पाळती सारे नियमा विधिपूर्वक ॥ २७ ॥
यज्ञीं या देवतांचा तो तिरस्कार मुळीच ना ।
कर्माध्यक्ष तरी देव भाग तो कां न घेत की ॥ २८ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
द्विजबोलासि ऐकोनी उदास अंग जाहला ।
याजकांच्या अनुमत मौन सोडोनि बोलला ॥ २९ ॥
सदस्यांनो न ते देव येती वा सोम ना पिती ।
सांगा माझ्या करें काय अपराध घडे असा ॥ ३० ॥
सदस्य म्हणाले -
राजन्! या जन्मि तो कांही चुकला नच तू मुळी ।
हां! पूर्व जन्मिच्या दोषे पुत्र ना तुजला पहा ॥ ३१ ॥
होवो कल्याण ते सारे ! उपाये पुत्र मेळवी ।
पुत्र इच्छोनिया यज्ञ करिता शक्य हे असे ॥ ३२ ॥
संतान इच्छुनी यज्ञ करिता पुरुषोत्तम ।
यज्ञात येइ निश्चीत देवता भाग घेतिल ॥ ३३ ॥
भक्त जे मागती त्याते तो ते निश्चीत देतसे ।
ज्यापरी भजतो त्याला त्यापरी फल देतसे ॥ ३४ ॥
या परी अंग राजाने पुत्र प्राप्त्यर्थ यज्ञ तो ।
करिता पशुचा आला यज्ञ रूपात श्रीहरी ।
पूजनार्थ पुरोडाश नामे चरू समर्पिला ॥ ३५ ॥
देताचि आहुती कुंडी सुवर्णहार श्वेत ते ।
वस्त्रांनी शोभला ऐसा पुरुष खिर घेउनी ॥
सोन्याचे पात्र घे हाती सिद्ध तो जाहला असे ॥ ३६ ॥
उदार अंगराजाने घेता याजक संमती ।
ओंजळीत क्षिरो घेता हुंगोनी पत्निला दिली ॥ ३७ ॥
वांझ राणी तदा सेवी पुत्रदा क्षीर जी अशी ।
समागमे पतीच्या तै एक तो पुत्र जाहला ॥ ३८ ॥
बाल्यावस्थीच मातेच्या वंशाच्या परि वागला ।
सुनीथी मृत्युची पुत्री तेणे तो पापि जाहला ॥ ३९ ॥
व्याधाच्या परि तो बाळ बाणेची हरिणे वधी ।
पाहता त्याजला लोक ओरडती वेन तो पहा ॥ ४० ॥
होता तो निर्दयी क्रूर खेळता ते सवंगडी ।
पशूच्या परिही मारी बाणाने आपुल्याच की ॥ ४१ ॥
पुत्राची दुष्टता ऐसी रोखण्या नृप तो तसे ।
प्रयत्न करिता व्यर्थ होताची खिन्नला मनीं ॥ ४२ ॥
मनात म्हणि तो ज्यांना पुत्र ना भाग्यवान ते ।
कुपुत्र जन्मता चाळे क्लेश तो न सहेच की ॥ ४३ ॥
ज्याच्या त्या करणीने त्या पित्रांचे येश नासते ।
भागी ही पाप वाट्याचा उलटे होतसे कसे ॥ ४४ ॥
अखंड क्लेश लाभेल घर ही दुःखि होतसे ।
सूज्ञ ना पुरवी लाड आत्म्याचा बंध तो असे ॥ ४५ ॥
कुपुत्र चांगला कां की गृहनर्क सुखे सुटे ।
सुपुत्रे न सुटे मोह भवात पडणे पुन्हा ॥ ४६ ॥
(इंद्रवज्रा)
अंगांविचारे नच झोप आली
वैराग्य घेवोनि उठोनि गेला ।
निद्रीत होती सुनिथा तदा ती
सोडोनि मोहा वनिं तो निघाला ॥ ४७ ॥
प्रजेस जेव्हां कळलेचि सारे
मंत्री पुरोहीत तसेच मित्र ।
शोकाकुळे शोधिति सृष्टि सारी
शोधी जसा अज्ञ हरीस बाह्य ॥ ४८ ॥
स्वामी तया ना मिळता कुठेची
आले पुरा सर्व पुसोनि नेत्र ।
निराश होविनि जिथे मुनी ते
एकत्र होते वदले तसेच ॥ ४९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ ४ ॥ १३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|