समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय ६ वा
ब्रह्मादी देवता कैलासी जाऊन महादेवाची मनधरणी करतात -
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
या परी रुद्रसेने ने देवता हरवीयल्या ।
गदा चक्रे त्रिशूळाने खड्गाने विंधुनी तदा ॥ १ ॥
विंधिले भूत प्रेतांनी तेंव्हा ते ऋत्विजांसह ।
ब्रह्माजी पासि जावोनी बोलले वृत्त सर्व हे ॥ २ ॥
ब्रह्माजी आणि श्रीविष्णु अंतरी सर्व जाणिती ।
जाणिता दक्षयज्ञात नव्हते पातले तदा ॥ ३ ॥
ऐकुनी सर्व या गोष्टी बोलले ब्रह्मदेवजी ।
जरी समर्थ चुकला दंडीता त्यास ना भले ॥ ४ ॥
(इंद्रवज्रा)
त्या यज्ञभागा नच अर्पुनीया
तै शंकराचा अवमान केला ।
त्वरीत होतो शिवची प्रसन्न
त्या शुद्ध चित्ते पदि जा तयाच्या ॥ ५ ॥
दक्षाचिया शब्दतिरेचि दुःखी
पुन्हा वियोगी प्रिय त्या सतीचा ।
त्या याग पूर्तीस पदासि जा त्यां
ना तो खरे कांहि नसेचि लोकां ॥ ६ ॥
स्वतंत्र तो रुद्र न जाणिती ते
सामर्थ्य त्याचे ऋषि देव इंद्र ।
ना मीहि जाणी मग कोण अन्य
मात्रा कुणाची नचले शिवासी ॥ ७ ॥
बोलोनि ऐसे पितरां सवे ते
प्रजापती घेउनिया निघाले ।
कैलासधामी प्रिय त्या हराच्या
त्या देवता घेउनि पातले ते ॥ ८ ॥
(अनुष्टुप्)
औषधी तप मंत्रादी योगसिद्ध जिथे सदा ।
राहती देवता सिद्ध गंधर्व अप्सरा तशा ॥ ९ ॥
विवीध धातुची ऐसे शोभती शिखरे-मणी ।
शोभले वृक्ष नी वेली झुंडीने पशु राहती ॥ १० ॥
वाहती स्वच्छ ते ओढे कित्येक गिरिकंदरे ।
सिद्ध नी सिद्ध पत्न्यांचे क्रीडांगणचि जाहले ॥ ११ ॥
केका तो मयुरांचा नी भुंग्यांचे गुंजणे तसे ।
किल्बील पाखरांची नी कोकील ध्वनी तो कुहूऽऽ ॥ १२ ॥
जणू कल्पतरू पक्ष्यां फांद्यांनी बाहती सदा ।
हत्तीच्या पदि तो चाले बोले कैलास निर्झरीं ॥ १३ ॥
मंदार पारिजातो नी तमाल शाल ताड नी ।
अर्जून कचनारो नी सरलो वृक्ष आसनी ॥ १४ ॥
कदंब आम्र नी नाग पुन्नाग नीप चंपक ।
गुलाबशोक नी कुंद सोनेरी शतपत्र ते ॥ १५ ॥
वेलची मालती वेली मोगरा पुष्पसाजिरा ।
वाढवी माधवी शोभा कैलासी सर्वदा अशी ॥ १६ ॥
कटहल् गुजरी भोज पिंपरी वट पिंपळ ।
गुगुळ औषधीवृक्ष सुपारी राजपुग नी ॥ १७ ॥
बदाम खारका आंबे पियाल मुहुआ तसे ।
बांबू नी वेत यांनी तो मोठा रम्यचि भासतो ॥ १८ ॥
शतपत्र नि कल्हार उत्पलो कुमुदो अशा
विवीध कमळांनी तै फुललेली सरोवरे ।
शोभेने ते तिथे भृंग थव्यांनी कुंजती सदा ॥ १९ ॥
सर्वत्र हरिणे वाघ वानरे सूकरे रिसे ।
सिंह साही निलगायी शरभो कृष्णमृग ते ॥ २० ॥
रेडे सायाळ कोल्हे नी अश्वमुख नि लांडगे ।
तळ्याच्या तिरि ती कैक मोठी शोभाच वाढली ॥ २१ ॥
त्याच्या चारी दिशांना श्रीनंदा ही वाहते नदी ।
जिच्या पवित्र स्नानाने सुगंधी तनु होतसे ॥
भगवान् शंकराचा तो कैलासीचा निवास हा ।
आश्चर्य वाटले देवा पाहता रमणीयता ॥ २२ ॥
अलकापुरि ती रम्य देवांनी पाहिली तिथे ।
सौगंधी पद्म पाण्यात सुगंधी वन पाहिले ॥ २३ ॥
नंदा तैसी अलक्नंदा नद्या दोन्हीहि वाहती ।
श्रीहरीपदतीर्थाने पवित्र जाहल्या अशा ॥ २४ ॥
घरी रतिक्रिडेने ज्या थकल्या देव अंगना ।
इथे त्या जमती स्नाना प्रियासी फेकिती जळ ॥ २५ ॥
धुतल्या स्तनिचे कुंकु तयाने पिवळे जळ ।
तहान नसता हत्ती गंध लोभेचि प्राशिती ॥ २६ ॥
सोने चांदी नि रत्नांची विमाने शेकडो तिथे ।
ढग विजांपरी भास यक्ष पत्न्या निवास जे ॥ २७ ॥
कुबेर नगरी ऐसी सोडुनी देवता पुढे ।
सपुष्पपर्ण शोभेच्या सौगंधी वनि पातले ॥ २८ ॥
कोकिलादि खगांचा जै किल्बिलाट सदा असे ।
गुंजती भृंग ते नित्य हंस पद्मे तळ्यात ती ॥ २९ ॥
वनात घासिती अंग हत्ती चंदनवृक्षला ।
त्या गंधे यक्ष पत्नींची मने धुंदचि होत की ॥ ३० ॥
वैडुरी पायर्या होत्या बारवांना सुशोभित ।
शोभले कैक तै पद्म वटवृक्ष पुढे महा ॥ ३१ ॥
योजने शत उंचा नी शाखा पाऊणभाग त्या
स्थीर ती सावली होती घामाचा त्रास ना जिथे ।
खोपेही नव्हती कोठे पक्षांचे मुळि तेथ की ॥ ३२ ॥
महायोग्यासि आधार वृक्षाच्या तळि शंकर ।
भगावान् शांत तो जैसा काळाच्या परि भासला ॥ ३३ ॥
भगवान् भूतनाथाचे श्रीअंग शांत भासले ।
सनकादिक नी सिद्ध कुबेर सेविती तया ॥ ३४ ॥
जगत्पती महादेव सुहृदो जगतास या ।
स्नेहार्द्र सर्व जीवांना लावितो ध्यान सर्वदा ॥ ३५ ॥
सायंमेघापरी कांती शरीरी भस्म दंड नी ।
जटा मृगचर्माते चंद्राते मस्तकी धरी ॥ ३६ ॥
दर्भासनी बसोनीया श्रोत्यामध्येच नारदे ।
पुसल्या कांहि प्रश्नांना ब्रह्मज्ञानासि बोधितो ॥ २७ ॥
उजव्या मांडिसी डावा पाय ठेवोनि बैसला
डाव्या हातास डाव्याची गुडघ्यावरि ठेविला ।
बगलीं अक्षमालांना सारुनी तर्क मुद्रित ॥ ३८ ॥
(इंद्रवज्रा)
तो योगपट्टीसचि टेकुनीया
तल्लीन ब्रह्मास मनात सेवी ।
तेंव्हा समस्ते कर जोडुनीया
त्या देवतांनी नमिले हराला ॥ ३९ ॥
पाहूनि ब्रह्म्यासि शिवे त्वरीत
उठोनि वाकोनि प्रणाम केला ।
जै विष्णुने कश्यप वंदियेला
त्या वामनाचा अवतार घेता ॥ ४० ॥
तसेचि सिद्धेनि महर्षि यांनी
ब्रह्म्यासि तेंव्हा नमिले उठोनी ।
ब्रह्मा तसा राहुनि नम्र भावे
त्या चंद्रमौळीस उठोओनि बोले ॥ ४१ ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
(अनुष्टुप्)
तुला मी जाणितो देवा जगाचा स्वामी तूचि की ।
विश्वाची योनि नी बीज यां परा परब्रह्म तू ॥ ४२ ॥
भगवन् शिवशक्तीच्या तैसे संहार साधिता पुन्हा ॥
जसा तो क्रीडतो कीट जाळे गुंफोनि मोडितो ॥ ४३ ॥
(इंद्रवज्रा)
प्राप्यर्थ धर्मार्थ नि वेदअंगा
दक्षा निमित्ते तुचि वेद झाला ।
चारीहि वर्णा तुचि बांधियेले
सीमा तयाची द्विज पाळितात ॥ ४४ ॥
तू साधितो मंगल मंगलाचे
तो स्वर्ग किंवा निज मोक्ष देसी ।
पाप्यासि नर्कातुचि टाकितो नी
कुणा कुणा हे उलटेचि कैसे ॥ ४५ ॥
जो अर्पितो देह तुझ्या पदासी
अभेद दृष्टी अशि त्यास लाभे ।
जीवात सर्वेश शिवस्वरूप
त्यां भेदबुद्धी नि कर्मो रमे जो ॥ ४६ ॥
भले दुजांचे न मुळीच साहे ।
जो मर्मभेदी दुखवी दुजाला
त्या मारणे तुम्हि तसाचि धर्म ॥ ४७ ॥
हे देवदेवा भगवंत माये
मोहोनि जाता मग भेद होय ।
साधू अशांना करिती कृपा की
दैवास कोणी नच थांबवीतो ॥ ४८ ॥
न स्पर्शि माया तुज जाणत्यासी
तरी जयांचे मन कर्ममार्गी ।
होती तयांच्या कडुनी चुकाही
कृपा तयांशी तुचि रे करावी ॥ ४९ ॥
तू मूळ सर्वां यजनास पूर्ण
तूची करीशी अन भाग घेसी ।
न भाग देताचि विध्वंस झाला
त्या यज्ञपूर्तीस कृपा करावी ॥ ५० ॥
(अनुष्टुप्)
यज्ञाचा यजमान् दक्ष व्हावा जीवीत ते करा ।
भगाला नेत्र ते यावे भृगूला दाढि नी मिश्या ॥
पूषासी दात ते यावे पूर्वीच्या समची दुजे ॥ ५१ ॥
अस्त्र शस्त्रे नि पाषाणे देवता ऋत्विजासही ।
जखमा जाहल्या अंगी व्हाव्या त्याही बर्या पुन्हा ॥ ५२ ॥
यज्ञाचा शेष जो भाग आपुला सर्व तो असे ।
यज्ञस्ते यज्ञभागाने यज्ञ हा पूर्ण होऊ दे ॥ ५३
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥ ४ ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|