समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ११ वा

युद्ध बंद करण्यासाठी स्वायंभूव मनू ध्रुवास समजावतात -

मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
ऋषिंचे ऐकता बोल आचम्य करुनी ध्रुवे ।
नारायणास्त्र बाणाला स्थापुनी धनु ताणिले ॥ १ ॥
क्षणात यक्षमायावी जाळ ते नष्ट जाहले ।
अविद्या नष्टते जैसी ज्ञानाच्या उदये तसे ॥ २ ॥
(इंद्रवज्रा)
अस्त्रा तदा त्या धनुसीच घेता
    फळेसुवर्णी अन हंसपंखी ।
केकारवाते करिताच कैक
    निघोनिया तीर शत्रूत गेले ॥ ३ ॥
घायाळ शत्रू तयि तीक्ष्ण बाणे
    होताचि सारे बहु क्रोधले की ।
गरुड सर्पा जयि तो सळीतो
    सर्पापरी धावुनि यक्ष आले ॥ ४ ॥
तेंव्हा तयां बाण वेधे ध्रुवाने
    तोडोनिया हात नि पाय खांदे ।
त्या श्रेष्ठ लोकांत फेकोनि देई
    जेथे रहाती मुनि थोर नित्य ॥ ५ ॥
स्वायंभुवे तो ध्रुव पाहिला तै
    यक्षासि मारी उगिच्या उगीच ।
दयार्द्र भावे ऋषि घेउनीया
    ध्रुवास बोले समजावुनीया ॥ ६ ॥
मनूजी (स्वायंभुव) म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
थांब थांब मुला जास्त क्रोध तो नर्कद्वार की ।
अपराधाविना यक्षा मारिसी क्रोधि हो‌उनी ॥ ७ ॥
निर्दोष यक्षसंहार करिसी कुळधर्म ना ।
बापा ! साधू अशा कृत्या नित्यची बहु निंदिती ॥ ८ ॥
बंधुप्रेम तुझे योग्य परी संतप्त हो‌उनी ।
एका दोष्यासि क्रोधोनी किती हे मारले जीव ॥ ९ ॥
तनू जड तिला आत्मा मानुनी पशुच्या परी ।
करणे जीवहिंसा ही न साधू-भक्त मार्ग की ॥ १० ॥
कठीण प्रभुची भक्ती परी तू बालशा वयीं ।
सर्वभूतात्मभावाने तयाचे पद घेतले ॥ ११ ॥
प्रभूचा प्रिय तू भक्त भक्तही वंदिती तुला ।
भक्तशिरोमणी तू तो केले निंद्य कसे असे ॥ १२ ॥
सर्वात्मा श्रेष्ठ व्यक्तींना दावी सहनशीलता
सानासी तो दया दावी समान मित्रता तसी ।
समता धरिता चित्ती प्रभू तो नित्य पावतो ॥ १३ ॥
प्रसन्न प्रभु तो होता प्राकृती गुण कर्म ते ।
लिंगदेहातुनी जाती ब्रह्मानंदचि राहतो ॥ १४ ॥
भेदाने पंचभूतांच्या स्त्री नी पुरुष भेद ते ।
पुन्हा समागमे त्यांच्या स्त्री नी पुरुष जन्मती ॥ १५ ॥
प्रमाणे गुण सत्वादी जीवांना देह लाभतो ।
स्थिती नी लयही होतो गुणांचा भाव वेगळा ॥ १६ ॥
निमित्तमात्र तो आहे सृष्टि त्याचीच आश्रिता ।
फिरते अधिने त्याच्या चुंबका लोह ते जसे ॥ १७ ॥
(इंद्रवज्रा)
ती कालशक्ती क्रमुनी गुणांच्या
    क्षोभेचि सृष्टी परि भिन्न भासे ।
कर्ताहि भासे असुनी अकर्ता
    अचिंत्य ऐशा भगवंत लीला ॥ १८ ॥
(अनुष्टुप्‌)
अव्ययो कालरूपात्मा स्वयं तो करितो लय ।
अनादी आदि कर्ता तो निर्मितो मारितो पुन्हा ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
सृष्टीत राही सम तो प्रविष्ट
    ना कोणी शत्रू अन मित्र त्याला ।
वायूसवे जै धुळ धावती तै
    कर्माधिनी जीव फळास भोगी ॥ २० ॥
(अनुष्टुप्‌)
जीवांची आयुवृद्धी नी क्षयही श्रीहरी करी ।
दोन्हींच्या वेगळा तो नी स्वरुपी स्थित नित्यची ॥ २१ ॥
राजा ! या परमात्म्याला मिमांसी कर्म नी तसे ।
चार्वाकीय स्वभावो नी वैशेषिकहि काल त्या ॥
ज्योतिषी दैव नी कामी काम त्यासीच बोलती ॥ २२ ॥
विषयातीत तो आहे शक्तिंचा उद्‌गमो तसा ।
न कळे काय इच्छी तो न जाणे प्रभुसी कुणी ॥ २३ ॥
मुला हे तो कुबेराचे अनुचर यये तुझा ।
बंधु तो मारला नाही ईश्वरेच्छाचि सर्व ती ॥ २४ ॥
एकटा रचितो सृष्टी पोसितो मारितो पुन्हा ।
अहंकार नसे त्याला निर्लेप गुण-कर्मिं तो ॥ २५ ॥
आंतरात्मा नियंता नी रक्षको प्रभु आपुल्या ।
मायेने सृजतो जीवा पाळितो मारितो तसा ॥ २६ ॥
(इंद्रवज्रा)
धाके पशू बोझ जसे वहाती
    तसेचि ब्रह्मादि भिती तयाला ।
पाप्यास शत्रू भजकास छत्र
    बापा ! तयाच्या शरणीच राही ॥ २७ ॥
तू पाचवर्षी शिशु आसताना
    मातेसि सोडोनि वनास गेला
अराधुनी तेथ हरी कडोनी
    त्रैलोकि मोठे पद मेळवीले ॥ २८ ॥
वात्सल्य भावेचि तुझ्या हृदीं तो
    विराजला मुक्त विशेष रूपे ।
शोधी तयाला तव अंतरात
    प्रतीत होतो जरि निर्विकार ॥ २९ ॥
(वसंततिलका)
तो शक्तिशालि भगवान्‌ परमात्म ऐसा
    आनंदरूप स्मरता दृढ होय भक्ती ।
त्याचा प्रभाव पडता मग मीपणाची
    भंगेल गाठ पुरती जरि अज्ञ मोठी ॥ ३० ॥
(अनुष्टुप्‌)
राजा ! मी बोललो ज्ञान रोगासी औषधी जसी ।
विरोधी क्रोध कल्याण तुझे देव भले करो ॥ ३१ ॥
क्रोध्याचे भय सर्वांना न भ्यावे जीव कोणते ।
कोणाचे भयही ना हो इच्छिती ज्ञानि ते सदा । ३२ ॥
बंधू तो आपुला यक्षे मारिला वाटते तुला ।
अपराध तुझ्या हाते कुबेराचाचि जाहला ॥ ३३ ॥
कुळाचे तेज तो सारे लुटण्यापूर्वि त्याजला ।
वत्सा ! नम्रचि शब्दाने प्रसन्न शीघ्रची करी ॥ ३४ ॥
यापरी नातवाला त्या मनूने शिकवीयले ।
ध्रुवाने नमिता सर्वां स्वलोकी सर्व पातले ॥ ३५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥ ४ ॥ ११ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP